जागतिक आरोग्य संघटनेने १६ ते २२ नोव्हेंबर हा आठवडा ‘अँटिबायोटिक्स माहिती सप्ताह’ म्हणून जाहीर केला आहे. या सप्ताहाचे ब्रीदवाक्य आहे ‘अँटिबायोटिक्स- हँडल विथ केअर’ झटपट गुण आणणारा जादूई उपाय असा दृष्टिकोन ठेवत गरज नसतानाही अँटिबायोटिक्सचा वापर बेसुमार करण्याची वृत्ती आपण सर्वानीच ठेवली व त्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत. यापुढे मात्र आपणास अधिक दक्ष राहावे लागणार आहे.. आरोग्याच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या व गंभीर विषयाचा ऊहापोह..
२०११चा जागतिक आरोग्य दिन हा जंतूची बंडखोरी व अँटिबायोटिक्सच्या वाढत्या निष्प्रभतेला अधोरेखित करणारा होता. त्याचे ब्रीदवाक्यही मोठे बोलके होते. ‘No action today, no cure tomorrow’ आज जर पावले उचलली नाहीत तर जंतूसोबतची लढाई आपण हरणार आहोत, हा इशारा आरोग्य संघटनेने अशा रीतीने २०११ मध्येच दिला होता.
इतर सर्व औषधांपेक्षा अँटिबायोटिक्स हा औषधप्रकार मुळातच वेगळा. सूक्ष्म रोगजंतूंना (जिवाणू- बॅक्टेरिआ) मारण्याचे काम अँटिबायोटिक्सचे. पेनिसिलिनचा शोध व त्याचे औद्योगिक स्तरावर उत्पादन होण्यापूर्वी, म्हणजे १९४० पर्यंत आपल्याकडे रोगजंतूंविरुद्ध लढण्यासाठी कोणतेच अस्त्र नव्हते. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन (जंतुसंसर्ग)मुळे मृत्यू घडत होते. पण पेनिसिलिनपासून अँटिबायोटिक युग चालू झाले व जंतूंविरुद्धची लढाई आपण जिंकलो या विजयोन्मादात सर्वच संबंधित घटक राहिले. अँटिबायोटिक्सचा अति वापर व चुकीचा वापर घडत गेला व मग अँटिबायोटिक्स रेसिस्टन्स (प्रतिरोध) हा भस्मासुर आपणच निर्माण केला. इतर औषधे जेव्हा चुकीच्या पद्धतीने वापरली जातात तेव्हा संबंधित रुग्णाला गुण येत नाही किंवा दुष्परिणाम भोगावे लागतात, आजार बरा होत नाही, उलटतो. पण अँटिबायोटिक्सच्या बाबतीत हे सर्व तर होतेच पण याहून अधिक भयंकर काही तरी होत असते. चुकीच्या वापरामुळे जंतूंना अँटिबायोटिक्सची कामाची पद्धत ओळखण्याची संधी मिळते व त्या अँटिबायोटिक्सना चकवा देण्यासाठी मग ते स्मार्टपणे स्वत:ला बदलवतात. त्यांच्या नवीन पिढय़ा पूर्वी चुकीच्या पद्धतीने वापरलेल्या अँटिबायोटिक्सना मुळीच दाद देत नाहीत व ‘अँटिबायोटिक्स रेसिस्टन्स’ निर्माण होतो. औषध घेऊनही काही परिणाम होत नाही, बंडखोर जंतू लीलया वाढत राहतात. अशा इन्फेक्शनवर उपचार करणे एक आव्हान होऊन बसते. मग अशा वेळी अधिक पॉवरफुल अँटिबायोटिक्स वापरून बघायचे, त्यानेही परिणाम नाही झाला तर मग अजून पॉवरफुल अँटिबायोटिक्स वापरायचे. अशा प्रकारे भात्यातील एकेक अस्त्र वापरत जायचे. गेली काही दशके आपण आणि सारे जगच हेच करत आलो आहोत. पण या प्रक्रियेत जंतूंच्या काही जाती इतक्या प्रबळ झाल्या आहेत की, आपल्याकडील सर्वात प्रभावी अँटिबायोटिक्स ज्याला ‘last resort, high end’ अँटिबायोटिक म्हटले जाते. (उदा. कार्बापिनिम गट) तेही निष्प्रभ ठरत आहे. म्हणजेच आपण अशा स्थितीला आहोत की, काही रेसिस्टन्ट इन्फेक्शनसाठी आपल्याकडे उपचारांसाठी उपायच नाहीत व एका हतबल, हताश परिस्थितीकडे, थोडक्यात १९४० पूर्वीच्या प्री-अँटिबायोटिक्स युगाकडे आपली वाटचाल आहे.
अँटिबायोटिक्स रेसिस्टन्स ही जरी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्यामुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावर अँटिबायोटिक्स निकामी होणे व जिवाणू मोकाट सुटणे हे सर्व मानवनिर्मितच आहे. रुग्ण, डॉक्टर्स, फार्मसिस्ट, फार्मा कंपन्या, शासन व प्रशासन हे सर्व घटक या परिस्थितीस कारणीभूत आहेत. अँटिबायोटिक्सकडे जबाबदारीच्या दृष्टिकोनातून सर्वानीच बघणे आवश्यक आहे. एका रुग्णात निर्माण झालेले बंडखोर जंतू सहज इतरांमध्ये पसरतात व पूर्ण समाजातच त्यामुळे रेसिस्टन्ट इन्फेक्शन्स पसरतात. क्षयरोगाचे उदाहरण सर्वानाच सुपरिचित आहे. आज रेसिस्टंट टीनी ही भारतापुढील एक मोठी समस्या झाली आहे.
अँटिबायोटिक्स कोर्स जाणते व अजाणतेपणी अर्धवट सोडणे, साध्या सर्दीसाठी (जे विषाणूनिर्मित इन्फेक्शन आहे व त्यासाठी अँटिबायोटिक्सचा काहीही उपयोग होत नाही) व इतर किरकोळ आजारांसाठी स्वमनाने जाऊन ‘स्ट्राँग औषध’ म्हणून अँटिबायोटिक्स खरेदी करणे, फार्मसिस्टनी प्रिस्क्रिप्शनशिवाय काऊंटरवर अँटिबायोटिक्सची विक्री करणे, डॉक्टरांनी नको इतका अँटिबायोटिक्सचा मारा रुग्णांवर करणे, गरज नसेल तेव्हाही अधिक पॉवरफुल अँटिबायोटिक वापरणे, प्रशासनाने औषधविषयक कायद्यांची कडक अंमलबजावणी न करणे, हॉस्पिटल्समध्ये ‘इन्फेक्शन कंट्रोल’चे पथ्य न पाळणे अशा अनेक चुकीच्या बाबी सर्रास घडत आहेत. दिल्लीमध्ये ‘सुपरबग्स’ मिळाल्याच्या बातमीनंतर शासनाने काही हालचाली चालू केल्या होत्या व ‘नॅशनल अँटिबायोटिक पॉलिसी’च्या दृष्टीने काही पावले उचलली होती. पण त्याबाबत म्हणावी तशी प्रगती काही दिसत नाही.
ज्या देशांनी याबाबत कडक धोरणे अमलात आणली आहेत त्या देशांमध्ये काही प्रमाणात रेसिस्टन्सला आळा बसत आहे, असे जागतिक अँटिबायोटिक रिपोर्ट २०१५ दर्शवतो. म्हणजे प्रयत्न केले तर आपण अँटिबायोटिक्सना वाचवू शकू अशी उमेद ठेवता येईल हे काही देशांच्या उदाहरणावरून दिसते. पण याच रिपोर्टमधील भारतातील पाहणीचे निष्कर्ष अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत. ई-कोलाय, क्लेबसिएला न्यूमोनिया, एंटरोबॅक्टर अशा काही जंतूंनी जवळजवळ सर्वच अँटिबायोटिक्सना दाद न देणाऱ्या प्रजाती बनवल्या आहेत. जितक्या अँटिबायोटिक्सचा वापर जास्त, तेवढी रेसिस्टन्ट जंतूंची निर्माण होण्याची शक्यता अधिक. भारतात अँटिबायोटिक्सचा वापर सातत्याने वाढत आहे व मागील दशकापेक्षा जवळजवळ ३०% जास्त तो या दशकात आहे.
