महासत्तांतील शीतयुद्धातून चंद्राला गवसणी

माणसाला आकाशातील ग्रहताऱ्यांचे आकर्षण फार पूर्वीपासून होते,कधी काळी आपण पृथ्वीचाच उपग्रह असलेल्या चंद्राला गवसणी घालू  असे कुणालाही वाटले नव्हते पण विज्ञान काल्पनिकेत शोभावा, असा चांद्र विजय माणसाने मिळवला, तो २० जुलै १९६९ रोजी. हा चांद्र विजय रशिया व अमेरिका या दोन महासत्तांमधील शीतयुद्धाचा परिणाम होता हे खरे असले, तरी तो मानवतेसाठी फार मोठा पल्ला ठरला. नील आर्मस्ट्राँग व एडविन ‘बझ’आल्ड्रीन हे अमेरिकेचे दोघे जण चंद्रावर पाऊ ल ठेवून सुखरूप परत आले. ही घटना विज्ञान, तंत्रज्ञान व संस्कृती अशा सर्वच अंगांना स्पर्शून जाणारी ठरली. आज पन्नास वर्षांनीही त्या आठवणींनी राष्ट्रीयता विसरून सर्वच माणसांच्या अंगावर रोमांच उभे राहतात, यात शंका नाही.

candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
Bhayander
भाईंदर : माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांच्या भूमिकेकडे लक्ष, महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच
chennai super kings vs gujarat titans
IPL 2024 : नवनेतृत्वाची कसोटी; चेन्नईसमोर आज गुजरातचे आव्हान

* बेरेशीट (इस्रायल)  एप्रिल २०१९ : इस्रायलचे हे यान खासगी मोहिमेचा भाग होता, गुगल ल्युनर पारितोषिकासाठी त्याची निर्मिती केली होती. ते चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले.

* चेंज ४- ल्युनर आर्बिटर अँड  रोव्हर : २१ मे २०१८- ही चीनची चांद्रमोहीम असून त्यांच्या चांद्र संशोधन कार्यक्रमातील दुसरा टप्पा होता, यान व त्याचे रोव्हर यूटू २ चंद्रावर उतरले.

* चेंज ३- ल्युनर आर्बिटर अँड रोव्हर  : १ डिसेंबर २०१३- चेंज ३ यानात रोव्हर व लँडर असे दोन भाग होते. रोव्हर गाडी यशस्वीपणे चंद्रावर उतरली. चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेतली.

* लाडी (ल्युनर अ‍ॅटमॉस्फिअर अँड डस्ट एनव्हायर्नमेंट एक्स्प्लोरर- नासा) : ७ सप्टेंबर २०१३- चंद्राभोवती परिक्रमेचा उद्देश. चंद्राच्या विषुववृत्ताचा अभ्यास, यान चंद्रावर आदळवण्यात आले.

* ग्रेल (एब अँड फ्लो) : नासा १० सप्टेंबर २०११- दोन्ही परिक्रमा करणारी याने. चंद्राच्या गुरुत्वाचा अचूक अभ्यास, ही याने उत्तर ध्रुवावर पाडण्यात आली.*

* चेंज २ (सीएनएसए- चीन) : १ ऑक्टोबर २०१० – यानाने चंद्राच्या कक्षेत यशस्वी कामगिरी केली. नंतर ते खोल अवकाशात निघून गेले. एका लघुग्रहाशीही यानाचा संपर्क  आला होता. ७७ दिवस चंद्राची परिक्रमा केली.

*  एलक्रॉस (ल्युनर क्रेटर ऑब्झर्वेशन अँड सेन्सिंग सॅटेलाइट- नासा) : १८ जून २००९- हे यान  यशस्वीपणे दक्षिण ध्रुवावर आदळले, यात चंद्रावर आघाती अवतरणाचा अभ्यासही करण्यात आला.

