नितीन गडकरी, नागपूर
राज्यातील युती शासनात सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून कामाचा सपाटा लावणारे भाजपचे नितीन गडकरी केंद्रीयमंत्री झाल्यावर त्याच गतीने कामे करतील, असे वाटत असताना गेल्या वर्षभरात एम्स, ksआयआयएम, स्कील सेंटर, अशा नव्या प्रकल्पांची फक्त घोषणा केली, कामे मात्र सुरू झालेली नाहीत.
महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पाबाबत प्रत्यक्षात काहीच हालचाली दिसत नाहीत. तेथे त्यांनी गृह आणि संरक्षण विभागाकडे असलेल्या जमिनी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.  भांडेवाडीत स्कील सेंटरच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. जेएनएनयूआरएमअंतर्गत शहरातील प्रकल्पांच्या निधीसाठी गडकरींनी प्रयत्न केले. पेंच-४ सारखा प्रकल्प त्यातून मार्गी लागला. मेट्रो रेल्वेसाठी काम सुरू केले आहे. शहरातील रस्त्यांच्या सिमेंटीकरणासाठी राज्य सरकारने ३०० कोटींची घोषणा केली तरी कामे सुरू झालेली नाहीत. पाचपावली पुलाचे नूतनीकरण, सीताबर्डी किल्ला खुला करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेशी संबंधित केंद्राच्या अनेक प्रकल्पांना गती दिली जात असून त्यात महत्त्वाचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. भांडेवाडी परिसरात ‘साई’ केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आश्वासनांचे काय झाले? – विलास मुत्तेमवार (काँग्रेस)
कोणत्याही लोकप्रतिनिधीने वर्षभरात काय केले, याचे मूल्यमापन करणे रास्त नाही. तेच गडकरींच्याही बाबतीत लागू आहे. मात्र त्यांनी निवडणुकीच्या वेळी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावू, शेतक ऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देऊ, अशी अनेक आश्वासने दिली होती. गेल्या वर्षभरात एकाही प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. स्वतंत्र विदर्भाची घोषणा करणारे गडकरी आता मात्र त्याबाबत ब्रसुद्धा काढत नाहीत.

उर्वरित चार वर्षांत शहराचा विकास करणार
उपराजधानीत अनेक नवीन प्रकल्प आणण्यात यश आले असून त्याचे कामही सुरू झाले आहे. कधी नव्हे, ते नागपूरसाठी जास्तीत जास्त निधी मिळवून दिला आहे. केलेल्या कामांवर समाधानी असून येत्या पाच वर्षांत मिहान, एम्स, आयआयएम या प्रकल्पांसह येत्या चार वर्षांत शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करू. शेतक री आत्महत्या थांबविण्यासाठी विदर्भात प्रयत्न सुरू आहे.

-राम भाकरे

प्रतिमा स्वच्छ, पण संपर्कात कमी
पक्षाशी एकनिष्ठ आणि स्वच्छ प्रतिमा ही खासदार अनिल शिरोळे यांची वैशिष्टय़े. ही दोन्ही वैशिष्टय़े सत्ता मिळाल्यानंतरही कायम राहिली असली आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी हाच अनुभव शिरोळे यांच्याबद्दल vv01येत असला, तरी सार्वजनिक संपर्काच्या बाबतीत मात्र वर्षभरात ते नक्कीच कमी पडले आहेत. शासकीय कार्यक्रमांमध्ये शिरोळे यांचा चांगला सहभाग वर्षभर दिसून आला; पण पुण्याचा खासदार ज्या पद्धतीने सार्वजनिक जीवनात रमला पाहिजे, कार्यकर्त्यांच्या गराडय़ात दिसला पाहिजे, त्याच्या कार्यालयात नागरिकांची- कार्यकर्त्यांची गर्दी असली पाहिजे.. अशा ज्या काही पुणेकरांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत त्या शिरोळे पूर्ण करू शकलेले नाहीत. पुणे मेट्रोचा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित प्रकल्पही अद्याप केंद्राकडून मार्गी लागलेला नाही.

पुण्यासाठीचा निधी आटला, प्रकल्प खोळंबले  – विश्वजित कदम, काँग्रेस</strong>
पुण्याच्या मेट्रोप्रश्नी विलंब लागतोय. पुण्याच्या विकास आराखडय़ावरही खासदारांचेलक्ष असायला हवे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थात मिशन (जेएनएनयूआरएम) अंतर्गत पुण्यासाठी निधी येणे बंद झाले आहे. त्यामुळे विकासाचा वेग कमी झाला आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेली वचने पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले आहे. अनेक प्रकल्पांना विलंब होत असल्याबाबत आवाज उठवला तरच केंद्र पुणेकरांकडे लक्ष देईल. राज्यातही त्यांचे सरकार आहे, तरी त्यांनी पुणेकरांच्या समस्यांबाबत साधे मुख्यमंत्र्यांकडेही शिष्टमंडळ नेले नाही.

समस्यामुक्त पुण्यासाठी प्रयत्न
पुण्याची स्मार्ट सिटीसाठी निवड, मेट्रो प्रकल्प, पीएमआरडीएची स्थापना, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्समधील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सध्याच्या विमानतळाला जादा मिळणार असलेली जागा, आदर्श ग्राम योजना अशा विषयांत प्रगती झालेली आहे. पुण्याला चांगले शहर करण्याचे अनेक प्रकल्पही मार्गी लागत आहेत.

-विनायक करमरकर