|| सीमा भानू

भाषेच्या संवर्धन आणि जतनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिला जाणारा ‘प्राचार्य राम शेवाळकर भाषाव्रती पुरस्कार यंदा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाचे माजी प्रमुख प्रा. प्र. ना. परांजपे व नागपूर येथील व्याकरण व भाषाशास्त्राचे जाणकार दिवाकर मोहनी यांना जाहीर झाला आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याची ही ओळख..

खरे तर प्र. ना. परांजपेसरांनी जन्मभर प्राध्यापकी केली असली, तरी मराठी भाषेचे खंदे पुरस्कर्ते, ती टिकण्यासाठी, वाढण्यासाठी प्रयत्न करणारे साक्षेपी समीक्षक आणि लेखक म्हणून ते अधिक ओळखले जातात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे तेव्हाच्या एस.एस.सी.मध्ये संपूर्ण मुंबई प्रांतात (ज्यात अहमदाबाद आणि कर्नाटकाचा काही भागही समाविष्ट होता.) मराठीत पहिले येऊनही त्यांनी बी.ए. आणि एम.ए.साठी इंग्रजी विषय निवडला होता आणि नंतर रुईया महाविद्यालयात १५ वर्षे इंग्रजी शिकवलेही!

पण या सगळ्याचा त्यांच्या मराठीप्रेमावर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्या वेळचे त्यांचे प्राध्यापक नागराज यांच्यामुळे भाषा आणि साहित्य याबद्दल त्यांचा एक दृष्टिकोन तयार झाला. दिखाऊ  लेखनाने संमोहित होण्यापेक्षा लेखनाची खरी क्षमता ओळखण्याची सवय त्यांच्यामुळे लागली असे ते सांगतात. त्यानंतर ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंग्रजी अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेजेस’मधून त्यांनी एम.लिट. केले. आणि इथे साहित्याच्या पलीकडे जाऊन भाषेचा विचार करण्याची कला त्यांना अवगत झाली. त्यामुळेच भाषेचे शिक्षण आणि वाङ्मयाचे शिक्षण या भिन्न गोष्टी असल्याचे ते मानतात. ‘सत्यकथा’त त्यांनी अनेक पुस्तकांची समीक्षा लिहिली. ती लिहितानाही- भाषा हे माणसाच्या अंतरंगाचे प्रतीक आहे. त्यामुळे ती कृत्रिमपणे वापरली आहे का, हे बघण्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांना परखड समीक्षक म्हणून ओळखले जाऊ  लागले ते याच सुमारास. ‘भाषेकडून भाषेकडे आणि भाषांतराकडे’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातही त्यांचे या विषयावर मत मांडणारे लेख समाविष्ट केले आहेत. मराठी अभ्यास परिषदेच्या ‘भाषा आणि जीवन’ या भाषा संवर्धनाला वाहिलेल्या त्रमासिकाचे संपादनही ते २००४ पासून करीत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातर्फे अन्य भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्यातही सरांचा खूप मोठा वाटा आहे. योग्य शब्द वापरण्याबाबत सर खूप काटेकोर आहेत. मृदू आवाजात, पण ठामपणे आपला मुद्दा पटवून देण्यातही ते माहीर आहेत. जसे ‘शुद्ध भाषा’ याऐवजी ‘प्रमाण भाषा’ हा शब्द वापरायचा आग्रह ते धरतात. ‘शुद्ध’ या शब्दाला वर्णवर्चस्वाचा दर्प आहे. प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत लिहायचे ठरवले, तर कळणार नाही म्हणून त्यासाठी प्रमाण भाषा हवी. पण ती शुद्ध असलीच पाहिजे असे नाही. भाषेप्रमाणे तिचे नियम बदलत जाणार आणि हे साहजिकच आहे, असे ते सांगतात. ‘भाषेचा दुराग्रह असू नये. सगळ्या भाषा चांगल्याच असतात. जी भाषा माणसांच्या गरजा पूर्ण करते ती टिकते’ असे सांगतानाच भाषेबद्दलची वैज्ञानिक समज येण्यासाठी भाषेचे विज्ञान शिकवायला हवे असे त्यांना वाटते.

आपल्याकडे एक तर भाषेबद्दल टोकाचा दुराग्रह आहे, नाही तर मग तितकीच टोकाची अनास्था आहे. भाषा जपायची आणि वाढवायची तर या दोन्ही भावना टाळल्या पाहिजेत असे स्पष्ट मत सर सतत मांडत आलेले आहेत. भाषा हे व्रत मानले तर तिचा प्रसार करण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करणे गरजेचे आहे, जो अभावानेच केला जातो असे त्यांना वाटते. याचबरोबर मराठी भाषेच्या अध्यापनाकडे होणारे दुर्लक्षही त्यांना खटकते. ‘ब्रिटिश कौन्सिल’कडून जसे अध्यापनाला साहाय्यभूत ठरणारे अभ्यासक्रम चालवले जातात, तशी शिक्षकांना साहाय्यभूत ठरणारी कुठलीच मदत वा मार्गदर्शन मराठीसाठी नाही. हे खरे असले तरी, मातृभाषेतून शिकणे हेच त्यांना गरजेचे वाटते. कारण त्याशिवाय बुद्धीचा विकास होत नाही. आपण जिथे राहतो त्या महाराष्ट्राबद्दलची समज इंग्रजी शिकून कशी येणार, असा प्रश्न ते त्यांच्या लिखाणातून सतत विचारतात.

मात्र, मराठी भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असे सरांना अजिबात वाटत नाही. आज महाराष्ट्रात १०-१२ कोटी लोक राहतात. त्यापैकी सात-आठ कोटी तरी वेगवेगळ्या पद्धतीची, पण मराठी भाषा बोलतात. मराठीतून शिकणे कमी झाले असले, तरी अजूनही अनेक मुले मराठी शाळेत जातातच. जयंत नारळीकरांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ आवर्जून मराठीत लिहितात. शान्ता शेळके, श्रीनिवास कुलकर्णी, आचार्य अत्रे यांसारख्या लेखकांनी सहज आणि सरळ लिखाणाने ही भाषा अनेकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे ‘अभिजातते’चे प्रमाणपत्र नसले तरी तिला धोका नाही. मराठी टिकणार नाही असे ज्यांना वाटते, त्यांना वस्तुस्थितीचे वस्तुनिष्ठ ज्ञान नाही असे सरांना ठामपणे वाटते.

नुकतीच वयाची ऐंशी वर्षे पार केलेले सर आजही ज्या उत्साहाने, चिकाटीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आग्रही आहेत ते पाहिले की, ‘भाषाव्रती’ पुरस्कारासाठीची त्यांची निवड किती योग्य आहे, हे पटते.

bhanuseema@gmail.com