पराग परीट

एखाद्या वस्तूचे नाते एखाद्या विशिष्ट दिवसाशी जोडले, की ती वस्तू चर्चेत येते. मग त्या विशिष्ट कालावधीत का होईना त्या वस्तूची चर्चा होते, तिला मागणी येते. बाजारातील अनेक उत्पादनांचे असे नाते जोडलेले दिसते. कृषी मालाला देखील असे वलय देता आले तर त्याचा बाजारव्यवस्थेवर परिणाम होत शेतक ऱ्यांना फायदा होईल.

युरोपातून वेगवेगळे दिन अर्थात ‘डे’ साजरे करण्याचा ट्रेंड  जगभर पसरत गेला. रोझ डे, व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फादर्स डे, थँक्स गिव्हिंग डे यासारखे वर्षभर कितीतरी दिवस आज जवळपास सर्वच देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साजरे होत आहेत. कृषी आणि कृषी संलग्न गोष्टींवरही तिकडे ‘दिवस’ साजरे करतात. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनेदेखील सदस्य देशांच्या मागणीच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दिन साजरे केले जातात.

‘रोझ डे’ आणि त्यानंतरच्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा करण्याने जगभर अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. वर्षभर सण समारंभात गुलाब फुलांची जेवढी विक्री होते त्याहून जास्त विक्री केवळ या दोन विशेष दिवसांना होते. यामुळे यापुढे कुठल्याही शेतीमालाला असे बाजाराभिमुख करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊ न अशाप्रकारे ‘दिवस’ साजरे करण्याची कल्पना राबवायला हरकत नाही. उत्पादित एखाद्या शेतीमालाचे महत्त्व वाढवण्यासाठी त्यासाठीचे हे ‘डे’ साजरे करणं खूप फायदेशीर ठरू शकेल.

हल्लीच्या काळात देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पौष्टिक लघू तृणधान्यांचा आहारातील वापर वाढावा या उद्देशाने व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. नाचणी, वरी, राळा, सावा, बर्टी यारखी पिके उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्या पिकाचे महत्त्व पटवून देण्यासोबतच त्याचा खप वाढविण्याच्या उद्देशाने ‘मिलेट डे’ साजरा करायला वाव आहे.

शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, विविध सामाजिक संस्था, क्लब यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर असे दिवस साजरे करायला सुरुवात करुन नंतर त्याला व्यापक स्वरूप प्राप्त करून देता येईल.

पिकाची काढणी किंवा कापणी झाली की त्यादरम्यान त्या एखाद्या पिकाचा ‘दिवस’ साजरा करता येईल. त्या दिवशी त्या शेतीमालापासून तयार केल्या जाणाऱ्या विविध खाद्यपदार्थाच्या स्पर्धा, खाद्यमहोत्सव, प्रदर्शन याच्या आयोजनाची जोड देता येईल.

राज्यात उसाचे आणि गुळाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. गुऱ्हाळघरं सुरू झाल्यानंतर आणि सार्वजनिक सुट्टय़ा गृहीत धरून एखादा दिवस ‘गूळ दिवस’ म्हणून साजरा करायला सुरुवात व्हायला हवी. ‘गूळ दिवस’ किंवा ‘गोड दिवस’ अथवा ‘जॅगरी डे’ असे मस्त नाव देऊ न त्या दिवशी आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार यांना भेट म्हणून गूळ देण्याचा किंवा त्या दिवशी जास्तीत जास्त पदार्थ गूळ घालून तयार करून त्याचे सेवन करण्याची प्रथा प्रचलित करायलाही खूप मोठा वाव आहे.

हळूहळू या विविध पिके , शेतमाल, प्रक्रिया पदार्थाच्या ‘दिवसां’ना प्रसिद्धी मिळत जाईल आणि असे दिवस राज्यभर, देशभर किंवा त्या पिकाचे उत्पादन घेणाऱ्या इतर देशांमधेही साजरे केले जातील.

२६ ऑक्टोबरला अमेरिका आणि कॅनडातील भोपळा उत्पादक शेतकरी ‘पंप्कीन डे’ साजरा करतात. या दिवशी भोपळा, झुकीनी, काकडी, कलिंगड अशा भोपळावर्गीय पिकांचे उत्पादक त्यांच्या जवळच्या बाजारात नेतात. त्यांनी उत्पादित मालाचे, त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे प्रदर्शन भरवतात. शहरातील लोक आवर्जून या प्रदर्शनांना सहकुटुंब भेट देतात. खरेदी करतात. भोपळ्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ आप्तेष्ट, नातेवाइकांना भेट म्हणून देतात.

३१ ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या ‘हॅलोवीन’ दिवशी तर भोपळे कोरुन त्याला भीतीदायक चेहऱ्याचा आकार देऊ न त्याचं प्रदर्शन मांडणे, घराबाहेर अडकून ठेवण्याची आणि सामुदायिक मिरवणूक काढण्याची कित्येक वर्षे चालत आलेली परंपराही तिकडे आहे.

अमेरिका आणि कॅनडात ‘थँक्स गिव्हिंग डे’ ला भोपळ्यापासून तयार केलेल्या ‘डेझर्ट’सारखा एक पदार्थ ज्याला ‘पंप्कीन पाय’ असे म्हणतात; तो आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांना देण्याची परंपरा आहे. ‘पंप्किन डे’ पासून ‘थॅन्क्स गिव्हिंग डे’ पर्यंत अमेरिका आणि कॅनडामधे भोपळ्याचा खप प्रचंड वाढतो. हा कालावधी डोळ्यासमोर ठेवून तिथला शेतकरी भोपळा लागवड करतो आणि फायदा मिळवतो.

