|| सुहास सरदेशमुख

मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरूकपणे कर्तव्य बजावलेले निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे हे टिपण…

फक्त आम्हालाच सारे कळते, हा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचा तोरा तेव्हा विकसित व्हायचा होता. माहिती-तंत्रज्ञान हे क्षेत्रच अस्तित्वात नव्हते. निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी लागणारी आकडेवारी मिळविण्याकरिता गावागावांतील यंत्रणेवर महिनोन्महिने अवलंबून राहावे लागत असे. तर्क, गृहीतके आणि एखाद्या दौऱ्यातून परिस्थितीचे अवलोकन करून निर्णय घ्यावे लागत. अशा कालखंडातील सनदी अधिकारी अशी भुजंगराव कुलकर्णी यांची ओळख होती. विधायक काही घडवून आणण्यासाठी आणि ब्रिटिश व्यवस्थेतील नोकरशाहीचे दोष दूर करण्यासाठी ढुसण्या देत राहावे असे काम सनदी अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते. बहुतेक सनदी अधिकारी योजना आखताना सर्वसामान्यांपेक्षा सत्ताधाऱ्यांचा विचार पुढे सरकविण्यात धन्यता मानतात, अशा काळात राज्य आणि त्यातील मागास प्रदेशाच्या जडणघडणीचा विचार करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यशैलीची ओळख व्हावी म्हणून भुजंगराव कुलकर्णी या व्यक्तिमत्त्वाकडे पाहावे लागेल. ‘मी, मराठवाडा आणि महाराष्ट्र’ या त्यांच्या आत्मचरित्रात्मक नोंदींमध्येही हीच बाब प्रकर्षाने पुढे येते.

‘महाराष्ट्राचा विकास’ या शब्दांतून मराठवाडा आणि विदर्भ कसा सहजपणे सुटून जातो, ही राजकीय गणिते लक्षात आणून देण्यासाठी काही जणांनी आवर्जून काम केले. अर्थात, ते काम अजूनही संपलेले नाही. पण ते आता कोणी आवर्जून करत नाही. कारण त्यासाठी लागणारे वैचारिक नेतृत्वही आता शिल्लक राहिलेले नाही. गोविंदभाई श्रॉफ यांच्या रूपाने मराठवाड्यातील घटना-घडामोडींना असणारे वळण आता पुरते नाहीसे झाले आहे. एवढे की, त्यांनी स्थापन केलेल्या सरस्वतीभुवन शिक्षण संस्थेतून त्यांचे छायाचित्रही हलविण्याइतपतची ती घसरण आहे. विकास प्रक्रियेत प्रादेशिक समतोल असायलाच हवा, या दृष्टीने विचार करण्यास लावणारे नेतृत्व जेव्हा मराठवाड्यात होते तेव्हा नोकरशाहीतील भुजंगराव कुलकर्णी यांच्यासारखी मंडळी त्या प्रक्रियेला साथ देणारी होती. आता दबावगटच नसल्याने नोकरशाहीच नेतृत्व करू पाहाते आहे आणि त्यांना रोखू शकेल एवढा आवाका असणारे राजकीय व पक्षीय नेतृत्वही शिल्लक नाही. अशा काळात, १९७४ साली सेवानिवृत्त अधिकाऱ्याची कार्यशैली आणि त्यांनी केलेल्या सूचनांवर पुन्हा विचार करावा लागणे, हे शासकीय व्यवस्थेच्या अवमूल्यनाचे निदर्शक म्हणता येईल.

