पंजाबातील  घुमान येथे  ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालपासून सुरू झाले.  संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे  हे संमेलनाध्यक्ष असून त्यांच्या भाषणाचा हा संपादित भाग..
पुंडलिक वरदा हरी विठ्ठलऽऽ
श्री ज्ञानदेव नामदेव तुकाराम ॥
मराठी संस्कृतीला ओळख देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यापैकी एक आहे साहित्य संमेलन. त्यामुळे साहित्य संमेलन भरवायचे की नाही हा चर्चेचा विषय होऊच शकत नाही. साहित्य संमेलन म्हणजे मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार. या संमेलनात साहित्याची चर्चा होणार हे उघडच आहे; पण या प्रकारच्या चर्चेला, ज्ञानव्यवहाराला उत्सवी वातावरण लाभण्यात गैर काय आहे? उलट, ज्ञान आणि उत्सव यांनी एकत्र नांदणे ही आमची एक सांस्कृतिक सिद्धी आहे. ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाला ज्ञानाची दिवाळी म्हणतात. ज्ञानही साजरे करता यायला हवे. संत नामदेवराय म्हणतात-
‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।’
vv02हा काही एका धर्मसंप्रदायाचा घोष नव्हता. हा आहे एका श्रेष्ठ वाङ्मयीन परंपरेचा घोष. ज्या दैवताला केंद्रस्थानी ठेवून उभ्या राहिलेल्या व्यापक आणि समावेशक अभिजात परंपरेचा हा घोष आहे, ते दैवत -श्री विठ्ठल- संत नामदेवरायांमुळे शीख धर्माच्या पवित्र प्रमाणग्रंथात- गुरू ग्रंथसाहिबात ‘बिठलु’ या नावाने प्रविष्ट झाले आहे, आणि तोच महाराष्ट्र आणि पंजाब, मराठे आणि शीख यांच्यातील अनुबंधाचा मूळ पाया आहे, अगदी पक्का आहे. धर्माधर्मामधील भेदांच्या पलीकडे जायची व त्यासाठी वेळप्रसंगी त्या त्या धर्मातील कर्मठांवर टीका करण्याची गरज भारतात पहिल्यांदा नामदेवांनी सांगितली व समकालीन िहदू आणि मुसलमान यांना खडे बोल ऐकवले. हेच नंतर कबीरांनी, एकनाथांनी आणि गुरू नानकदेवांनीही केले.
महत्त्वाची गोष्ट ही आहे, की संत नामदेवांनी हा पाया येथेच म्हणजे घुमान या गावी रचला. नामदेवांच्या एकूण काव्यातील पदांचा काही भाग गुरू अर्जुनदेवांनी आदरपूर्वक समावेश केला. पण नामदेवांची ही पदे आत्मसात करण्याची प्रक्रिया गुरू नानकदेवांपासूनच सुरू झाली असणार यात शंका नाही. पंजाबमधील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यांच्यातही असाच निकटचा संबंध आहे. मला येथे हे निदर्शनास आणून द्यायचे आहे, की जे स्थान उत्तरेत पंजाबचे आहे तेच दक्षिणेत महाराष्ट्राचे आहे. विंध्य पर्वताच्या दक्षिणेत आलेल्या प्रत्येक आक्रमकाशी पहिल्यांदा सामना करावा लागला तो महाराष्ट्रालाच.
एखाद्या साहित्यप्रवाहाला मुख्य प्रवाह कधी म्हणता येईल? पहिली गोष्ट म्हणजे या प्रवाहाने दीर्घकाळ अस्तित्वात राहायला हवे. या दृष्टीने पाहिले तर ज्ञानेश्वर-नामदेव ते निळोबा या पाच शतकांच्या काळाला दीर्घ नक्कीच म्हणता येते. दुसरे असे, की या प्रवाहात ज्यांचा समावेश केला जातो त्यांना स्वत:ला असा प्रवाह अस्तित्वात आहे आणि आपण त्याचे घटक आहोत याचे भान हवे. असे आत्मभान या परंपरेत निश्चितच होते. अठरापगड जातींच्या स्त्री-पुरुष संतांना आपण एकाच उपास्य दैवताचे उपासक आहोत याची जशी जाणीव होती, तशीच आपण एक विचारसरणी मानणारे आहोत आणि एकाच प्रकारचे कवित्व करणारे आहोत याचीही जाणीव होती. हेच लोक तीर्थयात्रेच्या मिषाने एकमेकांशी संवाद करीत पंजाबपर्यंत पोहोचले. vv01जातीपातींमधील भेद मिटावेत यासाठी यांनीच चंद्रभागेच्या वाळवंटात काला नावाचा स्नेहभोजनाचा प्रकार रूढ केला.
