गेल्या तीन वर्षांत १५ लष्करी हेलिकॉप्टर्स अपघातग्रस्त झाली. त्यात वैमानिकांसह काही
अधिकाऱ्यांना नाहक प्राण गमवावे लागले. त्यातील बहुतांश अपघातांच्या चौकशीत पुढे येणारे कारण म्हणजे मानवी दोष. आयुर्मान संपुष्टात आलेल्या आणि तंत्रज्ञानदृष्टय़ा कालबाह्य़ ठरलेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीत काढला जाणारा हा निष्कर्ष धक्कादायक आहे.

आकाशात मार्गक्रमण करताना समोर अचानक मोठा ढग आल्यास दिशादर्शनाची व्यवस्था नसल्यामुळे दिशाच समजत नाही.
हिमालय पर्वतरांगांमधून मार्ग काढताना कशाला तरी धडकून अपघात होऊ शकतो याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा नाही. उड्डाणाआधी सर्व यंत्रणा व्यवस्थित आहेत की नाही हे सांगणारी काही व्यवस्था नाही. vv15सीमावर्ती भागात मार्गक्रमण करताना हवामानातील बदल, धोके समजतील याची कोणतीही सोय नाही..
भारतीय लष्करातील हवाई दलाच्या (आर्मी एव्हिएशन) ताफ्यात असणाऱ्या १७५ चीता व चेतक हेलिकॉप्टर्सच्या या काही उणिवा. कोणत्याही हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपरोक्त व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरतात. तथापि, तब्बल ४० वर्षांपासून सेवेत असणाऱ्या चीता व चेतकमध्ये त्या नाहीत. अर्थात, जुनाट हेलिकॉप्टरमध्ये प्रगत तंत्रज्ञानाची अपेक्षाही करता येणार नाही. त्यांचे आयुष्य पंधरा वर्षांपूर्वीच संपुष्टात आले आहे. उत्पादन प्रक्रिया १९९० मध्ये पूर्णपणे बंद झाली. आज त्यांचे सुटे भागही मिळणे दुष्कर झाले आहे. हेलिकॉप्टर इंजिनच्या दुरुस्तीची परिसीमा गाठली गेली आहे. या परिस्थितीत आधुनिक हेलिकॉप्टर मिळत नसल्याने धोकादायक असूनही तीच हेलिकॉप्टर घेऊन वैमानिकांना दररोज उड्डाण करावे लागत आहे. मागील तीन वर्षांत १५ लष्करी हेलिकॉप्टर्स अपघातग्रस्त झाली. त्यात वैमानिकांसह काही अधिकाऱ्यांना नाहक प्राण गमवावे लागले. त्यातील बहुतांश अपघातांच्या चौकशीत पुढे येणारे कारण म्हणजे मानवी दोष. आयुर्मान संपुष्टात आलेले आणि तंत्रज्ञानदृष्टय़ा कालबाह्य़ ठरलेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीत काढला जाणारा हा निष्कर्ष आश्चर्यचकित आणि धक्कादायक आहे.
वैमानिकांचे नाहक जाणारे बळी रोखण्यासाठी चीता व चेतकचा वापर त्वरित थांबवावा या मागणीकरिता लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लष्करात विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पत्नी अशा गंभीर विषयावर एकत्रित येण्याची ही पहिलीच वेळ. नाशिकच्या अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले यांनी ‘इंडियन आर्मी वाइव्ज एजिटेशन ग्रुप’ची स्थापना करून देशभरातील इतर अधिकाऱ्यांच्या पत्नींना एकत्र आणले. हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील या गटाच्या सदस्य आहेत. अलीकडेच गटाच्या संस्थापिका अ‍ॅड. मीनल यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. जुनाट हेलिकॉप्टर्समुळे आजवर झालेली मनुष्यहानी आणि नुकसानीचा अहवाल त्यांच्यासमोर मांडला. लष्करी अधिकाऱ्याशी विवाहबद्ध होताना समरप्रसंगात पतीला देशासाठी वीरमरण पत्करावे लागू शकते याची मानसिक तयारी कोणतीही पत्नी करते. युद्धात वीरमरण पत्करणे समजता येईल, पण जुनाट लष्करी सामग्रीमुळे जीव गमवावा लागणे हे पत्नींसाठी वेदनादायी ठरते. अपघातांमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी प्राण गमावले, त्यातील काहींचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता, काहींना अवघ्या सहा महिन्यांचे बाळ आहे, काहींच्या पत्नी गरोदर होत्या. पतीच्या अकस्मात मृत्यूच्या धक्क्यातून