भली थोरली माणसे, मोठमोठय़ा घटना, बदल आणि क्रांतिकारक बदलांच्या गोष्टींनी भरलेला आपला हा काळ असतानाही त्यातल्या जवळपास प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार असूनही मला कसेबसे त्यांचे सांगाडे दिसतात..

डॉ. ऑलिव्हर सॅक्स या आपल्या काळातील एका महान विचारवंताचे गेल्या रविवारी निधन झाले. ते न्यूरोलॉजिस्ट (न्यूरोसायकॉलॉजिस्ट) होते. मेंदूचे कार्य समजून घेत. ‘जाणीव’ म्हणजे काय याचा त्यांनी सतत विचार केला. आपल्याला जे समजले आहे, ज्याचे ज्ञान झाले आहे ते समजणे म्हणजे काय किंवा ज्ञान होते म्हणजे काय, जे समजले ते समजले हे कसे समजते अशा व्यामिश्र जाणिवेवर ते लिहीत असत. त्यांनी विविध विषयांवर उदंड लेखन केले. परंतु त्यांच्या महत्त्वाच्या गाजलेल्या पुस्तकातून वा लेखांतून जी माणसे व त्यांचे वर्तन त्यांनी ‘समजावले’ ती मेंदूच्या विकाराने, वेदनेने वा जखमेने, वाढलेल्या गाठीमुळे वा आकुंचन पावलेल्या मेंदूच्या एखाद्या भागाने ग्रस्त होती. अशा ग्रस्त मेंदूसह जगताना या माणसांना होणारे भास वा त्यांना दिसणारे वास्तव, वस्तू वा मानवी संबंध समजून घेताना त्यांची उडालेली तारांबळ, विसरलेल्या वा तुरळक लक्षात राहिलेल्या भूतकाळामुळे त्यांना नसलेले भविष्याचे भान वा त्यांचा सुटलेला वास्तवाचा आधार, अशा माणसांविषयी व त्यांच्या आकलनातून उलगडणाऱ्या सत्याविषयी डॉ. सॅक्स लिहीत असत.
पण समजा असा कोणताच मेंदू विकार नसताना माणूस सॅक्स यांच्या ग्रस्त माणसासारखा वागू लागला तर? डॉ. सॅक्स यांचा अभ्यास विकृतीच्या प्रकृतीविषयीचा होता. सुदृढ व मेंदूचा कोणताच विकार न झालेल्या माणसाच्या जाणिवेविषयी वा त्याच्या तशाच वागण्याविषयी डॉक्टरांचे काय अनुमान असावे? कदाचित त्यांच्यातला मानसशास्त्रज्ञ जागा होऊन मनाच्या खेळाविषयी त्यांनी आराखडे मांडलेही असते. पण केवळ एक माणूस नव्हे तर माणसांचा जमाव, जमावांचे संघ, संघांचा समाज असा अख्खा समाजच असे वागू लागला तर त्याचे निदान कसे करायचे?
हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे गेली काही वर्षे मला माझ्यातच असे बदल घडत आहेत याची जाणीव झाली. एका सकाळी तर ‘द मॅन हू मिस्टूक हिज वाइफ फॉर अ हॅट’ या पुस्तकातील जवळपास प्रत्येक नायकाला झालेला विकार आपल्याला झाला आहे असा मला भास झाला. त्याही पुढे जाऊन नंतर आजूबाजूला पाहताना जवळपास प्रत्येक माणसाला अशा कोणत्या ना कोणत्या मेंदू विकाराची लागण झाली आहे, असे मला वाटू लागले. मी नक्कीच डॉ. सॅक्स यांचा पेशंट नाही. माझ्या मेंदूच्या कोणत्याच भागात अजून तरी कोणती गाठ नाही. माझ्या आजूबाजूच्या माणसांना व तेही इतक्या हजारो- लाखो माणसांना एकाच वेळी अशी गाठ होण्याची वा त्यांच्या डोक्यात कुणी वरवंटा घालण्याची शक्यता नाही, तरीही मग मला असे का वाटते आहे?