दरम्यान, परचक्र आले व महाराष्ट्राच्या यादव घराण्याची राजवट संपुष्टात आली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही अनेक स्थित्यंतरे झाली. ज्ञानदेव-नामदेवांनी दिलेल्या शिकवणुकीचे आचरण करणारा समाज हे संकट पार करू शकला. १९५५ साली पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शं. दा. पेंडसे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘राजकीय सत्ता ज्यांच्या हाती होती ते क्षत्रिय व ब्राह्मण हे वरिष्ठ वर्ण स्वत:च्या दुर्गुणांनी पराभूत झाले असता एकनाथांच्या काळापर्यंत दोन-अडीच शतके महाराष्ट्रातील धर्म व संस्कृती यांचे रक्षण ज्या सामान्य जनतेने केले तिचे आपण खरोखरी ऋणी असले पाहिजे. अिहसेच्या व नम्रतेच्या साहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खांद्यावर घेतलेली भागवत धर्माची ध्वजा त्यांनी खाली ठेवली नाही आणि स्वत:ला सत्य वाटलेल्या तत्त्वांपासून ते च्युत झाले नाहीत. वरून बावळट आणि दुबळेपणाची मूर्ती दिसणाऱ्या वारकऱ्यांच्या अंत:करणातील निष्ठा आणि त्यांची अिहसा किती सामथ्र्यवान होती हे यावरून लक्षात येईल.’
मुद्दा एखाद्या संप्रदायाचा नसून महाराष्ट्राचा आणि मराठी साहित्याचा आहे. ज्या परंपरेतील साहित्याचा मुख्य प्रवाह म्हणून मी उल्लेख करीत आहे त्या साहित्याचा संबंध महाराष्ट्रातील लोकांच्या प्रत्यक्ष जगण्याशी होता. ते साहित्य त्यांच्या जगण्यातून उगवले आणि वाचकांना, श्रोत्यांना जगण्याचे बळ पुरवीत राहिले. साहित्याचा विचार करताना आपण सहसा लेखकांचा, कवींचा विचार करतो, वाचकांचा किंवा श्रोत्यांचा तितकासा करीत नाही. सुदैवाने काही आधुनिक विचारवंतांच्या लक्षात ही गोष्ट आली. मराठी साहित्याचा वाचकलक्ष्यी विचार करताना डॉ. रा. भा. पाटणकर लिहितात- ‘महाराष्ट्रातील सहा कोटी लोकांपैकी पाच लाख लोक दर वर्षी विठ्ठल दर्शनासाठी जमतात. म्हणजे जवळजवळ १० टक्के लोकांना त्यांचा आत्मिक-मूल्यात्मक-वाङ्मयीन जीवनरस वारकरी जीवनातून व वाङ्मयीन परंपरेतून मिळतो. प्रत्येक वारकऱ्याच्या घरातील एक-दोन आप्तेष्टांवर त्याचा थोडाबहुत परिणाम घडतो असे मानले, तर हे लक्षात येईल, की एकूण महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनात पाश्चात्त्य विद्याविभूषितांना जे स्थान आहे त्यापेक्षा किती तरी जास्त महत्त्वाचे स्थान वारकऱ्यांना व तत्सम इतर संप्रदायांना व त्यांच्या मौखिक परंपरांना आहे. या परंपरांचे आतून ज्ञान मिळवले नाही, तर त्यांच्या वाङ्मयाचे विश्लेषण, मूल्यमापन कसे करायचे हे केवळ इंग्रजीवर पोसलेल्या समीक्षकांना जमेल असे वाटत नाही..’
एखाद्या मानवी समूहाचे जगणे, त्याचे साहित्य आणि त्या साहित्याच्या समीक्षेत अंतर्भूत असलेली मूल्ये यांच्यात काही तरी संबंध असणार हे उघड आहे. या संदर्भात पाटणकरच लिहितात- ‘वाङ्मयकलेचा स्वभावच असा आहे, समाजजीवनाच्या ओघात तो असाच घडला आहे की जीवनार्थाला अभिमुख राहूनच वाङ्मयकला जगू शकते, रसरसून वाढू शकते. म्हणून वाङ्मयकृतीसमीक्षा प्रामुख्याने जीवनार्थाच्या अंगाने होणे क्रमप्राप्त आहे. वाङ्मयकृतीतले जीवनदर्शन व जीवनमूल्ये यांची चिकित्सा व मूल्यमापन करणे हे समीक्षकाचे प्रमुख कर्तव्य आहे व ते जो व्यवस्थित करीत नाही तो वाङ्मयीन समीक्षकच नव्हे.’