भारताची उडी

चांद्रयान १ (इस्रो -भारत) – २२ ऑक्टोबर २००८ हे यान भारताच्या चांद्र संशोधनातील पहिलेच. चंद्रावरील रेडिओ समस्थानिकांचा अभ्यास, २००९ मध्ये त्याचा संपर्क  तुटला. यानाने चंद्रावर पाणी  असल्याचे सांगितले

* चेंज १ (सीएनएसए- चीन) : २४ ऑक्टोबर २००७- चीनचे पृथ्वीच्या कक्षेपलीकडे जाणारे पहिले चांद्रयान. चंद्राच्या स्थानशास्त्रीय अभ्यासाचा उद्देश

* कागुया (सेलेन- जॅक्सा-जपान) : १४ सप्टेंबर २००७- जपानच्या यानात तीन भाग होते.

* ल्युनर आर्बिटर (नासा) : १७ फेब्रुवारी २००७- आर्टेमिस मोहिमेतील प्रकल्प हेलिओफिजिक्स व ग्रहीय विज्ञानाच्या अभ्यासात उपयोग.

* स्मार्ट १- (इएसए,युरोप) : २७ सप्टेंबर २००३ युरोपचे पहिले यशस्वी चांद्रयान, यात सौर विद्युत इंजिन वापरले होते. अभिनव तंत्रज्ञानावर आधारित यान.

* ल्युनर  प्रॉस्प्टेक्टर (अमेरिका) : ७ जानेवारी १९९८- चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत गेलेली मोहीम, चंद्रावरील बर्फ व खनिजांचा अभ्यास करण्याचा उद्देश, १९ महिने मोहीम चालली.

* क्लेमेनटाइन (अमेरिका) : २५ एप्रिल १९९४- अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे हे यान होते. ७० दिवसात चंद्राचे नकाशे तयार केले. १९९४ मध्ये यान बंद पडले.

* म्युसेस- हितेन (जपान) : २४ जानेवारी १९९०- चंद्राला दहा प्रदक्षिणा पूर्ण केल्या. अनेक तंत्रज्ञानांच्या चाचण्या चंद्राच्या कक्षेत घेण्यात यश. यान १९९३ मध्ये चंद्रावर कोसळले.

* ल्युना २४- (सोविएत रशिया) : ९ऑगस्ट १९७६- यान चंद्रावर सी ऑफ क्रिसेस येथे उतरले, १७० ग्रॅम माती गोळा केली.

* ल्युना- (सोविएत रशिया) : २८ ऑक्टोबर १९७४- हे यान चंद्रावर नमुने आणण्यासाठी पाठवले होते, पण ते अपयशी ठरले. तीन दिवस माहिती पाठवली.

* ल्युना २२ (सोविएत रशिया) : २९ मे १९७४- यान यशस्वीरीत्या चंद्राभोवती फिरले.  यात चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा, गॅमा किरण व गुरूत्वीय क्षेत्राचा अभ्यास करण्यात आला.

* ल्युना २१ (सोविएत रशिया) : ८ जानेवारी १९७३- हे यान चंद्रावर उतरले व मोठी छायाचित्रे घेतली. चार महिने मोहीम सुरू होती. ८० हजार टीव्ही  चित्रे पाठवली. ३७ किलोमीटर चालले. यशस्वी मोहीम.

* अपोलो १७ (अमेरिका) : ७ डिसेंबर १९७२- यशस्वी झालेले यान होते. अवकाशवीर  रोनाल्ड इव्हान्स हे चंद्राभोवती फिरत राहिले तर युजीन सेरनन व हॅरिसन श्मिट हे दोघे चंद्रावर उतरले.

* सोयूझ एल ३ : २३ नोव्हेंबर १९७२ – हे अपयशी ठरलेले ऑर्बिटर होते. उड्डाणानंतर ९० सेंकदात इंजिने बंद.

७१ तास मुक्काम

अपोलो १६ (अमेरिका) : १६ एप्रिल १९७२- यशस्वी मोहिमेत थॉमस मँटिग्ले हे चंद्राभोवती फिरत राहिले, तर जॉन यंग व चार्लस डय़ुक हे चंद्रावर डेसकार्टिस भागात उतरले. यात ल्युनर रोव्हर गाडी होती. ती २७ कि.मी चालली. ७१ तास चांद्रवीर तेथे होते. ९६ किलो नमुने घेतले.

