महापालिका शाळांमध्ये ‘असुविधांचा सुकाळ आणि विद्यार्थ्यांचा दुष्काळ’ अशी परिस्थिती असताना अकोल्यातील महानगरपालिकेची ‘शाळा क्रमांक २६’ मात्र अपवाद ठरली आहे. एके काळी ८० विद्याíथसंख्या असलेल्या या शाळेत आता ८०० विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाचे धडे गिरवतात. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या पाल्यांचा सर्वागीण शैक्षणिक विकास करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून एक लोकचळवळच निर्माण झाली. त्यातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन नव्याने घडले अन् महापालिकेच्या शाळेचं रूपडं पालटलं!
गेल्या काही वर्षांपासून खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. महापालिकांच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांसह नावीन्यपूर्ण शैक्षणिक बदल स्वीकारण्याची गरज असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. परिणामी खासगीचे आक्रमण रोखता येत नसल्याचा प्रत्यय अकोल्यातही आला. काही वर्षांपूर्वी नावारूपाला असलेल्या महापालिकेच्या शाळांना मागील १५ वर्षांपासून उतरती कळा लागली. खासगी शाळांकडून मिळणाऱ्या सुविधा आणि दर्जेदार शिक्षण याविरुद्ध महापालिका शाळांच्या पडक्या इमारती, शिक्षकांचे दुर्लक्ष, प्रशासनाची उदासीन भूमिका आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नसलेला ताळमेळ यांसारख्या विविध कारणांमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाटय़ाने रोडावली. परिणामी महापालिकांच्या शाळा अडचणीत आल्या. अकोल्यातील शिवसेना वसाहतीतील वीर भगतसिंग नगरातील ‘मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक २६’चे चित्र यापेक्षा काही नवीन नव्हते. शिवसेना वसाहत हा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांचे वास्तव्य असलेला परिसर. मोलमजुरी करून जीवन जगणारे लोक या भागात राहतात. घरात अठराविशे दारिद्रय़ असताना भरमसाट डोनेशन देऊन खासगी शाळांमध्ये मुलांना कसे शिकवायचे, हा गरीब पालकांपुढे पडलेला प्रश्न. शिक्षण घेण्यासाठी महापालिका शाळेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे महापालिकेचीच शाळा खासगी शाळांना तोडीस तोड करण्याचा निर्धार या परिसरातील नगरसेवक दिलीप देशमुख यांनी केला अन् १० वर्षांपूर्वी शाळेच्या प्रगतीला सुरुवात झाली.
शाळेमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा मार्ग वाटतो तेवढा सोपा नव्हता. मात्र, देशमुख आणि शाळेच्या कर्मचारीवर्गाने हे शिवधनुष्य पेलले. उतरती कळा लागलेल्या या शाळेत फक्त ८० विद्यार्थी शिक्षण घेत होते. परिसरात शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करून मुलांना शाळेत पाठवा, अशी पालकांना विनवणी करण्यापासूनची सुरुवात होती. शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीने कामाचा ‘श्री गणेश’ करण्यात आला. अवकळा आलेल्या शाळेत नवीन इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी, मैदान, शौचालय, बगिचा आदी मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. सर्व शिक्षा अभियान व लोकवर्गणीतून हे कार्य पार पडले. शाळेचे बाहय़रूप पालटल्याने पालक व विद्यार्थी या शाळेकडे वळू लागले. शाळेची पटसंख्या वाढून नववीपर्यंतचे एक-एक वर्ग नव्याने निर्माण होत गेले. कालांतराने या कार्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. शाळेला मदत करणाऱ्यांचे हात समोर येत गेले. त्यामुळे शाळेने यशाची नवनवीन शिखरे गाठण्यास सुरुवात केली.
मिशन २६
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी. आपले विद्यार्थीही स्पध्रेत टिकून राहण्यासाठी दहावीच्या परीक्षेची विशेष तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेण्याचे या शाळेत निश्चित करण्यात आले. त्यासाठी ‘मिशन २६’ आखण्यात आलं. मनपाच्या शाळेत २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षांत पहिल्यांदाच दहावीच्या तुकडीला परवानगी देण्यात आली. शाळेतील शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. परंतु, एकीकडे दहाव्या वर्गाच्या तुकडीला मंजुरी तर दुसरीकडे माध्यमिक शिक्षकांची अपुरी संख्या, यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊनच ‘मिशन २६’ अभियान रचण्यात आलं. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेतला. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनासह विविध सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकल्या. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन गुणवत्तेत अव्वल येणाऱ्या ९ मुलींच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था चांगल्या ठिकाणी करण्यात आली. या गरीब विद्यार्थ्यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता नि:स्वार्थपणे सेवा करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीचा हात मिळाला. दहावीतील विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक नियुक्त केले. त्याचबरोबर रविवारी, मंगळवारी आणि बुधवारी या विद्यार्थ्यांचे वर्ग खासगी शिकवणीच्या माध्यमातून घेण्यात आले. या अभियानामुळे विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात फायदा झाला आणि त्यांच्या गुणवत्तेतही वाढ झाली. वर्षभर दहावीच्या विद्यार्थ्यांना अनेक तज्ज्ञांनी शाळेत येऊन मार्गदर्शन केले. आता नववीत असणारे विद्यार्थी दहावीत जाणार आहेत. त्यांच्यासाठीही हे मिशन राबवले जात आहे. मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथमच दहावीची परीक्षा दिली आहे.
माजी विद्यार्थ्यांकडून धडे
नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी रविना मुंडे, दिव्या गावंडे, नेहा दही, दिव्या वरणकार आदी सुटीमध्ये शाळेतील उन्हाळी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य पार पाडत आहेत. आम्हाला शिकवण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात धावून आल्याने आता आम्ही इतर विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे मोठय़ा अभिमानाने त्या सांगतात.
पहिलीपासून सेमी इंग्लिश
शाळेतील मुले केजीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षणाचे धडे ‘सेमी इंग्लिश’ माध्यमातून गिरवत आहेत. गरीब कुटुंबांतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा नवीन मार्ग निर्माण झाला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे ग्रंथालय, प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांना सुलभ शिकता यावे, म्हणून ज्ञानरचना वर्ग साकारण्यात आले. शाळेत प्रसन्न वातावरण राहण्यासाठी फुला-झाडांनी भरलेला बगीचा तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे मैदान निर्माण करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही शाळेत राबविले जातात. खासगी शाळांनाही लाजवेल असा परिसर व दर्जेदार शैक्षणिक वातावरण महापालिकेच्या शाळा क्रमांक २६ मध्ये निर्माण झाले. आता परिसरातील खासगी शाळा ओस पडून महापालिकेच्या शाळेकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढू लागला.
पालकही समाधानी
उत्तम शिक्षण मिळत असल्याने परिसरातील पालकवर्गामध्येही समाधानाचे वातावरण असून, सामाजिक जाणीव जोपासणारी अशी शाळा कुठेही नाही, अशी भावना पालक महादेवराव खारोडे यांनी व्यक्त केली. वंचित घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचण्याचा नवीन मार्ग लोकचळवळीतून निर्माण झाला. त्यातून अनेकांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पडून त्यांचे जीवन नव्याने उजळले!

  • प्रबोध देशपांडे

 संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com