मराठी साहित्याचा विचार केला तर असे दिसते, की पाचेक शतके हा जीवनार्थ व ही जीवनमूल्ये संतसाहित्यातून अभिव्यक्त झाली आहेत. vv03या अभिव्यक्तीचीच स्वतंत्रपणे दखल घेणे हेही समीक्षकाचे कर्तव्य असल्याचे सांगायला पाटणकर विसरत नाहीत. ते पुढे म्हणतात, ‘पण हे करीत असताना असे लक्षात येते, की फॉर्मच्या व्यवस्थितपणे केलेल्या चिकित्सेशिवाय वाङ्मयसमीक्षा पूर्णच होऊ शकत नाही. सौंदर्यमीमांसेत दाखविल्याप्रमाणे फॉर्म या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत. त्यात शब्दयोजना, शैली, वृत्तरचना, प्रतिमा व त्यांच्या व्यूह-कथानकाची मांडणी, निवेदनाची पद्धती, वाङ्मयप्रकारांचे संकेत इत्यादी सर्व बाबींचा समावेश होतो.’
पाटणकरांचे म्हणणे बरोबरच आहे. त्यात फक्त एकाच मुद्दय़ाची भर टाकायला हवी, की या फॉर्मचाही साहित्यातील जीवनार्थाशी व मूल्यार्थाशी संबंध असतो आणि जीवनार्थाचा आणि मूल्यार्थाचा ते साहित्य निर्माण करणाऱ्या माणसांच्या इच्छा, आकांक्षा, प्रेरणा, श्रेयप्रेयाच्या कल्पना आणि ती प्राप्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडी यांच्याशी संबंध असतो. त्याचप्रमाणे लिहिणारी ही माणसे त्यांच्या अवतीभोवतीच्या समाजातील न लिहिणाऱ्या किंवा नुसत्या वाचणाऱ्या वा ऐकणाऱ्या माणसांपासून अलग किंवा अलिप्त असत नाहीत व त्यांचा विचार न करता लिहीतही नाहीत. समाजाविरुद्ध बंड करण्याचे अपवादात्मक प्रसंग सोडले तर लिहिणाऱ्या-वाचणाऱ्यांचे एक जैविक नाते असतेच असते. हे बंडदेखील बऱ्याचदा एकूण समाजाच्याच हितासाठी केलेले असते. प्रसंगी वैयक्तिक. सामाजिक बांधीलकीच्या वारंवार उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्दय़ाबद्दल एवढेच म्हणता येईल, की कोणी बांधीलकी मानो न मानो, नाते तर मानावेच लागते. ते एक स्वाभाविक वास्तवच असते.
तर मुद्दा असा आहे, की मराठी साहित्यात पाच शतके जो जीवनार्थ ज्या फॉर्ममध्ये प्रगटत होता तो जीवनार्थ व तो फॉर्म संतांनी दिलेला आहे.
 वाङ्मयेतिहास हा जसा लिहिणाऱ्यांचा इतिहास आहे तसाच तो वाचणाऱ्यांचा आणि वाचून कृती करणाऱ्यांचाही इतिहास असतो, हा मुद्दा मला सांगायचा होता. परंपरेचे आत्मभान जसे साहित्यिकाला असते तसेच ते वाचकांनाही असते, ही बाबही येथे नमूद करायची होती.
संतांचे अभंग, ओव्या आणि पेशवाईत बहरलेले पोवाडे आणि लावण्या हे साहित्य मराठी समाजाची आंतरिक गरज म्हणून महाराष्ट्राच्या मातीतून उगवून आलेले पीक आहे. संतांची साहित्यनिर्मिती १७५० दरम्यान स्थगित झाली असली तरी लावणीसारख्या गोष्टी त्यांची जागा घेऊ शकल्या नाहीत आणि मुख्य म्हणजे या नव्या पर्वातील कवींनी, संतांची परंपरा किंवा त्यांचे मुख्य प्रवाह असणे नाकारले नाही. त्यामुळे १८५० पर्यंतच्या मराठी साहित्याचा इतिहास सलग आणि अखंडित आहे. तो मराठी संस्कृतीचा स्वाभाविक भाग आहे.
ज्याला आपण आधुनिक साहित्य म्हणतो त्याची सुरुवात ब्रिटिश वासाहतिक राजवटीत १८५०च्या नंतरच झाली असे इतिहास सांगतो. अशा प्रकारचे लेखन हे मराठी समाजाच्या आंतरिक गरजांमधून निर्माण झाले असे कोणीच म्हणू शकणार नाही. ज्यांनी हे साहित्य लिहिले ते एकूण मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करीत होते, त्याच्या इच्छा-आकांक्षाना वा भावभावनांना, त्यांच्याशी तादात्म्य पावून व्यक्त करीत होते असेही म्हणता येत नाही. ते मराठी मातीतून उगवून आलेले पीक नसून बाहेरून आणून लावलेले रोपटे होते. त्याला मराठी माणसाच्या जीवनार्थाशी जोडण्यात येथील नवे लेखक यशस्वी ठरल्याचा दावाही टिकण्यासारखा vv04नाही. एकीकडे इंग्रजी साहित्याच्या अनुकरणाची प्रक्रिया चालू असतानाच दुसरीकडे आपल्या साहित्याकडे पाश्चात्त्य दृष्टीने पाहून त्याचे मूल्यमापन करण्याची सुरुवात झाली.
