बौद्ध धर्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धर्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली व या काळात इस्लामची आक्रमणे भारतात झाली. त्याची परिणती हळूहळू त्याचा लय होण्यात झाली. परंतु याकडे सोयीस्कर डोळेझाक करून अनेक मार्क्‍सवादी इतिहासकार असा सिद्धांत मांडतात की, भारतातून बौद्ध धर्म गायब होण्यामागे येथील हिंदू धर्म आणि हिंदू राजांनी केलेले अत्याचारच कारणीभूत आहेत. या इतिहासकारांचा हा सिद्धान्त कसा वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, याची चिकित्सा करणारा लेख..

इ. स.पूर्व सहाव्या शतकात भारतीय समाज हा जाती-जातींमधील विभागणी, विषमता, आचारपद्धतींमधील कृत्रिमता, मूळ धर्मतत्त्वांचा लोप व तत्त्वचिंतनाची गूढता या दोषांनी ग्रासला होता. या पाश्र्वभूमीवर इ. स.पूर्व ५६३ मध्ये भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. गौतम बुद्धसुद्धा हिंदू धर्माप्रमाणेच जीवन-मरणाच्या, म्हणजेच दु:खमय जीवनाच्या फेऱ्यातून सुटका ही जीवनाची इतिकर्तव्यता समजतो. आत्यंतिक मोक्ष किंवा निर्वाण हे कोणत्याही बाह्य़ उपचारांनी साध्य होत नाही तर दया, प्रेम, करुणा, परोपकार, शुद्ध वर्तन यांच्या आधारे मनुष्य ते प्राप्त करू शकतो, हे बुद्धाने सांगितले. संसाराचा त्याग, भिक्षुधर्माचा स्वीकार म्हणजेच अष्टांगमार्गाचा स्वीकार ही बुद्धाची शिकवणूक आहे. बुद्धाने सांगितलेली दु:खाची चार सत्ये व दु:खमुक्तीसाठीचा अष्टांगिक मार्ग हे त्याच्या लोकप्रियतेचे व बौद्ध धर्माच्या यशस्वी प्रसाराचे प्रमुख कारण होते. बौद्ध धर्माची मूळ स्थापना झाली ती भारतात व तो नंतर इतरत्र पसरला. आठव्या-नवव्या शतकात त्यास उतरती कळा लागली आणि १३ व्या शतकात त्याचा ऱ्हास झाला. जवळजवळ ७००-८०० वष्रे अस्तित्वात राहिलेला धर्म ज्या भूमीत जन्मला तिथेच तो लोप पावला, हे इतिहासातील एक अजबच!

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

बौद्ध धर्म भारतातून नामशेष का झाला, याचा ऊहापोह करताना येथील विचारवंत मंडळी वेगवेगळे सिद्धांत मांडतात. वस्तुत: भारतात, बौद्ध धर्माचा झालेला उदय, विकास व ऱ्हास आणि भारताबाहेर झालेला त्याचा प्रसार हा इतिहास अतिशय रंजक व अभ्यसनीय आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धर्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली व या काळात इस्लामची आक्रमणे भारतात झाली, त्याची परिणती हळूहळू त्याचा लय होण्यात झाली. परंतु याकडे सोयीस्कर डोळेझाक करून रोमिला थापर यांच्यासारखे मार्क्‍सवादी इतिहासकार असा सिद्धांत मांडतात की, भारतातून बौद्ध धर्म गायब होण्यामागे येथील हिंदू धर्म आणि हिंदू राजांनी केलेले अत्याचारच कारणीभूत आहेत. परंतु त्यांचा हा सिद्धांत म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास आहे.