काही व्यक्तिमत्त्वे अभ्यासाच्या जोरावर मुद्दा पुढे रेटतात, तर काही जण विचारांची देवाणघेवाण करत निर्णय घेताना लवचीक असतात. भुजंगराव कुलकर्णी निर्णय प्रक्रियेत गुणग्राहक होते. शासकीय कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी अधिकारपदाचा वापर करणे हा प्रशासकीय प्रक्रियेचा भाग; पण गुणग्राहकता दाखवत सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत काम करून घेणारे काही अधिकारी असतात. भुजंगराव या प्रोत्साहनपर शैलीतले. एखाद्या कर्मचाऱ्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या कामाचे लेखी कौतुक करून त्याचा गौरव करण्याची प्रथा त्यांनीच राज्यात पहिल्यांदा आणली. अशा अनेक बाबी त्यांनी पहिल्यांदा घडवून आणल्या. त्यात जनगणनेचे राज्यातील कामही मोठे. शिवाय त्यांनी मराठवाड्यातील सिंचन आणि अनुशेष या क्षेत्राकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. वैधानिक विकास महामंडळाची उभारणी आणि त्याचा राज्यकत्र्यांनी केलेला ऱ्हास या दोन्ही बाबी त्यांच्या हयातीत घडल्या. मागास भागाला न्याय मिळायला हवा अशी मांडणी करणारे राजकीय नेतृत्वही शिल्लक राहिलेले नाही आणि प्रशासकीय पातळीवर अनुशेष हा शब्दही आता उच्चारला जात नाही. विविध शासकीय समित्यांवर काम करणाऱ्या व्यक्ती एखादी बाब घडवून आणावी यासाठी आता फार तर पत्र लिहितात. नोकरी वाचविण्यासाठी आणि अधिक चांगल्या पदावर नियुक्तीसाठी करावी लागणारी हडेलहप्पी हा नोकरशाहीचा आत्मा बनलेला आहे. त्यामुळे भुजंगराव कुलकर्णी यांचे स्मरण म्हणजे निर्मळपणे लोककल्याणासाठी काम करणाऱ्या प्रवृत्तीचे स्मरण मानावे लागेल.

भुजंगराव कुलकर्णी हे भौतिकशास्त्राचे विद्यार्थी. पण त्यांना तो विषय फारसा शिकता आला नाही. त्या काळातील रेडिओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तशी हाताळता आली नाहीत. त्यामुळे इंग्रजी व मराठी साहित्य ते वाचत गेले. भारतातील आणि तत्कालीन मुंबई प्रांतातील राजकीय व सामाजिक घटना समजून घेण्यासाठी ते नियतकालिकांचे वाचन करत गेले. त्यातून आपसूकच चिकित्सक वृत्ती अंगी बाणली गेली. अभ्यास करताना विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची वृत्ती होती, अशी त्यांची आठवण सांगणाऱ्या मंडळींची संख्या विविध क्षेत्रांत आहे. पुण्यासारख्या शहरातील आयुक्त म्हणून रस्त्यात रोवलेले दगड काढण्यापासून बालगंधर्व नाट्यमंदिर व सारसबाग निर्माणात योगदान देणारे भुजंगराव कुलकर्णी यांचा स्वभाव विधायक घडवून आणण्याचा होता. तेव्हा- पुण्यात रंगमंदिराची उभारणी करताना अडचण आल्यास आवर्जून कळवा, असा पत्रव्यवहार पु. ल. देशपांडे यांनी आयुक्त असणाऱ्या भुजंगरावांशी केला होता. मागास आणि प्रगत अशा दोन्ही भागांत काम करणारे भुजंगराव रमले मात्र मराठवाड्यात.