वस्तुत: मराठी लोकांना अध्यात्म समजून घेणे अवघड नव्हतेच. अध्यात्मातील रुची हा येथील लोकांच्या संस्कृतिस्वभावाचाच भाग होता. एकनाथांनी तर भारुडांमधून रूपकांच्या माध्यमातून गहन आध्यात्मिक प्रमेये सर्वसामान्य माणसांना समजावून सांगितली होती. त्याचा परिणाम म्हणून अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींमधील कवींनीसुद्धा भेदिक नावाच्या लावणी प्रकारातून आध्यात्मिक चर्चा केलेली आढळते.
या संदर्भात आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. नव्याने स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश व्हावा म्हणून न्या. रानडे यांच्यासारख्यांनी प्रयत्न सुरू केले. या प्रस्तावाला विद्यापीठाचे कुलगुरू दस्तुरखुद्द सर अलेक्झांडर ग्रँट यांनी विरोध केला. विरोधाचे कारण म्हणजे मराठीत ग्रंथ नाहीत हे होते. अर्थ स्पष्ट आहे. ग्रंथ या शब्दाने ग्रँटसाहेबांना ज्याला आपण ‘डिस्कर्सिव्ह प्रोज’ (वैचारिक किंवा विवेचक गद्य) म्हणतो ते अभिप्रेत असावे. वस्तुत: (महानुभावांच्या लुप्त झालेल्या गद्याचा अपवाद सोडला तर) वारकरी संतांनी शास्त्रकाव्याचा फॉर्म विकसित करून वैचारिक आशयसुद्धा काव्यात्म शैलीत व्यक्त करण्याची पद्धत विकसित केली. खरे तर तेच मराठी साहित्याचे, म्हणजे मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाचे वैशिष्टय़ आहे.
त्या वेळच्या कसोटय़ांनुसार ग्रंथ म्हणता येईल अशी ‘गीतारहस्य’ ही पहिली कृती म्हणता येईल. खरे तर ‘द राइज ऑफ मराठा पॉवर’ हा ग्रंथ रानडय़ांनी मराठीत लिहिला असता तर तोच पहिला ठरला असता. या ग्रंथातील विवेचन इतके महत्त्वाचे होते, की स्वत: हेगेलने तो वाचला असता तर त्याला आपली इतिहासाची मीमांसा आणि संस्कृती मीमांसा बदलावी लागली असती, असे इतिहासाचार्य राजवाडय़ांना म्हणावे लागले.
मुद्दा एकोणिसाव्या शतकात स्थापन झालेल्या ब्रिटिश राजवटीमुळे महाराष्ट्रात दाखल झालेल्या नव्या मूल्यांचा, विचारांचा आणि विचारपद्धतीचा होता तसाच तो विचारांच्या अभिव्यक्तीच्या पद्धतीचाही होता. दरम्यानच्या काळात संतांचा वारसा मठ-मंदिरांमध्ये जपण्यात वारकरी यशस्वी झाले असले तरी त्या त्यांच्या मर्यादाही होत्या. त्यांची ही संकुचित दृष्टी एका परीने स्वत:ला आधुनिक मानून संतसाहित्य प्राचीन, धार्मिक, किंबहुना प्रतिगामी वगैरे मानणाऱ्यांना पूरकच ठरली. संतांच्या विचारांची क्षमता जाणू शकणाऱ्या न्या. रानडे व त्यांच्या प्रार्थना समाजातील सहकाऱ्यांनी त्यांच्याच आधारे नव्या आधुनिक विचारांशी जोडून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे संतसाहित्य व विशेषत: तुकोबांचे अभंग हा एकोणिसाव्या शतकातील मराठी प्रबोधनाचा पाया ठरला. या साऱ्या प्रक्रियेत मराठी विचारविश्व आणि वाङ्मयविश्व ढवळून निघाले. पाश्चात्त्य आधुनिकाच्या संदर्भात, प्रकाशात व कसोटीने आपल्या पूर्वीच्या वारशाचे पुनर्मूल्यांकन करून त्या वारशातील योग्य ते ठेवून त्याचा या आधुनिकाशी मेळ घालत आपणही आधुनिक व्हायचे, असा या काळातील आपल्या हालचालींचा रोख सांगता येईल. तसे केले नाही तर आपण टिकणार नाही, आपल्याला या परकीयांच्या जोखडातून मुक्तही होता येणार नाही, ही चिंता त्यामागे होती.
एकीकडे रानडे आणि प्रार्थना समाजातील मंडळी तुकोबांचा विचार आधुनिक काळाशी जोडण्याच्या प्रयत्नात असताना फुले, (कृष्णराव) भालेकर हे सत्यशोधक साहित्याच्या क्षेत्रात तुकोबांना अनुसरून अभिव्यक्ती करीत होते. म्हणजे एका अर्थाने या काळातही काही एक मर्यादेत संतसाहित्याने मुख्य प्रवाहाचे आपले स्वरूप एका विशिष्ट मर्यादेत जपले असे म्हणता येते.
वासुदेव बळवंत पटवर्धन यांच्यासारख्या इंग्रजी साहित्याच्या जाणकाराने मराठी संतसाहित्याचे स्वायत्त vv05अंतरंग ओळखले याचे विशेष कौतुक करायला हवे. पटवर्धन नेहमीप्रमाणे ‘संतसाहित्य’ असा शब्दप्रयोग न करता काव्याचा (किंवा साहित्याचा) ‘भक्ती संप्रदाय’ (भक्ती स्कूल) असा शब्दप्रयोग करतात. पटवर्धनांचा रानडे-भांडारकरांच्या प्रार्थना समाजाशी जवळचा संबंध होता.
वा. ब. पटवर्धनांच्या पुढचे पाऊल डॉ. मा. गो. देशमुख यांनी टाकले. देशमुखांनी (आधुनिक पाश्चात्त्यच काय परंतु) प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यशास्त्रसुद्धा संतसाहित्याची समीक्षा करण्यास अपुरे ठरते असा दावा केला. ‘मराठीचे साहित्यशास्त्र’ या प्रबंधात त्यांनी मराठी साहित्य हे मुख्यत्वे संतसाहित्य आहे आणि संतांनी गृहीत धरलेली साहित्यशास्त्रीय तत्त्वे संस्कृत साहित्यशास्त्रातील तत्त्वांपेक्षा वेगळी आहेत, अशी भूमिका मांडली. देशमुखांची मांडणी कोणी गंभीरपणाने घेतली असल्याचे ऐकिवात नाही.
पटवर्धन किंवा देशमुख यांच्याकडे कानाडोळा करणे फारसे अवघड नव्हतेच. ते चांगले समीक्षक, टीकाकार असले तरी स्वत: मोठे साहित्यिक नव्हते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहू लागलेल्या लेखक-कवींमध्येच परंपरेचे भान व्यक्त होऊ लागले. त्यात चित्रे, नेमाडे, कोलटकर या त्रिमूर्तीचा विशेष उल्लेख करणे भाग आहे. या एकूणच पिढीच्या भूमिकेविषयी दिलीप चित्रे सांगतात, ‘मराठी वाङ्मयाची स्वतंत्र परंपरा सातशे वर्षांची असून ते जणू काय गेल्या शतकातच सुरू झालेलं पश्चिमेला अनुसरणारं नवं प्रकरण आहे, असे मानणाऱ्या समीक्षक-शिक्षक-लेखक-प्रकाशकांचा आम्हाला उबग येत होता. आमच्या संतांची परखड परंपरा आम्हाला वंद्य वाटत होती.’ याच जाणिवेतून या मंडळींनी परंपरेशी परत एकदा सांधा जोडला.
संतसाहित्याचे मूल्यमापन जितक्या खोलवर जाऊन कराल तितके त्याचे महत्त्व अधिक उलगडेल. देशमुख-चित्र्यांनी सुचवल्याप्रमाणे त्यासाठी आवश्यक असणारी समीक्षासूत्रे संतसाहित्यातूनच विकसित केली तर त्यांच्या संदर्भात पाश्चात्त्य साहित्यासह इतरही साहित्याची समीक्षा करता येईल.