रोज सकाळी उठताना आपण रिप व्हॅन विंकलच आहोत. इतकेच नव्हे तर बाहेर पडताच भेटणारी, रस्त्यावरून गर्दीने चालणारी, लगबगीने ऑफिस गाठू पाहणारी, ट्रॅफिक जॅमच्या कचाटय़ात अडकलेली वा भरधाव गाडय़ा उडवणारी सारीच माणसे रिप व्हॅन विंकलसारखी मला का वाटावीत? रिप व्हॅन विंकल वीस वर्षांनी उठला. इथे तर रोज उठताना आपण विंकल आहोत किंवा कोणीच नाहोत, असा भास का व्हावा?
दाभोलकर यांच्या हत्येला खरंतर नुकतीच दोन वर्षे झाली. परंतु मला त्यांचा खून पुसटसा आठवतो. पानसरे खरेतर गेल्या वर्षी मारले गेले, पण असे वाटते त्यांना लांब कुठेतरी अस्पष्ट भूतकाळात पाहिले होते. कित्येक वर्षांपूर्वी. कलबुर्गीना मारून अजून महिनादेखील लोटला नाही पण तरीही त्यांना आठवताना त्यांच्या मरणाची घटना घडून कित्येक वर्षे लोटली असे वाटते.
गेली दहा वर्षे तरी मी नियमित प्राइम टाइम टीव्ही पाहतो. चॅनेल्स बदलून जिथे जोरजोरात हमरीतुमरीची चर्चा, वादविवाद चालू आहेत तेवढेच कार्यक्रम निवडून पाहतो. चॅनेलच्या काही बहादूर अँकर्सचे निर्भीड व कित्येकदा निर्लज्ज प्रश्न ऐकून पाहून मी हसतो, रागावतो, शरमतो किंवा चकित होतो. पण आज जर मला तुम्ही या दहा वर्षांतील अक्षरश: हजारो सनसनाटी व रोमांचकारी कार्यक्रमांतून दहा चर्चाचे विषय वा मांडणी सांगायला सांगितले तर मला कसाबसा आज मघाशी पाहिलेला शीना बोरा हत्येचा कार्यक्रम आठवेल.
भली थोरली माणसे, मोठमोठय़ा घटना, बदल आणि क्रांतिकारक बदलांच्या गोष्टींनी भरलेला आपला हा काळ असतानाही त्यातल्या जवळपास प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार असूनही मला कसेबसे त्यांचे सांगाडे दिसतात. विस्मरणाचा डोक्यात स्फोट व्हावा किंवा विस्मृतीची एक भयंकर साथ यावी तसा मी व कदाचित आपण सगळेच जण आपला सारा भूतकाळ- मग तो जवळचा वा लांबचा असो, तो विसरून एका सततच्या वर्तमानाच्या तुकडय़ावर जीवन जगतो आहोत काय? हा खरा प्रश्न आहे.
भूतकाळाचे भान नसणे म्हणजे भविष्याचा वेध नसणे, वर्तमानाच्या तुकडय़ावर सततच्या रिअल टाइममध्ये जगणे म्हणजे संदर्भाखेरीज व इतिहासाशिवाय जगणे, आपल्या आयुष्यातून कोणी इतिहासच चोरून नेला आहे काय?
इतिहास म्हणजे भाषा, इतिहास म्हणजे मानवी सौंदर्यशास्त्राची मांडणी, इतिहास म्हणजे बदलाची जाण, इतिहास म्हणजेच राजकारणाचे ज्ञान, इतिहास म्हणजे मानवी मनाला पडलेल्या तात्त्विक प्रश्नाचा व म्हणून मानवी स्वप्नाचा गाभा. इतिहासाशिवाय रिक्त जगणे म्हणजे नागडय़ा पशूसारखे भटक भटक भटकणे. इतिहास नसणे म्हणजे राजकारण किंवा राजकीय अस्तित्व नसणे. अमानवी म्हणून अमानुष व न-मानवी म्हणून निष्क्रिय जगणे. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ व मार्क्‍सवादी विचारवंत फ्रेडरिक जेमसन जेव्हा ‘ऑलवेज हिस्टोरिसाइझ’ असा उद्घोष करतात तेव्हा तो किती मूलभूत आक्रोश आहे याचा प्रत्यय आपल्या रोजच्या जगण्यातील हरवलेला इतिहासबद्ध विश्वामुळे हाती उरलेला चतकोर वर्तमानाच्या तुकडय़ावरून येतो.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अचाट प्रगतीमुळे गेल्या काही वर्षांत माणसाचे आयुर्मान वाढले. एका अभ्यासानुसार आज ब्रिटनमध्ये जगत असलेला सव्वीस वर्षांचा युवक गट वयाची सरासरी शंभरी सहज पार करेल असा विश्वास तज्ज्ञांना वाटतो. पण विस्मरणाचा क्षय झालेल्या समाजात, अशा माणसांचे खरे आयुष्य किती? आठवण नसेल तर आयुष्याची लांबी मोजायची कशी? आठवण ही मानवी बुद्धीची समृद्ध जाणीव आहे. कॉन्शसनेसची सेंद्रिय घडण वर्तमानाच्या तुकडय़ावर तेव्हाच जन्म घेते जेव्हा त्यापाठी सर्जनशील आठवणींचे जननक्षम गर्भाशय असते.
अशा अराजकीय वा न-राजकीय अनैतिहासिक समाजात ना कोणती महान कलाकृती जन्माला येते ना कोणते दैवी संगीताचे सूर कानावर पडतात. ना एखादा बुद्धमार्ग प्रगटतो, ना कोणती असामान्य कवितेची ओळ इपिक बनू पाहते. कोलाज, फ्यूजन, मिक्स, रिमिक्स, अर्थ नसलेल्या बाष्कळ शब्दांच्या ओळी म्हणजेच कविता किंवा पोपटपंची करणारे श्रीश्री वा श्रीमती श्रीमती सारखे माँ, भैया, पिता वा जगत्गुरू अशा बेगडी पदव्या धारण करणारे रामपासून शाम देव म्हणवणारे बाबा व बाया यांचे भंपक अध्यात्म असा हा वर्तमानाचा रिकामा तुकडा असतो. या आपल्या काळाला नाव काहीही द्या, उत्तर आधुनिक, उत्तर औद्योगिक, बहुराष्ट्रीय, ग्लोबल वा ग्राहक चंगळवादी भांडवलशाही- पण सांस्कृतिक व आध्यात्मिक अशा दोन्ही बाजूंनी रिकामा असलेला हा काळ आहे यात शंका नाही आणि उथळ पाण्याला खळखळाट फार या न्यायाने कोणीही सोम्यागोम्या दिपवणाऱ्या झगमगाटी इव्हेंट्सच्या भपकेबाज आवेशात येथे कलावंतापासून पंतप्रधानापर्यंत व तत्त्ववेत्त्यापासून आध्यात्मिक योगसाधकापर्यंत काहीही बनू व बनवू शकतो, याची स्वत:च उदाहरणे देण्याची गरज नाही. नियोजित मूल्यशून्यता (अु२’ी२ूील्लूी) आणि कधीही न अनुभवला होता असा फॅशनचा रेटा, जगण्या-राहण्याच्या स्टाइलमध्ये होणारे सततचे बदल, सततचे नूतनीकरण (मग ती गाडी असो वा घर, फर्निचर असो की इंटेरिअर, फोन असो वा कम्प्युटर, मित्र असो वा मैत्रीण) साऱ्या जगण्याच्या आरपार गेलेली जाहिरातबाजी, त्यामुळे संस्कार वा संदर्भ नव्हे तर जाहिरातीच्या बिल बोर्डवर दिसतात तसे एका साच्याचे व जाहिरातीचा निओन लाइट बदलला तरच वेगळे दिसणारे, परंतु तरीही एकसारखे स्त्री-पुरुष, टीव्ही आणि मीडियाचे अतिस्वातंत्र्य व त्याच्या बुरख्याखाली आपल्या खासगी आयुष्यात घुसलेला त्यांचा कॅमेरा किंवा बूमचा दांडा, जुने ताण- मग ते खेडी व शहरांचे असोत, केंद्र राज्यांचे असोत- त्यावर ताण तसेच ठेवून ओढलेला सार्वजनिक प्रमाणाचा- स्टँडर्डायझेशनचा पडदा. बिनगरजेतून निर्माण झालेली, एक्स्प्रेस हायवेजनी रुजवलेली मोटारींची बिनसंवादी एकांडी संस्कृती. ही येथील जागतिक खुल्या बाजारपेठी भांडवलशाहीची इतिहास नसलेली सद्य अवस्था लक्षणे आहेत. येथील प्रत्येक जणच ‘एमबीए’ आहे. त्या प्रत्येकाची भाषा त्याच्या स्पाइक केलेल्या केशभूषेसारखीच मुद्दाम खुरटलेली आहे, येथील सगळ्यांचे चेहरे गुळगुळीत आहेत. त्यावर आठवणींची कोणतीही सुरकुती नाही. येथील सगळ्यांचेच चेहरे आखून दिलेल्या डिझायनर स्माइलसारखे बुळबुळीत आहेत. त्यावर बाजूच्या जगण्यातील विसंगतीमुळे कोणतीच आठी उठत नाही. येथील सगळ्यांच्याच डोळ्यांना एक आखीव शहर व तेवढेच दिसू शकते. आजूबाजूच्या झोपडय़ा वा चाळीतील गुदमरलेले श्वास व त्यांचे वास त्यांनी स्वत:वर व स्वत:च्या घरात, गाडीत फवारलेल्या उसन्या परफ्यूममध्ये त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत. तेंडुलकरांची माणूस नावाची बेटे व गिधाडेमधील कुटुंबे येथे आता जागोजाग भेटू लागली आहेत.