पं. नेहरूंच्या काळापासून येथील खरा इतिहास आणि त्यातून निघणारे निष्कर्ष लपवून ठेवण्याचे धोरण आजतागायत चालू आहे. मार्क्‍सवादी विचारसरणीत वाढलेले अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे मोहम्मद हबीब हे एक इतिहासकार! त्यांनी प्रथम असा सिद्धांत मांडला की, मुस्लीम आक्रमकांनी येथील हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस केला तो इस्लामच्या शिकवणुकीमुळे नव्हे तर त्यामागे होती संपत्तीची लालसा! पं. नेहरू आणि काँग्रेसमधील त्यांच्या ‘सेक्युलर’ विचारवंतांनी या मतलबी सिद्धांतास व्यापकता मिळवून दिली. आपल्या साहित्यातून इस्लामची महानता आणि मध्ययुगीन मुस्लीम राजवटीचा काळ संस्मरणीय असल्याचे वर्णन केले आणि या सिद्धांतास अधिक बळकटी आणली. मानवेंद्रनाथ रॉय यांनी हबीब यांच्या सिद्धांतास अंतिम मुलामा देऊन त्यास अधिक विकृत केले. ते म्हणतात, ‘‘इस्लाम हा भारतात आला तो सामाजिक क्रांती करण्यासाठी, ज्या क्रांतीची सुरुवात बौद्ध धर्माने केली परंतु ब्राह्मणी विरोध व तलवारीमुळे बुद्धिझम अपयशी ठरला.’’

इस्लामच्या असहिष्णुतेकडे डोळेझाक करण्याकरिता रॉय यांच्या या मतलबी निष्कर्षांएवढा आणखी उत्तम नमुना कोणता असू शकेल? वस्तुत: मुस्लीम आक्रमक जिथे जिथे गेले, तिथे त्यांनी मंदिरे, शिल्पे व तेथील सांस्कृतिक चिन्हे यांचा विध्वंस केला. ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही, त्यांना त्यांनी क्रूरतेने ठार मारले असे इतिहास सांगतो (अफगाणिस्तानात बामियान येथे गौतम बुद्धाची जगातील सर्वात उंच मूर्ती होती. इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी (तालिबान्यांनी) ही मूर्ती जमीनदोस्त केली, हे अलीकडच्या काळातील या विध्वंसक वृत्तीचे उदाहरण). परंतु या मुस्लीम अत्याचारांवर पांघरूण घालण्यासाठी मार्क्‍सवादी इतिहासकार बनावट इतिहास रचत असतात. स्वातंत्र्यानंतर सुमारे चार दशके सरकारांच्या कृपेने एनसीईआरटी, आयसीएचआर, यूजीसीसारख्या संस्थांमध्ये मार्क्‍सवादी मंडळी मोठय़ा जागा अडवून होते. प. बंगालमध्ये माकपप्रणीत आघाडी ३४ वष्रे सत्तेत होती. या अधिकाराचा लाभ घेऊन शैक्षणिक पाठय़पुस्तकातून त्यांनी स्वत:स सोईस्कर अशी माहिती खपवली. उदाहरणार्थ- २८ एप्रिल १९८९ रोजी प. बंगालमधील मार्क्‍सवादी सरकारने एक परिपत्रक काढले. हे परिपत्रक बजावते की, ‘‘भारतातील मुस्लीम राज्यकर्त्यांच्या कालखंडाची िनदा होता कामा नये. मुस्लीम आक्रमकांनी या देशात मंदिरांचा विध्वंस केला त्याचा कुठेही उल्लेख नसावा.’’ (परिपत्रक एसवायएल/८९). महम्मद गझनीने मंदिरावर हल्ला केवळ संपत्तीसाठी केला, इस्लामशी त्याचा काही संबंध नव्हता. (इतिहास पाठय़पुस्तक, इ. ११ वी, पृष्ठ ४४, लेखक- सतीश चंद्र).

प्रा. आर. एस. शर्मा हे आणखी एक तथाकथित मार्क्‍सवादी इतिहासकार. मार्क्‍सवादी असल्यामुळे, मार्क्‍सने इतिहासाचे जे टप्पे सांगितले तेच टप्पे प्रा. शर्मा आपल्या ‘इंडियन फ्युडॅलिझम’ या ग्रंथात भारताबद्दल सांगतात. युरोपियन इतिहासात एक अंधारयुग आहे. त्या अर्थी इकडील इतिहासातही तसेच अंधारयुग असले पाहिजे असे गृहीतक मानून प्रा. शर्मा यांनी आपले म्हणणे पुढे दामटवले आहे.