गंमत म्हणजे नोबेल पारितोषिक स्वीकारतानाच सर अलेक्झांडर फ्लेमिंगने अँटिबायोटिक्सचा चुकीचा वापर रेसिस्टन्स निर्माण करू शकतो याची जाणीव दिली होती. ‘वापरायचे ना अँटिबायोटिक्स तर शहाणपणानेच वापरा’ असे कडकपणे बजावलेही होते. पण ते काही कोणी मनावर घेतले नाही. झटपट गुण आणणारा जादूई उपाय असा दृष्टिकोन ठेवत गरज नसतानाही अँटिबायोटिक्सचा वापर बेसुमार करण्याची वृत्ती आपण सर्वानीच ठेवली व त्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत. हे रोखले नाही तर पुढच्या पिढीसाठी कदाचित प्रभावी अँटिबायोटिक्स उरणारच नाहीत.
१९८० पासून पूर्णपणे नवीन अशा अँटिबायोटिक्सची निर्मितीही जवळजवळ झालेलीच नाही. परिस्थिती अधिक बिकट करण्यास ही बाबही कारणीभूत आहे.
मुळात अँटिबायोटिक्सचा वापर कमी करायला लागावा यासाठी जंतुसंसर्ग रोखण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. साबण, पाण्याने हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता, लसीकरण, शुद्ध पाणी, सांडपाण्याची योग्य व्यवस्था असे विविध पातळ्यांवरचे सर्वश्रुत उपाय यासाठी अमलात आणणे जरुरीचे आहे.
एकंदर जंतूंविरुद्धची लढाई हे फार मोठे आव्हान आहे. या सूक्ष्मजीवांनी बुद्धिमान मानवाला जेरीस आणले आहे हे नक्की. सर्व घटकांनी त्वरेने, गांभीर्याने एकत्रितपणे ही लढाई लढणे आपल्या हिताचे होईल. या जंतूंविरुद्धच्या महायुद्धात रुग्णांची/ ग्राहकांची भूमिका काय असावी? थोडक्यात महत्त्वाचे.
१अँटिबायोटिक्स ही जिवाणू (bacteria) निर्मित इन्फेक्शनविरुद्ध काम करतात. ही प्रिस्क्रिप्शन औषधे (शेडय़ूल एच व एचवन) व केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती घ्यावीत.
२अँटिबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करणे, जरी त्याआधीच बरे वाटू लागले तरीही आवश्यक. वेळच्या वेळी डोस घेणे व डोस न चुकवणे महत्त्वाचे.
३सर्दी, किरकोळ आजार यासाठी फार्मसीमध्ये जाऊन अँटिबायोटिक्स मागू नयेत व ‘स्ट्राँग’ औषध द्या, असा दबाव डॉक्टरांवरही आणू नये.
४डॉक्टरांकडून निघताना आपल्याला अँटिबायोटिक दिले आहे का, असल्यास ते नेमके कोणते, त्याचा कोर्स कसा हे नीट जाणून घेणे आवश्यक आहे व याच बाबतीत फार्मसिस्टचा सल्ला घेणेही जरुरीचे आहे. उरलेसुरले अँटिबायोटिक्स घरात ठेवून नंतर कधी तरी स्वमनाने वापरणे चुकीचे आहे.
अजिंक्य मी, अमर्त्य मी..

