कादंबरी, समीक्षा आदी साहित्य क्षेत्रात भालचंद्र नेमाडे यांनी नवे व मूलभूत स्वरूपाचे कार्य केले व त्याद्वारे मराठी साहित्याला नवे वळण व परिमाण दिले. नेमाडे हे केवळ अपरिचित अशा जीवनाचे चित्रण करणाऱ्या आशयावर संतुष्ट होणारे कादंबरीकार नाहीत, तर कादंबरीने सौंेदर्यात्मक रूपाचीही निर्मिती केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह कायम असतो.
सन्मानाची समृद्ध अडगळ
राजकारणाला न जुमानता नेमाडेंना ज्ञानपीठ
‘आता कविता लेखन करणार’!
कोसला ते हिंदू व्हाया देशीवाद
ज्ञानपीठ म्हणजे काय रे भाऊ?
विशेष संपादकीय – तुकारामांच्या मराठीचा गौरव!
प्रतिभावंत कादंबरीकार, समीक्षक आणि कवी भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला, ही अलीकडच्या काळातील साहित्य जगतातील सर्वोच्च आनंदाची, अभिमानाची घटना आहे. कादंबरी, समीक्षा आदी साहित्य क्षेत्रात नेमाडे यांनी नवे व मूलभूत स्वरूपाचे कार्य केले व त्याद्वारे मराठी साहित्याला नवे वळण व परिमाण दिले. त्यांनी कमी का असेना श्रेष्ठ दर्जाची कविता लिहिली आहे. कारण शब्दाला सर्जनाचे नवे सामथ्र्य प्राप्त करून देणारा कविता हा साहित्य प्रकार आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांनी आपल्या समीक्षात्मक लेखनाद्वारे समीक्षकांच्या व वाचकांच्याही वाङ्मयाविषयी रूढ कल्पनांना धक्का देऊन साहित्याबद्दल पुनर्विचार करायला लावला आहे. समीक्षक म्हणून नेमाडे यांची थोरवी किती मोठी आहे, हे फ्रेंच साहित्य समीक्षक जॉन पेरी जॉन ऑलिव्हर यांनी सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेल्या देशीवाद या संकल्पनेचा प्रभाव केवळ मराठी साहित्यावरच नव्हे तर भारतीय साहित्यावरही पडला आहे. नेमाडे यांच्या देशीवादाच्या संकल्पनेत लेखकाने आपल्या संस्कृतीत, आपल्या भूप्रदेशात नीट उभे राहून लेखन करणे महत्त्वाचे आहे. असेच लेखन साहित्यनिर्मितीला सकसता देत असते. म्हणून आयात केलेल्या परदेशी साहित्य संकल्पनांना महत्त्व न देता लेखकाने लिहिले पाहिजे. नेमाडे यांच्या या प्रतिपादनाचा मराठी साहित्यावर विशेषत: ग्रामीण भागातील तरुण लेखकवर्गावर प्रभाव पडलेला दिसतो. अलीकडच्या काळातील ग्रामीण भागातील लेखकांना प्रेरणा व आत्मविश्वास देण्याचे मोठेच काम नेमाडे यांच्या देशीवादाच्या संकल्पनेने साधले आहे.  
कविता, समीक्षा या क्षेत्रांतील नेमाडे यांचे साहित्यविषयक कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचे असले तरी सर्वसामान्य वाचकांच्या मनात नेमाडे यांची कादंबरीकार म्हणून कोणती मौलिक वैशिष्टय़े आहेत, हे आपण थोडक्यात ध्यानात घेऊ. नेमाडे यांच्या कादंबरी लेखनाबाबत एक गमतीदार विरोधाभास दिसून येतो. काही वर्षांपूर्वी एका प्रकाशकाने वाचकांच्या दृष्टीने लोकप्रिय मराठी कादंबरी कोणती, याबाबत आयोजित केलेल्या सर्वेक्षणात खांडेकरांची ‘ययाति’ व नेमाडे यांची ‘कोसला’ असा कौल दिला होता. मात्र नेमाडे यांच्या ‘कोसला’सह कोणत्याही कादंबरीचे समीक्षकांनी यथायोग्य स्वागत केलेले दिसतच नाही. उलट, त्यांच्या कादंबरीत, कादंबरी म्हणून कोणता उणेपणा आहे, हे दाखविण्याचाच कल दिसतो. समीक्षक व वाचक यांच्यामध्ये एक प्रकारचे शीतयुद्ध चालले असून तिच्यात अभिरुची संघर्ष आढळून येतो. थेट १९६३ साली प्रकाशित झालेल्या ‘कोसला’ या त्यांच्या कादंबरीपासून ते अलीकडे प्रकाशित झालेल्या ‘हिंदू’ कादंबरीबद्दल तो दिसून येतो. समीक्षक रूढ, पांढरपेशा अभिरुचीला महत्त्व देतात व सर्वसामान्य वाचक त्यांच्या कादंबरीच्या आंतरिक गुणवत्तेचे आकलन करतात, असे दिसून येईल.