आंद्रे िवक या नावाचे इतिहासकार आहेत. त्यांनी ‘अल हिंद’ या आपल्या ग्रंथात प्रा. शर्मा यांच्या वरील ग्रंथास आव्हान दिले आहे. ते म्हणतात, ‘इंडियन फ्युडॅलिझम’ या ग्रंथाने भारतीय इतिहासातील त्या विशिष्ट कालखंडाबद्दल लिहिणाऱ्या प्रत्येकाला चुकीच्या दिशेने नेले आहे. मध्ययुगीन कालखंड हा भारतीय इतिहासातील अंधारयुग होते, हे प्रा. शर्मा यांचे गृहीतक चुकीचे होते, परंतु एवढय़ाच कारणामुळे संशोधकांची दिशाभूल झालेली नाही तर त्यांच्या मूलभूत गृहीतकास कोणी आव्हान न दिल्याने त्यांचे मत जणू सिद्ध झाले आहे.

बौद्ध धर्माचा ऱ्हास येथील हिंदू राजांनी केला, हे असेच एक गृहीतक मार्क्‍सवादी इतिहासकारांनी पाठय़पुस्तकांमधून येथे दामटवले आहे आणि या त्यांच्या गृहीतकास कोणी आव्हान न दिल्यामुळे त्यांचे गृहीतक जणू सत्य बनले. बौद्ध धर्म हिंदू राजांनी नष्ट केला ही मांडणी म्हणजे हा त्याच मार्क्‍सवादी बनावट इतिहासाचा एक प्रकार!

कृ. अ. केळुसकर यांनी गौतम बुद्धांचे चरित्र लिहिले आहे. ‘‘या ग्रंथाच्या वाचनाने माझे संपूर्ण जीवन बदलून गेले,’’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. बाबासाहेबांना लहानपणी हे पुस्तक बक्षीस म्हणून मिळाले होते. केळुसकर लिहितात, ‘‘बौद्ध धर्मास अशोक व कनिष्क या दोन सार्वभौम प्रतापी राजांचा आश्रय मिळाल्यामुळे त्याचा प्रसार हिंदुस्थानात चोहीकडे झाला. परंतु बौद्ध धर्म प्रसारामुळे ब्राह्मणी धर्माचा ऱ्हास झाला असे समजता कामा नये. हे दोन्ही धर्म सुमारे १००० वष्रे एकमेकांशी चढाओढ करीत असत, असे पुष्कळ गोष्टींवरून मानण्यास आधार आहे. इ. स. ३९९ ते ४१३ पर्यंत फाहायन नामक चिनी यात्रेकरू देशभर फिरला. त्याने स्ववृत्तात असे लिहिले आहे की, सदरील शतकात ब्राह्मणी धर्माचे गुरू व बौद्ध धर्माचे गुरू यांस सारखाच मान असून ब्राह्मणांच्या देवळालगत बौद्धांचे धर्ममठ असत.’’ (पृष्ठ २६४).

पुष्यमित्र व मिहीरगुल या राजांचे चवीपुरते! किरकोळ अपवाद वगळले तर भारतात हिंदू राजांकडून बौद्ध धर्मीयांचे बलपूर्वक आणि योजनाबद्ध निर्मूलन झाल्याचा कोणताही पुरावा इतिहासात उपलब्ध नाही.

मिहीरगुलच्या बाबतीत बोलायचे झाले तर या राजाने बौद्धांचा छळ केला हे खरे, परंतु एकाही तत्कालीन वैदिक राजाने त्याचे दास्यत्व स्वीकारले नाही वा त्याने आरंभलेल्या छळास हातभारही लावला नाही, हे लक्षात घेण्याजोगे आहे आणि तो मुळात हूण होता त्यामुळे त्यास येथील जनतेनेही भारताचा राष्ट्रशत्रूच मानले, असे इतिहास सांगतो.