जगभरात नुकताच ४ जुलैला फणस दिवस अर्थात ‘जॅकफ्रुट डे’ साजरा केला गेला. लोकांनी मांसाहार कमी करुन त्याऐवजी आहारात फणसाचा अंतर्भाव वाढवावा हा ‘जॅकफ्रुट डे’ साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असला तरी फणस उत्पादक देश जसे, की भारत, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, कंबोडिया यासारख्या देशातील फणसाची स्थानिक आणि बाहेरच्या देशात विRी वाढावी, फणसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले जावेत यासाठीही असे दिन साजरे करण्याने लक्ष वेधले जाऊ  शकते.

आपल्या देशात वेगवेगळे धार्मिक सण साजरे केले जातात. या सणवारादिवशी त्या त्या काळात मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याचे, औषधी वनस्पतींचे सेवन वाढावे या उद्देशानेदेखील घरी काही पदार्थ शिजवले जातात किंवा आहारात वापरले जातात. हे शेकडो वर्षांपासून चालत आले आहे. एकादशीदिवशीच्या उपवासाला सेवन केला जाणारा वरीचा भात वर्षभर अधूनमधून आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. संक्रातीदिवशी खाण्यात येणारा राळ्याच्या तांदळाचा भात इतरवेळी आपण खातो का? पण त्याच्यात असलेले पौष्टिक गुणधर्म पाहिले तर तो वरचेवर आहारात वापरला जावा इतका उपयुक्त आहे. नाचणी, वरी, राळा, सावा, बर्टी, कोद्रा यासारख्या पौष्टिक लघू तृणधान्याची लागवड खूप कमी झाली आहे. याला कारण म्हणजे त्याचा आहारातला वापर कमी झाला आहे. तो वाढला तर आपोआपच बाजारात त्याची मागणी वाढेल आणि लागवडीला वाव मिळेल. या पदार्थाचे महत्त्व, वापर आणि त्यातून कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी या पिकांचा एखादा ‘दिवस’ साजरा केल्यास उपयोगी पडेल.

नाचणीचा प्रयोग

कोल्हापूर जिल्ह्य़ातल्या पन्हाळा तालुक्यात नाचणी उत्पादन पूर्वापार घेतले जाते, पण उत्पादन करणाऱ्या शेतकरी कुटुंबात मात्र नाचणीचा वापर फार तुरळक प्रमाणात केला जायचा. दर वर्षी दिवाळीच्या कालावधीत सांगली, सोलापूर या भागातून काही व्यापारी मोठय़ा प्रमाणावर ज्वारी घेऊ न या भागात फिरायचे. इथल्या शेतकऱ्यांकडून ज्वारीच्या बदल्यात दुप्पट नाचणी घ्यायचे आणि ही नाचणी मोठमोठय़ा शहरात चांगल्या दराने विक्री करुन स्वत: चांगला नफा कमवायचे. कारण एकच, की या भागातले नाचणी उत्पादक स्वत: उत्पादित केलेली नाचणी आहारात वापरत नव्हते. तांबडय़ा रंगाची भाकरी खाणे म्हणजे गरिबीचं लक्षण असं त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. यावर उपाय म्हणून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या माध्यमातून आम्ही १४ नोव्हेंबर  २०१८ या दिवशी या भागात ‘पौष्टिक नाचणी दिवस’ साजरा केला. या दिवशी प्रत्येक नाचणी उत्पादक महिलेनं नाचणीपासून पदार्थ करुन घेऊ न प्रदर्शन आयोजित केले. या पौष्टिक नाचणी दिनाच्या दिवशी ६८ महिलांनी ८० प्रकारचे वेगवेगळे नाचणीयुक्त पदार्थ तयार करुन आणले होते. नाचणीचे अंबील, अनारसे, घाऱ्या, इडल्या, मोदक, करंज्या, इतकंच काय तर नाचणीचे गुलाबजाम, नाचणीच्या गोड वडय़ा, बालआहारासाठी सेंद्रिय गूळ घालून केलेली सुकडी यासारखे एकापेक्षा एक सरस पदार्थ या प्रदर्शनात महिलांनी आणले होते. या प्रदर्शनाचा उद्देश एकच होता,की नाचणीचा आहारातला वापर  सर्वानी वाढवावा. नाचणी आहारात वापरण्यासाठी भाकरी, पापड याशिवायही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यानंतर आता दरवर्षी तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ‘पौष्टिक नाचणी दिवस’ साजरा करण्याचा प्रयत्न, याच भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊ न स्थापन केलेल्या मिलेट असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

प्रचार आणि प्रसार

एखाद्या पिकाचा किंवा उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी आधी ते पीक किंवा ते उत्पादन ग्राहकांना आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे, त्याचा नियमित आहारात वापर करणे किती गरजेचे आहे हे पटवून देणे आवश्यक आहे. दिन साजरे करण्यामागे हा प्रमुख उद्देश असेल तर ते साजरे करणे खूप सोपे होईल. शहरांमधे असलेले डॉक्टर्स, वकील,पोलीस, शिक्षक,अधिकारी, कर्मचारी तसेच सिनियर सिटिझन्स यांचे असोसिएशन्स किंवा क्लब तसेच सामाजिक संस्था यांना सोबत घेऊ न शेती उत्पादनांचे दिन साजरे केल्यास ते अधिक लोकप्रिय आणि प्रभावशाली होतील. कृषी विभाग आणि विशेषत: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मधील किसान गोष्टी, शेतकरी मेळावा किंवा  नावीन्यपूर्ण उपक्रम यापैकी एखाद्या बाबीचा उपयोग पीक उत्पादनांचे दिन साजरे करण्यासाठी करून घेता येऊ  शकतो.  धान्य, भाजीपाला, फळे यांचा खप वाढविण्यासाठी अशा काही नवनवीन कल्पना राबवाव्या लागतील.