News Flash

वृद्धांनाही दत्तक घेण्याची मानसिकता रुजावी

‘माणूस वृद्ध झाला म्हणून तो निरुपयोगी ठरत नाही. त्याचा अनुभव, ज्ञान समाजाच्या कामी येऊ शकते.

(संग्रहित छायाचित्र)

आठवडय़ाची मुलाखत

किरण कर्णिक, अध्यक्ष, हेल्पेज इंडिया संस्था

‘माणूस वृद्ध झाला म्हणून तो निरुपयोगी ठरत नाही. त्याचा अनुभव, ज्ञान समाजाच्या कामी येऊ शकते. म्हणूनच समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे’, ही भावना तरुण पिढीमध्ये जागवण्यासाठी ‘हेल्पेज इंडिया’ ही संस्था गेली ४२ वर्षे झटते आहे. या संस्थेला नुकताच संयुक्त राष्ट्रांचा ‘यूएन पॉप्युलेशन’ पुरस्कार प्राप्त झाला. यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष किरण कर्णिक यांनी ‘हेल्पेज इंडिया’ची भूमिका आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.

* सध्याच्या काळात महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची स्थिती काय आहे?

ज्येष्ठ नागरिकांची स्थिती देशभरात साधारण सारखीच आहे. प्रामुख्याने समाजातल्या तळाच्या वर्गातील ज्येष्ठांसाठी आम्ही काम करतो. येथे ज्येष्ठ व्यक्ती बऱ्याचदा आर्थिकदृष्टय़ा कु टुंबावर अवलंबून असते. शिवाय वयानुसार आरोग्यविषयक समस्या उद्भवतात, त्यासाठीही खर्च करावा लागतो. एकटेपणा येतो. काही जण कुटुंबीयांसाठी ओझे ठरतात. यातूनच हिंसा होते. माझ्याकडे आकडेवारी उपलब्ध नाही, पण संस्थेच्या माणसांच्या अनुभवानुसार महाराष्ट्रात ज्येष्ठांची स्थिती काही प्रमाणात चांगली आहे. त्यांच्यासोबत हिंसा होण्याच्या घटना तुलनेने उत्तरेकडे अधिक घडतात.

* टाळेबंदीत ज्येष्ठांची स्थिती काय होती?

सुरुवातीला संपूर्ण कुटुंब घरात एकत्र असल्यामुळे चांगला परिणाम झाला. एरवीच्या तुलनेत ज्येष्ठांशी कुटुंबीयांचा संवाद वाढला. पण हळूहळू नातवंडांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. मुलांचे ऑनलाइन काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकटेपणा येऊ लागला. काही ज्येष्ठ नागरिक लहानसहान कामे करून उदरनिर्वाह करत होते. बरेच घरकामगार ६० वर्षांवरील वयाचे आहेत. यातल्या बऱ्याच जणांनी टाळेबंदीत रोजगार गमावला. आर्थिकदृष्टय़ा परावलंबित्व आले. त्यामुळे मानसिक ताण वाढला.

* ‘हेल्पेज इंडिया’ने टाळेबंदीत ज्येष्ठांसाठी काय काम केले?

स्थलांतर करणाऱ्या ज्येष्ठांसाठी तयार अन्नाचे वाटप केले. घरोघरी किराणा सामानाचा पुरवठा केला. आम्ही स्वत: काही करण्यापेक्षाही याबाबत लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांना मार्गदर्शन केले. संघटनांचा ज्येष्ठांशी संवाद वाढावा, त्यांनी व्यायामाविषयी मार्गदर्शन करावे, यासाठी प्रयत्न केले.

* आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाल्यानंतर संस्थेचे पुढील उद्दिष्ट काय आहे?

आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली. देणगीदारांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे संस्थेला प्रेरणा मिळाली. समाजात सध्या जन्मदर कमी होतोय आणि ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात ज्येष्ठांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनासाठीचे धोरण वेगवेगळे आहे. बऱ्याच ठिकाणी प्रति महिना ४०० ते ८०० रुपयेच मिळतात. किमान २ हजार रुपये प्रति महिना तरी मिळावेत. शिवाय ज्येष्ठांमधील ठरावीक गटालाच निवृत्तिवेतन मिळते. ते सरसकट सर्वच ज्येष्ठांना मिळावे. या प्रश्नांवर आम्ही काम करत आहोत. शिवाय ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी फिरते आरोग्य केंद्रही चालवले जाते.

* काही वेळा कुटुंबीयांकडून योग्य काळजी घेतली जात असतानाही ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ असतात, चिडचिड करतात.

कुटुंबीयांकडून त्रास होत असेल तर ज्येष्ठ नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात. पण कुटुंबावरच अवलंबून असल्याने असे करण्यास ते धजावत नाहीत. कुटुंबाकडून काळजी घेतली जात असेल आणि तरीही एकटेपणा वाटत असेल तर विविध उपक्रमांत सहभागी व्हावे. ज्येष्ठांचे समूह, संघटना येथे मन रमवल्यास सकारात्मक परिणाम दिसतो. आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ यांच्यात संवाद घडवून आणतो. ज्येष्ठांना सोबत घेऊन शाळांना भेट देतो. तिथे लहान मुले आणि ज्येष्ठ यांच्यात संवाद घडतो.

* ज्येष्ठ नागरिकांबाबत सामाजिक आणि राजकीय जबाबदारी काय आहे?

९० टक्के ज्येष्ठ नागरिक कु टुंबासोबत राहतात. तीन टक्के वृद्धाश्रमांत राहतात. या दोन्हींपासून बाहेर, समाजात राहणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण सात टक्के आहे. कुटुंबीयांसोबतच शेजाऱ्यांनीही ज्येष्ठांची काळजी घेतली पाहिजे. शाळांमधून लहानपणापासूनच मुलांवर तसे संस्कार व्हावेत. मुले दत्तक घेतली जातात त्याप्रमाणे आजी-आजोबांना दत्तक घेण्याची मानसिकता रुजली पाहिजे. ज्येष्ठांचा सांभाळ ही फक्त जबाबदारी नसून ते कर्तव्य आहे. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग समाजाने करून घेतला पाहिजे. राजकीय पक्षांनीही काम केले पाहिजे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी काही जागा राखीव असाव्यात, असा केंद्र सरकारचा नियम आहे. पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर प्रामुख्याने काम होणे गरजेचे आहे.

* सन्मानाचे आयुष्य जगण्यासाठी ज्येष्ठांनी स्वावलंबी कसे बनावे?

आर्थिकदृष्टय़ा संपूर्ण स्वावलंबी बनणे कठीण आहे. पण काही प्राथमिक कौशल्ये ज्येष्ठांना अवगत व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आवश्यक वस्तू मागवता याव्यात, बँकेचे व्यवहार करता यावेत यासाठी ज्येष्ठांना तंत्रसाक्षर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

* ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न कसा सोडवावा?

– दिल्ली पोलिसांकडे एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची माहिती असते. शक्य तेव्हा पोलीस त्यांना भेटतात, चौकशी करतात. असे महाराष्ट्रातही व्हायला हवे. सामाजिक संघटनांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे.

* वृद्धाश्रम ही संकल्पना पटते का?

वृद्धाश्रमात राहताना मानसिक समस्या उद्भवतात. त्यामुळे वृद्धाश्रम ही संकल्पना आपल्या संस्कृतीला अनुरूप नाही. पण ज्यांना आर्थिक आधार नाही, अशांसाठी वृद्धाश्रम आवश्यक आहे. आपल्याकडे वृद्धाश्रमांची संख्या खूपच कमी आहे.

मुलाखत – नमिता धुरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:15 am

Web Title: adoption mentality should be inculcated in the elderly as well abn 97
Next Stories
1 विभाजनरेषा सांधताना..
2 निर्भय नटसम्राट!
3 मनस्वी, बेधडक!
Just Now!
X