देशाने अनेक लोकप्रिय पंतप्रधान पाहिले आहेत. त्यात नरेंद्र मोदी यांचे वेगळेपण उठून दिसते. काही जण त्यांना जननायक म्हणतात तर काही मुरब्बी राजकारणी मानतात. विकासकेंद्रित राजकारण करणारी व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख आहे. माझ्यासाठी ते २१ व्या शतकातील समाजसुधारक आहेत. भारतीय समाजात त्यांनी अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाच कोटी ९२ लाख शौचालये बांधली गेली, तर तीन लाख खेडी व ३०० जिल्हे उघडय़ावर शौचाला बसण्यापासून मुक्त म्हणून घोषित करण्यात आले.

बाबा, लोक रस्त्यावर कचरा का टाकतात? आपला देश स्वच्छ करण्याची पंतप्रधानांची घोषणा त्यांनी ऐकली नाही का? त्यांना अशा सवयी मोडणे कठीण जात आहे काय? असे अनेक प्रश्न माझी ११ वर्षांची मुलगी सिद्धी हिने विचारले. निष्पाप मुलीच्या या प्रश्नांनी माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. देशाच्या सद्यस्थितीबाबत मुलांमध्ये किती सामाजिक जाणीव आहे हे माझ्या लक्षात आले. या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी किती सहजतेने जनमानसाशी आणि अगदी लहान मुलांशीही कसे जोडले गेले आहेत हेच ध्यानात येते.

सिद्धीचे हे जे निरीक्षण आहे, ते देशात जे अभूतपूर्व सामाजिक परिवर्तन होत आहे त्याचाच एक भाग आहे. देशातील नेहमीच्या राजकीय गदारोळात, चढाओढीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपली सकारात्मक ऊर्जा व वलयांकित नेतृत्वाचा वापर देशातील सामाजिक बदलांसाठी करत आहेत हे पाहून मला बरे वाटते. विशेषत: युवकांशी ते अधिक जोडले गेले आहेत.

देशाने अनेक लोकप्रिय पंतप्रधान पाहिले आहेत, त्यात मोदी वेगळेच भासतात. काही जण त्यांचा उल्लेख जननेता असा करतात तर काही त्यांना धुरंधर राजकारणी समजतात. अनेकांसाठी विकासाच्या राजकारणात विश्वास ठेवणारे आश्वासक नेतृत्व आहे. माझ्यासाठी ते २१ व्या शतकातील समाजसुधारक आहेत. देशात सामाजिक बदलांचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाच कोटी ९२ लाखांहून अधिक शौचालये बांधण्यात आली. तीन लाख खेडी, ३०० जिल्हे उघडय़ावर शौचाला जाण्यापासून मुक्त म्हणून घोषित करण्यात आले. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांत देशातील स्वच्छताविषयक साधनांची उपाययोजनांची व्याप्ती ३८ टक्क्यांवरून ७६ टक्क्यांपर्यंत गेली. स्वच्छता तसेच त्याच्याशी निगडित मूलभूत समस्या परिणामकारकरीत्या सोडविण्यासाठी एखाद्या पंतप्रधानाला देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे झाल्यानंतरही मेहनत घ्यावी लागते.

हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरून मोदींनी स्वच्छ भारत योजनेची कशी सुरुवात केली हे मला आठवते. भारतीय राजकारणात पंतप्रधानांनी हातात झाडू घेऊन रस्त्यांची स्वच्छता करावी हे कल्पनेपलीकडील आहे. देशात यातून बदल घडून आला. आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यातून समाजजीवनात आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. योगाला समाजमान्यता मिळवून देणे असो किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बडेजाव संपवण्यासाठी वाहनांवरील लाल दिवे काढणे, दिव्यांगांसाठी विशेष योजना आखणे, त्याचप्रमाणे राजपत्रित अधिकारी किंवा समपदस्थ अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र साक्षांकित करून घेण्याची पद्धत रद्द करणे अशा छोटय़ा गोष्टीही खूप परिणामकारक ठरतात.

सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी कठोर असे आर्थिक, राजकीय व व्यूहरचनात्मक निर्णय घेणे गरजेचे असते. ‘मन की बात’सारख्या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी थेट संवाद साधावा हेही विरळच. या कार्यक्रमात देशात कसे बदल घडविता येतील यावर भर असतो. लाल किल्ल्यावरून केलेले भाषण असो, त्यातून त्यांनी देशाला किंवा जगाला एक संदेश दिला. सामाजिक बदलांसाठी समाजाला प्रोत्साहन देणे असाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे.

खादी उद्योगाला चालना देण्याचे त्यांचे आवाहन क्रांतिकारक ठरले. खादीचा वापर स्वातंत्र्य चळवळीत प्रेरणादायी ठरला होता. खरे तर महात्मा गांधी यांचा वारसा जे सांगतात, त्यांनी शेतकरी किंवा कलावंतांच्या मदतीसाठी काहीच केले नाही. मात्र मोदींनीच याबाबत वेगळा विचार केला. ‘बेटी बचाओ बेटी बढाओ’सारख्या योजनांना अनेक राज्यांत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. हरयाणासारख्या राज्यात मुली व महिलांप्रति दृष्टिकोन बदलला. ७०० हून अधिक जिल्ह्य़ात तीन कोटी २० लाख आर्थिक दुर्बल गटातील महिलांना घरगुती गॅस जोडण्या देण्यात आल्या. एलईडी दिवे देण्याचा उपक्रम असाच अनोखा होता. जनऔषधी व अमृत फार्मसीच्या माध्यमातून गरिबांना स्वस्त दरांत औषधे देणे किंवा हृदयरोगावरील स्टेंटच्या किमती वा गुडघे प्रत्यार्पणासाठी लागणाऱ्या बाबींच्या किमतीवर नियंत्रण हे आरोग्य क्षेत्रातील एक क्रांतिकारक पाऊल ठरले आहे.

तिहेरी तलाकचा मुद्दा हा माझ्या हृदयाला भिडणारा.. या अमानवी प्रथेमुळे वर्षांनुवर्षे मुस्लीम महिलांवर अन्याय झाला. राजकीय पक्षांसाठी ही मतपेढी होती. प्रागतिक समाजात अशा दुष्प्रथांना स्थान असता कामा नये. त्यामुळे तिहेरी तलाक संपवून मुस्लीम महिलांचे हक्क व प्रतिष्ठेसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल पंतप्रधानांना सलाम करायला हवा.

मी काही राजकारणी नाही. मी कलावंत आहे, चित्रपट निर्माता आहे. सामाजिक वास्तवाला भिडणाऱ्या विषयांवर चित्रपट तयार करणारा सर्जनशील व्यक्ती आहे. मात्र सामाजिक बदलांचे चौकसपणे निरीक्षण करण्याची माझ्यात जिज्ञासा आहे. भारतीय समाज ज्या पद्धतीने बदलत आहे, त्याचा कधी विचारही केला नव्हता. जनता आता राजकीय नेत्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ लागली आहे. मात्र ते केवळ राजकीय कारणासाठी नाही तर भारतीय समाजव्यवस्थेत मूलगामी बदलांसाठी हा प्रतिसाद आहे.

गरिबातील गरिबाचा विचार करणारा एक शक्तिशाली नेता देशासाठी उज्ज्वल भविष्याची आखणी करत असल्यानेच माझा हा लेखन प्रपंच. राजकीय व्यक्तीपेक्षा मोदींकडे मी समाजसुधारक म्हणून पाहतो. त्यामुळेच सिद्धी किंवा तिच्या वयाच्या बालकांना ठामपणे सांगू शकतो की देशाची सूत्रे सुरक्षित व्यक्तीच्या हाती आहेत. त्यामुळेच आपल्यापेक्षा त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.

मधुर भांडारकर

लेखक चित्रपट निर्माते आहेत.