मी हे जे विवेचन केले त्याचा संबंध बहुतांशी कवितेशी पोहोचतो. गद्याविषयी स्वतंत्रपणे बोलायला हवे. ज्ञानेश्वरीच्याही आधी लिहिल्या गेलेल्या लीळाचरित्राचा आणि एकूणच महानुभाव गद्याचा उल्लेख सुरुवातीलाच आलेला आहे. या गद्यात ज्याला आपण वैचारिक किंवा शास्त्रीय (वैज्ञानिक नव्हे) म्हणतो त्या प्रकारच्या लेखनाचा पुरेसा अंतर्भाव आहे. शिवकालापासून उत्तर पेशवाईपर्यंत लिहिले गेलेले बखरवाङ्मय एका अर्थाने गद्य पोवाडे आहेत असे म्हटले तरी चालण्यासारखे आहे. आज्ञापत्राचा अपवाद सोडला तर वैचारिक किंवा विवेचक गद्य फारसे आढळत नाही. वस्तुत: त्या काळच्या मराठय़ांचा पत्रव्यवहार विचारात घेतला तर मराठी गद्य पुरेसे प्रौढ व प्रगल्भ होते असे आपण म्हणू शकतो, पण त्यातून साहित्याचा दर्जा देता येईल अशी ग्रंथनिर्मिती झाली नाही, ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल. पण याचा अर्थ इंग्रजी भाषेच्या आणि साहित्याच्या परिचयाच्या अभावी मराठी गद्याचा स्वतंत्रपणे विकास झालाच नसता, मराठीत ती क्षमता नव्हतीच, असा नाही. ज्याला इंग्रजी भाषा येत नसणार, इतकेच नव्हे तर शिक्षणाच्या अभावी ज्याला चिपळूणकरी मराठीचा गंधही नसणार अशा प्रतिभावंताविषयी मी बोलत आहे. त्याचे नाव दादा महाराज सातारकर. महाराजांनी ग्रंथ लिहिले नाहीत पण कीर्तन-प्रवर्चने केली. ना. सी. फडके पूर्णपणे नास्तिक असूनही महाराजांच्या निरूपणांना आवर्जून यायचे ते त्यांच्या मराठीसाठी.  दादा महाराजांनी जी गद्यशैली कमावली ती विशेषत: संतांचे साहित्य आणि ‘अमृतानुभवा’वरील तसेच भागवताच्या दशम स्कंधावरील शिवकल्याणांच्या भाष्यग्रंथांच्या आधारे. ही परंपरा  दादा महाराजांमुळे बहिरट आणि चित्रे अशी विकसित झाली. (चित्र्यांचे यावरील साहित्य अद्याप अप्रकाशित.)
दादा महाराजांच्या काळातच शांकर वेदान्ताच्या प्रभावातून आणि अनुकरणातून संतसाहित्यावर निरूपणे करणाऱ्यांचा एक संप्रदाय वारकऱ्यांमध्ये पुढे आला, पण त्यांची मराठी दादा महाराजांच्या मराठीपुढे अगदीच सपक.  गद्यलेखनाचा खरा कस लागतो तो कादंबरी हा वाङ्मयप्रकार हाताळताना. खऱ्या मराठी माणसाची मानसिकता, वैचारिकता प्रगट करणाऱ्या कादंबऱ्या आधुनिक काळात रघुनाथ वामन दिघे यांनी लिहिल्या. मराठी कादंबरीचा आधुनिकतेकडून उत्तराधुनिकतेकडील प्रवास भालचंद्र नेमाडय़ांच्या कादंबऱ्यांत पाहायला मिळतो. नेमाडय़ांना हे करणे कसे शक्य झाले याचे कारण सांगतो. नेमाडय़ांनी महानुभाव आणि वारकरी या दोन्ही परंपरा पचवल्या आहेत म्हणून. दिघ्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर दुर्दैवाने आपल्या समीक्षकांनी व वाङ्मयेतिहासकारांनी ग्रामीण किंवा प्रादेशिक साहित्य या वर्गात त्यांच्या कादंबऱ्या टाकून घोर प्रमाद केला. खरे तर दिघ्यांच्या कादंबऱ्या वैचारिक कादंबऱ्या आहेत व त्यांच्यातून व्यक्त झालेली वैचारिकता अस्सल वारकरी शेतकरी मराठी वैचारिकता आहे. दिघे हे करू शकले याचे कारण अर्थातच त्यांची संतसाहित्याशी असलेली जवळीक. दिघे आणि नेमाडे हा मराठी कादंबरीचा सरळ प्रवास आहे फरक एवढाच आहे, की दिघ्यांचा नायक गाव आणि शेती सोडून बाहेर पडलेला नाही, तर नेमाडय़ांचा नायक शहरात आला. दिघ्यांचे नायक त्यामुळेच कमी गुंतागुंतीची व पहिल्यापासून शेवटपर्यंत परंपरा टिकवण्यात यशस्वी ठरलेले दिसतात. नेमाडय़ांचा नायक खेडय़ातून शहरात येतो तेव्हा तो सुरुवातीला परंपरेपासून दुरावतो, परंतु अखेर शेवटी तो परत परंपरेकडे येतो, असे स्थूलमानाने म्हणता येईल. शिवाय दिघ्यांचा नायक शुद्ध वारकरी, तर नेमाडय़ांच्या नायकात महानुभावांचेही रंग मिसळलेले. साहजिकच नेमाडय़ांची कादंबरी अधिक जटिल व अधिक आव्हानात्मक होते.
