भारतात समलिंगी संबंध हा गुन्हाच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने अशा संबंधाच्या समर्थकांना त्याचबरोबर इतरही अनेकांना धक्का बसला. आपल्या देशातील कायद्यानुसार समलिंगी संबंध हा गुन्हा असून तो वैध ठरवायचा असेल तर विद्यमान कायद्यात बदल करावे लागतील. हा निर्णय संसदच घेऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत समिलगी आकर्षण असलेल्या व्यक्तींची संख्या कमी असली तरी हा मुद्दा आहे महत्त्वाचाच. कारण तो व्यक्तिस्वातंत्र्याशीही निगडित आहे.. या प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची चर्चा करणारे आणि प्राचीन काळापासून आजपर्यंत भारतीय विवाहसंस्थेत झालेल्या बदलांचा आढावा घेणारा लेख..
नाझ  ही समलिंगींची संस्था विरुद्ध दिल्ली सरकार यांच्या खटल्याच्या निकालानंतर समस्त समलिंगी स्त्री-पुरुषांच्या डोळ्यासमोर फुललेली स्वप्ने अलीकडच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केवळ पुसली गेली, असे नव्हे तर आपण जन्मालाच आलो ते मुळी ‘गुन्हेगार’ म्हणून असा पाशवी शाप व छाप घेऊन आयुष्याला सामोरे जाण्याची असाहाय्य वेळ त्यांच्यावर आली आहे. प्रत्येक संवेदनशील मनाला लाज वाटावी आणि शरमेने मान खाली जावी, असा हा काळीज हरवलेला निर्णय आहे, अशीच प्रतिक्रिया साऱ्या देशभर गेला आठवडाभर उमटते आहे.
नैतिकतेच्या सजग भिंगातून समाजाकडे पाहण्याची दृष्टी येण्याचे प्रमुख साधन म्हणजे त्या त्या समाजात विकसित झालेले राजकारण व सौंदर्य (विवेक)शास्त्र. किंबहुना राजकीय प्रवाहाच्या ‘बांधणीतूनच नैतिकता व म्हणून त्या समाजाचे सौंदर्यशास्त्र विकसित होत असते. त्यामुळे राजकारणाइतकेच महत्त्व त्या त्या समाजातील साहित्य, संगीत आदी कला व्यवहाराला असते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, विशेषत: जेव्हा जगभर समलिंगी व्यवहाराला कायदेशीर मान्यता मिळत असताना, समलिंगी विवाह अंगीकारले जात असताना, ज्या वेळी उलटा येतो त्या वेळी आपल्याकडील राजकीय किंवा कलात्मक व्यवहारांची मर्यादा स्पष्ट होते की काय, असा प्रश्न पडू शकतो. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल अशा व्यवहारांची व्याप्ती अधोरेखित करतो तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मात्र येथील राजकारणाची व म्हणून कला व्यवहाराची मर्यादा दर्शवितो, असा हा दुतोंडी अनुभव आहे.
भांडवलशाही व मुक्त बाजारपेठेच्या गेल्या ३००-३५० वर्षांच्या इतिहासात ज्या काही ठळक चांगल्या गोष्टी घडल्या त्यात स्त्री-मुक्ती, दलित व कृष्णवर्णीय चळवळी आणि तिसरी समलिंगी स्त्री-पुरुषांच्या मानवी हक्कांसाठी निर्माण झालेली, अशा काही महत्त्वाच्या मुक्ती चळवळींचा उल्लेख करावा लागेल. डाव्या विचारांनी स्वाभाविकच या सर्व मानव मुक्ती चळवळीवर आपला हक्क सांगितला असला तरी भांडवली अर्थव्यवस्थेतील स्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्याचा उद्घोष या चळवळींच्या जन्माला कारणीभूत आहे यात शंका नाही. आपल्या देशात फुले, आंबेडकर, गांधी आणि नेहरू यांची परंपरा असल्याने या चळवळींना खतपाणी तर मिळालेच, पण त्यांची स्वतंत्र राजकीय व म्हणून नैतिक ताकद निर्माण होऊ शकली.  दुर्दैवाने समलिंगी मानव मुक्ती चळवळीत अन्य समाज फार मोठय़ा संख्येने सामील झालेला आपल्याला दिसत नाही.
 जगभर ज्या देशात मुक्त बाजारपेठेने परिसीमा गाठली आहे, अशा अजस्र भांडवली अर्थव्यवस्थेतील पाश्चिमात्य व अमेरिका आदी देशांत मात्र समलिंगी चळवळींनी बराच लांबचा पल्ला गाठल्याचे दिसून होते. मुक्त बाजारपेठेची परिणती म्हणून येणारे अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य तर या यशाचे गमक नाही ना, अशी रास्त शंका गेल्या काही वर्षांत अनेक विचारवंतांनी बोलून दाखवली आहे. आपल्याकडे समलिंगी व्यवहारासंबंधी किती कथा, कादंबऱ्या, नाटके, सिनेमा वा चित्रे निर्माण झाली? हाताच्या बोटावर त्यांची संख्या मोजावी लागेल. किती समीक्षा झाली, असा प्रश्न विचारला तर आपल्याला तोंड लपवावे लागेल. केकू  गांधी यांचा अपवाद वगळता येथील किती कलादालनांनी जाणीवपूर्वक समलिंगी कलाव्यवहाराला सौंदर्यशास्त्राच्या परिभाषेत आणण्याची उठाठेव केली? एक भूपेन खख्खर वगळता व अलीकडचे दोन-चार अपवाद वगळता किती जणांची चित्रे कलासंग्रहालयात दाखवली गेली? किती नाटके वा कविता आपण वाचल्या?  येथील फॅशनच्या दुनियेत समलिंगी सौंदर्यशास्त्राचे मापदंड केव्हा घडवले गेले? आपल्याकडे जे झाले तेही गेल्या काही वर्षांत अर्थव्यवस्था खुली झाल्यावरच!
काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘विचित्र- विक्षिप्त सौंदर्यशास्त्रबंद कपाटापासून रॅम्प वॉकपर्यंत अशा नावाने फॅशनच्या चळवळीचा मागोवा घेणारे- सुमारे तीनशे वर्षांच्या वाटचालीचा मागोवा घेणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ख्रिस्तोफर डॉयर, बिल ब्लास, हालस्टन, अशा अनेक कलावंतांची सुमारे १०० कामे या प्रदर्शनात पाहायला मिळाली. अठराव्या शतकातील सुप्रसिद्ध ‘मॉली’ घरे, तेथे दारू पिऊन नाचणारे, स्त्री वेश परिधान करून झुमणारे पुरुष यांच्याविषयी रिक्टर नॉरटन या समलिंगी समाजाच्या इतिहासकाराने बरेच लेखन केले आहे. समलिंगी स्त्री-पुरुषांना मिळणाऱ्या अघोरी शिक्षा, त्यांची काढण्यात येणारी धिंड, आणि प्रसंगी मृत्युदंडदेखील अशी वर्णने वाचताना अंगावर काटा येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपल्याला जणू अठराव्या शतकात ढकलले गेले आहे याची जाणीव होते. या प्रदर्शनात विसाव्या शतकातील पुरुषी, स्नायूंचा पिळदारपणा दाखवणाऱ्या स्त्रिया, गे क्लोनस् आणि ड्रॅग क्वीन अशा विविध अवतारांतील आविष्कार फॅशनच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात कसे मुरवले गेले याची मांडणी केली आहे.
१८९० मधील लालभडक नेक टाय, १९३० मधील ब्लिच केलेले रंगीत केस आणि १९७० मध्ये कोन असलेल्या टोकदार ब्रेसियर्स अशा आविष्कारांमागे असलेल्या अनेक कथा या प्रदर्शनात उलगडल्या गेल्या होत्या. प्रश्न असा आहे की, आपल्याकडे असा इतिहास मांडण्याची जबाबदारी येथील संपन्न सांस्कृतिक विश्व घेणार आहे की नाही?  ‘गिल्बर्ट व जॉर्ज’ या प्रसिद्ध समलिंगी जोडगोळीचे ‘जिवंत शिल्प’, ‘गाणारे शिल्प’ सत्तरीच्या दशकात जगभर फिरून आले. या दोघांनी एकत्रित काढलेली चित्रे, समलिंगी चष्म्यातून जगातील हिंसेकडे, असमानतेकडे, क्रूरतेकडे आणि भूक व उपासमारीकडे पाहतात आणि चित्रकलेच्या क्षेत्रात सौंदर्याचे एक नवे दालन उघडतात. अशी अक्षरश: शेकडो उदाहरणे कलेच्या प्रत्येक प्रांतात आपल्याला पाश्चिमात्य आधुनिक इतिहासात सापडतात.  या प्रत्येक कलाकृतीने समलिंगी चळवळीचा मार्ग रुंद केला आहे. आपल्याकडे अजूनही अशा कामांना व चळवळींना उपेक्षितांचाच दर्जा मिळालेला दिसतो. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आपण सर्वच जण कमीअधिक स्वरूपात सामील आहोत असेच म्हणावे लागेल. उत्कट प्रेमाविषयी बोलताना प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॅक्स लाका यांच्या एका प्रबंधाचे निरूपण करताना ‘द क्राइंग गेम’ या फिल्मचे उदाहरण देण्यात येते. या फिल्मच्या शेवटी प्रेमी युगूल जेव्हा शयनगृहात पोचते, त्या वेळी प्रेमाच्या उत्कट क्षणी नायकाला आणि म्हणून प्रेक्षकांना असा धक्का बसतो, जेव्हा नायक आपल्या विवस्त्र प्रेयसीकडे पाहतो. त्याची प्रेयसी असते ड्रग क्वीन-स्त्रीवेशातील पुरुष. एवढय़ा प्रचंड वंचनेनंतर सामान्य नायकाचे काय होईल? परंतु प्रेमाचा रेटा एवढा जबरदस्त की समलिंगी नसलेला, सैन्यात अधिकारी असलेला हा नायक त्याला (तिला?) आपला जोडीदार म्हणूनच स्वीकारतो. काय करणार आपण ‘नैसर्गिक’ प्रेमाची व्याख्या? न्यायालये व प्रस्थापित व्यवस्था यांचे कल्पनाविश्व लहान असते, कोते आणि वहिवाटीचे म्हणून आखीव व रेखीव असते. अशा भावविश्वाला मर्यादा असतात. म्हणून त्या त्या समाजातील कलावंतांचे व विचारवंतांचे मुख्य काम असे बांधलेले रस्ते तोडण्याचे, नव्या वाटा निर्माण करण्याचे, नव्या खिडक्या उघडून क्षितिजाला विस्तारण्याचे असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अंजन डोळ्यात पडून आपण सर्वानीच भव्य क्षितिजावरील सूर्यबिंब पाहण्याचे ठरवले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘विचित्र- विक्षिप्त सौंदर्यशास्त्रबंद कपाटापासून रॅम्प वॉकपर्यंत अशा नावाने फॅशनच्या चळवळीचा मागोवा घेणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ख्रिस्तोफर डॉयर, बिल ब्लास, हालस्टन, अशा अनेक कलावंतांची सुमारे १०० कामे या प्रदर्शनात पाहायला मिळाली.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?