संगीतकार आनंद मोडक यांनी अवीट चालीच्या गाण्यांनी मराठी संगीत क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटविला. लोकसंगीत आणि पाश्चात्त्य संगीताचा त्यांचा अभ्यास तर थक्क करणारा होता. चित्रपट असो वा नाटक, संगीतात नवनवे प्रयोग करण्याबाबत ते कायम आग्रही असत. परवा संगीतातील हे पर्व संपले. एका तरुण संगीतकाराने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..
मी शाळेत असतानाची गोष्ट. माझा मामा (दिग्दर्शक- दिलीप कोल्हटकर) त्याच्या एका मित्राला घेऊन घरी आला. प्रसन्न मुद्रा, काहीसा मिश्कील भाव, मोठे डोळे आणि दणदणीत पहाडी आवाज. त्यांची आणि मामाची नाटक, संगीत, सिनेमा या विषयांवर जोरदार चर्चा रंगली. अचानक मामा म्हणाला, ‘नरेंद्र, एखादं गाणं म्हणून दाखव याला. हा एक मोठा संगीतकार आहे.’ मी त्या वेळी हाफ चड्डीतला तोडकीमोडकी पेटी वाजवणारा आणि गाणारा एक शाळकरी मुलगा. संगीतातलं विशेष ज्ञान नाही. चारदोन गाणी पाठ केलेली त्यांना म्हणून दाखवली. ‘याला चांगला शिकू दे.’ माझ्या घरच्यांना यांनी सल्ला दिला. एवढीच आमची भेट. मला कुठं कल्पना होती की हा माणूस माझ्या आयुष्याचा एक भागच बनून जाणार आहे भविष्यात?
ही गोष्ट ८३-८४ सालातली. माझी आणि मोडक सरांची पहिली भेट. त्यानंतर १०-१२ वर्षे एखाद्या समारंभात, एखाद्या मैफिलीत आम्ही कधी कधी भेटत असू. पण एकत्र काम करण्याचा योग आला नाही. १९९६ साली पुण्यात ‘शिवरंजनी स्टुडिओज’ची स्थापना झाली आणि त्यांची माझी भेट वारंवार व्हायला लागली. आमच्या मित्रांनीच काढलेला स्टुडिओ. तोपर्यंत मोडक सर मुंबईला रेकॉर्डिग करत. पुण्यात स्टुडिओ सुरू झाला आहे म्हटल्यावर त्यांची रेकॉर्डिग खूप व्हायला लागली पुण्यात आणि माझ्या लक्षात यायला लागलं, हा माणूस वेगळा आहे. मनस्वीपणा म्हणजे काय हे तोपर्यंत नुसतं ऐकून होतो. त्याचा ढळढळीत आदर्श माझ्यासमोर मी बघितला. एखादी चाल शिकवताना किंवा एखादी सुरावट सांगताना, ते स्वत:ला झोकून द्यायचे. त्यांचा चेहरा विचित्र व्हायचा, त्यांचा मूळचा भसाडा आवाज अजूनच भसाडा व्हायचा. त्यांची देहबोली बदलायची. आजूबाजूच्या बऱ्याच लोकांना ते खूप विचित्र वाटायचं, त्यांची चेष्टा व्हायची, लोक हसायचे. पण सुदैवानं मला आणि त्यांच्या जवळच्या माणसांना देवानं एवढी समज दिली होती, की आम्हाला त्या सगळ्यातलं संगीत ऐकू येत होतं, जाणवत होतं आणि पुढे सगळं सोप होतं. त्यांनी काहीही म्हणून दाखवलं की मला त्यातले सूर ओळखीचे वाटू लागले, भाव कळायला लागले आणि मग मला वाटत, आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळायला हवी. त्या वेळी माझा ज्येष्ठ मित्र विवेक परांजपे त्यांच्यासोबत संगीत संयोजन करत असे. मी हळूहळू त्यांच्या रेकॉर्डिगमध्ये घुसायला लागलो.
स्वतंत्रपणे यशवंत देव, श्रीधर फडके यांच्यासोबत मी संगीत संयोजन करतच होतो, पण मोडकांसोबत काम करायची इच्छा स्वस्थ बसू देईना आणि एक दिवस मुंबईत माझं काही रेकॉर्डिग चालू असताना मोडक सरांचा फोन वाजला.  ते म्हणाले, की ‘मला एक पुणे विद्यापीठाकरिता गाणं करायचं आहे. विवेक नाहीये तर तू ते करशील का अरेंज?’ मी मिळेल त्या गाडीनं पुण्याला ताबडतोब त्यांच्या घरी. यमन रागातलं सुंदर गाणं. दोन दिवसांत काम संपलंसुद्धा. त्यांना माझं काम आवडलं आणि मग जो प्रवास सुरू झाला तो परवापर्यंत म्हणजे ते जायच्या अगदी आदल्या दिवसापर्यंत अखंडपणे सुरूच.