दिघ्यांचा विचार केवळ साहित्यापुरता मर्यादित ठेवण्यात दिघ्यांवर अन्याय आणि आपले नुकसान, असा दुहेरी धोका आहे. त्यांच्या लिखाणाचा महाराष्ट्राच्या व्यापक सांस्कृतिक-सामाजिक जीवनाशी संबंध जोडावा लागतो. वारकरी शेतकरी कधी मराठी साहित्याचा नायक झाला नव्हता. दिघ्यांनी त्याला पहिल्यांदा त्याचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांच्या ‘पाणकळा’ आणि ‘पड रे पाण्या’ या दोन कादंबऱ्यांमधील भुजबा जाधव-देशमुख आणि संतू मगर हे दोन नायक अस्सल मराठी बाण्याचे प्रतिनिधित्व करतात. हे दोन्ही नायक विचारवंत वारकरी आहेत. महाराष्ट्राच्या या शेतकऱ्याची मुळे दिघे तुकोबांपर्यंत शोधतात.
तुकोबा शेतकऱ्यांचे संत होते याचा पहिला उच्चार जोतिराव फुले यांनी केला. दिघ्यांनी त्याचा कलात्मक पातळीवर विस्तार केला, असे म्हणण्यात काहीच वावगे नाही.
‘आई आहे शेतात’ या दिघ्यांच्या आणखी एका कादंबरीचा नायक नानू सातपुते म्हणतो- ‘‘शेतकरी म्हणजे काय समजला तुम्ही? माझ्यासारखे सगळे शेतकरी झाले की तुमच्या कोणत्याही इझमला दाद देणार नाहीत. ऊन, वारा, पाऊस, गारठा, थंडी, साप, वाघ, किरडं यांच्याशी दरदिवशी, दरक्षणी लढाई देणारा, पंचभूतांशी झगडणारा, परमेश्वराच्या उत्पत्तिक्रियेचे आकलन करून तिचे नियमन करणारा शेतकरी तुम्ही हलकी असामी समजता? प्राणी, वनस्पती, भूगर्भ, कृषी, कृमी, कीटक, रसायन, जीवन, हवामान यांच्याबद्दलची शास्त्रे अनुभवांनी जाणणारा शास्त्रज्ञ; कीटक, कावळे, कोल्ही, तरस, बगळे यांच्यासारखे िहस्र प्राणी; चोर, गावगुंड यांच्याशी डावपेच खेळणारा सेनानी, राजकारणपटू व बाजारभावावरून कोणती पिकं काढायची हे ठरवणारा अर्थशास्त्रज्ञ.. असा आहे मूळ शेतकरी. खरा तत्त्वज्ञानी. याला तुम्ही काय समजू शकाल?’’
शेतकऱ्यांच्या राज्याचा.. ..  एक वेगळाच ‘युटोपिया’ दिघे रंगवतात. जोतिरावांनी बळीच्या राज्याची कल्पना मांडली होती. नंतर प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर यांनीही शेतकऱ्यांच्या राज्याची चर्चा केली. प्लेटोच्या युटोपियात तत्त्वज्ञच राजा होतो. दिघ्यांच्या तत्त्वज्ञ शेतकऱ्याच्या राज्यात राजाची गरजच नाही, हीच खरी लोकशाही आहे. मार्क्स, क्रोपोट्किन, जोतिराव फुले, महात्मा गांधी या सगळ्या अराज्यवाद्यांना कमी-अधिक प्रमाणात असेच काही तरी अभिप्रेत असते.
(अशाच प्रकारचा स्त्रीराज्याचा युटोपिया रंगवणारी कादंबरी ‘पालखीचा गोंडा’ काशीबाई कानिटकरांनी लिहिली होती, याचीही येथे नोंद घ्यायला हवी.)