* ल्युना २० (सोविएत रशिया) : १४ फेब्रुवारी १९७२- यानाने सी ऑफ फर्टलीची भागातील चांद्र नमुने पृथ्वीवर आणले. एकूण ३० ग्रॅम नमुने आणण्यात यश.

* ल्युना १९ (सोविएत रशिया) : २८ सप्टेंबर १९७१- चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करताना तेथील प्रारणांची पातळी, सौर वारे यांचा वेध घेतला.

’ ल्यना १८ (सोविएत रशिया) : २ सप्टेंबर १९७१-

ही मोहीम अपयशी ठरली,पण यान ५४ दिवस कक्षेत फिरत होते. संपर्कही तुटला.

‘रोव्हर गाडी’चा समावेश

* अपोलो १५ (अमेरिका) : २६ जुलै १९७१- चंद्रावर गेलेल्या यानातील जेम्स आयर्विन कक्षेत फिरत राहिले, तर डेव्हिड स्कॉट व अल्फ्रेड वोर्डन चंद्रावरील हॅडली रिली भागात उतरले. अपोलो १५ मोहिमेत रोव्हर गाडी होती. ती २८ कि.मी. चालली. चांद्रवीर ६७  तास तेथे होते. ७७ किलो माती व खडकाचे नमुने घेतले.

* अपोलो १४ : ३१ जानेवारी १९७१- अवकाशवीर स्टुअर्ट रूसा हे कक्षेत फिरत राहिले, तर अलन शेफर्ड व एडगर मिशेल चंद्रावर उतरले. ३३ तास चांद्रभूमीवर होते. खडकाचे ४२ किलो नमुने घेतले.

* ल्युना १७ (सोविएत रशिया) : १० नोव्हेंबर १९७०- चंद्रावर सी ऑफ रेन्स भागात उतरले. रोव्हर गाडी उतरवण्यात आली. ती १०.५ किलोमीटर चालली.  २० हजार टीव्ही छायाचित्रे पाठवली.

* झोंड ८ (सोविएत रशिया) : २० ऑक्टोबर १९७०- हे यशस्वी ठरलेले यान होते. त्याने पृथ्वी व चंद्र यांची रंगीत छायाचित्रे घेतली. ते हिंदी महासागरात कोसळले.

रशियाची यशस्वी मोहीम

* ल्युना १६ (सोविएत रशिया) : १२ सप्टेंबर १९७०-  यशस्वीपणे नमुने घेऊ न परत आले. चंद्राच्या अंधारलेल्या भागात उतरले. १०१ किलो खडकांचे नमुने आणले.

* अपोलो १३ (अमेरिका) : ११ एप्रिल १९७०- हे यान चंद्रावर पोहोचण्यात अपयशी ठरले होते. जेम्स लॉव्हेल, फ्रेड हेस, जॉन स्विगर्ट या अवकाशवीरांना परत आणले गेले.

* अपोलो १२ (अमेरिका) : १४ नोव्हेंबर १९६९- ही यशस्वी मोहीम होती.  रिचर्ड गॉर्डन हे चंद्राभोवती फिरत राहिले, तर चार्लस कोनरॉड, अलन बीन, चंद्रावर  ओशन ऑफ स्टॉर्मस भागात उतरले.  ३१.५ तास तेथे होते व ३४ किलो नमुने आणले.

* कॉसमॉस ३०५ (सोविएत रशिया) : २२ ऑक्टोबर १९६९- ही मोहीम नमुने आणण्यात फसली होती.

* कॉसमॉस ३०० (सोविएत रशिया) : २३ सप्टेंबर १९६९- ही मोहीमही चंद्रावरून नमुने आणण्यात फसली होती. यान चंद्रापर्यंत गेले नाही.

