डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे केंद्र असलेली दादर येथील इमारत मोडकळीस आल्याने महापालिकेने ती एका रात्रीतून जमीनदोस्त केली. या घटनेने  वादंग उभे राहिले. बाबासाहेबांनीच स्थापन केलेल्या ‘दी बाँबे शेडय़ुल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट’चे विश्वस्त आणि बाबासाहेबांचे नातू  यांच्यात यावरून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. आंबेडकरी जनतेलाही वास्तव काय आहे ते कळत नव्हते. या पाश्र्वभूमीवर ‘आंबेडकर भवना’विषयी दोन्ही बाजूंची भूमिका स्पष्ट करणारे लेख..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीच्या उन्नतीसाठी एक केंद्र उभारायचं ठरविलं. त्यासाठी त्यांनी स्वकमाईच्या पैशातून अनेक जागा घेतल्या, त्यापैकी काही जागा शिल्लकराहिल्या आणि काही जागा इतरांनी ताब्यात घेतल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दामोदर हॉल, परळ येथून चळवळ चालवायला त्रास होत होता. कारण मुंबईत वारंवार हिंदू-मुस्लीम दंगली होत होत्या. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी ठरविले की, आता आपण स्वतंत्र जागा घेऊ आणि मग या चळवळीचे केंद्र त्यांनी दादर येथील गोकुळदास पास्ता रोडवर जेथे आंबेडकर भवन आहे, तेथे हलविले. १९४० साली त्यांनी दादर येथील गोकुळदास आणि पुरुषोत्तमदास यांच्याकडून ही जागा विकत घेतली व त्याचे ‘कन्व्हेयन्स डीड’ही केले. या जागेसाठी बाबासाहेबांनी स्वत:च्या बँक खात्यातून पैसे दिले होते. १९३८च्या दंगलीमध्ये दादर मुंबई अग्निशमन दलाच्या पाठीमागे असणारा भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा जाळण्यात आला. त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोकुळदास पास्ता रोडवर १९४४ साली विकत घेतलेल्या जागेत भारतभूषण प्रिंटिंग प्रेसची उभारणी केली. त्या प्रेसमधून ‘प्रबुद्ध भारत’, ‘जनता’ व छोटय़ा- छोटय़ा पुस्तिका छापल्या. दामोदर सभागृहावरून चळवळीचं केंद्र दादर येथील आंबेडकर भवन येथे हलविल्यानंतर याच भवनातून आंबेडकरी चळवळीच्या एका युगाला सुरुवात झाली.

Shiv Sena, Neelam Gorhe , Accuses Congress, Neelam Gorhe Accuses Congress, Undermining Ambedkar s Movement, election campaign, washim lok sabha seat,
नीलम गोऱ्हे म्हणतात,‘आंबेडकरी चळवळ संपविण्याचं काम…’
solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Ambedkari movement in the Bhil community Tribal woman and Dr Babasaheb Ambedkar
आदिवासी स्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दुसऱ्या जागतिक महायुद्धात हेच आंबेडकर भवन १८ महार बटालियन उभे करण्याचे केंद्र होते. दुसऱ्या महायुद्धात लोकशाही की हुकूमशाही हा वाद सुरू झाला होता. त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या बाजूने उभे राहण्याचे ठरविले. लोकशाहीच्या बाजूने उभे राहिल्यामुळे त्यांना काँग्रेसचा विरोध सहन करावा लागला. त्या वेळी लोकशाही हक्कांच्या लढय़ाचे केंद्र म्हणून हेच आंबेडकर भवन केंद्रस्थानी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जोरकसपणे १९४४ साली उपेक्षित वर्गाचा सामाजिक- आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केली. त्यासाठी त्यांनी ‘दी बॉम्बे शेडय़ुल्ड कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट’ स्थापन करून त्या जागेच्या वापराचा अधिकार ट्रस्टला देण्यात आला. भैयासाहेब ऊर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकरांनी आपल्या तारुण्यामध्ये सिमेंटचा कारखाना काढला होता आणि तो चालविला. तो कारखाना १९३५ मध्ये काढला आणि त्यात बाबासाहेब आणि भैयासाहेब हे भागीदार होते. भैयासाहेब या कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत कन्स्ट्रक्शनचे काम करीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९४२ ते १९४६ पर्यंत मजूरमंत्री होते. इतिहासकारांनी भैयासाहेबांवर खूप अन्याय केला आहे. इतिहासकारांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मजूरमंत्री असताना भैयासाहेबांना परत पाठविले असे नमूद केले आहे; पण त्यांना का परत पाठविले याचा शोध कोणीच घेतला नाही. त्या काळात भैयासाहेब हे अधिकृत सरकारी कॉन्ट्रॅक्टर होते. पित्यामुळे मुलाला सरकारी कामे मिळत आहेत, असे चित्र उभे राहायला नको म्हणून बाबासाहेबांनी भैयासाहेबांना परत पाठविले. गोकुळदास पास्ता रोड, दादर, मुंबई येथील जमीन, हिंदू कॉलनीतील राजगृह, रामगुंफा बिल्डिंग यांच्यामधील गुंतवणुकीतून बाबासाहेबांना आर्थिक चणचण भासायला लागली म्हणून सिमेंट फॅक्टरी विकण्यात आली. त्या पैशातून आंबेडकर भवन, राजगृह, रामगुंफा या जागांमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांची काँग्रेसी पाश्र्वभूमी लक्षात घेता खोटय़ानाटय़ा, बोगस पत्राचा आधार घेत अत्यंत खालच्या पातळीवरचे आरोप करायला त्यांनी सुरुवात केली आहे. अनेक लेखकांनी आणि चळवळीतील काही पुढाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भैयासाहेब आंबेडकर यांचे पटत नाही असेच चित्र उभे केले आहे. भैयासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब यांची खासगी पत्रे प्रकाशित करायची नाही, असे आम्ही एकंदरीत ठरविले होते. याचे कारण या पत्रातून अनेक बाबी जाहीर झाल्या असत्या, बाहेर आल्या असत्या. एक तर बाबासाहेब किंवा भैयासाहेब एकमेकाला लिहिताना टाइप पत्र कधीच लिहीत नव्हते. त्यांची पत्रे एकमेकाला पाठवीत असताना खासगी संदेशवाहकामार्फत  जात असत. उलट उत्तरामध्ये पत्रे ही जशास तशी मिळाली त्यांचाही उल्लेख होत असे. जनतेस माहिती व्हावी म्हणून त्याचा तोच उतारा येथे देत आहे.

“My dear Yeshwant, I have received your two letters sent through Channa Ram. There is no reason to route through him. Your letters always come to me without intercepting him.” (22nd December 1953 – 26 Alipore Road, Civil Lines, Delhi)

तेव्हा या दोघांमधले संबंध चांगले नव्हते, असे भासविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न जो सतत चालू आहे तो किती विपर्यास आणि तकलादू आहे यावरून आपणास सहज कळते.

मुळात हा वाद कुठला हेच कोणी लक्षात घेत नाही. हा प्रॉपर्टीचा वाद आहे की दृष्टीचा वाद आहे. प्रॉपर्टीचा वाद हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निकाली काढलेला आहे. दादर येथील आंबेडकर भवनमध्ये देशाच्या फाळणीनंतर काही निर्वासितांना कॅम्प करून राहण्याची परवानगी बाबासाहेबांनी दिली होती. त्यापैकी काही निर्वासितांनी दी बॉम्बे शेडय़ुल्ड कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या खोटय़ा भाडेपावत्या छापून आम्ही येथील भाडेकरू आहोत, असे ते म्हणत होते. स्मॉल कॉजेस (दिवाणी न्यायालय) कोर्टात टेनन्सीच्या केसेस दाखल केल्या होत्या. तो टेनन्सीचा केस नं. ४९२०/१९५४ डॉ. बी. आर. आंबेडकर विरुद्ध अवतार सिंग/ एस. श्रीराम. त्या केसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: साक्षीदार म्हणून उभे राहिले, त्यामध्ये त्यांनी साक्ष दिली. त्या साक्षीमध्ये ते म्हणतात, ‘‘हा प्रेस माझ्या मालकीचा आहे. मी ही जमीन विकत घेतली. मी काही लाभधारक नाही. ट्रस्ट स्थापन केला. खरेदी केलेली जागा ट्रस्टला दिली, परंतु प्रेस आणि तेथील जागा ही माझ्या मालकीची आहे. प्रेसमधून मला नगण्य उत्पन्न आहे.’’

