खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी
येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..
पुढील रविवारी
औरंगाबाद, यवतमाळ

भाजप आणि राष्ट्रवादी दोघांची प्रतिष्ठा पणाला
नाशिक जिल्ह्य़ातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा संमिश्र दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी विजय पटकाविला. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर हे नाशिक मतदारसंघातून निवडून आले असले तरी भुजबळ यांचा येवला विधानसभा मतदारसंघ मात्र दिंडोरी मतदारसंघात समाविष्ट होतो. यामुळेच नाशिकबरोबरच दिंडोरी (राखीव) हा मतदारसंघ वास्तविक भुजबळ यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. पण भुजबळ यांचे सारे लक्ष नाशिककडेच असते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी भाजपचे चव्हाण यांच्या पथ्थ्यावर पडली होती. राष्ट्रवादीने दिंडोरीचे तत्कालीन आमदार नरहरी झिरवळ यांना उमेदवारी दिली, पण माजी मंत्री ए. टी. पवार हे रुसून बसल्याचा फटका राष्ट्रवादीला बसला होता. खासदार चव्हाण यांचा मतदारसंघातील जनसंपर्क हा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो. खासदार चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे. मध्यंतरी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्यासाठी पक्षाने चाचपणी केली. झिरवळ यांचा निभाव लागणे कठीण असल्याने माजी मंत्री ए. टी. पवार यांनाच िरगणात उतरविले जाईल, अशी चिन्हे आहेत. दिंडोरी मतदारसंघात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे ७५ हजारांपेक्षा जास्त हक्काचे मतदान आहे. नाशिक जिल्ह्य़ात मनसेने हातपाय पसरले आहेत. दिंडोरी मतदारसंघात मनसेने ताकद लावल्यास ते भाजपसाठी तापदायक ठरू शकते. यंदा राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेची करण्यावर भर दिल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे.
लोकसभा मतदारसंघ : दिंडोरी
विद्यमान खासदार : हरिश्चंद्र चव्हाण (भारतीय जनता पक्ष)
मागील निकाल :  राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांचा पराभव
जनसंपर्क
मतदारसंघात काही विशिष्ट भागात खासदारांकडून चांगला संपर्क राखला जातो. येवला, मनमाड, नांदगाव या भागात मात्र दीड ते दोन महिन्यांतून त्यांचे दर्शन होते. अधिवेशनाचा कालावधी वगळता दर सोमवारी ते हमखास सर्वाना भेटतात. परंतु त्यासाठी नागरिकांना मतदारसंघापासून लांब, नाशिक येथे त्यांच्या निवासस्थानी अथवा शासकीय विश्रामगृहात यावे लागते.
मतदारसंघातील कामगिरी :
*पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सुमारे २५० कोटींहून अधिकचा निधी मतदारसंघात आणला
*नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना निर्यातदारांकडून आर्थिक मदत
*मनमाड-नरडाणा रेल्वे मार्ग मंजुरीसाठी पाठपुरावा
*रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलन
*दुष्काळग्रस्त मनमाडकरांसाठी २६ हातपंपांची उपलब्धता
लोकसभेतील कामगिरी
*सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न: ७०६ (तारांकित ४२,
अतारांकित ६६४) एकूण आठ वेळा चर्चेत सहभाग
*एकूण हजेरी: २६५ दिवस (३१९ दिवसांपैकी)
सर्व घटकांच्या समस्या सोडविण्यावर भर
मनमाड-नरडाणा या प्रलंबित रेल्वेमार्गास मंजुरी, १५ रेल्वेगाडय़ांची थांब्याची वेळ वाढविणे, नाशिक-पेठ या राज्य मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात झालेला समावेश, युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करणाऱ्या उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल निर्यातदारांकडून मिळवून दिलेली भरपाई असे अनेक विषय पाठपुरावा करून मार्गी लावले. स्थानिक कृषीमाल थेट परदेशात पाठविण्यासाठी उपयुक्त ठरणारी कार्गो सेवा लवकर सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
खा. हरिश्चंद्र चव्हाण
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न
*रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग ल्लदिंडोरी मतदारसंघात भ्रमणध्वनी सेवा सुधारण्याबाबत चर्चा *कांद्याचा हमीभाव विशेषत: महाराष्ट्रात निश्चित करण्याची मागणी ल्लदिंडोरीमध्ये केवळ एकच टोल हवा, तसेच आदिवासी भागातून टोलवसुली थांबवणे ल्लदिंडोरीत रेल्वेसेवा सुधारणे, कन्याकुमारी एक्स्प्रेस नांदगाव, लासलगाव आणि निफाडला थांबवण्याची मागणी.

दावा तथ्यहीन
खा. चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणताही नवीन प्रकल्प वा योजना आणली नाही. बरीच कामे झाल्याचा दावा ते करीत असले तरी त्यात तथ्य नाही. निवडणुकीवेळी त्यांनी वारेमाप आश्वासने दिली होती. परंतु ती ते पूर्ण करू शकलेले नाहीत. अन्य मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधींनी केलेली कामे जशी ठसठशीतपणे दिसतात, तशी दिंडोरी मतदारसंघात जाणवत नाही.

नरहरी झिरवाळ