खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई
    
‘मोदी घटका’वर सारी भिस्त
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भिवंडी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. गेल्या वेळी विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेसचे सुरेश टावरे यांना झाला आणि ते निवडून आले. खासदार म्हणून फारसा प्रभाव पाडण्यात ते यशस्वी झाले नाहीत. भिवंडी ते मुरबाडपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रभाव आहे. गेल्या वेळी कुणबी सेनेकडून लढलेल्या विश्वनाथ पाटील यांनी भिवंडी ग्रामीण आणि शहापूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. शहापूर, वाडा आणि मुरबाड परिसरातील कुणबी समाजाची मते लक्षात घेता विश्वनाथ पाटील हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पाटील आता काँग्रेसबरोबर असून, टावरे यांच्याऐवजी आपल्यालाच काँग्रेसने उमेदवारी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. काँग्रेसची सारी भिस्त ही भिवंडी शहरातील मुस्लिम मतांवर आहे. भिवंडीमध्ये समाजवादी पार्टीची चांगली ताकद असली तरी भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केल्याने लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचे विभाजन होणार नाही, असा काँग्रेसला आशावाद आहे. काँग्रेससाठी वाट बिकट असली तरी मोदी घटकामुळे सुमारे चार लाखांच्या आसपास असलेल्या मुस्लिम मतांचे धुव्रीकरण होईल यावरच काँग्रेसची सारी भिस्त आहे. भाजपची नेमकी उलटी भूमिका आहे. मोदी यांच्यामुळे भिवंडी वगळता बाकी सर्वत्र भाजपलाच मतदान होईल, असे भाजपचे गणित आहे.
लोकसभा मतदारसंघ : भिवंडी
विद्यमान खासदार : सुरेश टावरे, काँग्रेस
मागील निकाल :  भाजपचे जगन्नाथ पाटील यांचा पराभव.
जनसंपर्क
 भिवंडीतील गोपाळनगरमध्ये मुख्य जनसंपर्क कार्यालय. शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी भारत निर्माण अभियान सुरू.  
मतदारसंघातील कामगिरी :
*माणकोली-रांजणोली-वडपे पुलासाठी प्रयत्न.
*भिवंडी पालिकेत १७८ कोटीची भुयारी गटार योजनेच्या निधीसाठी प्रयत्न.
*१५० आदिवासी वाडय़ांवर वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.
*शेतकऱ्यांसंदर्भातील ३५ सेक्शनसाठी पाठपुरावा.
*जि.प.च्या पष्टेपाडा डिजीटल शाळेसाठी दीड लाखाचा निधी.
लोकसभेतील कामगिरी
उपस्थित केलेले एकूण प्रश्न १७७, तारांकित १२, अतारांकित १६५, १८ वेळा चर्चेत सहभाग
एकूण हजेरी २९२ दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेतील कामगिरी
*मतदारसंघातील अल्पसंख्य समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक प्रगतीसाठी पावले उचलण्याची गरज
*वन आणि कृषीजमीन ताब्यात घेताना त्यावर अवलंबून असणाऱ्यांचा विचार करुन त्याबाबतच्या कायद्यात सुधारणा करावी. भिवंडी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजसाठी राज्य सरकारला मदत द्यावी
*भिवंडी मतदार संघात मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज. भिवंडीतील हातमागधारक आणि यंत्रमागधारक तसेच या क्षेत्रातील असंघटीत कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले
जनता समाधानी आहे!
निवडून आल्यापासून आपल्या मतदारसंघात मी अनेक रस्ते, उड्डाण पूल, भुयारी गटार योजना, तरूणांसाठी व्यायाम शाळा, समाजमंदिरे उपलब्ध करून दिली. छ. शिवाजी टर्मिनस-चर्चगेट ते भिवंडी अशी रिंगरूट रेल्वे सेवा, वासिंदचा रेल्वे उड्डाणपूल, यंत्रमागधारकांची वीज थकबाकी माफ करणे, कल्याणमध्ये दुर्गाडीजवळ नवीन उड्डाण पूल उभारणे अशा विविध कामांसाठी मी प्रयत्नशील आहे. माझ्या कामावर जनता समाधानी आहे.  
सुरेश टावरे, खासदार

शंभर टक्के अपयशी!
भिवंडी मतदारसंघात शेतकरी, औद्योगिक कामगार, येथील उद्योजकांचे अनेक प्रश्न आहेत. रेल्वे प्रवासी, स्थानकांच्या अनेक समस्या आहेत. या प्रश्नाविषयी या खासदारांनी कधीच संसदेत आवाज उठविला नाही. खासदार म्हणून जी दैनंदिन कामे मतदारसंघात करणे आवश्यक होती, ती केलेली नाहीत. विकासकामांबाबत कधी संसदेत तोंड उघडल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे शंभर टक्के अपयशी ठरलेले हे मौनी खासदार आहेत.  
नरेंद्र पवार, भाजप जिल्हाध्यक्ष