खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई

काँग्रेस व सेनेत उमेदवारीवरूनच धुसफुस!
दादर, प्रभादेवी या परिसरातील मध्यमवर्ग, नायगाव-माटुंगा भागातील कामगार-श्रमिक वर्ग, पुढे धारावी, माहीम, शीव, चेंबूर, अणुशक्तीनगर असा झोपडपट्टय़ांनी गच्च भरलेला मतदारसंघ बहुभाषिक, बहुधार्मिक असा आहे. शिवसेनेने काबिज केलेला हा मतदारसंघ काँग्रेसने २००४ च्या निवडणुकीत आपल्याकडे खेचून आणला. याचे सारे श्रेय अर्थातच एकनाथ गायकवाड यांना द्यावे लागेल. गायकवाड यांना विरोधकांबरोबरच स्वकीयांशीही नेहमी सामना करावा लागतो. आताही त्यांच्या नावाला विरोध आहे. राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा डोळा या मतदारसंघावर आहे. धारावीवरून मुख्यमंत्री आणि गायकवाड यांच्यात मतभेद निर्माण झाले. या पाश्र्वभूमीवर मुणगेकर यांनी सुरू केलेल्या तयारीला वेगळी किनार असल्याचे मानले जाते. अर्थात गायकवाड यांच्या तुलनेत मुणगेकर यांचा कितपत निभाव लागेल याबाबत काँग्रेसमध्येच साशंकता आहे. दुसरीकडे शिवसेनेतही धुसफुस सुरू आहे. मनोहर जोशी हे पुन्हा गुम्डघ्याला बाशिंग लावून बसले होते. पण शिवसेना पक्षप्रमुखांनी राहुल शेवाळे यांचे नाव पुढे केल्याने मनोहरपंत रुसले आणि त्यांनी थेट उद्धव यांनाच लक्ष्य केले. मग शिवसैनिकांनी मनोहरपंतांना दसरा मेळाव्यात ‘दादर’ दाखविला. रामदास आठवले शिवसेनेबरोबर असल्याने यंदा ही बाब शिवसेनेसाठी जमेची ठरणार आहे. मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महायुती झाल्यास मनसेला हा मतदारसंघ द्यावा, असा भाजपचा प्रस्ताव होता. शिवसेना आणि मनसेत मतविभाजन झाल्यास त्याचा फायदा गतवेळप्रमाणेच काँग्रेसला होऊ शकतो.
लोकसभा मतदारसंघ : दक्षिण-मध्य मुंबई</span>
विद्यमान खासदार : एकनाथ गायकवाड (काँग्रेस)  
मागील निकाल :  सुरेश गंभीर, शिवसेना, पराभूत
जनसंपर्क
शीव येथे मुख्य जनसंपर्क कार्यालय. त्याशिवाय मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत जनसंपर्क कार्यालये. फुटपाथवरही भेटणारा खासदार म्हणून गायकवाड यांची ख्याती.
मतदारसंघातील कामगिरी :
*धारावी क्रीडासंकुल उभारणीत सहभाग.
*दादर येथील राजा शिवाजी विद्यालय, तसेच अन्य शाळांमध्ये संगणक लायब्ररी उभारण्यास मदत.
*मतदारसंघात ११५८ शौचालयांचे बांधकाम. १८८ शौचालयांची बांधकामे सुरू.
*समाज मंदिर, व्यायामशाळा, रंगमंच, अनेक रस्ते रुंदीकरणाची कामे मार्गी.
*नायगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनची उभारणी.
लोकसभेतील कामगिरी
उपस्थित केलेले एकूण प्रश्न – ९४०. तारांकित प्रश्न – ६४. अतारांकित प्रश्न – ८७६.  एकूण हजेरी – ३२५ दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेतील कामगिरी
*लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात पहिलाच प्रश्न विचारला तो इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाचा.  माध्यान्ह भोजनातील गैरव्यवहार दूर करून मुलांना सकस आहार देण्याची मागणी.
*गया येथील बोधीविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी.  राष्ट्रीय व राज्य महामार्गावर रुग्णवाहिका सेवा
सुरू करणे.
*एलपीजी गॅसचा कृत्रिम तुटवडा करणाऱ्यांवर कारवाई करणे.
स्मारकासाठी प्रयत्नशील
दादर येथील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. गोरगरिबांच्या जीवनमानात क्रांतिकारी बदल घडवून आणू पाहणारा पथदर्शी प्रकल्प म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही पाठपुरावा करण्यात येत आहे. लोकल वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील.
एकनाथ गायकवाड.

महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
खासदार एकनाथ गायकवाड यांनी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. शीव, चेंबूर, अणुशक्तीनगर या परिसरात आरसीएफ, एचपीसीएल व इतर तेल कंपन्या आहेत. परंतु येथील प्रदूषण नियंत्रणाबाबत गायकवाड यांनी काहीही केले नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरला आहे. ‘शिवाजी पार्कचा परिसर हेरिटेज’चा प्रश्न प्रलंबित आहे. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न दुर्लक्षित आहे. चेंबूर-अणुशक्ती नगर परिसरात मोठय़ा प्रमाणावर ‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पग्रस्तांसाठी इमारती बांधण्यात आल्या. परंतु त्यातील रहिवाशांना नागरी सुविधा मिळत नाहीत. गायकवाड यांनी त्यांच्या खासदार निधीचाही फारसा वापर केला नाही.
राहुल शेवाळे (शिवसेना)