साहित्य किंवा कोणत्याही कलेचा आस्वाद घेत असताना त्यातलं काहीतरी मनाला आत खोलवर भिडावं लागतं. तसं झालं की आपसूकच ओठांवर शब्द येतात.. ‘वा!’
हे तादात्म्य पावणं वा दाद देणं म्हणजे त्या कलाकृतीची समीक्षाच होय. या पाक्षिक सदरात या आस्वादाचा दरवळ वाचकांना अनुभवायला मिळणार आहे..

‘अनारकली’ या नुकत्याच आलेल्या मल्याळम् चित्रपटातलं इंग्रजी गाणं (!) यू-टय़ूबवर बघत होतो. साहित्य- संगीताच्या धाग्यानं माणसं सहज जोडली जातात. त्याच नात्यानं स्नेही झालेल्या राधिका नायर यांनी हे गाणं लिहिलं आहे. तेच बघत होतो. समुद्र.. अथांग पसरलेला. त्यामधली ही बोट. बोटीच्या डेकवर ही मुलगी गिटारच्या सोबतीनिशी गाणं गाते आहे. तो तगडा हीरो पृथ्वीराज (सचिन कुंडलकरच्या ‘अय्या’ चित्रपटामधला!) बोटीवर (मुलींचे हृदयाचे ठोके चुकवीत) फिरतो आहे. आणि ते शब्द, सूर, त्या गायिकेचा आवाज, तो समुद्र.. सारं एकवटतंय आणि माझ्या तोंडातून आपसूक ‘वा!’ असा उद्गार बाहेर पडतो आहे. ती मुलगी हसऱ्या चेहऱ्यानं गाणं म्हणते आहे.
‘Over and over the sea greets the shore
Over and over the hues wait for dawn…l
(पुन्हा पुन्हा धडकू पाहतात किनाऱ्याला लाटा
या रंगांनी उजळून जाती पुन्हा पहाटवाटा..)
आणि मग मला शेजारी बसलेली मैत्रीण म्हणाली, ‘‘का म्हणालास रे ‘वा’? ’’ मलाही वाटलं- का म्हणतो आपण ‘वा’? तुम्ही-आम्ही सारेच? चांगलं गाणं, कविता ऐकल्यावर, चांगलं चित्र पाहिल्यावर, मस्त पुस्तक वाचून संपल्यावर.. आणि मग आमच्या एम. ए. इंग्रजीच्या वर्गातल्या एका विद्यार्थ्यांचा प्रश्नही मला आठवला. त्यानं विचारलेलं- ‘‘सर, समीक्षा म्हणजे काय नक्की?’’ मनात आलं, आपण ‘‘वा! क्या बात है!’’ असं कधी म्हणतो, का म्हणतो, कसं म्हणतो, किंवा मग का म्हणतच नाही, हे तपासत जाणारी कविता म्हणजे समीक्षा! मी वाचलेल्या समीक्षेच्या व्याख्यांमध्ये ही माझी व्याख्या बसत नाही. ती तशी रूढ निकषांपलीकडचीच आहे. पण अनेक वर्षे चवीनं ऐकल्यावर, वाचल्यावर आणि थोडंफार लिहिल्यानंतर माझी ही धारणा झाली आहे खरी!
अर्थात समीक्षा म्हणजे नुसता आस्वाद नाही. मागच्याच्या मागच्या वर्षी ‘लयपश्चिमा’ हे सदर लिहिताना मी काय लिहिलं, हे आता अनेक वाचकांना पुरतं माहिती आहे. मी नुसता आस्वाद घेत नव्हतो परक्या गाण्याचा.. त्या सगळ्या सांगीतिक संस्कृतीला मी सामाजिक अंगानं बघत होतो. तो समाजशास्त्राचा चष्मा लावला होता मी! असे अनेक चष्मे असतात. पण ते ‘चष्मे’ असतात; ‘डोळे’ नव्हेत! आणि खूपदा समीक्षा एखाद्या लेखकाला, कवीला एकाच नजरेतून बघत राहते. इंदिरा संतांच्या कवितेकडे स्त्रीवादी चष्म्यातून पाहण्यात गैर काहीच नाही. ते अगत्याचंही आहे. पण त्यांच्या कवितांची पर्यावरणीय समीक्षेच्या चष्म्यामधूनही तपासणी व्हायला हवी! (मी करतोच आहे ती इथेच- थोडय़ाच दिवसांत!) अगदी माíक्सस्ट चष्म्यामधूनही इंदिराबाईंच्या कविता अभ्यासल्या जाऊ शकतात. त्या काळातली ती पैसे कमावणारी आणि तीन मुलं सांभाळणारी ‘सिंगल मदर’ आणि त्यामागच्या अर्थशास्त्राचा त्यांच्या कवितांवरचा परिणाम! स्त्रीवाद, पोस्ट-मॉडर्न ऊर्फ उत्तर-आधुनिकतावाद, रूपवाद, आदिबंधात्मक समीक्षावाद हे सारे ‘वाद’ साहित्याला (आणि संगीतालाही!) लागू करता येतात. निकष आहेत ते सारे- महत्त्वाचे, धोरणी आणि काहीसे हट्टी निकष! पण साहित्यकृती काय किंवा संगीत काय; ते निकषांना ओलांडून विस्तारत असतं! तुम्ही चष्मे बदलता तसं चित्र दिसायचं बदलतं. कारण चित्राची आवाहकता ही मर्यादित नसते.
आणि अगदी मराठी साहित्यापुरतं बोलायचं झालं तरी केवढी नवी, सशक्त , उत्साही आणि बिनधास्त लाट आली आहे. हा पाहा- वाशिमचा विष्णू जोशी! त्याची कविता मला एकाच चष्म्यामधून बघता येत नाहीये.
‘गपगार होतात दु:खाने अवयव इथे
थरथरावा एखादा म्हातारा थंडीनं
तशा भावना थरथरतात मरण्याआधी
अशाही अवस्थेत वाटते लिहावी कविता..’
किती सशक्त संवेदन आहे हे! आणि केवढं आशावादी! आणि संभाजी भगत त्याच्या दणकट आवाजात सुनावतोय-
‘हे पालखीचे भोई/ यांना आईची वळख नाही।’
आणि मग गाता गाता मधेचे गद्यात शिरत म्हणतोय-
‘या समष्टीशी, या समाजाशी नातं तोडलेली माणसं
सुंदर असू शकत नाहीत!’
आणि एकदम ते सारं संवेदन विद्रोहाच्या कक्षेच्या कुठच्या कुठे वर जातं! संभाजी भगत या घटनेची समीक्षा करायला कुठला एक निकष पुरणार आहे का? छे!
तिकडे चाळीसगावमध्ये सत्यपालसिंग रजपूत कवितेला चंद्र, तारे, सूर्य, वारे (आणि साजण-साजणी!) याबाहेर ढकलत चालला आहे.
संगीता बर्वे आणि पृथ्वीराज तौर हे ‘बालसाहित्य’ नावाच्या अत्यंत अवघड आयामाला नवी झळाळी देताहेत. पवन नालट, प्रणव सखदेव हे तरुण या आजच्या जगाला शब्दांत टिपताहेत. मेघना भुस्कुटे आणि सायली राजाध्यक्ष ई-दिवाळी अंक काढीत मराठी साहित्याचा डिस्कोर्स अभिवाचन, गायन, अभिनय अशा अनेक डिस्कोर्सेस्ना जोडताहेत! (डिस्कोर्स! आलाच माझा आवडता शब्द ) पण त्यावर मागाहून! आणि इथे ही उपयोजलेली ‘स्माईली’ आणि तशीच बाकी चिन्हं! भाषेला ती वाढवणार आहेत की संकोचत नेणार आहेत?
तिकडे गाण्यात राहुल देशपांडे जुन्या सुरांना नव्या काळाची गती तानेमध्ये जोडतो आहे. सावनी शेंडे टीना टर्नरसोबत ‘बियाँड’ नावाच्या अल्बममध्ये जगातली शांतिस्तोत्रे म्हणते आहे. आणि मग उपनिषदांमधल्या प्रार्थना जिथे बँजोला जोडल्या जातात, तिथे तर आजचे रूढ समीक्षा-चष्मे किती अपुरे, किती त्रोटक वाटू लागतात!
अन् म्हणूनच या वर्षांचं हे सदर ते समीक्षा-संकेत नव्याने ‘रिबूट’ करण्यासाठी! मोडण्यासाठी नव्हे! मोडण्यावर माझा विश्वासच नाही! तो ‘वा!’ का बरं मुखातून येतो ते बघायचंय. तुम्हालाही सांगायचंय. तुम्हीही ती कविता, ते गाणं, ती कथा, तो लेख वाचून मग ‘वा!’ असं म्हणालात की सारं चक्र पुरं होणार आहे! ‘आस्वादक’ आणि ‘अभ्यासू’ समीक्षा हे द्वंद्व मला पटत नाही. आस्वाद हा जात्याच घेता येतो खरा; पण अभ्यासाने आपण अधिक उत्तम आस्वाद घेऊ शकतो!
दोन आठवडय़ांपूर्वीची गोष्ट! ‘कटय़ार’चं मध्यांतर आलं तसा मी शंकर महादेवन् नावाच्या अद्भुत प्रतिभावंत सर्जकाला न राहवून ‘मेसेज’ पाठवला.. ‘‘एखाद्या गाण्याच्या प्रसन्नतेनं डोळ्यांत ध्यानीमनी नसताना पाणी येतं तेव्हा काय करायचं? ते ऐकताना आतली कळ- जी हरवली होती, ती पुन्हा सापडते- दुखावते, सुखावते तेव्हा काय करायचं? सांग शंकर! ’’ त्या अद्भुत सर्जकाचं उत्तर आलंही लगोलग. पण त्याआधी मला त्यांचं एक वाक्य आठवत राहिलं. माझ्या पहिल्या पुस्तकासाठी जेव्हा मी शंकरजींची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी मध्येच म्हटलं होतं- ‘‘आत शांती असली की सारी निर्मिती सहज होते.’’ आणि मला आत्ता ध्यानात येतं आहे, की तो शांतवणारा क्षण रसिकांपर्यंत पोचतोच. मग कधी लोकलमध्ये व्हॉट्सअॅपवर आलेला विनोद वाचताना (त्याचीही समीक्षा या सदरात पुढे आहेच!), कधी ऑफिस संपून निघण्याआधी डेस्कटॉपवरचं गाणं ऐकताना, कधी झोपेला झुकांडय़ा देत रात्री पुस्तक वाचून संपवताना आपल्या तोंडातून, मनातून, देहातून ‘वा! वा!’ असा सहजोद्गार बाहेर पडतो. तो ‘वा!’ म्हणतानाचा क्षण शांततेचा असतो. आपला स्वत:चा म्हणून असतो. चंद्रभागेच्या किनारी उभं राहून पाण्यात डोकावण्याचा असतो. बाकी मागे तर सारं वाळवंटच असतं!
ashudentist@gmail.com

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय