पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा जगभरात निषेध झाला. पाकिस्तानसह अमेरिका, चीन आदी देशांनीही तो केला, पण पुढे काय? हितसंबंध आड आले की उक्ती आणि कृती यांच्यातील अंतर रुंदावते. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाविरोधातील लढय़ात हाच मोठा धोका ठरला आहे. या वेळीही असेच घडेल का? असा प्रश्न पुलवामा हल्ल्यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी ‘जैश-ए-महम्मद’ ही दहशतवादी संघटना मूळची पाकिस्तानची. आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानने २००२ मध्ये या संघटनेवर बंदीही घातली. मात्र ही संघटना पाकिस्तानातूनच सक्रिय आहे, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या ‘काश्मीर अटॅक कुल्ड प्रॉम्प्ट क्रायसिस इन साऊथ एशिया’ या लेखात म्हटले आहे. हा हल्ला पाकपुरस्कृत असल्याचा आरोप भारत करू लागल्याने या संघटनेचा म्होरक्या मसूद अझरला पाकिस्तान अटकही करील, मात्र याआधीही मसूद अझरला अटक करून पाकिस्तानने त्याची सुटका केली होती, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. शिवाय याप्रकरणी आता पाकिस्तानने चौकशी करण्याची तयारी दाखवली तरी त्यातून फारसे काही साध्य होणार नाही. कारण पाकिस्तानच्या चौकशीच्या विश्वसनीयतेवर याआधीही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दाखला लेखात देण्यात आला आहे.

मसूद अझर आणि तालिबान यांच्यातील सख्य सर्वज्ञात आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानात तालिबानशी चर्चा सुरू असताना हा हल्ला झाल्याने अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तालिबानसोबतच्या या शांतता चर्चेत अमेरिका ही पाकिस्तानची मदत घेत आहे. अमेरिकेचे लष्कर अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेच्या दक्षिण आशियाबाबतच्या धोरणात पाकिस्तानचे महत्त्व वाढेल. त्यामुळे भारताशी दीर्घकालीन संबंधांचा विचार करता अमेरिका पाकिस्तानला खडसावेल. मात्र अफगाणिस्तानात पाकिस्तानची मदत लागणार असल्याने अमेरिका संतुलन साधण्याचा प्रयत्न करील, असा अंदाज या लेखात व्यक्त करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानमधील आपल्या हितसंबंधांसाठी अमेरिकेची पाकिस्तानकडे डोळेझाक, चीनचे पाकिस्तानला संरक्षण आणि सौदी अरेबियाचे पाकिस्तानला अर्थसाहाय्य यामुळे पाकिस्तानबाबतच्या या देशांच्या दुटप्पीपणाचा भारतीयांना राग आहे, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्याच ‘एव्हरिथिंग विल चेंज आफ्टर द काश्मीर अटॅक’ या शीर्षकाच्या लेखात म्हटले आहे.अफगाणिस्तानात हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानात आश्रय मिळत असल्याने वर्षभरापूर्वी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला देण्यात येणारे अर्थसाहाय्य रोखले होते. मात्र त्याचा फारसा फायदा झालेला नाही. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद आणि जैश-ए-महम्मदचा मसूद अझर या दोघांनाही पाकिस्तानात मोकळे रान असल्याचे ‘सीएनएन’च्या संकेतस्थळावरील एका लेखात म्हटले आहे. काश्मीरमध्ये खदखद कायम ठेवण्याची ‘जैश-ए-महम्मद’ची खुमखुमी पाहता त्याकडे डोळेझाक करण्याची भूमिका पाकिस्तानने घेतली असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे.

या हल्ल्याचा निषेध करताना चीनने नेहमीप्रमाणे सावध पवित्रा घेतला. सर्व स्वरूपांतील दहशतवादाचा निषेध करीत असल्याचे सांगताना चीनने मसूद अझर, जैश-ए-महम्मद किंवा पाकिस्तानचा उल्लेख टाळला.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांना चीनने खो घातला. शिवाय, अमेरिकेनेही ही मागणी जोरकसपणे मांडलेली नाही, याकडे ‘सीएनएन’ने लक्ष वेधले आहे. या हल्ल्याने पुन्हा मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची संधी आहे. मात्र अफगाणिस्तानातील हितसंबंध, भारताची इराणकडून तेल आणि रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र खरेदीमुळे आताही अमेरिका त्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता ‘सीएनएन’ने वर्तवली आहे.

या हल्ल्याचा बदला घेण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. पाकिस्तानबद्दल रोष भारतीय मतदारांना एकवटतो. मोदी सरकारने या हल्ल्यास प्रत्युत्तर दिले नाही तर त्याची त्यांना राजकीय किंमत चुकवावी लागेल, असे निरीक्षणही परदेशांतील माध्यमांत नोंदवण्यात आले आहे. मात्र भारतात युद्धज्वर वाढू लागला असला तरी दीर्घकालीन उपाययोजनाच उपयुक्त असल्याचे ‘तेहरान टाइम्स’मधील एका लेखात म्हटले आहे.

संसदेवरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझरचा समावेश होता. मात्र पाकिस्तानने त्याला अटक करून सोडून दिले आणि आश्रयही दिला. तेव्हापासून अलीकडच्या पठाणकोट, उरी आणि आताच्या पुलवामा हल्ल्यापर्यंत ‘जैश-ए-महम्मद’ची मजल गेली. त्यामुळे मसूद अझरबाबत अमेरिका, चीन आदी देशांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. निषेधाची शब्दसेवा पुरे.  आता या देशांनी कृती करायला हवी.

संकलन :  सुनील कांबळी