10 April 2020

News Flash

२. सर्जक अन् विध्वंसक

आगीच्या ठिणगीनं शेकोटी पेटत जाते. त्या धगधगत्या शेकोटीच्या आगीनमायेनं मग गारठल्या जिवांना ऊब मिळते.

आगीच्या ठिणगीनं शेकोटी पेटत जाते. त्या धगधगत्या शेकोटीच्या आगीनमायेनं मग गारठल्या जिवांना ऊब मिळते. आगीच्या ठिणगीनं सरपण पेटत जातं, त्यावर अन्न रांधलं जातं. भुकेल्या पोटांची त्या ‘पूर्णब्रह्मा’नं तृप्ती होते. आगीच्या ज्या ठिणगीनं जसा हा तृप्तीचा अनुभव येतो, त्याच ठिणगीनं अतृप्तीची आगही भडकू शकते. त्या आगीत मग घरंच्या घरं, शेतंच्या शेतं आणि गावंच्या गावंही भस्मसात होऊ शकतात. आगीच्या शक्तीचा असा दुहेरी वापर आहे. सर्जक आणि विध्वंसक! शून्यातून स्वर्ग निर्माण करणारा आणि होत्याचं नव्हतं करणारा!! पण अन्न रांधून भुकेली पोटं भरायची का घरदार जाळून राखरांगोळी करायची, याचा निर्णय ती ठिणगी घेते का हो? नाही.. या सर्जक किंवा विध्वंसक वापराची बीजं असतात माणसाच्या मनात! कारण माणसाच्या मनाच्या शक्तीचा हाच दुहेरी वापर आहे.. सर्जक आणि विध्वंसक.. सकारात्मक आणि नकारात्मक..
मनाच्या सर्जक, सकारात्मक शक्तीच्या आधारावर जीवनही संपन्न आणि परिपूर्ण होऊ शकतं. त्याच मनाच्या विध्वंसक आणि नकारात्मक शक्तीनं जीवन उजाड, भकास होऊ शकतं. प्रेम, करुणा, दया, सहवेदनेनं मन संस्कारित झालं की ते व्यक्तीच्या जीवनाला व्यापकतेची दिशा देतं. द्वेष, मत्सर, ईष्र्या आणि वैरानं मन पेटलं की व्यक्तीचं जीवन दिशाहीन होत जातं. अगदी त्याचप्रमाणे अवघ्या समाजाचं मनच जेव्हा सामूहिक द्वेष, सामूहिक मत्सर आणि सामूहिक वैरानं पेटून उठतं तेव्हा त्या समाजाचं जीवनही दिशाहीन होत जातं. म्हणजेच जीवन हे व्यक्तिगत असो की सामूहिक, त्याचं भवितव्य अवलंबून आहे ते मनावर!
हे मनच माणसाला गोत्यात आणतं. हे मनच माणसाला गुंत्यातून सोडवतं. हे मनच माणसाला बंधनात पाडतं. हे मनच बंधनं झुगारून मुक्त होतं. थोडक्यात माणसाच्या समग्र जीवनावर मनाचाच प्रथम ताबा आहे. जीवनावर ज्या मनाचा ताबा आहे, ते मन ज्याच्या ताब्यात येतं, त्याचा जीवनावरही ताबा असतो! तोच खरा स्व-तंत्र असतो! आज आपला आपल्या जीवनावर ताबा नाही कारण आपलं मन आपल्या ताब्यात नाही! त्यामुळे आपण स्व-तंत्र जगत नाही तर विकारांच्या ऊर्मीच्या आधीन होऊन पराधीनतेनं जगत आहोत. म्हणून या मनाची जडणघडण हेच माणसांचं प्रथम कर्तव्य आहे. जीवनात तृप्ती हवी तर मग आत्मतृप्त हवं. तृप्तीसाठी अहोरात्र धडपडत असतानाही हे मन तृप्त नाही, कारण ते अशाश्वताच्या नादात अडकलं आहे. अशाश्वतात गुंतून त्यात शाश्वत तृप्तीचा आधार शोधण्याची भ्रामक आस या मनात रुजली आहे. अशाश्वताच्या आधारावर शाश्वत सुख लाभूच शकत नाही. जो शाश्वत आहे तोच खरं शाश्वत सुख देऊ शकतो. हा शाश्वत आधार कोणता हे एका सद्गुरूंच्याच आधारानं जाणता येतं. त्यामुळे मनाला सद्गुरूमयतेचं वळण लावण्यासाठीच तर ‘मनाचे श्लोक’ अवतरले!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2016 4:14 am

Web Title: a different reaction of fire
Next Stories
1 १. पडछाया
Just Now!
X