खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
उस्मानाबाद, हातकणंगले

रावेरमध्ये पुन्हा कमळच फुलणार?
जळगाव आणि रावेर हे जळगाव जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघ गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या ताब्यात होते. यंदा जिल्ह्य़ातील एक जागा काँग्रेसला सोडण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिले आहेत. रावेर स्वत:कडे ठेवून जळगाव काँग्रेसला सोडण्याची राष्ट्रवादीची योजना असली तरी काँग्रेसाचाही रावेर मतदारसंघावर डोळा आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेपूर्वी सध्याचा रावेर मतदारसंघाचा बहुतांशी भाग एरंडोल मतदारसंघात होता. भाजपचे एम. के. अण्णा पाटील प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेताना पकडले गेल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे वसंत मोरे निवडून आले. गेल्या निवडणुकीत रावेरमध्ये राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील यांनी चांगली लढत दिली. या वेळी जळगाव घरकूल योजना घोटाळ्यातील आरोपी व माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीमध्ये घाटत आहे. देवकर यांचा लाल दिवा कायम ठेवण्यात आला असता तर त्यांना लोकसभा लढविण्याकरिता ताकद मिळाली असती. पण देवकर यांचे राज्यमंत्रीपद काढून घेण्यात आले. ही जागा काँग्रेसला मिळेल या आशेवर एक वर्ष खासदारकी भूषविलेले डॉ. उल्हास पाटील हे लढण्याच्या तयारीत आहेत. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनाही लोकसभेचे वेध लागले आहेत. भाजपमध्ये हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मतदारसंघात असलेला चांगला संपर्क त्यांना फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची ताकद त्यांच्या मागे आहेच. सध्या तरी भाजपला अनुकूल तर राष्ट्रवादीला प्रतिकूल असे या मतदारसंघात वातावरण आहे.
लोकसभा मतदारसंघ : रावेर
विद्यमान खासदार : हरिभाऊ जावळे, भाजप
मागील निकाल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचा पराभव
जनसंपर्क
मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित असलेल्या हरिभाऊंचा जनसंपर्क दांडगा आहे. भुसावळ, भालोद, फैजपूर, रावेर येथे त्यांची संपर्क कार्यालये आहेतच, त्याशिवाय पक्षाच्या खासदार-आमदारांच्या कार्यालयांमध्येही त्यांच्याशी संपर्क होऊ शकतो.

मतदारसंघातील कामगिरी :
*महाकाय जलपुनर्भरण योजना केंद्राकडून मंजूर करून प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा
*जळगाव जिल्ह्य़ातील तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्राकडून निधी मिळविण्यात यश
*जळगाव विमानतळावर हवाई वाहतूक सुरू होण्यासाठी वारंवार पाठपुरावा
*जळगाव दूध संघ आणि राष्ट्रीय दूध डेअरी यांच्या विलीनीकरण प्रश्नावर आवाज उठविला.
*पिण्याच्या पाण्याच्या योजना, रस्ते, आदिवासींच्या विकास योजना, मधुकर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष या नात्याने प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती

लोकसभेतील कामगिरी
एकूण उपस्थित केलेले प्रश्न ३६४, तारांकित २४, अतारांकित ३४०, ५६ वेळा चर्चेत सहभाग. एकूण हजेरी २८० दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न
*सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करणे.
*जळगाव विमानतळावरून मुंबई, पुणे आणि दिल्लीला सेवा सुरू करणे.
*जळगावमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था सुरू करण्याची गरज.
*जळगावमध्ये इंदिरा आवास योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी देणे, स्वयंरोजगारासाठी निधी देण्याची मागणी.
सहकार प्रकल्पाची उभारणी नाही
जावळे यांच्या खासदारकीच्या काळात कोणताही सहकारी प्रकल्प जिल्ह्य़ात उभारण्यात आलेला नाही. केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले आहे. केंद्राच्या माध्यमातून सिंचन प्रकल्प उभारण्याची आवश्यकता होती. तेही त्यांना जमले नाही. अशा प्रकारे ते अनेक बाबतीत अपयशी ठरले आहेत.
अ‍ॅड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी

तलावांसाठी निधी मिळवला
महाराष्ट्रात तलाव किंवा बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळत असला तरी त्यांच्या दुरुस्तीची कोणतीही योजना नाही. त्यामुळे अनेक तलाव, बंधारे फुटले किंवा गळत असतानाही निधी मिळत नाही. या कामाकरिता केंद्राच्या जलसंधारण विभागाकडे पडून असलेला निधी महाराष्ट्राकडे वळता करून घेतला. ही सर्वात मोठी कामगिरी. जिल्ह्य़ातील तलावांच्या दुरुस्तीसाठी केंद्राचा निधी इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रथमच मिळाला.    
 हरिभाऊ  जावळे