खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..

निरुपम यांच्यासमोर कडवे आव्हान!
एकेकाळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईत भाजपने आपले बस्तान बसवले त्यालाही आता बराच काळ लोटला. भाजपचे राम नाईक यांनी आमदार ते खासदार म्हणून केलेल्या कामगिरीमुळे भाजपला आपले स्थान भक्कम करण्यास मदत झाली. रेल्वेच्या प्रश्नांवरून आंदोलने करून भाजपने येथे चांगला जनाधार निर्माण केला होता. १९८९ पासून नाईक लागोपाठ पाच वेळा लोकसभेवर निवडून आले. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलियम आणि रेल्वे ही दोन महत्त्वाची खाती भूषविण्याची त्यांना संधी मिळाली. रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी मतदारसंघात प्रभाव पाडला. २००४च्या निवडणुकीत चित्रपट अभिनेता गोविंदा अहुजासारख्या राजकारणातील नवख्याने त्यांचा पराभव केला. २००९मध्ये मनसेला मिळालेल्या सुमारे दीड लाख मतांमुळे नाईक यांचे दिल्लीला जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. काँग्रेसचे संजय निरुपम हे सहा हजार मतांनी निवडून आले. गेल्या पाच वर्षांत निरुपम यांनी मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला. मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लीम अशी संमिश्र वस्ती असलेला हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने आतापासूनच प्रतिष्ठा पणाला लावली आहे. निवडणुकीच्या रिंगणातून निवृत्त होण्याची घोषणा राम नाईक यांनी केल्याने भाजपला नवा चेहरा शोधावा लागणार आहे. बोरिवलीचे आमदार गोपाळ शेट्टी यांचे नाव चर्चेत आहे. मोदी घटक आणि मतदारसंघातील गुजराती मतांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता यंदा काँग्रेसचे निरुपम यांना निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित.
लोकसभा मतदारसंघ : उत्तर मुंबई</strong>
विद्यमान खासदार : संजय निरुपम (काँग्रेस)
मागील निकाल :  राम नाईक (भाजप) पराभूत
जनसंपर्क
बोरिवलीमध्ये मुख्य कार्यालय असून, मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालये आहेत.
मतदारसंघातील कामगिरी :
*दोन हजार शौचालये, १७० बोअरवेल्स तसेच १५ उद्यानांची निर्मिती. ३५ बालभारती व समाज मंदिरे.  
*खासदार निधीतून जलवाहिन्या तसेच रस्त्यांची कामे. मतदारसंघातील ४५० सोसायटय़ांना मानिव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेन्स) करून देण्यास मदत.
*बोरिवली, कांदिवली, दहिसर व गोरेगाव या रेल्वे स्थानकांवर सुविधा निर्माण केल्या.
*संजय गांधी उद्यानातील २५ हजार झोपडीवासीयांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा. कांदिवली येथे जिल्हा सहनिबंधकांचे कार्यालय.
लोकसभेतील कामगिरी
एकूण प्रश्न – ३२५ (तारांकित ३३, अतारांकित २९२ चर्चेत ५६ वेळा सहभाग) उपस्थिती- ३०७ दिवस (३३८ दिवसांपैकी)
लोकसभेतील कामगिरी
*बोरिवलीतील जीवन विमा नगर वसाहतीमधील नागरिकांना सार्वजनिक सुविधा पुरवणे. मुंबई विमानतळावर जागा आणि पायाभूत सुविधांअभावी निर्माण होणारी कोंडी कमी करणे
*भारतीय वैद्यक परिषदेने केईएम रुग्णालयाला असंलग्न ठरवण्याचा मुद्दा उपस्थित केला
*उत्तर मुंबईत गोराई ते मनोरीदरम्यान सागरी सुरक्षा बळकट करणे. एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे
केवळ बोलघेवडा नाही
मतदारसंघातील दहिसर, बोरिवलीपासून थेट गोरेगावपर्यंत लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहापासून गृहनिर्माण सोसायटय़ांच्या कन्व्हेयन्सपर्यंत अनेक प्रश्न यशस्वीपणे सोडवले. प्रामुख्याने चांगले रस्ते, वाहतुकीचे प्रश्न तसेच पायाभूत सुविधांसाठी केलेल्या कामांची लोकांनी दखल घेतली आहे. रेल्वेच्या प्रश्नावर केवळ बोलघेवडेपणा न करता प्रत्येक रेल्वे स्थानकात थेट सुविधा निर्माण केल्यामुळे बोरिवली ते गोरेगावमधील लक्षावधी रेल्वे प्रवाशांना आज त्याचा लाभ मिळत आहे.
संजय निरुपम

निराशाजनक कामगिरी
खासदार म्हणून संजय निरुपम यांची कामगिरी निराशाजनक म्हणावी लागेल. मनसेमुळे केवळ अपघाताने निवडून आल्यानंतर लोकसभेतील त्यांचा सहभाग तसेच सभागृहातील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. उत्तर मुंबईचे प्रश्न मांडण्यात ते कमी पडले, एवढेच नव्हे तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. रेल्वे हा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न. पण त्यावर त्यांनी लोकसभेत फारसा आवाजही उठवलेला नाही.
राम नाईक, भाजप