* झोंड ७ (सोविएत रशिया) : ७ ऑगस्ट १९६९- हे यान चंद्रापर्यंत गेले, परत आले, रंगीत छायाचित्रे घेतली. कझाकिस्तानात उतरले. मोहीम यशस्वी झाली होती.

माणूस पहिल्यांदा चंद्रावर

अपोलो ११(अमेरिका) : १६ जुलै १९६९ (अवतरण २० जुलै १९६९)- मायकेल कॉलिन्स हे चंद्राच्या कक्षेत फिरत राहिले. नील आर्मस्ट्राँग व एडविन बझ अल्ड्रिन हे चंद्रावर उतरले. माणूस पहिल्यांदा चंद्रावर उतरला,चंद्रावरून आल्यानंतर यान २४  जुलै १९६९रोजी पॅसिफिक सागरात उतरले. वीस किलो खडकाचे नमुने आणले.

* ल्युना १५ (सोविएत रशिया) : १३ जुलै १९६९- हे यान गुप्तपणे सोडले होते, ते अपयशी ठरले. ते चंद्रावर कोसळले. सोविएत रशियाने ते यशस्वी झाल्याचा केलेला दावा खोटा होता. अपोलो ११ यानाच्या वेळीच ते सोडण्यात आले होते. त्यामुळे गोंधळ झाला होता.

* ल्युना १९६९ सी (सोविएत रशिया) : १४ जून १९६९ – चंद्रावरून नमुने आणण्यात अपयशी. अग्निबाणाचा स्फोट.

अपोलो १० (अमेरिका) :  १८ मे १९६९- ही यशस्वी मोहीम होती. थॉमस स्टॅफर्ड, जॉन यंग, युजीन सेरनन हे चंद्राच्या कक्षेत गेले, तेथे चंद्राच्या कक्षेत उतरण्याच्या तंत्राचा अभ्यास केला. यान पॅसिफिक महासागरात उतरले.

* ल्युना १९६९ बी (सोविएत रशिया) : १५ एप्रिल १९६९  अग्निबाणाचा अवकाशतळावरच स्फोट होऊ न अपयशी ठरले.

* झोंड एल १ एस १ (सोविएत रशिया) : २१ फेब्रुवारी १९६९- यानाच्या अग्निबाणाचा स्फोट होऊ न अपयशी.

* ल्युना १९६९ ए  (सोव्हिएत रशिया) : १९ फेब्रुवारी १९६९- यानाच्या अग्निबाणाचा स्फोट होऊन अपयशी.

* झोंड १९६९ ए (सोव्हिएत रशिया) : २० जानेवारी १९६९- यानाच्या प्रक्षेपकातील दुसरा टप्पा  बंद पडून अपयशी.

* अपोलो ८ (अमेरिका) : चांद्रयानाचा मानवासह कक्षेत प्रवेश. फ्रँक बोरमन, जेम्स लॉव्हेल, विल्यम अँडर्स हे पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेले व चंद्राकडे प्रवास करून १० प्रदक्षिणा पूर्ण केल्या. २७ डिसेंबर १९६८ रोजी पृथ्वीवर आले.

* झोंड ६ (सोव्हिएत  रशिया) : १० नोव्हेंबर १९६८- चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी रशियाची ही मोहीम महत्त्वाची होती, यान चंद्राकडे पोहोचण्यास दोन दिवस लागले. चंद्राची छायाचित्रे घेतली. नंतर यान परत आले. हिंदी महासागरात न पडता पॅराशूटच्या मदतीने रशियात उतरले.

* झोंड ५ (सोव्हिएत  रशिया) : १५ सप्टेंबर १९६८- चंद्राजवळून यान गेले व पृथ्वीवर  परतही आले. या मोहिमेची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. आपणच चंद्रावर माणूस उतरवणार अशी खात्रीच रशियाला या मोहिमेत पटली होती.

* ल्युना १४ (सोव्हिएत रशिया) : ७ एप्रिल १९६८- यानाने चंद्राची छायाचित्रे घेतली, तेथील गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला.

* सव्‍‌र्हेयर ७ (अमेरिका) : ७ जानेवारी १९६८ -अमेरिकेचे चंद्रावर उतरलेले लँडर यान. टायको विवरात ते उतरले होते. खडक उचलणे शक्य नव्हते, त्यामुळे ते वितळवले.

* सव्‍‌र्हेयर ६ (अमेरिका) : ७ नोव्हेंबर १९६७- अमेरिकेचे हे लँडर चंद्रावर सिनस मेडी भागात  उतरले. छायाचित्रे घेतली. मातीचे नमुने उचलले. चंद्राचा पृष्ठभाग कडक असल्याचे स्पष्ट केले.

* सव्‍‌र्हेयर ५ (अमेरिका) : ८ सप्टेंबर १९६७- हेलियमची गळती होऊनही चंद्रावर उतरले. अंतिम संदेश १७ डिसेंबरला मिळाला. मातीचा अंदाज घेण्यात यश.

* ल्युनर ऑर्बिटर ५ (अमेरिका) : १ ऑगस्ट १९६७-  यात चंद्राच्या ९९ टक्के भागाचा नकाशा तयार करण्यात आला. हे यान नंतर चंद्रावर आदळवले गेले.

* सव्‍‌र्हेयर ४ (अमेरिका) : १४ जुलै १९६७- यानाची मोहीम फसली. अडीच मिनिटातच संपर्क तुटला. पण ते नंतर चंद्रावर उतरले होते.

* ल्युनर ऑर्बिटर ४ (अमेरिका) : ४ मे १९६७- यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची छायाचित्रे घेतली. आठ महिने कक्षेत राहिल्यानंतर ते चंद्रावर पाडण्यात आले.

* सव्‍‌र्हेयर ३ (अमेरिका) : १७ एप्रिल १९६७- सव्‍‌र्हेयर ३ यानाने चंद्रावर अलगद अवतरण केले. ओशन ऑफ स्टॉर्मस येथे ते उतरले. ६३०० छायाचित्रे पाठवली.

* ल्युनर ऑर्बिटर ३ (अमेरिका) : ४ फेब्रुवारी १९६७- यानाची कक्षा अनेकदा बदलण्यात आली. पृष्ठभागावर पडलेल्या यानाची छायचित्रे पाठवली. नंतर ते चंद्रावर पाडण्यात आली.

* ल्युना ३ (सोव्हिएत रशिया) : २१ डिसेंबर १९६६- ओशन ऑफ स्टॉर्मस या चंद्राच्या भागात उतरले. मातीचे नमुने घेऊन प्रयोग केले. नंतर यानाचे इंधनच संपले.

* ल्युनर ऑर्बिटर २ (अमेरिका) : ६ नोव्हेंबर १९६६- ही मोहीम यशस्वी झाली. चंद्राच्या कक्षेत राहून ८०० छायाचित्रे घेतली. कोपर्निकस विवराचे छायाचित्र त्यात होते. नंतर चंद्रावर आदळवले गेले.

* ल्युना १२ (सोव्हिएत रशिया) : २२ ऑक्टोबर १९६६- चंद्राच्या पृष्ठभागाची एकूण ११०० छायाचित्रे घेतली. सी ऑफ रेन्स भागात उतरले.

* सव्‍‌र्हेयर २ (अमेरिका) : २० डिसेंबर १९६६- यानाचा थ्रस्टर बंद पडल्याने नियंत्रणही सुटून अपयशी झाले.

* ल्युना ११ (सोव्हिएत रशिया) : २४ ऑगस्ट १९६६-  तंत्रज्ञान परीक्षणाचा उद्देश, २७७ प्रदक्षिणा पूर्ण केल्या.

* ल्युनर ऑर्बिटर १ (अमेरिका) : १० ऑगस्ट १९६६ – स्पष्ट प्रतिमा पाठवल्या, त्यात २० लाख कि.मी. ची चांद्र पृष्ठभूमी दिसत आहे. ७७ दिवसात ५२७ प्रदक्षिणा.

