चीन-भारत सीमारेषा आखण्यासाठी ब्रिटनचे भारतीय परराष्ट्र सचिव हेन्री मॅकमहॉन यांनी भारत-चीन आणि तिबेट या राष्ट्रांची परिषद भरवली, त्याला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून, मॅकमहॉन रेषेला न जुमानण्याच्या चीनच्या अडेलतट्टू पवित्र्यालाही तितकीच वर्षे झाली आहेत. या शतकात भारताने चीनविरुद्धच्या युद्धात लाजिरवाणा पराभव स्वीकारलाच, पण पुढे वेळोवेळी सीमेवर होणाऱ्या चिनी कुरापत्या कायमस्वरूपी थांबविण्याचीही काळजी घेतली नाही. लडाख येथे चिनी लष्कराने केलेली ताजी घुसखोरी आणि त्यावरील मवाळ राजकीय भूमिका भारतीय उपखंडात ‘दादा’ बनलेल्या चीनच्या विस्तारवादी भूमिकेला खतपाणीच घालणारी आहे.
चिनी ‘वॉर्मअप’
आतापर्यंत अरुणाचल प्रदेशात स्वारस्य दाखविणाऱ्या चीनने दौलत बेग ओल्डी येथे भारतीय हद्दीत घुसखोरी केली त्याची कारणमीमांसा स्पष्ट नाही. कारण चीनच्या मते ती घुसखोरी नाही, भारताकडून ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही आणि तज्ज्ञांच्या मतांतही एकवाक्यता नाही. दौलत बेग ओल्डी या परिसराला भारताने २००८ सालापासून नव्याने हवाई तळाप्रमाणे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या धसक्याने चीनने या परिसरात घुसखोरी केली असावी किंवा चीन भारतीय प्रतिक्रियेला जोखण्याचे काम करीत आहे. चीनच्या जोडीला महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा भारत बाळगत असल्याने त्याला त्रास देण्याचा प्रयत्न चीन करीत आहे किंवा चीनचे हे विस्ताराकरीताचे ‘वॉर्मअप’ धोरण असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
इतिहास काय सांगतो?
१९५०मध्ये तिबेट आपल्या आधिपत्याखाली आणल्यानंतर तिबेटला चीनमधून जोडणारा महामार्ग चीनने अक्साई चीनमधून काढला. याची खबर भारताला तो पूर्ण होईस्तोवर आठ वर्षे मिळाली नव्हती. १९६०मध्ये या महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी आणि अक्साईचीनवरील हक्कांसाठी चीनने लडाखवर हल्ले चढविले. पुढे १९६२च्या युद्धात भारताच्या हद्दीतील काही भाग चीनने गिळंकृत केला. रशिया, जपान, कोरिया, व्हिएतनाम, तैवान आदी एकूण २२ शेजारी राष्ट्रांशी सीमासंघर्ष करून चीनने आतापर्यंत सीमाप्रश्न आपल्याला हवे त्या पद्धतीने हाताळण्यात कौशल्य हस्तगत केले आहे.
आर्थिक साम्राज्यवाद
भारत- चीन व्यापार ६० अब्ज डॉलर इतका मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. कच्चामाल, यंत्रे, तंत्रज्ञान ते कचकडय़ांच्या वस्तूंपर्यंत सगळ्यासाठी प्रचंड मोठी बाजारपेठ असलेल्या भारतावर चीनने अत्यंत सहजरीत्या कब्जा केला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा विचारही अशक्य असल्यासारखे आपले त्यांवरील अवलंबित्व ‘चायनीज खाद्यसंस्कृती’इतकेच फोफावले आहे.
भारताला वेढा
पाकिस्तानने ग्वादर या भौगोलिकदृष्टय़ा अतिमहत्त्वपूर्ण बंदराची जबाबदारी सिंगापूरकडून काढून चीनच्या कंपनीकडे सोपविली. मालदीवचे मरारा हे बेटही भाडेपट्टीवर चीनने घेतले आहे. श्रीलंकेमधील बंदर विकासाची जबाबदारी चीनने घेतली आहे. तेथील शहरे आणि त्यांच्या मूलभूत सेवा उभारण्यात चिनी कंपन्या आघाडीवर आहेत. बांगलादेशच्या चितगांव बंदराच्या विकासामध्येही चीनने गुंतवणूक केली आहे. म्यानमार येथील बंदर, नेपाळ-अरुणाचल प्रदेशातील अखत्यारीत असलेल्या भागात हवाई, रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे चीनने असे उभारले आहे, की भारताशी लढाई झाल्यास पूर्ण क्षमतेने व द्रुतगतीने सैन्य घुसवता येईल. याशिवाय चीन आपल्या शेजारील राष्ट्रांना भारताविरोधात चिथवत आहे, ते वेगळे. एका अंदाजानुसार भारतासोबत युद्ध झाल्यास चीन ७० हजार ते लाखभर सैन्य विविध मार्गानी भारतात सहजपणे घुसवू शकतो. ज्याचा प्रतिकार करताना भारताला रस्ते- रेल्वे आदींमधील आपल्याच मर्यादेमुळे जेमतेम तीन ते पाच हजारांपर्यंत सैन्य उभे करता येऊ शकते.
भारत-चीन सीमा
एकूण ४०५७ किमी लांबीची भारत आणि चीन यांच्यामधील सीमा आग्नेय काश्मीर ते तालू खिंड, लडाख, उत्तर प्रदेश, नेपाळ, सिक्कीम, भूतान, अरुणाचल प्रदेश यांच्यामधून म्यानमार-भारत-चीन यांच्या तिठय़ापर्यंत जाते.
सैन्यबळ आकडेवारी संदर्भ : ग्लोबल फायर पॉवर. आकडे २०११ व १२ मधील.
चीन                            
आघाडीवरील सैन्य – २, २८५,०००   
राखीव सैन्य – ८००,०००
रणगाडे – ७,९५०
विमाने – ५,०४८
विमानवाहू नौका – १
फ्रिगेट्स – ४७
विनाशिका – २५
पाणबुडय़ा – ६३

लष्करी बलाबल भारत

आघाडीवरील सैन्य – १,३२५,०००
राखीव सैन्य – १,७४७,०००
रणगाडे – ३,५५५
विमाने – १,९६२
विमानवाहू नौका – १
फ्रिगेट्स – १४
विनाशिका – ८
पाणबुडय़ा – १५