(Case No. 1095/4920/ 1954 Dr. B. R. Ambedkar and Avtar Singh S. Shriram “At the time of agreement, it was an open piece of land. A printing press Bharat Bhusan Press is in the Building. The press is nobody’s private property. The press is no included in the Trust. I am legally the owner of press, not beneficially. There is hardly any income from the Press.”)

हे कोर्टात शपथेवर सांगितलेले खरे, की तोतया ट्रस्टी रत्नाकर गायकवाड यांनी बनावट पत्रांच्या आधारे केलेले विधान खरे. अनेक जणांना याची जाणीव नाही की, कोणीही म्युनिसिपल रेकॉर्ड आणि बेस्टचा रेकॉर्ड तपासला नाही. प्रेसच्या स्थापनेपासून प्रॉपर्टी टॅक्स, इलेक्ट्रिसिटीची बिले भैयासाहेब ऊर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या नावे आहे. अशा या वास्तूला गुंडांचा अड्डा म्हणणे व तेथील हा सर्व इतिहास नाकारणे हे फक्त अविवेकीच म्हणावे लागेल. मला माझ्या राजकीय वाटचालीसाठी टीव्ही आणि प्रिंट मीडिया यांची गरज नाही. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील नवजात नवश्रीमंत, पण कणा नसणाऱ्या अनेक जणांना राजकारणात उतरायचे आहे. अशांची चळवळीशी आणि विचारांशी कसलीही बांधिलकी नाही. त्यांना सत्ता, संपत्ती आणि स्वार्थ एवढेच दिसते. त्यांच्या या प्रयत्नात मी मोठा अडसर आहे आणि म्हणूनच ज्या दिवशी सामाजिक- राजकीय कार्यात पाऊल ठेवले त्या दिवसापासून माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न चालविला आहे.

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीची अनेक महत्त्वाची ठिकाणे ही सरकारी पैशाने बांधण्यात आली आहेत. चैत्यभूमी आणि आंबेडकर भवन ही दोनच अशी केंद्रे आहेत, की ज्यात सरकारचा पैसा नाही. जनतेच्या पैशातून उभी राहिलेली स्मारके आहेत. यांनाही बाटवायचे कसे याचा गेल्या अनेक वर्षांपासून पद्धतशीरपणे प्रयत्न चालला आहे. ज्यांना गुंड म्हणून संबोधलं जातंय, त्यांनी या दोन्ही वास्तूंचे सरकारीकरण होऊ दिले नाही. याचे शल्य अनेक जणांना आहे.

‘एफ’ या व्यक्तीच्या नावाने खोटा दस्तावेज तयार करण्याचे कारस्थान चालले आहे, तेव्हा ‘एफ’ या नावाने चारित्र्यहनन करण्याचाही प्रयत्न केला जाईल. व्यक्तिगत हल्ला आता येथे थांबेल असे वाटत नाही, तर तो आता ‘एफ’पर्यंत पोहोचेल. अनेक वर्षांपासून या संदर्भात पद्धतशीरपणे प्रयत्न चालले आहेत. मला कुणकुण लागल्यामुळे आणि विचारणा केल्यामुळे बाबासाहेबांनी आपलं ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक ‘एफ’ या व्यक्तीला अर्पण केले आहे, तेव्हा मग तुम्ही अजून काही उजेडात आणणार आहात का? सध्याच्या परिस्थितीमध्ये चारित्र्यहनन करणे हे साधन आहे. पाहायचं हे आहे की, यातून बाबासाहेब तरी वाचताहेत का?