मराठवाड्यात काम करताना जातीय, धार्मिक दुभंग आणि एकोपा, सांधे आणि खाचखळगे माहीत असावे लागतात. अन्यथा पुढे जाता येत नाही. अनेकदा चांगल्या योजनाही वळचणीला टाकण्याची कार्यपद्धती काही आजची नाही. दलित समाजातील मुलींसाठी स्वतंत्र तंत्रनिकेतन असावे असा प्रस्ताव भुजंगरावांनी मांडला होता. पण तो पूर्ण झाला नाही. अनेकदा लोकसहभागातून आणि दबावगट निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींच्या सहकार्याने अनेक कामे होतात. तसा दबावगट आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून सनदी अधिकाऱ्यांना काम करावे लागते. नांदेड आणि औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी ही भूमिका अधिक चांगल्या पद्धतीने वठविली. विचारांचा आवाका, प्रदेशाची माहिती, समाजमन व चालीरीती, परंपरा कळाल्या तर कामात अधिक गतिमानता येते. हे सारे गुण असतानाही लोककल्याणासाठी चौकट मोडून आणि चौकटीच्या मर्यादेतही काम करण्याची वृत्ती असावी लागते. प्रशासकीय कुरघोड्या, हित जपणारे अधिकारी १९७० च्या दशकापर्यंत नव्हते असे मानण्याचे कारण नाही. महाराष्ट्र-गुजरात एकत्र असताना गुजराती बाजूने असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या स्वभावाचे आता रंजक वाटतील असे प्रसंग भुजंगराव कुलकर्णी यांनी त्यांच्या नोकरीत अनुभवले. पण ते उसळून यायचे जेव्हा प्रादेशिक असमतोलाचा प्रश्न येई तेव्हा.  १९८३ साली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना प्रादेशिक मागासपणा मोजण्यासाठी वि. म. दांडेकर समिती नेमण्यात आली होती. पण दांडेकरांच्या एकूण भाषणातूून विकासाच्या असमतोलाचा प्रश्न त्यांनी गांभीर्याने घेतला नव्हता असे स्पष्टपणे नोंदवून समितीने दिलेल्या अहवालास भुजंगरावांनी भिन्न मतपत्रिका जोडली होती. ही भिन्न मतपत्रिका दांडेकरांच्याच कार्यालयात बसून त्यांच्याच लघुलेखकास तोंडी सांगून त्यांनी करवून घेतली होती, हे विशेष! आर्थिक अनुशेष आणि जलसंपदा क्षेत्रातील त्यांचा अभ्यास दांडगा होता. मराठवाडा आणि विदर्भाच्या सिंचन अनुशेषावर आणि सिंचन अयोगाचे सदस्य म्हणून काम करतानाही लोककल्याणासाठी काही बाबी प्रकर्षाने करायलाच हव्यात असा त्यांचा आग्रह होता. सिंचन आयोगास शासनाने ठरवून दिलेली कार्यकक्षा ओलांडूनही काही शिफारशी करायला हव्यात, असे त्यांचे मत होते. राज्यकर्ते हे मतदारसंघापुरते मर्यादित झाले असताना, राज्याचा विकास समतोलच हवा ही मागणी लावून धरण्यासाठी सतत दबावगट निर्माण करून ठेवावा लागतो. त्यासाठी भुजंगराव कुलकर्णी यांच्यासारख्यांचे असणे अधिक महत्त्वाचे ठरते.

अधिकारी म्हणून उत्तम काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती निवृत्तीनंतर मात्र अलिप्त होतात. पण भुजंगराव कुलकर्णी निवृत्तीनंतरही विधायक कार्यासाठी सक्रिय राहिले. मराठवाड्यातील पाऊस आणि पीकरचना हा त्यांच्या अभ्यासाचा विषय बनला होता. अधिकाऱ्यांना या क्षेत्रात लक्ष घालण्यासाठी ते आवर्जून विनंती करत. अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढावी म्हणून त्यांनी त्या वेळी केलेले प्रयत्नही महत्त्वपूर्ण मानले जातात. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गाढे पिंपळगावपासून सुरू झालेल्या प्रवासात त्यांनी अनेकांचे सहकार्य घेतले आणि विधायक असे घडवत राहिले. ठासून भरलेला मराठवाडी बाणा असणारा हा अधिकारी ज्या क्षेत्रात गेला त्या क्षेत्रात ठसा उमटवला. नोकरशाहीत प्रवाहपतित होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या काळात भुजंगराव कुलकर्णी चर्चेत राहतात ते त्यामुळेच!

suhas.sardeshmukh@expressindia.com