* सव्‍‌र्हेयर १ (अमेरिका) : ३० मे १९६६- नियंत्रित अवतरण, १११०० छायाचित्रे पाठवली. सहा आठवडे मोहीम चालली.

* ल्युना १० (सोव्हिएत रशिया) : ३१ मार्च १९६६-  चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे गेले. प्रारण पातळी, वैश्विक किरणांची तीव्रता, चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास. दोन महिने माहिती पाठवली. चंद्राला ४६० प्रदक्षिणा.

* कॉसमॉस १११ (सोव्हिएत रशिया) : १ मार्च १९६६- चंद्राच्या कक्षेत पोहोचले नाही पुन्हा परत आले.

* ल्युना ९ (सोव्हिएत रशिया) : ३१ जानेवारी १९६६- चंद्रावर नियंत्रित अवतरण करणारे पहिलेयान. शेवटचा संदेश ५ फेब्रुवारीला मिळाला.

* ल्युना ८ (सोव्हिएत रशिया) : ३ डिसेंबर १९६५- हे अपयशी ठरले. अग्निबाणात दोष असल्याने ते चंद्रावर जाऊन ओशन ऑफ स्टॉर्मस भागात आदळले.

* ल्युना ७ (सोव्हिएत रशिया) : ४ ऑक्टोबर १९६५- ही अपयशी मोहिम होती. अग्निबाणात बिघाड होऊन चंद्रावरील ओशन ऑफ स्टॉर्मस भागात आदळले.

* झोंड ३ (सोव्हिएत रशिया) : १८ जुलै १९६५- यशस्वी मोहिमेत २५ छायाचित्रे मिळाली. ती नऊ दिवसात पृथ्वीकडे आली.

* ल्युना ६ (सोव्हिएत रशिया) : ८ जून १९६५- चंद्रावर जात असताना अग्निबाण (प्रक्षेपक) बंद पडला.

* ल्युना ५ (सोव्हिएत रशिया)  : ९ मे १९६५- चंद्रावर अवतरणाचा हा प्रयत्न अग्निबाण बिघडल्याने अपयशी.

* रेंजर  ९ (अमेरिका) : २१ मार्च १९६५- चंद्रावर यशस्वीपणे उतरून ५८०० छायाचित्रे पाठवली.

* रेंजर ८ (अमेरिका) : १७ फेब्रुवारी १९६५-  ७१०० छायाचित्रे पाठवून सी ऑफ ट्रान्क्विलिटी भागात कोसळले.

* रेंजर ७ (अमेरिका) : २८ जुलै १९६४-  एकूण ४३०० उच्च विवर्तन छायाचित्रे पाठवून सी ऑफ क्लाऊडस या चंद्रावरील भागात कोसळले

* रेंजर ६ (अमेरिका) : ३० जानेवारी १९६४- छायाचित्रे घेण्याचा उद्देश होता पण कॅमेरा बि़घडला. नंतर सी ऑफ ट्रान्क्विलिटी भागात कोसळले.

* ल्युना ४ (सोव्हिएत रशिया) : २ एप्रिल १९६३-  यानाचा संपर्क ९३०० किमी नंतर तुटल्याने अपयशी.

* स्पुटनिक २५ (सोव्हिएत रशिया) : ४ जानेवारी १९६३- प्रक्षेपण यशस्वी पण चंद्राच्या कक्षेत गेले नाही.

* रेंजर ५ (अमेरिका) : १८ ऑक्टोबर १९६२- मोहीम अपयशी. चंद्रापासून ७२० कि.मी.वर नियंत्रण सुटले.

* रेंजर ४ (अमेरिका ) : २३ एप्रिल १९६२-  प्रक्षेपण यशस्वी पण संदेशवहन यंत्रणेत बिघाड. चंद्रावर कोसळले.

रेंजर ३ (अमेरिका) : २६ जानेवारी १९६२- चंद्राच्या छायाचित्रांसाठी पाठवलेले यान चंद्रापर्यंत गेले नाही.

* रेंजर २ (अमेरिका) : १८ नोव्हेंबर १९६१- हे चाचणी वाहन होते पण त्याची इंजिने कार्यान्वित झाली नाहीत. यान पृथ्वीच्या वातावरणात जळाले.

मून वॉकर्स

अमेरिकेने ज्या चांद्रमोहिमा केल्या त्यातून किमान १२ जण चंद्रावर पाऊल ठेवून आले.

नील आर्मस्ट्राँग (अपोलो ११); एडविन बझ आल्ड्रीन (अपोलो ११);

पीट कॉनराड (अपोलो १२); अ‍ॅलन बीन (अपोलो १२);

अ‍ॅलन शेफर्ड (अपोलो १४); एडगर मिशेल (अपोलो १४);

डेव्हिड स्कॉट (अपोलो १५);

जेम्स आयर्विन (अपोलो १५);

जॉन यंग (अपोलो १६);

चार्लस डय़ुक (अपोलो १६);

जीन सेरनन (अपोलो १७);

हॅरिसन श्मिट (अपोलो १७)

चांद्रविजयाचे डोहाळे ते मंगळ मोहिमेतील थांबा

माणसाला चंद्रावर जाण्याची कल्पना १९५० पासूनच सुचली होती. किंबहुना तेव्हापासून  त्या दिशेने प्रयत्नही सुरू झाले होते. अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा तो काळ.  १९५९ मध्ये सोव्हिएत रशियाने ल्युना १ हे पहिले यान चंद्रावर पाठवून सर्वाना धक्का दिला. त्यानंतर ल्युना २ हे त्यांचेच यान चंद्रावर उतरणारे पहिले यान ठरले. ल्युना ३ यानाने चंद्राच्या अप्रकाशित भागाच्या प्रतिमा पाठवल्या होत्या. १९६६ मध्ये सोविएत रशियाच्याच रॉसकॉसमॉस संस्थेच्या यानाने चंद्रावर अलगद अवतरण केले. हे सगळे पाहिले तर या चांद्र स्पर्धेत सुरूवातीला सोव्हिएत रशियाचीच आघाडी होती, पण उशिराने या स्पर्धेत उतरलेल्या नासाने रॉसकॉसमॉस या रशियाच्या संस्थेला मागे टाकले. रशियाचा स्पुटनिक उपग्रह अवकाशात गेल्यापासूनच अमेरिकेला रशियाशीच आता आपली स्पर्धा आहे हे कळून चुकले होते. सरतेशेवटी चंद्राची शर्यत अमेरिके नेच जिंकली. नंतर अमेरिकेने मागे वळून पाहिलेच नाही. १९६९  ते १९७२ या काळात अमेरिकेचे बारा जण चंद्रावर पाऊल ठेवून आले. त्यानंतर पृथ्वीचा शेजारी असलेल्या चंद्रावर कुणीही पाऊल ठेवलेले नाही. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, उपग्रह अशा पृथ्वीनिकटच्या कक्षातील प्रयोगात चंद्राला सगळे विसरून गेले. पण अलीकडे चंद्राविषयीची उत्सुकता पुन्हा वाढली आहे. जपान, युरोपीय अवकाश संस्था, भारत, चीन, इस्रायल हे सगळे देश पुन्हा चंद्राच्या प्रेमात आहेत, पण त्यामागे हेतू वेगळे आहेत. मंगळ किंवा इतर दूरच्या ग्रहांवर जाण्यासाठी चंद्राचा थांबा म्हणून वापर करण्याचा त्यांचा इरादा आहे. तेथील खनिज संपत्ती मोठी आहे. आपले इंधनाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुबलक असा हेलियम ३ तिथे आहे.

