देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा हे देव, संत वा धार्मिक गुरू नसल्याने त्यांची पूजा करता येणार नाही, असा ठराव रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत नुकताच मंजूर करण्यात आला. यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून बलसाडमधील एका मंदिरातून तर साईबाबांची मूर्ती लगेच हलवण्यात आल्याने साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
आज हे संकट धर्मसंसदीय आहे. उद्या त्याचे स्वरूप आणखी वेगळेही असू शकेल. या वादाची ही चिकित्सा..
शिर्डीचे साईबाबा हे परमेश्वर आहेत की नाहीत, हा प्रश्नच मुळी हास्यास्पद आहे. हिंदूच्या धर्मसंसदेने त्यांना देवत्व आणि गुरुपद नाकारले आहे; पण त्याला व्यवहारात खरोखरच काही अर्थ नाही. कारण तो अखेर श्रद्धेचा प्रश्न आहे. कोटय़वधी हिंदू आणि मुस्लीम त्यांना संत, गुरू, भगवान मानतात. त्यामुळे द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांना लुटेरा, वेश्यापुत्र, मांसाहारी म्हटले, त्यांच्या भक्तांना ‘संक्रामक बिमारी’ झाली आहे, अशी टीका केली किंवा शंकराचार्याच्या नेतृत्वाखाली छत्तीसगढमधील कवर्धा येथे झालेल्या धर्मसंसदेने साईबाबांच्या मूर्ती उखडून गंगेत फेकण्याचा आदेश दिला म्हणून काही कोणताही साईभक्त हिंदू साई- भक्ती सोडणार नाही. मुस्लिमांबाबत प्रश्नच नाही. त्यांना हा आदेश मानण्याचे बंधनच नाही; पण तसे तर ते हिंदू धर्मीयांवरही नाही. तरीही शंकराचार्य वगरे मंडळींची धर्मसंसद हा आदेश देते. गुजरातेतील बलसाडमधील शिवमंदिरात लगोलग त्याचे पालन केले जाते. त्याआधी उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका मंदिरातून अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकत्रे बळजबरीने साईबाबांची मूर्ती हटवतात, गायब करतात. जिल्हा प्रशासन तिचा शोध घेत आहे, तर त्याला विरोध करतात. या सर्व घटनांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. याचे कारण हा केवळ साईबाबांच्या भगवान असण्या-नसण्याशी संबंधित प्रश्न नाही, तर हिंदू धर्माचे आजवरचे स्वरूप पालटण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक छोटासा, परंतु महत्त्वपूर्ण भाग आहे.
‘आपल्या’हिंदू धर्मावरील संकट
साईबाबा होते तरी कोण?
धर्मसंसद हे विश्व हिंदू परिषदेचे अपत्य आहे, ही गोष्ट येथे सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे. या परिषदेने १९८३ साली देशात एकात्मता यात्रा काढली. त्या यात्रेत प्रथम धर्मसंसदेची कल्पना पुढे आली आणि १९८४ मध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात अशी धर्मसंसद भरविण्यात आली. तिला देशातल्या एकूण ७४ संप्रदायांमधील ५५८ संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित होते. त्या संसदेत रामजन्मभूमी मुक्तीची हाक देण्यात आली. पुढे १९९१ मध्ये झालेल्या धर्मसंसदेत या आंदोलनाची पुढची दिशा निश्चित झाली. त्यानंतरची लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा, बाबरी मशिदीचे पतन वगरे इतिहास सर्वानाच माहीत आहे. भाजप आणि वििहप यांच्या घोषणेतले राममंदिर अजून ‘त्याच जागी’ उभे राहायचे आहे; पण त्या आंदोलनातून देशातील राजकीय आणि सामाजिक पट पूर्ण बदलला. त्याहून मोठा बदल झाला तो हिंदू धर्माच्या दृश्य स्वरूपात. बाबरी मशिदीचे पतन हा हिंदूच्या गेल्या शेकडो वर्षांतला पहिला विजय मानला गेला, ही गोष्ट येथे लक्षणीय आहे. आजवरचा हिंदू धर्म सहिष्णू होता, सर्वाना सामावून घेणारा होता. तो आता तसा असणार नाही, हा संदेश या आंदोलनाने दिला. त्याला देशभरातील हिंदूंनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय होता. भाजपच्या सत्ताविजय यात्रेतून ते स्पष्टच दिसले; पण त्या आंदोलनातून निर्माण झालेला उन्माद तात्पुरता होता. तो ओसरला. हिंदुत्ववादी शक्तींच्या सत्ताकारणाला त्यातून बळ मिळाले; पण त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वासमोर जागतिकीकरण आणि जात ही दोन मोठी आव्हाने असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले. त्यांचा मुकाबला करायचा तर त्या आड येत होते ते हिंदू धर्माचे मूळचे स्वरूप- सर्वसमावेशक आणि म्हणून अनाक्रमक. घाव घालायचा तर त्यावर. त्यासाठी हिंदू धर्माचे रेजिमेन्टीकरण करण्याची आवश्यकता आहे हे या धर्मातील हुशार मंडळींनी बरोबर ताडले. कवध्र्यातील धर्मसंसद हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. साईबाबांच्या देवत्वाविषयी प्रश्न निर्माण करून एका प्रयोगाला सुरुवात करण्यात आली आहे. हिंदू धर्मात मूलभूत बदल करण्याचा हा प्रयोग आहे.