संगीतकलेला वाहून घेणं वगैरे गोष्टी या बऱ्यापैकी खोटय़ा, पुस्तकी किंवा अतिरंजित असतात असं माझं मत. पण मोडक सरांचा आणि माझा सहवास वाढला. त्यानंतर माझं मत पुरतं बदललं. खरोखरच या माणसाला दुसरं कशाचं भानच नाही. आपले कपडे, आपलं घर, आपलं बोलणं हे सगळं दुय्यम, संगीत हेच आयुष्य. सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या कॅसेट्स काढायच्या, त्या टेपरेकॉर्डरमध्ये टाकायच्या, परत काढायच्या, दुसऱ्या टाकायच्या. या सगळ्या क्रियांमध्ये प्रचंड धसमुसळेपणा, पाडापाडी. असं वाटायचं की पुढील १५ सेकंदांमध्ये एखादा स्वर कानावर पडला नाही तर यांचा श्वास गुदमरेल की काय? आणि व्यासंग तरी किती? मोझार्ट, बीटल्स, हॅरी बेलाफॉन्त, नॅट किंग कोल, फैंरूझ, किशोरी आमोणकर,  इक्बालबानो, यमुनाबाई वाईकर, कुमारजी किती तरी. त्या विविधतेला काही मर्यादाच नाही. एखाद्या जातिवंत खवय्याला जसं काहीही चालतं जेवायला तसं काहीही चालेल, पण सदैव टेपरेकॉर्डर चालूच. पुढे पुढे त्या कॅसेट्सची जागा यूटय़ूब नं घेतली एवढंच. संगीत दिग्दर्शक म्हणून मोडक सरांचा आलेख हा पण विस्मयचकित करणाराच. लहानपण सगळं अकोल्यात गेलं. सांस्कृतिक वातावरण तसं पुणे-मुंबईच्या मानानं बेताचंच. पण नोकरीनिमित्तानं पुण्यात आले आणि थिएटर अकादमीसारख्या ग्रुपमध्ये ‘घाशीराम’च्या निमित्तानं सांस्कृतिक विश्वात जे स्थिरावले ते कायमचेच. ४० वर्षांचा प्रवास. यात काय नाही केलं? घाशीराम, पडघम, महानिर्वाण, तीन पैशाचा तमाशा, अफलातून, बदकाचं गुपित, अलिबाबाची हीच गुहासारखी नाटकं, २२ जून, कळत नकळत, चौकट राजा, मुक्ता, एक होता विदूषक, हरिश्चंद्राची फॅक्टरी यांसारखे सिनेमे, चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदरे यांच्याबरोबर शब्दवेधनिर्मित ‘अमृतगाथा’, ‘प्रीतरंग’, ‘साजणवेळा’, ‘आख्यान तुकोबाराय’, ‘शेवंतीचे बन’ आणि आता चालू असलेला ‘आज या देशामध्ये’ हा कवितांचा कार्यक्रम. सतत संगीत. मला वाटायचं; मला कधी कधी संगीताचा कंटाळा येतो तसा यांना येत नाही? कधी तरी वेगळं करावंसं वाटत नाही? ही प्रचंड ऊर्जा येते कुठून यांच्यात? त्यांचं गाणं रेकॉर्ड करणं म्हणजे गायकाची परीक्षाच. कारण त्यांना जसं हवं तसं (म्हणजे तसंच) गायकाच्या गळ्यातून येईपर्यंत उसंत नाही. एकेका गाण्याचं डबिंग १०-१० तास चालूच, जेवणखाणही नाही. बरं काही गोष्टी तांत्रिकदृष्टय़ा दुरुस्त करता येतात. मी म्हणालो, एवढं आपल्याला करून घेता येईल, गायक थकायच्या आत डबिंग संपलं तर बरं. पण नाही, हे आपला हट्ट सोडणार नाहीत. रेकॉर्ड झालेली प्रत्येक गोष्ट परफेक्टच पाहिजे. बाकी वागण्यात, राहण्यात, अजिबात नसलेलं नेमकेपण हे इथं भरून निघत होतं. कधी कधी मलाच त्रास होत होता या सगळ्याचा. मग आमच्यात वाद व्हायचे. मी चिडायचो, ठरवायचो की काही दिवस तरी मोडकांचं काम करायचं नाही. पण ठरवतानाच माहीत असायचं की त्यांचा दोन दिवसांत फोन येणार. ‘नरेन’ अशी हाक येणार आणि मी हो म्हणणार. जे अस्सल होतं त्याच्यापासून किती दिवस लांब राहणार?
हा अस्सलपणा मोडक सरांनी शेवटपर्यंत जपला, जोपासला. तोच त्यांचा सगळ्यात मोठा गुण होता. पण दुर्दैवानं या अस्सलपणाचं तेज सहन करण्याची अजिबात क्षमता नसलेल्या दिग्दर्शकांनी-निर्मात्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे मोडक सरांना व्यावसायिक यश अगदी भरभरून मिळालं असं म्हणता येत नाही. याची कल्पना त्यांनाही होती. ते तसं बोलूनही दाखवत. म्हणूनच शेवटपर्यंत जवळजवळ ३५ र्वष त्यांनी प्रामाणिकपणे महाराष्ट्र बँकेत नोकरी केली आणि त्या भरवशावर असे अनेक सांगीतिक उपक्रम राबविले. ज्यामधून आर्थिक प्राप्तीवर मर्यादा होती, पण अशा काही कलाकृती निर्माण झाल्या ज्या अचंबित करणाऱ्या, अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करणाऱ्या होत्या. माझ्या मते कुठलीही कला ही एका दुचाकी रथासारखी असते. लोकाभिमुखतेचं एक चाक आणि प्रयोगशीलतेचं एक ही दोन्ही चाकं चालली तर कला पुढे जाणार. दोन्हींपैकी एकच चाक चाललं तर रथ जागच्या जागी गोल फिरतो. लोकाभिमुखतेचं चाक भले मोडक सरांनी फार पळवलं नसेल, पण प्रयोगशीलतेचं चाक त्यांनी शेवटपर्यंत पळवलं, एकहाती. एकनिष्ठतेनं. मराठी संगीतकला ही मोडक सरांची कायम ऋणी राहील.
याशिवाय मोडक सरांना एक खूप मोठं व्यसन होतं, बोलण्याचं. आणि त्याकरिता त्यांना सतत मित्र बरोबर लागत. मैत्रीचे बंध त्यांनी अनेकांबरोबर जोडले आणि प्राणापलीकडे जपले. रवींद्र साठे, अमर हळदीपूर, चंद्रकांत काळे, डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, चंद्रशेखर वैराळे किंवा संगीत क्षेत्रातील मी, राजू जावळकर, राजेंद्र दूरकर, संदीप कुलकर्णी, विवेक परांजपे यांच्यावर त्यांनी जिवापाड प्रेम केलं. गेली १६ र्वष दर दोन दिवसांनी त्यांच्या फोन ठरलेला. बोलण्यामध्ये एक स्वत:ची विनोदबुद्धी, ती भाषा फक्त त्यांचीच होती आणि त्यांच्याच तोंडी शोभत असे. सांगीतिक सूचना पण ते त्यांच्या खास ढंगामध्ये देत. एकदा मी त्यांना एका गायकाचं नाव सुचवलं, तर ते म्हणाले, ‘तो नको, त्याच्या खांद्यावर कलिंगड आहे.’ (म्हणजे त्याला डोकं नाही.) एकदा ते संदीप कुलकर्णीला म्हणाले, ‘तू बासरी घेऊन सुरावटीभोवती गस्त घाल.’ चांगल्या संगीतकारांना ते ‘रावण’ म्हणायचे. अशी किती तरी वाक्यं.  खाण्याचीसुद्धा प्रचंड आवड. विशेषत: मासे. ते मला म्हणायचे, मी मेल्यानंतर माझ्या तोंडात तुळशीपत्राऐवजी सुरमईचा तुकडा ठेवा. आम्ही दोघं एकत्रच फ्राय होऊ. काल त्यांच्याकडे बघताना मला हे सारखं आठवत होतं.
पण गेले काही दिवस ते थकले होते. जवळचे मित्र कविवर्य सुधीर मोघे गेल्यानंतर ते खूपच खचले. आम्ही मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या चित्रपटाचं काम करत होतो. मोघे आणि मोडक यांचं एकत्र काम असलं की आम्ही त्याला गमतीनं ‘मोमो प्रॉडक्शन’ असं म्हणायचो. पण हे दोघेही जण हे प्रॉडक्शन अर्धवट टाकून जातील असं कोणाला वाटलं असेल? काल मोडकांच्या घरी गेलो असताना घराच्या आतील बाजूस गेलो तेव्हा एका बाजूला त्यांचा देह आणि दुसऱ्या बाजूला त्यांची संगीताची खोली दिसत होती. याच ठिकाणी अनेक नाटकं वाचली गेली. अनेक गाण्यांना चाली लावल्या गेल्या. अनेक कलाकृती निर्माण झाल्या. पण या वेळेस ती खोली वेगळी दिसत होती. खोलीच्या मधोमध दिमाखात विराजमान झालेली हार्मोनियम. त्यावर एक नोटेशन स्टँड, त्यावर ‘आनंद मोडक’ नाव धारण केलेली लेटरहेड्स आणि सगळ्यात त्रास देणारी गोष्ट म्हणजे खोली पूर्णपणे आवरलेली. अस्ताव्यस्तपणाचा मागमूसही नाही. अचानक एका भयंकर शांततेनं मला घेरलं आणि त्यात ऐकू आले मोडक सरांचे स्वर. मी चमकून त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर तीच शांतता. गेल्या १६ वर्षांत कधीही न अनुभवलेली. त्या आवरलेल्या खोलीचं कोडं काही केल्या सुटत नाही. सुटू नये.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार