माधव वझे

१९६० च्या एक-दोन र्वष आधी आणि नंतरची गोष्ट! स. प. आणि फग्र्युसन महाविद्यालयात शिकत असताना आमच्या नाटय़ विभागाने संमेलनाच्या वेळी जी नाटके केली त्यामध्ये मला प्रमुख भूमिका होत्या. नाटय़ विभागाने वासुदेव पाळंदे यांना दिग्दर्शक म्हणून निमंत्रण दिले होते. पाळंदेसरांचा भर स्वच्छ, स्पष्ट बोलण्यावर असायचा. एक पात्र बोलत असताना शेजारच्या पात्राने प्रतिसाद म्हणून मधूनमधून ‘हां-हू’, ‘अस्सं’, ‘बरं’ असे काहीतरी म्हणायला हवे असा त्यांचा आग्रह असायचा. ते सगळे ठीक होते. पण नट-नटींनी एकमेकांकडे पाहून आपापली वाक्ये बोलली पाहिजेत असा त्यांचा फक्त आग्रहच नाही, तर हट्टच असायचा आणि काही केल्या ते आम्हाला जमायचे नाही. आम्ही मुले-मुली तसे जरी एकमेकांचे मित्रमत्रिणी होतो तरी एकमेकांच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलायचे म्हटले की गोंधळून जायचो. पाळंदेसर समजावून सांगायचे आणि आम्ही मनाचा हिय्या करून एकमेकांकडे पाहायचा प्रयत्न केला की नजर भिरभिरायची तरी किंवा फस्सकन् जे हसू फुटायचे ते काही आवरायचे नाही. सर चिडायचे.

सासरा सुनेच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देत आहे असे एक दृश्य होते. तर सासरा झालेला आमचा मित्र सुनेपासून सुरक्षित अंतर ठेवून लांबूनच तिच्या खांद्यावर हात ठेवला- न ठेवला असे करायचा आणि विजेचा धक्का बसल्याप्रमाणे हात क्षणार्धात काढून घ्यायचा. सर तर कपाळाला हात लावायचे. इतर नट-नटी खोखो हसत राहायचे. कारण आम्हाला माहीत होते की, सासरा आणि सून यांचे बाहेर प्रेमप्रकरण सुरू आहे. जवळिकीची दृश्ये करताना मुली तर फारच संकोचायच्या. तशी दृश्ये टाळण्यासाठी त्या पाळंदेसरांना तालमीनंतर भेटून आर्जव करायच्या. घरी अशी दृश्ये आवडणार नाहीत, नाटक झाल्यानंतर उगीचच अफवा पसरतील, मित्र-मत्रिणी चेष्टा करून जीव नकोसा करतील अशी भीती त्यांना वाटत असायची. आम्ही मुलेमुली काही केल्या एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहू शकत नसल्याचे लक्षात आल्यावर पाळंदेसरांनी एक तोडगा सुचवला. डोळ्यात जरी नाही तरी एकमेकांच्या कानाकडे पाहून आम्ही वाक्ये बोलावी, म्हणजे मग तुम्ही एकमेकांकडे पाहत आहात असेच प्रेक्षकांना वाटेल, असे त्यांनी सुचवले. कानाकडे पाहून वाक्ये बोलण्याच्या नुसत्या कल्पनेनेच सगळे हसून हसून बेजार झाले.

काही वष्रे उलटली. महाविद्यालयीन शिक्षण संपवून पुणे विद्यापीठात शिकत असताना एक दिवस फग्र्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्याचा निरोप आला. एका नाटकाचे दिग्दर्शन मी करावे असे त्यांनी सुचविले. पडत्या फळाची आज्ञा म्हणून लगेचच होकार दिला. नाटक बसवताना पाळंदेसरांच्या पद्धतीने दिग्दर्शनाला सुरुवात केली.

त्याच दिवसांत केव्हातरी तालीम संपवून घरी जाताना पाळंदेसर रस्त्यात भेटले. फग्र्युसनमध्ये मी नाटक बसवतो आहे हे त्यांना माहीत होते आणि त्याचा त्यांना खूप आनंद झाला होता. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभ्या उभ्या बोलत असताना मी सरांना माझी अडचण बोलून दाखवली. ‘‘‘हातांचे काय करायचे हे त्या मुलामुलींना कळत नाही’, ‘आपण करतो आहोत ते नाटक आहे, त्यामुळे लगेचच कोणी एकमेकांच्या प्रेमात पडत नसतात, तेव्हा रंगमंचावर बिनधास्तपणे एकमेकांच्या नजरेला नजर देऊन बोला..’ असे अनेकदा सांगूनही ती मुलेमुली एक तर संकोच करतात म्हणा किंवा घाबरतात म्हणा, पण पहिले पाढे पंचावन्न.’’ मी अगतिक होऊन बोलत होतो. पाळंदसर त्यांनीच सांगितल्याप्रमाणे मधूनमधून ‘अस्सं’, ‘बऽऽरं’, ‘असं होय?’- असा प्रतिसाद देत होते. मधूनच हसत होते.

माझे बोलणे केव्हातरी संपले. सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘अरे, तू ज्या या सगळ्या गोष्टींबद्दल तक्रार करतो आहेस, त्या सगळ्या गोष्टी नाटकात काम करताना तूही करत होतास. तुम्ही सगळे चोरटय़ा आवाजात बोलायचात. एकमेकांची नजर चुकवायचात. आणि मी अगदी हताश व्हायचो. आता हताश होण्याची वेळ तुझी आहे. एक दिग्दर्शक म्हणून तुझे प्रयत्न चालू ठेव. हा विषयच असा आहे की एकदा आपण सविस्तर चर्चा केली पाहिजे. तू मोकळा झालास की भेटू केव्हातरी.’

बालरंगभूमीची ती बहराची वष्रे होती. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत बालनाटय़ांचे पीक तरारून यायचे. त्या बहुतेक नाटकांचा भर अद्भुतरम्यतेवर असायचा. देवदेवता, राक्षस, पऱ्या, विदूषक, राजे-राण्या यांनी गजबजलेल्या त्या नाटकांमध्ये घटना एकापाठोपाठ एक अतिशय वेगाने घडत जात असत. तितक्याच वेगाने संगीतही असायचे. लाल, हिरव्या दिव्यांची उघडझाप केली जायची. प्रयोग सुरू असताना छोटे प्रेक्षक चीत्कारायचे, ओरडायचे. पॉपकॉर्नचे पुडे फस्त होत असायचे.

एक दिवस एका घरी त्यांच्या घरातला दिनू नाटक पाहून आला होता आणि तो त्याच्या आईला नाटकात मारामारी कशी झाली, र्खे अस्वल कसे आले, मग नाटकातला राजा लपून कसा बसला, त्यावेळी लाल दिवा कसा लागला, वगरे सगळं अगदी रंगून सांगत होता. त्याचे ते वर्णन ऐकून आईने विचारले, ‘हे सगळे अगदी मस्तच आहे रे. पण नाटक कशाबद्दल होते ते सांग ना?’ आणि दिनू डोके खाजवायला लागला. हो की! आपण पाहिले ते नाटक कशाबद्दल होते बरे?

तो संवाद ऐकला आणि मनात आले- पाळंदेसरांना आता उशीर न करता भेटलेच पाहिजे. पण त्याआधी आणखी एक अनुभव यायचा होता.

एका माध्यमिक शाळेचे स्नेहसंमेलन होते. संमेलनात नाटक होणार होतेच. मी नाटकात भूमिका करतो, नाटके बसवतोसुद्धा- हे शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख असलेल्या बाईंना माहीत असल्यामुळे त्यांनी शाळेचे नाटक पाहायला मला बोलावले. अपेक्षेप्रमाणे नाटक बालशिवाजी, त्याचे मावळे, जिजामाता यांचे होते. प्रयोग सुरू झाला आणि थोडय़ाच वेळात जाणवले की, रंगमंचावरचा बालशिवाजी डावखुरा आहे. जोरजोराने बोलत असताना त्याचा डावा हात तो हवेत फेकत होता. ते लगेचच खटकले. शिवाजी आणि डावखुरा? – पण मनाची समजूत घातली. असेना का बालशिवाजी डावखुरा; कुठे असे लिहून ठेवले आहे, की तो डावखुरा नव्हता?

त्या बालनटाने काम छानच केले! नाटक संपले आणि मुख्याध्यापक बाईंनी मला रंगमंचावर नेले.. सगळ्या बालकलाकारांची ओळख करून देण्यासाठी! रंगमंचामागे कपडेपटात आम्ही गेलो. तिथे मुलेमुली दाटीवाटीने उभी होती. आम्ही तिथे आलेले पाहून दिग्दíशका बाईंनी तिथल्या खुर्चीकडे हात दाखवत मला बसण्याची विनंती केली. इतकेच नाही तर त्यांनी लगबगीने ती खुर्ची माझ्या दिशेने सरकवलीही. मी काहीसा चपापलो. दिग्दर्शिकाबाई डावखुऱ्या असल्याचे जाणवले. काही बोललो नाही. मग आला चहा. बाईंनी तत्परता दाखवून ट्रेमधून कप उचलून माझ्या हातात दिला, तोही डाव्या हाताने. आणि कळले, की शिवाजी डावखुरा कसा झाला ते!

आता मात्र राहवले नाही. पाळंदेसरांच्या घरीच गेलो. त्यांना डावखुऱ्या बालशिवाजीबद्दल सांगितले आणि आम्ही दोघे पुढे खूप वेळ हसत राहिलो. त्या आमच्या भेटीत मागच्या सगळ्या आठवणींची उजळणी झाली. पाळंदेसर प्रश्न विचारून मला बोलते करत होते. ते शिक्षक असल्यामुळे मुलांच्या मानसशास्त्राचे दाखले मधूनमधून देत होते. आपल्या कुटुंबसंस्थेविषयी आणि शिक्षणपद्धतीविषयी आमची चर्चा झाली. बालपणापासून एकमेकांना निरागसपणे स्पर्श करणारे मुलगे आणि मुली- त्यात हातात हात घेतले जातात, एकमेकांना धपाटे दिले जातात, मिठय़ा मारल्या जातात, पापे घेतले जातात- तेच मुलगे आणि त्या मुली वयात येत असताना खरे तर तितक्याच निरागसपणे आणि स्वाभाविकपणे एकमेकांना स्पर्श करत असतात. पण ती वयात येत आहेत, त्यांच्या लैंगिक भावना जाग्या आणि विकसित होत आहेत, त्यामुळे आता मुलगे आणि मुली यांना एकमेकांना स्पर्श करू देता कामा नये असे त्यांच्या आईवडिलांना वाटायला लागते. भावा-बहिणीनेही एकमेकांच्या अंगचटीला जायचे नाही असे कुटुंबामध्ये बजावले जाते. तीच गोष्ट माध्यमिक शाळेमधली आणि महाविद्यालयातली. शाळा- महाविद्यालयाच्या वर्गामध्ये मुलग्यांचे आणि मुलींचे असे दोन तटच पाडले जातात. महाविद्यालयात असताना मजा यायची. अर्थशास्त्राच्या कुमारी प्राध्यापिका आम्हा मुलांच्या रांगांकडे पाहत बोलायच्या, तर तर्कशास्त्राचे कुमार सर मुलींच्या रांगेकडे नजर लावून असायचे.

इथे एक गमतीदार घटना आठवते. १९७४ मध्ये फ्रान्सला गेलो होतो. माझी फ्रेंच मत्रीण तिथे एका  शाळेमध्ये शिक्षिका होती. तिने त्यांच्या शाळेमध्ये मला बोलावले. एका लहानशा वर्गात आम्ही गेलो. मुलेमुली मला प्रश्न विचारणार होती. अनेक प्रश्नांपकी एक प्रश्न साहजिकच आपल्या विवाहपद्धतीबद्दल होता. माझ्या बायकोची आणि माझी भेट कधी, कशी झाली याबद्दल त्यांना उत्सुकता होती. मग- मुलीच्या घरचे मुलीकरिता अनुरूप मुलगा शोधतात, मुलाला मुली सांगून येतात, मग मुलगा-मुली पाहून त्यातली एक पसंत करतो, वगरे मी त्यांना सांगितले. भारतात सरसकट प्रेमविवाह का होत नाहीत? तुमचा प्रेमविवाह कसा नाही झाला? असे त्यांचे प्रश्न होते. शाळेपासूनच मुलामुलींना कसे एकमेकांपासून दूर ठेवले जाते, ते आता त्यांना सांगावे लागणार होते. माझ्यासमोरच एका बाकावर दोन बाजूला दोन मुलगे आणि त्यांच्या मधे एक गुबगुबीत मुलगी असे बसले होते. एका मुलीला मधे जागा देऊन दोन मुलगे तिच्या दोन बाजूंना बसले आहेत असे दृश्य भारतातल्या शाळेत कोणी स्वप्नातदेखील पाहू शकत नाही, असे मी त्यांच्याकडे पाहत सांगितले तेव्हा त्या मुलीने दोन हातांच्या दोन कोपरांनी बाजूच्या दोन्ही मुलांना ढकलून दिल्यासारखे केले आणि वर्गात एकच हशा झाला.

िलगभेदाविषयी आपण आजही अति संवेदनशील आहोत. प्रौढपणीही स्त्री-पुरुषांचे गट पाडले जातात. एका सांस्कृतिक संघटनेबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. एका समारंभाच्या वेळी स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा करून तशी आसनव्यवस्था केली होती. समारंभ संपल्यावरदेखील स्त्री-पुरुषांनी एकाच दाराने बाहेर पडावे असे अपेक्षित नव्हते. तेव्हा सभेच्या संचालकांनी जाहीर केले की, पुरुष दक्षिण मार्गाने, तर स्त्रिया वाम मार्गाने (?) जातील. कोणत्याही बाबतीत अति नियंत्रण हे विकृतीला आमंत्रण देत असते. भिन्निलगी व्यक्तींमधली शारीरिक जवळीक आपल्या समाजाला मान्य नाही. इतकेच नाही, तर तशा जवळिकीबद्दल आपल्या मनामध्ये संशय असतो. पुण्यामधील वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चोक्सी आणि इंग्रजीच्या प्राध्यापिका डॉ. होमजी भरुचा संध्याकाळी एकमेकांचे हात हातात घेऊन अनेकदा महाविद्यालयाच्या आवारात फिरत असत. तिथे अध्ययन-अध्यापन करणाऱ्या आम्हा सर्वाच्या परिचयाचे आणि खरे तर आवडीचे असे ते दृश्य होते. शारीरिक जवळीक म्हणजे निकोप नाते नसणार, हे कोणते तर्कशास्त्र?

पाळंदेसरांशी बोलताना अशा निष्कर्षांला आलो की युवा-युवतींच्या मनात रुतून बसलेले असे शारीरिक-मानसिक गंड नाटकाच्या तालमीमध्ये अनुभवाला येत असले तरी ते दूर करायचे म्हटले तर त्याला आता उशीर झाला आहे. मुलामुलींच्या मनामध्ये गंड निर्माण होण्यापूर्वीच आपण त्यांना एकत्र आणून निकोप वातावरणामध्ये एकमेकांच्या संगतीमध्ये राहू दिले पाहिजे. आणि त्याचबरोबर खास त्यांचीच अशी स्वत:ची रंगभूमी निर्माण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

छोटय़ा मुलामुलींसाठी प्रौढ नाटककारांनी नाटके कशाला लिहायला हवी? शाळेच्या संमेलनामध्ये  ‘एकच प्याला’ नाटकातल्या तळीरामाच्या आर्य मदिरा मंडळाचा प्रवेश सादर करण्याची शाळेतल्या शिक्षकांची महत्त्वाकांक्षा असते, याला काय म्हणावे? त्या लहान मुलामुलींच्या जगाबद्दलचे अज्ञान आपल्या बाल आणि शालेय रंगभूमीवर ओसंडून वाहत होते. नाटय़छटाकार दिवाकरांच्या अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच नाटय़छटा खरे तर शालेय मुलामुलींसाठी आहेत. पण शिक्षक-शिक्षिका मोठय़ा हौसेने त्यांना ‘पंत मेले, राव चढले’ ही नाटय़छटा स्पध्रेमध्ये सादर करायला लावतात, हे नेहमीचे दृश्य होते. आणि लहान मुलांसाठी म्हणून लिहिल्या जाणाऱ्या नाटकांतले संवाद म्हणजे तर लहान तोंडी मोठा घास देण्याचाच प्रकार होत असतो. ‘तुमचा होतो खेळ, पण आमचा जातो जीव’ असे ती लहान मुलेमुली म्हणू शकत नव्हती, एवढेच.

त्या मुलामुलींच्या वयोगटाला शोभेसेच विषय नाटकासाठी निवडले पाहिजेत असा कटाक्ष असला पाहिजे. म्हणजे अभ्यास, फजिती, निरोप, निकाल, मदत, मत्री, भांडण, स्पर्धा, गरसमज.. असे कितीतरी. कितीही वष्रे उलटली आणि जग कितीही पुढे गेले तरी लहान मुलामुलींच्या भावविश्वात हे विषय असणारच आहेत. आणि या विषयांवर नाटके तयार करायची, तीही त्यांनीच. एक पायाभूत काम आपण सुरू केले पाहिजे.

आम्ही ठरवले की, पुण्यातल्या माध्यमिक शाळांतल्या मुलामुलींना घेऊन आपण काम सुरू करायचे. पाळंदेसर शिक्षक असल्यामुळे पुण्यातल्या शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयामधून त्यांनी माध्यमिक शाळांची यादी मिळवली. नूतन मराठी विद्यालय, हुजूरपागा, मॉडर्न प्रशाला, अहिल्यादेवी अशा मध्यमवर्गीय मुलामुलींच्या आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शाळांच्या बरोबरच आम्ही खडकमाळ आळीवरील आणि भवानी पेठेतीलही शाळा निवडल्या. सुरुवातीला एकूण पाच शाळा निवडल्या. ‘जागर’ या आमच्या प्रायोगिक संस्थेमधल्या तरुण सहकारी मुलामुलींना घेऊन आम्ही त्या पाच शाळांच्या मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिकांना भेटलो आणि त्यांना सांगितले की, पाचवी ते सातवीच्या वर्गातल्या मुलामुलींशी बोलून आम्हाला एक नाटय़-उपक्रम करायचा आहे. त्यांनी संबंधित शिक्षक-शिक्षिकांना बोलावून घेतले. आम्ही उपक्रम सांगितल्यावर- ‘आम्हाला यामध्ये काही करायचे नाही ना? मग जरूर या उपक्रम करायला!’ अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. ती आम्ही समजू शकत होतो. शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नेहमीच जुंपले जाते, हे शिक्षक-प्राध्यापक म्हणून आम्ही पाहतच आलो होतो. म्हणून आम्ही त्यांना सांगितले की, त्यांना यामध्ये काहीही करायचे नाही. त्यांनी फक्त आम्हाला वर्गात नेऊन आमची ओळख करून द्यायची.

वर्गात गेल्यावर मी त्या मुलामुलींशी बोलायला सुरुवात करत असे. हसऱ्या चेहऱ्याने त्या मुलांमधलेच एक होऊन आपण त्यांच्याशी मित्र-मत्रिणीच्या नात्याने बोललो, अगदी साध्या-सोप्या भाषेमध्ये, तर त्यांच्याशी आपला संवाद फार छान जुळून येतो. त्यांना प्रौढ, संस्कृतप्रचुर भाषेमध्ये त्यांच्याशी बोललेले जसे आवडत नाही, त्याचप्रमाणे कुक्कुलं बाळ समजून त्यांच्याशी लाडेलाडे बोललेलेही त्यांना आवडत नाही. मुलांशी बोलणे सोपे नाही. आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये या महत्त्वाच्या घटकाकडे आपण कधीही लक्ष दिले नाही.  तर मुलामुलींना मी सांगायचो, की त्यांनी त्यांचे स्वत:चे एक नाटक करावे यासाठी आम्ही आलो आहोत. आजपासून एक आठवडय़ाने आम्ही त्यांनी बसवलेले नाटक पाहायला येणार. नाटक कोण लिहिणार, त्याचा विषय काय, ते कोण बसवणार, नाटकात कामे कोण करणार, कोणाला कोणते काम असणार, हे सगळे त्यांचे त्यांनीच ठरवायचे. आणि महत्त्वाचे म्हणजे नाटक फक्त सात-आठ मिनिटांचे असले तरी चालेल. नाटक मोठ्ठेच असले पाहिजे असे काही ठरलेले नाही. शाळा संपल्यावर त्यांनी नाटकाची तयारी सुरू करायची. आमचा हा उपक्रम त्यांना सांगितल्यावर वर्णन करता येणार नाही असा उत्साह वर्गामध्ये संचारताना आम्ही अनुभवला. तरीही आम्ही साशंक होतो. मुले तेवढय़ापुरती उत्साहात राहतील, पण आठवडय़ानंतर काय परिस्थिती असेल?

आमची भीती खोटी ठरली. बहुतेक शाळांमधल्या निरनिराळ्या वर्गातल्या मुलामुलींनी आठवडाभरात नाटक बसवले होते. ते पाहायला आम्ही ‘जागर’मधले काही जण जात होतो. मुलामुलींच्या वाचनात आलेल्या काही गोष्टींना त्यांनी नाटय़रूप दिले होते. कोणी शिक्षकांनी किंवा घरी आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टीला नाटय़रूप दिले होते. बहुतेक नाटके उपदेशपर होती. आणि त्यातून कोणता बोध घ्यावा, ते दिग्दर्शक मुलगा नाटक सुरू होताना किंवा ते संपल्यानंतर सांगत होता. विशेष म्हणजे एकही मुलगी दिग्दर्शक नव्हती. सगळी नाटके पाहून त्यातून पंचवीस मुलेमुली आम्ही निवडणार होतो. त्या निवड प्रक्रियेमध्ये खडकमाळ आळीवरच्या शाळेतल्या मुलांनी आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्टय़ा निम्न स्तरावरच्या कुटुंबांतल्या मुलामुलींनी केलेले नाटक पाहून ती मुले मध्यमवर्गीय शाळेतल्या मुलामुलींच्या तुलनेने तशी उजवी असल्याचे आम्हाला जाणवले. एक बिनधास्तपणा, एक रांगडेपणा त्यांच्या एकूणच सादरीकरणामध्ये होता.

निवडलेल्या पंचवीस मुलामुलींचे घराचे पत्ते आम्ही त्या- त्या शाळेमधून मिळवले. आता पुढची पायरी होती, त्या मुलामुलींच्या आई-वडिलांशी बोलण्याची. म्हणून ‘जागर’ने त्या सर्वाना पत्र पाठवून एका सभेला येण्याची विनंती केली. मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेमागच्या लहानशा जागेमध्ये आमचा उपक्रम करण्यासाठी परवानगी दिली. चार िभतींच्या बाहेरही आणि खरे तर अनेकदा बाहेरच- मुलामुलींचे व्यक्तिमत्त्व बहरते, हे खरे तर शिक्षणसंस्थांनी ओळखून योग्य संस्थांना आपल्या संस्थेतली जागा उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता असते; पण तसे सहसा घडत नाही. परिणामी केवळ जागेअभावी अनेक सांस्कृतिक संस्थांच्या कार्याला मोठी मर्यादा पडते हे आपण पाहतो.

तर मॉडर्न हायस्कूलच्या आवारात आम्ही पालकांची सभा ठरवली. मोठय़ा संख्येने पालक सभेला आलेले पाहून आमचा उत्साह वाढला. तुमच्या पाल्यामध्ये काही नाटय़गुण असल्याचे आम्ही पाहिले आहे. त्यांच्या या गुणांचा विकास व्हावा म्हणून दिवाळीच्या सुट्टीत आम्ही एक शिबीर घ्यायचे म्हणत आहोत. त्या शिबिरासाठी काहीही शुल्क नाही. फक्त पाल्यांची ने-आण तुम्ही करावी, इतकीच अपेक्षा आहे. तर आत्ता या सभेतच आपण त्याची चर्चा करूया, असा प्रस्ताव मी मांडल्याक्षणी चच्रेला सुरुवात झाली. एकुणात शिबिराची कल्पना सगळ्यांना खूप आवडली असली तरी त्यांच्या अडचणीही होत्या. अभ्यासाचे खासगी वर्ग, कोणाचे पोहण्याचे वर्ग होते, तर सुट्टीत कोणी बाहेरगावी जायचे म्हणत होते. शिबिरामुळे पाल्यांचे अभ्यासात लक्ष राहणार नाही अशी भीती कोणाला वाटत होती, तर असल्या शिबिराचा पुढे उपयोग काय, असा कोणाचा प्रश्न होता.

ती चर्चा ऐकून पाळंदेसर काहीसे निराश झाले. आपला हा उपक्रम इथेच बारगळणार असे त्यांना वाटायला लागले. सगळे पालक एकमेकांमध्ये बोलत असताना त्यांनी मला जरा बाजूला घेऊन त्यांची शंका बोलून दाखवली. पालकांची एकमेकांमधली चर्चा थोडा वेळ तशीच चालू देऊन नंतर एक नवा प्रस्ताव आम्ही पालकांसमोर ठेवला. प्रस्ताव असा होता की, आपण शिबीर सुरू करू या. एका आठवडय़ाने असे वाटले, की नको आपल्याला हे शिबीर, तर ते केव्हाही बंद करता येईलच; पण चार-सहा दिवस पाहू या तर काय होते आहे ते. या प्रस्तावाला मात्र अगदी एकमुखी मान्यता मिळाली. काहींनी तर परगावी जाण्याचे बेत बदलले. निवडलेली पंचवीस मुलेमुलीही सभेला आली होती. त्यांनी हात उंचावून आणि उडय़ा मारून जसे काही जिंकल्याचीच भावना व्यक्त केली.

शिबिराचा पहिला दिवस. आम्ही सगळेच जमिनीवर अनौपचारिकपणे बसलेलो. सगळ्यांना उत्सुकता.. सुरुवात कशी होणार, याबद्दल. समोर पाचव्या यत्तेतली मुलेमुली. त्यांना म्हटले, आपले हे रंगभूमी आणि नाटक याबद्दलचे शिबीर आहे, तर तुमच्या मनात आता जे काही प्रश्न असतील तर ते विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे आमच्यातले कोणी कोणी देतील. आणि प्रश्नाचे उत्तर माहीत नसले तर आम्ही तसे कबूल करू आणि नंतर केव्हातरी उत्तर मिळवून तुम्हाला सांगू.

समोरून प्रश्न यायला सुरुवात झाली : रंगमंचावर पुढचा पडदा नेहमी लाल रंगाचाच का असतो? त्या पडद्याची गरज काय असते? नाटक सुरू होण्यापूर्वी रंगमंचावर धूप का जाळतात? नाटक सुरू करण्याआधी तीन घंटा का वाजवतात? नाटककार जिवंत नसेल तर त्याला द्यायचे मानधन कुठे पाठवायचे असते? नटराजाच्या पायाखाली एक बाळ असते, त्याचे नाव काय?

पहिल्याच सत्रात प्रश्नांची सरबत्ती झाली आणि आम्ही सगळे अवाक् झालो. आम्हाला तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरे कुठे माहीत होती? वेळोवेळी हशा आणि टाळ्या- असे ते सत्र. मुलामुलींना किती जिज्ञासा असते त्याचा प्रत्यक्ष अनुभव.

शिबीर सकाळी ७ वाजता सुरू.. सगळ्यांनी आपापली पादत्राणे मदानाच्या िभतीला लागून एका ओळीत ठेवायची. देवळाबाहेर चपलांचा जसा खच असतो, तो नको. पाळंदेसर, मी आणि ‘जागर’मधले आमचे तरुण सहकारी यांचाही अपवाद नाही. रंगमंचावर त्या- त्या क्षणी जे- जे काही घडत असते ते एकाच वेळी अर्थपूर्ण आणि सुंदरच असले पाहिजे; त्यामध्ये विस्कळीतपणा असू नये, या अगदी प्राथमिक, पण महत्त्वाच्या तत्त्वाची आम्ही तोंडओळख करून देत होतो. मग गोलाकार उभे राहून, डोळे मिटून आपापल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करायचे. फरशीवर पाठीवर झोपून, डोळे मिटून आसमंतातले ध्वनी ऐकायचे. हाताची बोटे न वापरता दोन आकडी गुणाकाराचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. एकाग्रतेसाठी असे काही खेळ झाल्यानंतर संपूर्ण शरीराला पुरेसा ताण देणारे व्यायामप्रकार आणि मग गोलाकार बसून संस्कृत श्लोक, ऋचा मोठय़ाने म्हणण्याचा सराव. कधी गीता, कधी दुसरे काही. त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट होण्यासाठी जिभेला व्यायाम मिळावा म्हणून  संस्कृत.

मुलामुलींना उत्सुकता होती- आपण नाटक कधी सुरू करणार, याची. कुठले नाटक, ते बसवणार कोण, नाटकात इतक्या सगळ्यांना कशा काय भूमिका मिळणार, आणि नाटकाची सजावट वगरे कोण करणार? – असंख्य प्रश्न. आम्ही ठरवले होते की, मुलांची निवड करताना ज्याप्रमाणे त्या मुलांनीच तयार केलेली  नाटके आपण पाहिली होती, त्याप्रमाणे इथेही मुलांनीच त्यांचे त्यांचे नाटक तयार करायचे.

आमच्या मनात होते की, नाटकात गोष्ट असते हे खरे; पण केवळ गोष्ट सांगण्यासाठी नाटक नसते. गोष्टी स्वतंत्रपणे सांगितल्या, लिहिल्या जातातच. नाटकाला एक विषय असतो. त्या विषयाचे अनेक पलू असू शकतात. त्यांना आशय म्हणायचे. तो आशय व्यक्त होईल अशी एक गोष्ट तयार करायची आणि ती गोष्ट निवेदनामधून, संवाद-गाणी-नृत्य यांमधून नट-नटींनी प्रेक्षकांसमोर सादर करायची. पण हे सगळं पाचवीतल्या मुलामुलींना आत्ताच सांगण्याची एक तर गरज नव्हती; आणि दुसरे म्हणजे ते त्यांना जडही गेले असते. आमच्यातल्याच काही जणांना विषय, आशय, आकृतिबंध, आविष्कार अशा साहित्यिक संज्ञांचे जिथे वावडे होते, तिथे या लहान मुलामुलींना ते शब्द वापरून गुदमरवून टाकण्यात अर्थ नव्हता.

मनात आले, मुलामुलींशी बोलता बोलता त्यांना आपल्या मुद्दय़ाकडे न्यावे. मग सुरुवात केली. समजा, एक तळे आहे. त्यामध्ये आपण एक दगड टाकला, तर काय होईल? भराभर हात वर झाले. मग झाली उत्तरांना सुरुवात. कोणी सांगितले, दगड टाकला की पाण्यावर लाटा येतील. दुसऱ्याने म्हटले, नाही, लाटा नाही, पाण्यावर तरंग उमटतील. आणखी एका मुलीचे म्हणणे होते, पाण्यावर भाकरी येतील. लहान-मोठी चाके पाण्यावर दिसतील असेही आणखी एक उत्तर होते. त्यांना मजा येत होती हे दिसतच होते.

त्यानंतर प्रश्न केला की, तुम्ही लाटा, तरंग, भाकरी किंवा चाके वगरे जे काही म्हणता, ते पाण्यात दगड टाकल्यावर कधी येईल? या प्रश्नावर सगळ्यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे झाले. म्हणजे? हा काय प्रश्न झाला? असा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. एकसाथ आवाज आला, ‘दगड पाण्यात टाकला रे टाकला की त्या क्षणी लाटा, तरंग, भाकरी आणि चाके पाण्यावर येतील.’

पुढचा प्रश्न : ठीक आहे, पण एक सांगा, की त्या लाटा, ते तरंग, त्या भाकरी आणि ती चाके किती असतील? – या प्रश्नावर मात्र शांतता. एकमेकांकडे पाहत मुलं एकमेकांच्या कानात काहीतरी सांगत होती; पण कोणीच उत्तर देत नव्हते. त्यांच्यातल्या एकाने मान हलवून डोके खाजवायला जशी सुरुवात केली तसे सगळे हसायला लागले. पण त्यानेच हात वर केला आणि म्हणाला, ‘किती लाटा वगरे येतील ते दगडावर- म्हणजे दगडाच्या आकारावर, वजनावर अवलंबून असेल.’ सगळ्यांना ते उत्तर इतके आवडले, की त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अशी प्रस्तावना करून झाल्यावर मुलांना म्हटले, आता मी तुमच्या मनाच्या किंवा बुद्धीच्या तळ्यात एक दगड टाकणार आहे आणि तुम्हीच सांगितले आहे की, दगड टाकल्यावर तरंग लगेचच येतात पाण्यावर. त्यामुळे मी दगड टाकल्यावर जे काय तरंग उमटायचे ते एका क्षणात उमटले पाहिजेत. चला तर..

मुलामुलींची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती हे दिसतच होते. काही क्षण तसेच ताणलेले जाऊ दिले आणि अचानक एक शब्द उच्चारला- ‘शिक्षा.’

आणि त्याच क्षणी कितीतरी हात वर फेकले गेले. आणि जोडीला- चीत्कार. उत्तर देण्यासाठी अहमहमिका सुरू झाली. मग अगदी मागच्या बाजूला बसलेल्या मुलीला संधी दिली. आणि तिच्यानंतर एकेक करत अनेकांना. ‘शिक्षा’ नावाचा दगड टाकल्यावर क्षणात जे तरंग उमटले, ते असे होते- (१) शिक्षा केल्याने माणूस सुधारतोच असे नाही. (२) कधी कधी चूक एकाची, पण शिक्षा दुसऱ्यालाच होते. (३) अनेकदा चुकीच्या किंवा गुन्ह्य़ाच्या प्रमाणात शिक्षा होत नाही. (४) कधी कधी निसर्ग माणसाला शिक्षा करतो. (५) शिक्षा आपल्याला झाली की वाईट वाटते, पण दुसऱ्याला झाली तर वाईट नाही वाटत. कधी कधी तर आनंदच होतो. (६) काही जणांना शिक्षेची सवयच होते.

आता कुठे आम्ही हळूहळू नाटकाकडे येत होतो. ‘शिक्षा’ या शब्दाला इतके प्रतिसाद आल्यावर त्यांना म्हटले, आता आपण तुमचे सहा-सात जणांचे असे गट करणार आहोत. एकेका गटाने ‘शिक्षा’ या विषयावर एक नाटक एकमेकांमध्ये चर्चा करून तयार करायचे. ‘शिक्षा’ या विषयाचा तुम्हाला जाणवलेला अर्थ तुमच्या नाटकामधून प्रेक्षकांना समजला पाहिजे. म्हणजे तुम्ही तशी एक गोष्ट तयार करायची; पण ती गोष्ट सांगायची मात्र नाही. गोष्टीतून कोणता बोध वगरे घ्यावा, हे तर मुळीच सांगायचे नाही. तर नाटकामधूनच त्या गोष्टीचा अर्थ सहजच आम्हाला कळला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे गोष्ट तयार करून नाटक सादर करायला तुम्हाला फक्त वीस मिनिटे मिळणार आहेत. ‘शिक्षा’ या विषयावरची पाच-सहा नाटके तुम्ही करणार आहात.

ठरल्याप्रमाणे पाच-सहा गट तयार केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी कोंडाळे करून बसले. प्रत्येक गटामध्ये चर्चा सुरू झाली. विषयाचा त्यांनी निवडलेला अर्थ सुचवला जाईल अशी गोष्ट तयार करण्यात सगळे गुंतले. प्रत्येक गटात प्रत्येकालाच काहीबाही सुचत होते. पण माझेच म्हणणे खरे असे म्हणून चालणार नव्हते. कारण वीस मिनिटांत गोष्ट तयार करून ती पाच-सात-दहा मिनिटांच्या  नाटकामधून इतर गटांसमोर सादर करायची होती.

आम्ही त्यांना सांगितले नाही, पण सांघिक भावना रुजविण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. प्रत्येक गटापाशी जाऊन आम्ही अंदाज घेत होतो आणि त्यांच्या शंकांचे निरसनही करत होतो.

वीस मिनिटे पाहता पाहता संपली. त्या पाच-सहा गटांनी ‘शिक्षा’ या विषयावरचे आपापले नाटक तयार केले होते.

एक दिवस एका गटाला विषय दिला होता- अभ्यास. बाकीच्या गटांतली मुलेमुली आणि आम्ही काही जण प्रेक्षक. नाटक सुरू झाले. त्या मोकळ्या जागेत असलेल्या एका धोंडय़ावर एक जाडजूड मुलगा बसलेला. तो बाबा. आमच्यासमोर जमिनीवर एक लहान मुलगा पुस्तक घेऊन मोठमोठय़ाने कविता पाठ करण्याच्या मागे आहे. त्याच्या हातात खरे पुस्तक नाही. त्याचे बाबा डाफरतात, ‘‘बाळ्या, मी इथे वर्तमानपत्र वाचतो आहे, कळत नाही? थांबव तुझी ती कविता.’’ ‘‘पण बाबा, आज तोंडी परीक्षा आहे माझी.’’ त्यावर, ‘‘मला उलट उत्तर देतोस? आवाज कमी कर म्हणतो ना!’’ बाळ्या हलक्या आवाजात कविता म्हणत राहतो. इतक्यात तिथेच िभतीच्या कडेला उभी असलेली एक मुलगी तोंडानेच टेलिफोनची घंटा वाजवते. बाळ्या बाबांना म्हणतो, ‘‘बाबा, फोन.’’ त्यावर ‘‘अरे बाळ्या, मग बघ- कोणाचा टेलिफोन आहे तो!’’ ‘‘पण बाबा, माझी परीक्षा..’’ असे पुटपुटत बाळ्या फोन घेतो आणि सांगतो, ‘‘बाबा, आईला फोन आहे शरयूताईंचा.’’ बाबा त्याला सोडत नाहीत. ‘‘अरे, मग आत जा आणि सांग आईला- तिला फोन आला आहे ते.’’ बाळ्या नाखुशीने उठून आत (म्हणजे तिथेच जरा पलीकडे) जाऊन आईला निरोप देतो आणि येऊन पुन्हा कविता पाठ म्हणू लागतो. आई येते आणि मत्रिणीशी साडीच्या सेलबद्दल टेलिफोनवर बोलत राहते. साहजिकच बाळ्याचा आवाज चढतो, तर आई त्याला गप्प राहायला सांगते. टेलिफोन संपून आई आत जाते तेव्हा त्या लहान मुलाला हायसे वाटते आणि तो उत्साहाने कविता म्हणू लागतो. तर लहान भाऊ रडत येतो. बाबा पुन्हा ओरडतात, ‘‘अरे बाळ्या, तो रडतो आहे, त्याच्याकडे बघ जरा.’’ ‘‘पण बाबा, परीक्षा..’’ बाबा डोळे वटारतात. बाळ्या भावाला विचारतो, ‘‘अरे, काय झाले रडायला?’’ – त्यावर उत्तर येते, ‘‘कपिलदेव आऊट झाला!’’ ‘‘उद्या तो नाही आऊट होणार..’’ अशी त्याची समजून घालून बाळ्या कविता घेऊन बसतो, तर त्याची ताई येते आणि तिचा युनिफॉर्म इस्त्री करून आणायला सांगते. आता मात्र बाळ्या चिडतो आणि सरळ नकार देतो. त्यावर, ‘‘ठीक आहे, तुला माझी किंमतच नाही,’’ असे म्हणून ताई जायला निघते, तर बाळ्या नाइलाजाने युनिफॉर्म घेतो आणि इस्त्रीसाठी (तिथेच पलीकडे) देऊन पुन्हा बसतो. तेवढय़ात आई त्याला जेवायला बोलावते. आता मात्र ‘‘मी अजिबात येणार नाही; माझी कविता मी पाठ करतो आहे,’’ असे घसा खरवडून तो सांगतो. तर बाबा म्हणतात, ‘‘काय रे, एकदा आम्हाला, एकदा तुला असे तुझ्या आईने वाढायचे का? चल जेवायला म्हणतो ना!’’ – पुस्तक पालथे टाकून बाळ्या स्वयंपाकघरात जायला निघतो आणि बाबा त्याला म्हणतात, ‘‘बाळ्या, आज तोंडी परीक्षा आहे ना? ठीक आहे. आज तू रिक्षाने शाळेत जायचे. आणि हे घे दहा रुपये, आज शाळेच्या उपाहारगृहामधून विकत घेऊन काहीतरी खा. आणि हो, हे पसे वरती, कोल्ड िड्रक घेण्यासाठी! बघ, आम्ही काही कमी करतो का तुझ्यासाठी? मग? परीक्षेत उत्तम मार्क मिळाले पाहिजेत! काय?’’

जेवायला जाताना बाळ्याला एकाच वेळी टेलिफोनची घंटा, आईचे टेलिफोनवरचे बोलणे, भावाचे रडणे आणि ताईचे गुरकावणे ऐकू येऊ लागते आणि तो मटकन् खालीच बसतो. सुमारे सात-आठ मिनिटांचे ते नाटक संपले तेव्हा इतर गटांतल्या मुलामुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला.

त्यांच्या नाटकामधूनच त्यांच्या गोष्टीचा अर्थ कळून येत होता. दिग्दर्शकाने तो सांगण्याची गरज नव्हती. ती नाटके मुलामुलींच्या आई-वडिलांबद्दल काही म्हणत होती, गुरुजनांबद्दल काही सांगत होती, शेजाऱ्याविषयी काही बोलत होती. विशेष म्हणजे ती नाटके कुठे कुठे हसवतही होती. त्यांच्या नाटकातले स्थळ आणि वेळ त्यांच्या सोयीप्रमाणे ते बदलत होते. त्यांनीच ऐनवेळी तयार केलेले संवाद म्हणताना त्यांच्यातले कोणी कोणी मधूनच अडखळत होते किंवा चुकीच्या दिशेने ये-जा करत होते, बुजरेपणाने अगदी हलक्या आवाजात बोलत होते हे खरे; परंतु या टप्प्यावर त्याला अजिबातच महत्त्व नव्हते. महत्त्व होते याला, की ती सगळी मुले त्यांच्या स्वत:च्या आणि मित्रमत्रिणींच्या अनुभवांतून निर्माण केलेले असे खास त्यांचे नाटक आपल्या मित्र-मत्रिणींसमोर सादर करत होती. आणि हे सगळे छोटय़ाशा सभागृहात.. खुच्र्या, टेबले, बाके, स्टूल अशा जुजबी साहित्याच्या मदतीने. वेशभूषेसाठी भर होता तो टोप्या, दुपट्टे, शाली यावर. आणि रंगभूषा नव्हतीच.

एका गटाने त्यांना मिळालेल्या विषयावर नाटय़प्रयोग सादर केल्यानंतर इतर गट त्या प्रयोगाविषयी चर्चा करायचे. त्यावेळी एक ठरलेले होते, की नाटय़प्रयोगामध्ये काय आवडले, त्याबद्दल आधी बोलायचे आणि मग दोषांबद्दल. दुसरे असे ठरले होते, की जे दोष किरकोळ आहेत आणि जे लगेचच सुधारता येतील, त्याबद्दल बोलायचे नाही. म्हणजे कोणाचे एखादे वाक्य चुकलेले असते, कोणी चुकीच्या दिशेने आलेले असते, कोणी उगीचच हसलेले असते, वगरे. मराठी नाटय़समीक्षेमध्ये अधिककरून दोषच दाखवले जातात. आणि तेही मिशी पडली, एक दिवा उघडझाप करत होता, खांब हलत होता, असे किरकोळ दोष- हे  आमच्या अनुभवाचे होते. एक सुजाण प्रेक्षकही आम्ही घडवू म्हणत होतो.

असेल ओबडधोबड, नसेल सफाईदार; पण एक तर खरे होते की- ती ‘त्यांची’ रंगभूमी होती!

दहा वष्रे ‘जागर’ने पुण्यातल्या शालेय पातळीवर ‘त्यांच्या’ रंगभूमीचा हा उपक्रम केला. पाळंदेसरांनी त्याचे नामकरण केले.. ‘प्रसंग-नाटय़दर्शन.’ आज पुण्यामधील अनेक महाविद्यालयांमध्ये ‘प्रसंग-नाटय़दर्शन’ होत असते.

आमच्या या वाटचालीमध्ये आम्हाला अर्थातच आधार वाटत होता तो तेंडुलकर, रत्नाकर मतकरी आणि सई परांजपे यांचा. त्यांनी लहान मुलांचे भावविश्व नेमके जाणले होते. त्यांच्या नाटकांमध्ये अद्भुतरम्यता आहेच, पण मुलांच्या जगातले वास्तव अधोरेखित करण्यासाठी ती आलेली आहे. मतकरी आणि सई परांजपे यांनी तर त्यांच्या नाटकांचे प्रयोग मोठय़ा आकारमानाच्या नाटय़गृहामध्येही केले. शिवाय त्यांचे नाटय़प्रयोग नेपथ्य, वेशभूषा, संगीत यांची आवश्यक ती जोड दिलेले होते. नव्वदीच्या दशकात मुक्त अर्थव्यवस्था आपण स्वीकारली आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये आपण स्वत:ला झोकून दिले. परिणामी आपल्या मध्यमवर्गीयांच्या फक्त राहणीमानामध्येच बदल झाला असे नाही, तर जीवनशैलीमध्येही तो झाला. शालेय आणि महाविद्यालयीन मुलामुलींमध्ये आत्मविश्वास असलेला एक मोकळेपणा आला. मुलेमुली घरातल्यापेक्षा घराबाहेर त्यांच्या मित्रमत्रिणींच्या घोळक्यामध्ये आता त्यांचा वेळ घालवू लागले. कुठल्याही प्रकारचे सेलिब्रेशन करायचे तर कोणाच्या घरी, नाहीतर बाहेरच कुठेतरी करण्याचे जसे काही ठरूनच गेले. ‘सात वाजायच्या आत घरी’ हा दंडक तर मागेच पडला. आता रात्री-अपरात्रीही घरी परतले तरी कोणाचेच बिघडण्यासारखे राहिले नाही. एकमेकांना टाळ्या द्याव्या, एकमेकांचे केस ओढावे, आनंदाच्या भरामध्ये मित्राला आणि मत्रिणीला आलिंगन द्यावे, हवे तर एकमेकांचे कपडे एकमेकांना वापरण्यासाठी द्यावे- असे अगदी सहज आणि हक्काने होऊ लागले. मित्र आणि/ किंवा मत्रीण यापलीकडे जाऊन मत्र महत्त्वाचे होत गेले.

पुण्यामध्ये असा बदल प्रकर्षांने जाणवला- पुरुषोत्तम करंडक स्पध्रेमध्ये! तेंडुलकर, मतकरी यांच्याच काय, आळेकर, एलकुंचवार यांच्याही एकांकिका आता त्या स्पध्रेमध्ये दिसत नाहीत. महाविद्यालयीन मुलेमुली लिहिती झाली आहेत. इतकेच नाही, तर एरव्ही निषिद्ध म्हटल्या गेलेल्या विषयांवरदेखील ही मुलेमुली एकांकिका लिहीत आहेत. आजही प्रकर्षांने १९९८ हे वर्ष आठवते. त्या वर्षी तीन महाविद्यालयीन मुलींनी लिहिलेल्या एकांकिका त्यांच्या महाविद्यालयांनी सादर केल्या होत्या. पकी एक होती- विवाहबाह्य़ संबंध हा विषय असलेली.. ‘सी-सॉ’ नावाची. आणि त्या एकांकिकेमध्ये विवाहबाह्य़ संबंध पुरुषाचे नाही, तर घरातील विवाहित स्त्रीचे होते. त्याच वर्षी सादर झालेली ‘अर्धुक’ ही एकांकिका दोन मुलांमधील समिलगी संबंधांविषयी होती. तर तिसरी होती- ‘वाटा’! विचारपूर्वक स्वत:चे कार्यक्षेत्र ठरवू पाहणाऱ्या स्त्रीलाच वाटा रोखल्या जाण्याचा अनुभव का यावा, असा रोकडा प्रश्न ती एकांकिका विचारत होती. अनुक्रमे मधुराणी गोखले, अर्चना दीक्षित आणि विभावरी दीक्षित यांनी त्या एकांकिका लिहिल्या होत्या. आजची तरुण मुलेमुली रंगभूमीवर स्वत:ला व्यक्त करीत आहेत, एकमेकांमध्ये चर्चा करून त्यांच्या अनुभवानुसार आणि आकलनानुसार विविध विषयांवर नाटय़लेखन करीत आहेत.

िलगभेदामुळे मुलामुलींमध्ये रुतलेले गंड दूर करावेत, मुलामुलींची नाटके प्रौढ लेखक-लेखिकांनी न लिहिता त्या मुलामुलींनीच त्यांच्या अनुभवांना त्यांच्या भाषेमध्ये नाटय़रूप द्यावे असा फक्त दोन कलमी प्रस्ताव ‘जागर’चा होता. खूप वेळ त्यासाठी जावा लागला. पण ‘त्यांची’ म्हणावी अशी एक रंगभूमी उभी राहिल्याच्या खुणा आज कुठे कुठे दिसताहेत, हे खरे!