आपला हिंदू धर्म सहिष्णू आहे याचे अनेकांना दु:ख वाटते. तो इस्लामप्रमाणे आक्रमक व्हावा असे अनेकांना मनोमन वाटते तेव्हा त्यांची कीव करण्याखेरीज अन्य पर्याय नसतो. याचे कारण ही सहिष्णुता अबलांची नाही. ती सर्वसमावेशकतेमधून आलेली आहे. ती हिंदूंची ताकद आहे. व्ही. एस. नायपॉल यांनी भारताला लक्षावधी बंडांचा देश म्हटले आहे. अशा देशात लोकशाही फळते, फुलते याचे कारण हिंदू धर्माच्या या ताकदीत आहे. अन्यथा हा देश केव्हाच कोसळून पडला असता. हिंदू धर्माचे हे स्वरूपच मुळात विशिष्ट अर्थाने लोकशाहीस्नेही आहे. कोटय़वधी देव, अनेक पंथ, अनेक मार्ग, विविध उपासना पद्धती यांचे संघराज्य म्हणजे हिंदू धर्म आहे. येथे वेद मानणारे असतात आणि ‘त्रयो वेदस्य कर्तारो भण्ड धूर्त निशाचरा:’ असे म्हणणारेही असतात. येथे देव मानणारे असतात आणि येथेच लोकायत आणि सांख्य यांसारखी ईश्वराला दारी उभीही न करणारी दर्शने असतात. एखादा मनुष्य वेदप्रामाण्य मानत नसला किंवा नास्तिक असला, तरीही तो हिंदूच राहतो. त्याच्या नास्तिकतेने हिंदू धर्म ‘खतरे में’ पडत नसतो. सरदार भगतसिंग यांच्यासारखा कट्टर डावा क्रांतिवीर जेव्हा पुस्तक लिहितो तेव्हा त्याचे नाव ‘मी नास्तिक का आहे?’ असे असते, तर बटर्रण्ड रसेल यांच्यासारखा तत्त्ववेत्त्याच्या पुस्तकाचे नाव ‘मी ख्रिश्चन का नाही?’ असे असते, इब्न वराक यांच्यासारख्या मूळ भारतीय वंशाच्या मुस्लीम लेखकाचे पुस्तक ‘मी मुस्लीम का नाही?’ या नावाने येते. हा फरक नीट समजून घेतला पाहिजे. हिंदू धर्मातही टीका करण्यासारखे भरपूर आहे; पण तेथे एकच एक धर्मग्रंथ नाही. एकच एक देव नाही. ही त्याची बलस्थाने आहेत. त्यामुळेच त्याला विस्कळीत स्वरूप प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच या धर्मावर कोणा एका धर्माचार्याची सत्ता चालू शकत नाही. कोणतीही धर्मसंसद या धर्माचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.
 हे ज्यांना खटकते अशा लोकांपुढे आदर्श दिसतात ते किताबी धर्माचे. अशा धर्मात धार्मिकांच्या कवायती फौजा तयार करणे सोपे असते. आज तसेच प्रयत्न सनातन वैदिक धर्माची उपासना करणाऱ्या मंडळींकडून सुरू आहेत. धर्माचे अत्यंत किरटे आणि कठोर रूप समोर ठेवून त्याच्या रक्षणासाठी ही मंडळी आग्रही असतात. याच लोकांनी असहिष्णुतेचे एक वेगळेच पर्व हिंदू धर्मात आणले आहे. साईबाबांना देवत्व नाकारणे हा याच असहिष्णुतेचा आविष्कार आहे. हिंदू धर्म म्हणजे केवळ सनातन वैदिक धर्म असे नवे समीकरण लादले जात आहे.
गुजरातमधील शाळांतून सक्तीचे पूरक वाचन म्हणून वाटली जात असलेली दीनानाथ बात्राकृत पुस्तके, मुस्लिमांच्या मदरशांप्रमाणे हिंदूंच्या शाळांमध्ये सनातन वैदिक धर्माचे शिक्षण देण्याची शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांची मागणी, इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात गीता आणि महाभारत यांचा समावेश करावा यासाठी दिल्या जाणाऱ्या हाका ते साईबाबांविषयीचा वाद या सर्वामध्ये एक सूत्र आहे. हिंदू धर्माला किताबी धर्माप्रमाणे बनविण्यासाठी चाललेली ही तयारी आहे. यातून तुमचा-आमचा हिंदू धर्म- जो आपणांस आचाराचे, उपासनेचे, श्रद्धेचे, एवढेच नव्हे तर अश्रद्धेचेही स्वातंत्र्य देतो- तोच संकटात आलेला आहे. आज हे संकट धर्मसंसदीय आहे. उद्या त्याचे स्वरूप आणखी वेगळेही असू शकेल; पण या उपद्व्यापांतून नक्कीच येथे नव्या स्वरूपातला हिंदू धर्म निर्माण होणार आहे. विविध मार्गानी आपण तिकडेच चाललो आहोत. एक मात्र खरे, की त्यातून जो धर्म आपल्यासमोर येणार आहे, तो अन्य कोणताही असेल, तुमचा-माझा हिंदू धर्म नसेल.