का य दिवस होते ते! माझे पूर्वज बघता बघता काही तासांतच गारद व्हायचे. नुसते सळो की पळे करून सोडले आम्हाला त्या फ्लेमिंगसाहेबांनी व त्यांच्या मित्रांनी. काही तरी पेनिसिलिन नावाचे बनवले होते म्हणे, तेसुद्धा आमच्याच दूरच्या नातलगांपासून, अहो म्हणजे बुरशीपासून. कमाल आहे ना! तर या अस्त्राचे अँटिबायोटिक असे नामकरण केले गेले. आमच्या ‘अँटी’च होते ते व मग कलियुगच चालू झाले आमच्यासाठी. फ्लेमिंग आमचे व्हिलन ठरले. त्याआधी आमचे काय साम्राज्य होते सांगू! आम्ही व आमचे नातलग (जिवाणू-विषाणू) सर्वत्र झटपट पसरायचे व ‘साथ आली, साथ आली’ अशी दहशत होती आमची. अगदी जगज्जेत्या नेपोलिअनचे सैन्यही आम्ही अशा साथीने गारद केले होते हो. तुम्हा माणसांकडे काही म्हणजे काही उपाय नव्हता आम्हाला रोखण्याचा. हे अर्निबध राज्य आमचे १९४० पर्यंत चालले. मात्र नंतर पेनिसिलिन आले व आमचे कर्दनकाळ ठरले. त्यानंतर आमच्या विरुद्धच्या कारवायांना इतकी गती आली. टेट्रासायक्लिन, स्ट्रेप्टोमायसिन, रायफाम्पिसिन, अ‍ॅम्पिसिलिन, इरिथ्रोमायसिन, सिप्रोफ्लोक्सासिन, सेफिक्झाईम आणि अशा अनेक अँटिबायोटिक्सची फलटणच तयार झाली. हा हल्ला परतवण्याचे आमचे प्रयत्न चालू होते. पण तसे सोपे नव्हते ते. हार-जीत दोन्ही चालू होते. आमच्यातील काही जण मुळातच जरा बंडखोर वृत्तीचे. ते अँटिबायोटिक्सची चव चाखायचे. बंडखोर पिढय़ा तयार करायचे. असं करत करत काही अँटिबायोटिक्सना नामोहरम केले होते आम्ही.. आमचे प्रयत्न अव्याहत चालू होते आणि इतक्या वर्षांनुवर्षांच्या प्रयत्नांचे फळ आज आम्हाला मिळत आहे. आज मी, एक बंडखोर इ-कोलाय (E-coli) तुमच्याशी बोलतोय ना, तुम्हाला छातीठोकपणे सांगतो. आता तुमची कोणतीही अँटिबायोटिक्स, गोळ्या, इंजेक्शने मला काहीही करू शकणार नाहीत. मी तुमची सर्व अँटिबायोटिक्स पेनिसिलिन ते सिप्रो ते मोरे.. यांना पुरून उरलो आहे. अशा बंडखोर प्रजातीचे मी भराभर उत्पादन करणारच. खरं सांगू का, या माझ्या यशात जसे माझे प्रयत्न आहेत ना त्यापेक्षा फार मोलाची साथ तुमची मिळाली. प्रयत्नांना जोड नशिबाची! कारण तुम्ही मानव जेवढे बुद्धिमान ना, तेवढय़ाच मोठय़ा मोठय़ा चुका करता तुम्ही. अँटिबायोटिक्सचा हव्यास तुम्ही केला, ऊठसूट वापर, कित्ती वेळा गरज नसताना वापरलेत तुम्ही अँटिबायोटिक्स आमच्याविरुद्ध. पुन्हा अर्धवटपणे घेऊन आम्हाला संधी दिलीत जगण्याची. विजिगीषू वृत्तीचे आम्ही, प्रत्येक संधीचा फायदा उठवत गेलो. धन्यवाद तुम्हाला. आज सारे जग माझ्यासारख्या बंडखोरांनी हादरून गेले आहे. मोठय़ा मोठय़ा परिषदा माझ्यासाठी भरत आहेत. लोक चिंतातुर आहेत. मला खूप हसू येते, कीवही येते तुमची. असो. तुम्हाला शुभेच्छा! माझ्यासोबतच्या लढाईत.
– एक बंडखोर जिवाणू

 

symghar @yahoo.com