तुकाराम-फुले-दिघे अशी परंपरा अधोरेखित करताना दिघ्यांनी तत्त्वज्ञाची प्रतिष्ठा दिलेल्या शेतकऱ्यांची आज काय अवस्था आहे याचाही विचार गंभीरपणे व्हायला हवा. नेमक्या याच ठिकाणी नेमाडय़ांच्या कादंबऱ्या व दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. साहित्य क्षेत्रातील उत्तराधुनिकतेची गाठ अर्थव्यवस्थेतील भांडवलशाहीशी, उत्तर भांडवलशाहीशी किंवा नवभांडवलशाहीशी आहे हे विसरता कामा नये. या टकराटकरीतच शेतकऱ्यांवर आज आत्महत्यांच्या प्रसंगांना तोंड द्यायची वेळ आली आहे व शासनही हतबुद्ध झाल्यासारखे वागत आहे. प्रश्न केवळ नुकसानभरपाई किंवा अनुदान देण्यापुरता मर्यादित नाही. नावेत साठलेले पाणी बाहेर टाकावेच लागते, पण ज्या छिद्रांमधून ते पाणी आत येत असते ती छिद्रे बुजवल्याशिवाय पाणी बाहेर काढण्याची कृती निर्थक ठरते, असा काहीसा हा प्रकार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला त्याच्या मूळ स्वभावाची, त्याच्या तात्त्विक बैठकीची जाणीव करून दिली पाहिजे. आणि हे काम साहित्यिकांचे आहे. त्यासाठी जरूर पडली तर जोतिरावांचा ‘असूड’ही हाती घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
िहदू, मुस्लीम, अस्पृश्य, आदिवासी अशा विविध सामाजिक-धार्मिक गटांचे अभिसरण संतांच्या व्यापक मानवतावादी दृष्टीने करून जोतिराव फुल्यांना अभिप्रेत असलेल्या एकमय लोकांचे म्हणजेच भारत या राष्ट्राचे प्रतििबब साहित्यात पाहू शकणारे दिघे हे एकमेव लेखक होत, आणि त्यांना ही जी दृष्टी लाभली ती त्यांनी स्वीकारलेल्या संतविचारांमुळे. ज्ञानदेव-तुकारामांच्या विचारांत असलेल्या तत्त्वांची कलात्मक हाताळणी करणारे दिघे हे मराठी कादंबरीचे मापदंडच होत. मराठी संस्कृतीची नस पकडून त्यांनी वारकरी शेतकऱ्याला नायक बनवले. या अर्थाने ते देशी आहेत. पण मुळात वारकरी विचारच वैश्विक असल्यामुळे वारकरीही आपोआप वैश्विक होतात. त्यांचे देशी असणे हे वसाहतवादविरोधातून निष्पन्न झालेले नाही, तसेच त्यांची वैश्विकता हे भाबडे स्वप्नरंजन नाही.
येऊ घातलेल्या उद्याच्या आर्थिक-सामाजिक विश्वाच्या एका बाजूचे दर्शन नंदा खरे यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीतून घडवले आहे- ते सर्वानाच अंतर्मुख करणारे आहे. व्यक्तीच्या स्वतंत्रतेपासून, स्वायत्ततेपासून आणि प्रतिष्ठेपासून सुरू झालेली भांडवलशाही आता नेमक्या याच गोष्टींच्या मुळावर आलेली आहे. साम्यवादी राष्ट्रांमधील शासन संस्था व्यक्तीची कशी गळचेपी करते याच्या अनेक सुरस कथा आपण ऐकलेल्या आहेतच. एक साम्यवादी व्यवस्था तिचा आर्थिक पायाच भुसभुशीत झाल्यामुळे कशी कोसळली व दुसरीने वेळीच शहाणे होऊन आपला आर्थिक पाया भांडवलशाही व्यवस्थेलाही लाजवील अशा प्रकारे कसा बळकट केला आहे हेही आपण पाहिले आहे. यावर उतारा म्हणून काही शक्ती धर्माचे हत्यार घेऊन पुढे सरसावल्या आहेत. एक शक्ती पुढे ढकलणारी तर दुसरी मागे खेचणारी, अशा पेचप्रसंगातून संपूर्ण मानवजातच चाललेली आहे, त्याला महाराष्ट्र किंवा मराठी साहित्य अपवाद असण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत आपण अर्थाध किंवा धर्माध होऊन कोणाच्या तरी मागे फरफटत जायचे की आपला विवेक शाबूत ठेवून आपल्यातील मनुष्यत्वही जपायचे, हा खरा प्रश्न आहे. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी असल्याचा डांगोरा ग्रीक काळापासून पिटण्यात येत आहे, आणि ते खरेही आहे. आपणाला जे काही आहे ते मिळवून देण्याचा मार्ग बुद्धी सांगते. याच बुद्धीने विज्ञानाची निर्मिती करून असे अनेक मार्ग माणसाला दाखवले. पण काय हवे असले पाहिजे हे बुद्धी सांगत नाही. तेथे विवेक कामाला येतो. विज्ञान आणि धर्म या दोहोंवरही विवेकाचे नियंत्रण पाहिजे. म्हणजेच बुद्धी आणि श्रद्धा यांच्याही वरचे स्थान विवेकाचे आहे. महात्मा गांधी हा आधुनिक काळातील सर्वात महान विवेकवादी नेता होता. ते ज्याला आपला आतला आवाज म्हणत असत तो खरे तर त्यांचा विवेक होता.
नामदेवांसारख्या संतांनीसुद्धा समाजाच्या याच विवेकाला आवाहन केले होते. संतांमधील या अंगभूत विवेकाचा उल्लेख करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात,
‘चंद्र तेथे चंद्रिका ।  शंभू तेथे अंबिका ।
संत तेथे विवेका । असणे जेवी ॥’
मराठी भाषेच्या या भूमीत ‘विवेकवेली’ची लावणी होऊ द्या, अशी ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली होती हे आपण जाणतोच.

*संमेलनाध्यक्षांच्या भाषणामुळे ‘बुकमार्क’हे नियमित पान आजच्या अंकात नाही.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?