त्या अजून सावरल्या नसल्याची व्यथा त्यांनी संरक्षणमंत्र्यांसमोर मांडली. जुनाट सामग्रीमुळे हे घडत असल्याने लष्करी कुटुंबीयांमध्ये संतप्त भावना आहे. अपघातांच्या मालिकेमुळे वैमानिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे. चिता व चेतकच्या जागी आधुनिक हेलिकॉप्टर समाविष्ट केली जाणार आहेत. दहा वर्षांपासून हा विषय रखडला असून दुसरीकडे कालबाह्य़ हेलिकॉप्टरचे अपघात वाढत असल्याकडे गटाने लक्ष वेधले. लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींची भावना जाणून घेतल्यावर संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी हा विषय केंद्र सरकारने गांभीर्याने घेतला असल्याचे सांगितले. ताफ्यातील १७५ चीता व चेतकचे उड्डाण लगेच कायमस्वरूपी थांबविणे शक्य नाही. कारण त्याचा लष्करी सज्जता व समतोलावर परिणाम होईल. यामुळे टप्प्याटप्प्याने नवीन हेलिकॉप्टर्स समाविष्ट करून चीता आणि चेतकला निरोप देण्याचे नियोजन असल्याचे पर्रिकर यांनी नमूद केले.
वास्तविक, लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या गटाला संरक्षणमंत्र्यांनी दिलेले हे आश्वासन आठ वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरापेक्षा वेगळे नाही. तेव्हापासून आजतागायत आधुनिक हेलिकॉप्टर्स खरेदीचा विषय भरारी घेऊ शकलेला नाही. दुसरीकडे जुन्या हेलिकॉप्टरच्या अपघातांची मालिका कायम आहे. सीमावर्ती भागात टेहळणी, हवाई निरीक्षण कक्ष स्थापून तोफखान्याच्या माऱ्याचे नियंत्रण, जखमी सैनिकांना युद्धभूमीवरून वाहून नेणे, लढाऊ सैनिकांच्या तुकडय़ांना जलदपणे आघाडीवर पोहोचविणे, आघाडीवरील तळांना रसद पुरवठा याची संपूर्ण जबाबदारी लष्कराच्या हवाई दलावर आहे. शांतता काळात त्यांचे दैनंदिन काम अव्याहतपणे सुरू असते. देशांतर्गत पूर, भूकंप,vv17 सुनामी आदी नैसर्गिक संकटांत ही हेलिकॉप्टर्स बचावकार्यात आघाडीवर असतात. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडे (एनडीआरएफ) स्वत:ची हेलिकॉप्टर्स नाहीत. त्यांची संपूर्ण भिस्त याच दलाच्या हेलिकॉप्टर्सवर आहे. या दलाच्या कामाचा आवाका लक्षात घेतल्यास आयुर्मान संपलेल्या चीता व चेतकचा वापर वैमानिकांबरोबर लष्करी अधिकारी, जवान तसेच नागरी भागातील बचावकार्यावेळी नागरिकांचा जीव धोक्यात टाकणारा ठरला आहे. अपघात रोखण्यासाठी साहाय्यभूत ठरणारी आवश्यक ती यंत्रणा, व्यवस्था या दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये नसताना वैमानिक हिमालयाच्या डोंगररांगांमधून कसे मार्गक्रमण करीत असेल याचा विचार करता येईल. जम्मू-काश्मीरमध्ये बहुतांश सीमारेषा निश्चित नाही. डोंगररांगेच्या सीमावर्ती भागात दिशादर्शन यंत्रणेअभावी हेलिकॉप्टर भरकटण्याची शक्यता असते. मध्यंतरी याच पद्धतीने भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर थेट पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. उड्डाणाआधी परिसरात हवामानाची माहिती उपलब्ध होण्याची व्यवस्था नाही. आघाडीवरील तळांवर संपर्क साधून तोंडी मिळालेल्या माहितीच्या आधारे हेलिकॉप्टर उड्डाण करते. मार्गक्रमणादरम्यान वादळ, ढग, पाऊस तत्सम बाबींची पूर्वसूचना देणारी यंत्रणा हेलिकॉप्टरमध्ये नसल्यामुळे वैमानिक दैवाच्या भरवशावर असतो. ‘अ‍ॅटो पायलट’ आणि ‘ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निग सिस्टीम’ या सुविधा हेलिकॉप्टर अपघाताची शक्यता कमी करणाऱ्या. यामुळे हेलिकॉप्टर वैमानिकाच्या हस्तक्षेपाशिवाय सुरक्षित अंतर राखून मार्गक्रमण करते. उंच-सखल भागात त्याचा लाभ होतो. मात्र चीता व चेतकमध्ये वैमानिकाला अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यात कशाला धडकून अपघात झाला तर चौकशीत मानवी दोष हे कारण पुढे येते. अपघात झाला की लष्कर चौकशी करते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे भाग तपासणीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) प्रयोगशाळेत पाठविले जातात. एचएएल हेलिकॉप्टरसाठी वेळोवेळी लागणारे सुटे भाग परदेशातून आयात करून लष्कराला पुरवठा करते. म्हणजे जे मालाचा पुरवठा करतात. त्यांच्याच प्रयोगशाळेत अपघातानंतर तपासणी होते. एचएएल प्रयोगशाळेच्या अहवालावरून चौकशीचा अंतिम निष्कर्ष काढला जातो. त्यातून तांत्रिक दोषांची स्पष्टता होत नसल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता राहत नाही. बहुतांश अपघातात मानवी दोष हा एकमेव निष्कर्ष आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एचएएल त्यांच्या बाजूने काही चुकीचे नसल्याचे दर्शविते. हेलिकॉप्टरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे याचा विचारही केला जात नाही. ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’ असाच हा प्रकार. जागतिक निकषानुसार अशा अपघातांच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र त्रयस्थ यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. देशात सद्य:स्थितीत तशी व्यवस्था अस्तित्वात नाही. नव्या केंद्र सरकारने संरक्षण सामग्रीत स्वयंपूर्णता आणण्याचे सूतोवाच केले आहे. तथापि, विद्यमान स्थिती लक्षात घेतल्यास अतिशय किरकोळ साहित्यासाठी आपण परदेशांवर अवलंबून असल्याचे लक्षात येते. हेलिकॉप्टरपुरता विचार केल्यास ‘पिन्स, वायर, वॉशर, होजेस, प्लास्टिक कंटेनर’ अशा लहानसहान बाबी महागडय़ा दराने परदेशातून खरेदी कराव्या लागतात हे वास्तव आहे. त्यात एचएएल परदेशातील उत्पादकांकडून जे काही सुटे भाग मागविते, त्यात काही दोष उद्भवल्यास विक्रीपश्चातसेवेची शाश्वती मिळत नाही. देशातील लघू व मध्यम उद्योगांकडून विविध प्रकारचे सुटे भाग स्थानिक पातळीवर तयार करता येऊ शकतात. केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने लघू व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण ठेवले आहे. कुशल मनुष्यबळ, ज्ञानाधारित कौशल्य उपलब्ध असूनही त्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. परदेशातील पुरवठादारांवर विसंबून राहणे युद्धकाळात आर्थिक भार आणि चिंताही वाढविणारे आहे.
अपघातांची शृंखला कायम असल्याने खुद्द लष्कराने चिता व चेतक बदलण्यासाठी चौदा वर्षांत आतापर्यंत तीन वेळा संरक्षण मंत्रालयाकडे लेखी मागणी केली. पण लालफितीचा कारभार, तत्कालीन सरकारचे धोरण या प्रक्रियेत अडथळा ठरले. ही दिरंगाई वैमानिकांच्या जिवावर बेतत आहे. शेजारील चीन आणि पाकिस्तानकडे देखील तंत्रज्ञानदृष्टय़ा सरस हेलिकॉप्टर्स आहेत. तंत्रज्ञानात मागास हेलिकॉप्टरचा वापर समरप्रसंगात भारतीय लष्कराला अडचणीचा ठरू शकतो. या सर्व बाबींची जाणीव लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या गटाने संरक्षण मंत्रालयास करून दिली आहे. वैमानिकांची कमतरता भासत असल्याने लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन वैमानिक करण्यासाठी खास नाशिक येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करून या स्कूलमधून ५० ते ६० वैमानिक तयार केले जातात. प्रत्येक तुकडीच्या दीक्षान्त सोहळ्यात नवोदित वैमानिकांना आकाशातील लढाऊ सैनिक म्हणून काम करताना सुरक्षित उड्डाणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले जाते. असुरक्षित हेलिकॉप्टर हाती देऊन त्यांच्याकडून बाळगली जाणारी सुरक्षित उड्डाणाची अपेक्षा कितपत योग्य आहे?