खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारा मध्ये..
पुढील रविवारी
पालघर, वर्धा

अशोक चव्हाण यांची कसोटी !
नांदेड म्हणजे अशोक चव्हाण हे समीकरण तयार झाले. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोकररावांनी वर्चस्व निर्माण केले. २००९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. राज्याचे नेतृत्व येताच नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अशोकरावांना निवडणुकीत चांगलाच फायदेशीर ठरला. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून वेगळा प्रभाव पडतो आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला.
लोकसभा निवडणुकीत भास्करराव खतगावकर हे निवडून आले. त्यानंतर विधानसभा निवडणूक अशोकरावांच्या नेतृत्वाखाली झाल्याने जिल्ह्य़ातील नऊपैकी सहा ठिकाणी काँग्रेस, दोन मतदारसंघात राष्ट्रवादी तर एक अपक्ष निवडून आला. विरोधकांचा जिल्ह्य़ात पार सफाया झाला. ‘आदर्श’ घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद गेले असले तरी जिल्ह्य़ाच्या राजकारणावर प्रभाव राखण्यात त्यांना यश आले. राजकीय पुनर्वसनाची संधी चव्हाण हे शोधत आहेत. आगामी निवडणुकीत पुन्हा उमेदवारीकरिता खासदार खतगावकर हे शड्डू ठोकून बसले आहेत. पण अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता यांना उमेदवारी द्यावी, अशी चर्चा चव्हाण समर्थकांनी सुरू केली आहे. भाजपकडे तेवढा प्रबळ उमेदवार नाही. राज्याच्या राजकारणात प्रभाव कायम ठेवण्याकरिता नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे आव्हान आहे. उमेदवार कोणी असो, सामना अशोक चव्हाण विरुद्ध अन्य असाच रंगणार आहे.
लोकसभा मतदारसंघ :नांदेड
विद्यमान खासदार : भास्करराव पाटील खतगावकर (काँग्रेस)
मागील निकाल :  भाजपचे संभाजी पवार पराभूत.
जनसंपर्क
सुमारे ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात खतगावकर यांचा जनसंपर्क व्यापक म्हणता येईल असा आहे.
मतदारसंघातील कामगिरी :
*अनेक नव्या रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात यश.
*चांगल्या दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवेकरिता १७ मनोऱ्यांची उभारणी व २३ मनोरे प्रस्तावित.
*नांदेड शहरात पायाभूत सुविधांसाठी ‘जेएनएनयूआरएम’मध्ये सुमारे ७०० कोटी रुपये मंजूर.
लोकसभेतील कामगिरी
सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न ७८६ तारांकित ५३ अतारांकित ७३३, चार वेळा चर्चेत सहभाग.
एकूण हजेरी २६२ दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न
*गाडगीळ समितीच्या अहवालाचा फेरविचार करण्याबाबत विशेष उल्लेखाद्वारे चर्चा. ’रेल्वे अंदाजपत्रकावरील चर्चेत दोन वेळा सहभाग, लोकपालवरील चर्चेत भाग

निधीचा पाऊस
जिल्हय़ाचा विकास, गरीबांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडून कोटय़वधीचा निधी आणला. सीरआफ ८५ कोटी, पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजना ६० कोटी, इंदिरा आवास २१४ कोटी, नांदेड शहरात घरकुलांसाठी ७०० कोटी. मराठवाडय़ातील अन्य कोणत्या शहराला मिळाला नाही, एवढा निधी नांदेड जिल्हय़ात आला. त्यामुळे नांदेड शहराचा चेहरामोहरा बदलत आहे.
भास्करराव पाटील खतगावकर

मौनी खासदार
संसदीय कामकाज असो किंवा मतदारसंघातील कामे, या आघाडय़ांवर सर्व काही भकास दिसते. रेल्वे आंदोलनात त्यांना रेल्वे संघर्ष समितीच्या कुबडय़ा घ्याव्या लागल्या. आलेल्या निधीचे श्रेय त्यांचे नाही. रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेली गाडी त्यांना सुरू करता आली नाही. सुपरफास्ट ट्रेनचे काय झाले?
राम पाटील रातोळीकर, भाजप