कोसला या कादंबरीने मराठी कादंबरी विश्व ढवळून काढले. आशय, व्यक्तिचित्रण, निवेदनतंत्र आणि भाषाशैली या कादंबरीच्या प्रत्येक अंगामध्ये नेमाडे यांनी सांकेतिक रूढ अभिरुचीला जोरदार धक्का देण्याचे कार्य केले. सामान्यत: कोसलाआधीच्या मराठी कादंबरीतील नायक हा ‘हिरो’ असायचा. मात्र त्याचे वीरत्व अथवा पराक्रम हे वरपांगी स्वरूपाचे असायचे. नेमाडे यांनी असल्या ‘हिरो’ला आपल्या कादंबरीत मज्जाव करून ‘अ‍ॅन्टि-हिरो’ वाटावा, असा सर्वसामान्य नायक निर्माण केला. तोपर्यंतच्या मराठी कादंबरीत नायक-नायिका यांच्यातील प्रेमचित्रण हाच मुख्य आशय असायचा. त्यातच नायकाचा पराक्रम. पण नेमाडे यांच्या कादंबरीतील पांडुरंग सांगवीकर हा ‘प्रतिनायक’ (अ‍ॅन्टि-हिरो) म्हणतो की, सहलीला गेल्यानंतर आपण जर नीट सावध राहिलो तर मुलींपासून आपला बचाव करता येतो. कॉलेजचे शिक्षण घेणारा पांडुरंग सांगवीकर चित्रित करताना नेमाडे यांनी केवळ  आपल्या शैक्षणिक पद्धतीतला पोकळपणा चित्रित केला असे नव्हे तर जीवनाच्या इतर अंगातही असलेला सच्चेपणाचा अभाव त्यांनी दाखविला. निवेदनासाठी विविध तंत्रे वापरली व भाषा ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तोंडची वाटावी अशी अनौपचारिक स्वरूपाची उपयोगात आणली. हे सगळे करून जीवनाबद्दलचा गंभीर विचार, सखोल चिंतन त्यांनी कादंबरीत दाखविले व रूढ स्वरूपाच्या कादंबरी लेखनातून कादंबरी लेखनाला जोरदार धक्का देऊन नवी अभिरुची निर्माण केली.
बिढार, जरीला, हूल व झूल या कादंबरी चतुष्टय़ातून त्यांनी आपल्या शैक्षणिक तसेच सामाजिक जीवनाचे अंतर्भेदी चित्रण करून वाचकांना अंतर्मुख करायला लावले. नेमाडे यांच्या मते, कादंबरीने वाचकांना अस्वस्थ केले पाहिजे. (आधीचे कादंबरीकार वाचकांना खूश करीत असत!) शिवाय कादंबरीकाराच्या कृतीने समाजाची इंचभर का होईना, प्रगती झाली पाहिजे, या भूमिकेतून नेमाडे यांनी आपले कादंबरी लेखन केले. आपल्या शैक्षणिक जीवनातला पोकळपणा व सामाजिक जीवनातल्या उणिवा दाखविल्या. नेमाडे यांच्या या कादंबरी चतुष्टय़ात महाराष्ट्राच्या विस्तृत जीवनाचे, त्यातील भाषाविशेषासकट चित्रण आहे. पांढरपेशा जीवनातील अनेक छिद्रे, व्यंग्ये दाखवून त्यांनी वाचकांना अस्वस्थ केले, चिंतनशील बनविले. मात्र नेमाडे हे केवळ अपरिचित अशा जीवनाचे चित्रण करणाऱ्या आशयावर संतुष्ट होणारे कादंबरीकार नाहीत, तर कादंबरीने सौंेदर्यात्मक रूपाचीही निर्मिती केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या अलीकडच्या ‘हिंदू’ या कादंबरीत विस्तृत अवकाश आणि काळ यांचे चित्रण अनेकविध संस्कृतीच्या दर्शनाने घडविले आहे. व्यासंग आणि चिंतन याचे उत्कृष्ट फलित असणाऱ्या कादंबरीचा ‘हिंदू’ हा अत्युत्तम नमुना आहे. नेमाडे यांच्या या कादंबरीतून त्यांचा विविध जागतिक संस्कृती व अन्य ज्ञानविषयांचा किती सखोल व्यासंग आहे, याचा प्रत्यय येतो. मला तर वाटते, प्रचंड व्यासंग व सखोल चिंतन करून कादंबरी लेखन करणारे नेमाडे यांच्यासारखा कादंबरीकार अखिल भारतीय पातळीवरही अपवादात्मक म्हणावा लागेल. लेखकाने आपले काम अत्यंत जबाबदारीने, निष्ठापूर्वक व खडतर परिश्रम करून व्रतस्थपणे केले पाहिजे, ही नेमाडे यांची भूमिका आहे. नेमाडे यांच्या या परिश्रमाला अत्यंत अपवादात्मक अशा प्रतिभागुणांची जोड मिळाली आहे. म्हणूनच त्यांच्या हातून श्रेष्ठ दर्जाचे कादंबरी लेखन झालेले आहे. त्यांच्या सखोल वैचारिकतेतून देशीवादाचा मूल्यवान विचार देणारे समीक्षा लेखन झाले आहे. श्रेष्ठ कवीलाही हेवा वाटावा, असे कविता लेखन त्यांनी केले आहे. अशा या प्रतिभावंत, गुणी, निष्ठावान मराठी लेखकाला अखिल भारतीय पातळीवरचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, ही गोष्ट समस्त मराठीजनांच्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची वाटावी अशीच आहे.

प्रचंड व्यासंग व सखोल चिंतन करून कादंबरी लेखन करणारे नेमाडे यांच्यासारखा कादंबरीकार अखिल भारतीय पातळीवरही अपवादात्मक म्हणावा लागेल. लेखकाने आपले काम अत्यंत जबाबदारीने, निष्ठापूर्वक व खडतर परिश्रम करून व्रतस्थपणे केले पाहिजे, ही नेमाडे यांची भूमिका आहे. नेमाडे यांच्या या परिश्रमाला अत्यंत अपवादात्मक अशा प्रतिभागुणांची जोड मिळाली आहे. म्हणूनच त्यांच्या हातून श्रेष्ठ दर्जाचे कादंबरी लेखन झालेले आहे.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान