दिल्लीवाला

पुनर्वसन..

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सुशील मोदी आणि चिराग पासवान या दोन नेत्यांचं पुनर्वसन करावं लागणार आहे. निवडणुकीत दोघांनीही नेमून दिलेलं काम चोख बजावलं, पण आता त्यांचं करायचं काय, हा भाजपसमोर प्रश्न आहे. बिहारमध्ये भाजपनं राजकारणातील पुढचं पाऊल टाकलं आहे. पक्षाला पुढच्या पाच वर्षांतील पक्षबांधणीचा विचार करायचा आहे. भाजपमध्ये नितीशकुमार यांचे एकमेव मित्र होते ते सुशील मोदी. ही मैत्रीही सुशील मोदींच्या आड आली असावी. आता भाजपनं त्यांच्याऐवजी नवं प्रदेशनेतृत्व विकसित करायचं ठरवलं आहे. या वेळी भाजपनं बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत, त्यातील ताराकिशोर प्रसाद हे सुशील मोदींचे समर्थक मानले जातात. मोदींसाठी ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरली. या नाराज मोदींनी ४० वर्ष राजकारण करू दिल्याबद्दल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आभार मानले आणि कार्यकर्ता असणं कोणी हिरावून घेऊ शकत नाही असाही टोमणा मारला. आता त्यांना राज्यसभेत आणून केंद्रीय स्तरावर कामाची जबाबदारी दिली जाऊ शकते. रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेतील जागेवर ‘लोकजनशक्ती’च्या उमेदवाराला संधी द्यायची का हेही भाजप पाहात असला, तरी त्यास नितीशकुमार यांचा विरोध असेल. संयुक्त जनता दलाच्या होकाराशिवाय भाजपला उमेदवार निश्चित करता येणार नाही. चिराग पासवान यांना त्यांच्या वडिलांच्या जागी मंत्रिपद देण्याचा भाजपचा विचार असू शकेल. तसं केलं तरी नितीश नाराज होतील. पण तडजोडीचा भाग म्हणून भाजपनं नितीश यांच्याकडं बिहारचं गृहमंत्रिपद कायम राहू दिलं आहे.

निवडीचा खेळ

काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी पक्षनेतृत्वावर आगपाखड केल्यामुळे पक्षांतर्गत वाद नव्यानं उफाळून आला. राहुल गांधी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष होणार हे आता निश्चित असल्यानं ज्येष्ठांकडून शेवटचा हादरा देण्याचा हा आणखी एक प्रयत्न होता. डिसेंबरमध्ये कदाचित आणखी एक दणका दिला जाऊ शकतो, असं जुनेजाणते सांगत होते, तो तुलनेत आधीच दिला गेला. पण लगेचच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी सल्लागार समितीची बैठक बोलावल्यानं वातावरणनिर्मिती झाली. बंडखोर नेत्यांच्या पत्रानंतर कार्यकारिणीची बैठक झाली होती, त्यात राहुल आणि त्यांच्या निष्ठावानांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर जबरदस्त हल्लाबोल केला होता. या वेळी सल्लागार समितीच्या बैठकीचा अजेण्डा वेगळा होता. त्यात सिबल यांच्या नाराजीचे पडसाद उमटतील असं वाटत होतं, पण सोनिया गांधी बैठकीला येणार नसल्याचं कळल्यावर बैठकीकडं कोणीच लक्ष दिलं नाही. बैठक झाली ती ‘झूम’वर, त्यातही सोनियांचे विश्वासू ए. के. अ‍ॅण्टोनी आणि अहमद पटेल हे दोघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळं राहुल गांधींचे विश्वासू के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि जुन्यांपैकी मुकुल वासनिक, अंबिका सोनी या चौघांनी विचारांची देवाणघेवाण केली. त्यातून निर्णायक काहीही निघण्याची शक्यता नव्हती. मात्र राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. हे काम काँग्रेसच्या निवडणूक समितीकडं असल्यानं त्याच्याशी सोनिया वा राहुल यांचा थेट संबंध नाही. दिल्लीतील प्रदूषणापासून दूर जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी सोनियांना दिल्यामुळे त्या आणि राहुल हे दोघेही विश्रांतीसाठी गोव्याला निघून गेले आहेत. प्रियंका गांधी-वढेरा यांचं लक्ष उत्तर प्रदेशकडं असलं तरी, त्या कित्येक महिन्यांत काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात फिरकल्या नसल्याच्या तक्रारीही लखनऊमधल्या कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. आता अखिल भारतीय काँग्रेस समितीचे हजार-दीड हजार सदस्य डिजिटल माध्यमातून पक्षाध्यक्षाची निवड करतील. त्यांना डिजिटल कार्ड दिलं जाईल, त्यातून मतदानाची प्रक्रिया सुलभ होईल. करोनाकाळातील ही खबरदारी. ज्येष्ठांना राहुल गांधींना आव्हान द्यायचं असेल तर पक्षाध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरावं लागेल. काँग्रेस कार्यकारिणीसाठीही निवडणूक होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसं होणार असेल तर आपले अधिक सदस्य समितीवर कसे निवडले जातील, हे बंडखोरांना बघावं लागेल.

दक्षिणायन

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचं ‘चलो पश्चिम बंगाल’ झालं. आता तेथील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्यासाठी गेल्या आठवडय़ात भाजपचे सर्वेसर्वा अमित शहा यांनी दौराही केला. आता त्यांचा शनिवार-रविवारचा तमिळनाडू दौरा कसा होतो याकडे द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही प्रादेशिक पक्षांचं लक्ष असेल. शहा यांच्या दौऱ्यातून भाजपनं आता ‘चलो दक्षिण’चे संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय कार्यकारिणीनंतर राज्या-राज्यांच्या प्रभारींमध्येही बदल केले. तमिळनाडूचे पक्षप्रभारीही बदलण्यात आले असून मुरलीधर राव यांच्याऐवजी सी. टी. रवी यांच्याकडे राज्याची जबाबदारी दिली आहे. रवी हे महाराष्ट्राचेही नवे प्रभारी आहेत, पण त्यांचं प्रमुख लक्ष तमिळनाडूतील भाजप संघटनाला मजबूत करण्याचं असेल. त्यांना अधिकृतपणे प्रभारी बनवण्याआधी त्यांनी सत्ताधारी अण्णाद्रमुकशी दोन हात करून भाजपच्या ताकदीची चुणूक दाखवायची होती. रवी हे कडवे हिंदुत्ववादी नेते असून पक्षाचं अस्तित्व दाखवून देईल अशा चेहऱ्याची तमिळनाडूमध्ये भाजपला गरज होती. पार्वतीपुत्र भगवान मुरुगनशी संबंधित वेत्रीवेल यात्रा काढून भाजपनं शहा यांच्या दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्याचा बिगूल वाजवून घेतला होता. या यात्रेच्या निमित्तानं रवी यांनी तमिळनाडूमध्ये भाजप किती आक्रमक होऊ शकेल हेही दाखवून दिलं आहे. शहांचा दौरा प्रामुख्याने राज्यातील पक्ष संघटनेला अजेण्डा देणं आणि विधानसभेच्या जागांसाठी सत्ताधारी अण्णाद्रमुकशी तडजोड केली तर भाजपच्या फायद्याची गणितं मांडणं यासाठी होत आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांचे बंधू अळ्ळगिरी यांनी रवी यांच्याशी चर्चा केली. ते शहांना भेटले तर नवी समीकरणंही निर्माण होतील. रजनीकांत स्वतंत्र पक्ष काढून निवडणुकीत उतरणार आहेत की नाही, याचीही चाचपणी शहा करतील. रजनीकांत यांच्या संभाव्य राजकीय प्रवासावरही भाजपचं ‘चलो दक्षिण’ अवलंबून असेल. शहा तमिळनाडूत असताना ट्विटरवर मात्र शनिवारी दिवसभर ‘गो बॅक अमित शहा’ हा ट्रेण्ड व्हायरल झाला होता.

संघटना तयारी

पश्चिम बंगाल भाजपसाठी केंद्रीय नेतृत्वानं अजेण्डा ठरवून दिलाय, शिवाय नवा चमूही दिलाय. त्यातला महत्त्वाचा अजेण्डा म्हणजे तृणमूल काँग्रेसचे अधिकाधिक मासे गळाला लावणे. वाहतूकमंत्री सुवेंदू अधिकारी यांचं ममतादीदींशी सख्य राहिलेलं नाही, असं भाजपचं म्हणणंय. अधिकारी भाजपमध्ये येणारच, त्यांना कोणी रोखू शकत नाही, असा दावा केला गेलाय. त्यात आता सौगता राय यांचंही नाव भाजपनं जोडलंय. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांपैकी काहींना विधानसभा निवडणुकीआधी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांसाठी संघटना बळकटीचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्याला भाजपच्या भाषेत बूथस्तरावरील व्यवस्थापन म्हणतात. पश्चिम बंगालसाठी बनवलेल्या ११ सदस्यांच्या चमूत सुनील देवधर आणि विनोद तावडे हे मराठीवीरदेखील ‘तृणमूल हटाव’च्या मोहिमेत उतरतील. तावडेंकडे हरियाणाही दिलं आहे. तावडे राष्ट्रीय प्रवक्ताही आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या ‘स्पर्धकांना’ महाराष्ट्राबाहेरील राजकारणात गुंतवण्यात आलं असावं असं यातून दिसतंय. नड्डांनी अन्य राज्यांमधील पक्षसंघटनांचाही आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. प्रभारी बदलणं हे त्याचंच द्योतक आहे. नड्डांनी आपले नवे उपाध्यक्ष, महासचिव यांच्या बैठका घेतल्या आहेत. प्रदेश स्तरावरील अहवालांवर डिसेंबरमध्ये चर्चा केली जाणार आहे. बृहन् हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं थेट भूपेंदर यादव यांना निवडणूक प्रभारी म्हणून पाठवलेलं आहे. त्यातून भाजपची संघटनात्मक तयारी पूर्व-दक्षिण दिशेनं निघाली असल्याचं प्रकर्षांनं समोर येऊ लागलं आहे.