स्वा. सावरकर म्हणतात, ‘‘सम्राट पुष्यमित्राने बौद्ध भिक्खूंचा छळ केल्याचे पौराणिक पद्धतीने रंगविलेले उल्लेख जुन्या बौद्धग्रंथातून सापडतात. मात्र युरोपीय इतिहास लेखकांनीसुद्धा या उल्लेखांना अतिशयोक्तीपूर्ण म्हणून बाजूस सारले आहे.’’ (सहा सोनेरी पाने, पृष्ठ ७०.)

एटीन लॅमोट हा बौद्ध धर्माचा एक अभ्यासक. तो म्हणतो की, ‘‘उपलब्ध ऐतिहासिक दस्तावेज बघितले तर, पुष्यमित्राने बौद्ध धर्मीयांचा छळ केला असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे त्याला या आरोपातून निर्दोष सोडावे लागेल.’’ (हिस्टरी ऑफ इंडियन बुद्धिझम, पृष्ठ १०९.)

एडवर्ड कोंझे हे बौद्ध धर्माचे अभ्यासक. ते म्हणतात की, इ. स. १०००-१२०० या कालखंडात भारतातून बौद्ध धर्म लोप पावला व याची कारणे खुद्द बौद्ध धर्माचा कमकुवतपणा, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन आणि मुख्यत्वे इस्लामचे अत्याचार ही आहेत. (बुद्धिझम, इट्स एसेन्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, पृष्ठ ११७.)

गौतम बुद्ध हयात असतानाच बौद्ध धर्म कमकुवत करण्याचे प्रयत्न चालू झाले होते. गौतम बुद्धाने धर्मप्रसाराचे कार्य सुरळीत चालावे याकरिता बौद्ध संघाची स्थापना केली. जोपर्यंत या संघाचे काम सूत्रबद्ध पद्धतीत चालत होते तोपर्यंत धर्मप्रसाराचे कार्य उत्तम चालत होते. ‘‘बुद्धाच्या हयातीतच छन्न, उपनंद यांसारखे बुद्धाला प्रतिकार करणारे काही लोक निघाले. ‘षडवíगक भिक्षू’ नावाचा एक गट बुद्धाने घालून दिलेल्या नियमांचा पद्धतशीरपणे प्रतिकार करीत होता. तसेच बुद्धाचा देवदत्त नावाचा चुलतभाऊ होता. तो बुद्धाने पुढारी होण्यात जे यश मिळाले, त्याबद्दल त्याचा मत्सर करीत असे. कित्येक वेळा राजघराण्यातील लोकांच्या मदतीने बुद्धाचा जीव घेण्याचे प्रयत्न केले गेले, ते फसले; परंतु शेवटी भिक्षुसंघात फूट पाडण्याच्या प्रयत्नांत तो यशस्वी झाला. (मराठी विश्वकोश, पृष्ठ ९५६-५७.)

बुद्धाच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांमध्ये बौद्ध धर्मातील मूळ तत्त्वांबाबतच मतभेद झाले आणि त्यातून महायान आणि हिनयानसारखे पंथ निर्माण झाले. यापकी महायान पंथीयांनी मूर्तिपूजेला स्थान दिले. वैदिक धर्मात मूíतपूजा हा समजला जाणारा दोष बौद्ध धर्मातही शिरला, म्हणून तोही दुबळा झाला. प्रारंभी बौद्ध धर्माचा प्रसार चारित्र्यवान बौद्ध भिक्षू व भिक्षुणींनी घडवून आणला परंतु कालांतराने बौद्ध विहारांमध्ये ध्येयवाद, शिस्त यांची जागा अनाचार, विलासी जीवन, स्वार्थलोलुपता या दुर्गुणांनी घेतली, परिणामत: बौद्ध धर्माच्या अध:पतनास सुरुवात झाली, असे इतिहास सांगतो.

हिन्रिच झिमर हा मध्य आशियातील देशाच्या ऐतिहासिक घडामोडींविषयीचा एक अभ्यासक. त्याने आर्ट ऑफ इंडियन एशिया हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात भारतातील बुद्धिझमच्या नाशाविषयी त्याने अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. तो म्हणतो, ‘‘भारतातील कलाकृतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर अशोककालीन शतकाच्या प्रारंभापासून त्या कलाकृतीवर बुद्धिझमचा पगडा होता. त्यानंतर मात्र बुद्धिझम आणि हिंदू धर्माबद्दलच्या विषयांचे आळीपाळीने सादरीकरण होत असे. या दोन्ही परंपरा सुमारे दोन हजार वष्रे एकमेकांशी चढाओढ करीत समृद्ध पावल्या. त्याकरिता वेळप्रसंगी त्यांनी एकमेकांचे मठ, शाळाही वापरल्या. इ. स. १२०० मध्ये इस्लामचे आक्रमण झाल्यानंतर मात्र आपल्या जन्मभूमीतून बौद्ध धर्म गायब झाला. (पृष्ठ २७०.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहे. यात डॉ. आंबेडकर बौद्ध धर्माविषयी लिहितात, ‘बट’ या मूळ पíशयन भाषेतील शब्दाचा अर्थ मूर्ती, परंतु या शब्दाची व्युत्पत्ती बौद्ध धर्मापासून झाली. मुस्लीम हे मूर्तिपूजेचे विरोधक त्यामुळे मूर्तिभंजकता म्हणजे बुद्धिझमचा नाश हे इस्लामचे मिशन बनले. इस्लामने बौद्ध धर्माचा नाश केवळ भारतातच नव्हे तर जगात जिथे इस्लाम पोचला तिथे त्याने या धर्माचा नाश केला. बॅक्ट्रिया-पाíथया, अफगाणिस्तान, गांधार, चायनिज, तुर्कस्थान एवढेच नव्हे तर नालंदा येथील विद्यापीठे मुस्लीम आक्रमकांनी ध्वस्त केली. हजारोंच्या संख्येत बुद्ध भिक्खू परागंदा झाले. मुस्लीम आक्रमकांनी मोठय़ा संख्येत बौद्ध साधूंना ठार मारले व बुद्धविहार जमीनदोस्त केले. (खंड ३, पृष्ठ २२९.)

डॉ. बाबासाहेबांनी २५ मे १९५० रोजी कोलंबो येथे भारतातील बौद्ध धर्माचा विकास आणि विनाश यावर भाषण केले आहे. या भाषणातही त्यांनी बौद्ध धर्माच्या भारतातील ऱ्हासास अल्लाउद्दीनसारख्या मुस्लीम आक्रमकाच्या अत्याचारास अधोरेखित केले आहे.

मार्क्‍सवादी विचारवंत धर्मानंद कोसंबी यांनीही म्हटले आहे की, महम्मद बिन बख्तयार खिलजीच्या नेतृत्वाखाली इ. स. १२०० मध्ये नालंदा येथील विद्यापीठ व सारनाथच्या स्तंभाचे अतोनात नुकसान झाले (द कल्चर अ‍ॅण्ड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया, न्यू दिल्ली, १९८४, पृष्ठ १८.)

मुस्लीम आक्रमक या देशात येण्याअगोदरच, बौद्ध धर्माच्या ऱ्हासास सुरुवात झाली हे खरे, परंतु या धर्माचे अस्तित्वच भारतातून नाहीसे झाले ते मुख्यत्वे मुस्लीम आक्रमकांच्या हिंसेमुळे हे सत्य समजण्यासाठी वरील दाखले पुरेसे आहेत. मात्र येथील रोमिला थापर व तत्सम मार्क्‍सवादी इतिहासकार डोळसपणे या इतिहासाकडे बघतील आणि आपल्या पुराव्यांशी प्रामाणिक राहतील तरच जनतेस खरा इतिहास कळू शकेल.

लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक आहेत.

ravisathe64@gmail.com