एका उत्सवी, अतिमुक्त, चंगळवाद, लासवट बाजारपेठेवर आधारित भांडवलशाहीचा हा क्षण आहे. क्षण म्हणण्याचे कारण त्याचे आविष्करण- जीवनमरण एका वर्तमानाच्या तुटपुंज्या भागावर चालते. पुसट होत चाललेली इतिहासाची जाणीव आणि या क्षणाच्या प्रत्येक थेंबा-थेंबातून येथील सामाजिक व्यवस्थेची भूतकाळाला- म्हणजे अनुभवाला धरून ठेवण्याची कमजोर होत चाललेली क्षमता हे या समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. शाश्वत वर्तमान व सतत बदलाचे वादळ अशा तणावात जगणे केविलवाणे बनते.
सतत ब्रेकिंग बातमी आणून आपल्या मेंदूवर एकाच वेळी माहितीचा वरवंटा आपटून येथील मीडिया-माध्यमे आपल्याला मेंदूच्या विकाराने ग्रस्त करतात. दर क्षणाला बातमीचा नवा तडाखा हाणल्याने आपण त्याआधीचे सहज विसरतो. माध्यमे ही आपला मानसशास्त्रीय विस्मृती व्याधीची (अेल्ली२्रं) नुसतीच कारणे नसून बाजारपेठीय भांडवलशाहीमुक्त राजकारणाची धूर्त दलालच आहेत.
कला काय किंवा राजकारण काय, त्यांचा एक मुख्य उद्देश प्रश्न विचारणे हा असतो. नकारात्मक, विध्वंसक, मर्यादा तोडणारे, विरोधी, गंभीर आणि टीकात्मक या व अशा अभिव्यक्तीतून समाजाला मशाल दाखविण्याचे काम ते करतात. जर कला, तत्त्वविचार व राजकारण हे सारेच समकालीन मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेची यंत्रणा बिनघोर राबविण्याचे काम करणार असतील तर डॉ. सॅक्स यांच्या पात्राप्रमाणे आपण सारेच अर्थहीन काळाच्या दोरीवर लटकणारे वेताळ म्हणून लोंबकळत राहू. गरज आहे ती या व्यवस्थेचे लॉजिक भेदण्याची. तिचे समीकरण चुकवण्याची. तिचे गणित तोडण्याची. इतिहासाचे धागे जुळवण्याची. हरवलेली भाषा मिळवण्याची. कवितेची ओळ शोधण्याची. संगीताची लांब गेलेली गाज पुन्हा गात्रा गात्रात गुणगुणण्याची.
शोस्ताकोविच्च्या लेनिनग्राड सिम्फनीसारखे संगीत निर्माण करण्याची. सर्जनाची थीम (किंवा विषय) आता तथाकथित गोडगोड सुंदरतेतून नव्हे तर तथाकथित कुरूपतेच्या आणि आजूबाजूच्या रुदनाच्या सुरातूनच प्रकटायला हवी.
लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि
नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल:
sanjeev.khandekar@gmail.com