अवकाश क्षेत्रात स्पर्धेपेक्षा

आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे चांद्रवीर मायकेल कॉलिन्स यांचे प्रतिपादन

वॉशिंग्टन : आगामी काळात अमेरिकेने अवकाश क्षेत्रातील महाशक्ती राहणे गरजेचे आहे पण सध्याच्या परिस्थितीत अवकाश मोहिमा या कुठल्या एका देशाने करण्याची गोष्ट राहणार नाही त्यामुळेच आंतरराष्ट्रीय सहकार्यातून त्या कराव्या लागतील असे चांद्रवीर मायकेल कॉलिन्स यांनी म्हटले आहे.

अवकाश संशोधनात यापुढे जागतिक व संयुक्त दृष्टिकोनच उपयुक्त ठरणार आहे, यात काही प्रमाणात या मोहिमांचा वेग मंदावेलही पण आंतरराष्ट्रीय सहकार्य टाळता न येण्यासारखी गोष्ट आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, जेव्हा आम्ही चंद्रावर अमेरिकेचा झेंडा लावला तेव्हा अमेरिकी असल्याचा अभिमान वाटला, पण त्यानंतर आम्ही राजनैतिकतेचा भाग म्हणून चांद्र विजयानंतर जगाचा दौरा केला तेव्हा लोकांनीच आमचे डोळे उघडले.  आमच्या चांद्रविजयावर लोकांचे म्हणणे असे होते की, ही अमेरिकेची कामगिरी नाही तर सगळ्या मानवतेची कामगिरी आहे, हा वैश्विक दृष्टिकोन सामान्य लोकांनी आम्हाला दिला.

अनेक लोक आसुसलेले

एडविन बझ आल्ड्रिन (वय ८९)  यांनीही आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन सहकार्याचाच पुरस्कार केला. वन स्मॉल स्टेप फॉर मॅन, वन जायंट लीप फॉर मनकाइंड या आर्मस्ट्राँग यांच्या वक्तव्याची आठवण देत त्यांनी सांगितले की, मला वाटते मानवतेच्या त्या महाकाय पावलासाठी अजूनही आपल्यापैकी अनेक लोक आसुसलेले आहेत.

चांद्रविजयावरचे गुगल डुडल

जगातील सांस्कृतिक, वैज्ञानिक व इतर सर्व क्षेत्रातील संस्मरणीय घटनांची नोंद घेण्याची गुगल डुडलची परंपरा कायम आहे. मानवाच्या चांद्र विजयाची पन्नास वर्षे हा एक ऐतिहासिक क्षण. अपोलो ११ मोहिमेत माणसाने चंद्र जिंकला. त्यावर गुगल डुडल तयार करण्यात आले. त्यात एक चित्रफितही असून त्यात द्विमार्गी संवादाची सोय आहे.

तेव्हाचे संगणक आणि आताचा मोबाईल!

अपोलो ११ मोहिमेत माणसाने २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. त्यात नील आर्मस्ट्राँग व एडविन अल्ड्रीन हे दोघे इगल या चांद्रयानातून तेथील पृष्ठभूमीवर उतरले. कॉलिन्स मात्र कक्षेत फिरत राहिले.  सॅटर्न ११ प्रक्षेपकाच्या मदतीने १६ जुलै रोजी अपोलो ११ यान फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून चंद्राकडे रवाना झाले, ती नासाची पाचवी समानव मोहीम होती. मायकेल कॉलिन्स यांनी तेव्हाचा अनुभव सांगताना म्हटले आहे की, नासाने त्यावेळी तीन अँटेनाचा वापर केला होता. ते स्पेन, ऑस्ट्रेलिया व कॅलिफोर्निया येथे लावलेले होते.  चांद्रवीरांना त्यांचे संगणक फार प्रगत असल्याचे वाटले होते, पण त्या संगणकाची क्षमता आज आपल्या खिशात असलेल्या मोबाईल इतकीही नव्हती. कॉलिन्स आज ८८ वर्षांचे आहेत ते म्हणतात की,  सूर्य त्याच्या भोवती सोनेरी प्रभा घेऊन येताना दिसला पण चिमुकल्या पृथ्वीचे जे दर्शन होते ते त्यापेक्षाही विलोभनीय होते.