12 December 2019

News Flash

वास्तुशास्त्र आणि देवघर

मनातले सगळे किंतु काढून टाकून या प्रश्नाकडे मोकळेपणाने बघणे गरजेचे आहे.

देवघर

डॉ. धुंडिराज पाठक

एके काळी घरामध्ये स्वतंत्र देवघर असायचे. आजकाल स्क्वेअर फुटांच्या हिशेबातल्या घरांमध्ये देवघर नेमके कुठे असावे हा मोठाच प्रश्न असतो. मनातले सगळे किंतु काढून टाकून या प्रश्नाकडे मोकळेपणाने बघणे गरजेचे आहे.

संपूर्ण बंगल्याचे कच्चे आरेखन (नकाशा) तयार असते. ही आई-बाबांची खोली, ही आम्हा दोघांसाठी, ही बंटीला द्यायची, ही स्वीटीची, हा दिवाणखाना, ती फॅमिली रूम, ती टीव्ही रूम अशा सगळ्या खोल्यांचे वाटप अगोदरच झालेले असते. आरेखनही तयार झालेले असते आणि सगळ्यात शेवटी प्रश्न पडलेला असतो की, ‘देवघर कुठे घ्यायचे?’ आणि हे त्यांच्या आणि आíकटेक्टच्या एकत्रित सल्ल्यातूनही न सुटलेले कोडे आमच्यासमोर, आमच्यापर्यंत आलेले असते.

गंमत आहे ना! ज्या देवावर आमचा एवढा भरवसा आहे असे म्हणतो, ज्या देवामुळेच आमचे सर्व काही चाललेले आहे असे आपण (निदान) म्हणतो, पण तरीही घराच्या बाबतीत त्याचा विचार मात्र सगळ्यात शेवटी! मोठा फ्लॅट असो की छोटा फ्लॅट, बाकी सगळ्यांच्या तरतुदी झाल्यानंतरच देवघराचा हा प्रश्न पडलेला असतो. आणि हो हल्ली देव‘घर’ ते कुठले, खरे तर बऱ्याच फ्लॅटस्मधून देव‘कोनाडा’ असतो.

खरोखरच आजच्या या धकाधकीच्या जीवनात, जागांचे आणि फ्लॅटचे भाव पूर्ण ताकदीच्या बाहेर गेलेले असतानाही, सर्वच आयुष्य एका अस्थिरतेच्या कमाल पातळीच्याही पलीकडे गेलेले असतानाही आम्हाला देवाची आठवण होते हे निश्चितच योग्य आहे आणि त्यामुळे घरामध्ये देवघर (किंवा देवकोनाडा) कुठेतरी असावे असे वाटते याही गोष्टीला आम्ही तितकेच महत्त्व देतो.

वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्राचाही अभ्यास :

भारतीय वास्तुशास्त्राचा एकूण आवाका पाहता त्यामध्ये नगर रचना (Town Planning), निवासी वास्तू रचना (Residencial & Commercial Vastu) आणि मंदिर रचना (Temple Architect) अशा तीन गोष्टी पूर्णपणे भिन्न आणि मोठय़ा प्रमाणात चíचल्या गेलेल्या आहेत. त्यातील मंदिर रचना हा भाग ‘स्वतंत्रपणे मंदिर’ असा असून त्या माध्यमातून काही देवतांची स्थापना कशी, कोठे, केव्हा करावी याबद्दलचे निकष आलेले आहेत. आपल्या वास्तूमधील देवघराची रचना करताना वास्तुशास्त्राचा अभ्यास तर आवश्यकच पण त्याहीबरोबर धर्मशास्त्र, धार्मिक ग्रंथ व देवतांचाही अभ्यास असणे गरजेचे असते आणि त्यातूनच आपले कोडे उलगडू शकते.

पूर्ण घर हेच मंदिर असावे :

आपली भारतीयांची मूळ संकल्पना खरी अशी आहे की आपले संपूर्ण घरच मंदिर स्वरूप असावे. याचा अर्थ घरात सगळ्या िभतींवर जिकडेतिकडे (रसाच्या गुऱ्हाळासारखे) देवदेवतांचे आणि संत-महात्म्यांचे फोटो असावेत असा नाही. तर घरातील राहणाऱ्या सगळ्यांचीच मनोवृत्ती ही देवासारखी झाली पाहिजे. म्हणजे आपल्या या मनुष्य जन्मातला प्रवास हा राक्षसी वृत्तीकडून मनुष्य वृत्तीकडे आणि मनुष्य वृत्तीकडून शक्य तितका देव वृत्तीकडे व्हावा आणि यासाठी सगळे काही नियम, संयम आणि मर्यादा! अशी देवप्रवृत्ती झाली तर ते घरच मंदिरासारखे पवित्र वाटायला लागते.

देवघराचा विचार :

वास्तुशास्त्र ईशान्येस देवघर असणे अत्यंत चांगले म्हणून सांगते.

बृहत्संहिता : ऐशान्यां देवगृहम् । असे म्हणते.

देवघर ईशान्य कोपऱ्यात असावे याबद्दल बहुतेक वास्तुविशारदांचे एकमत आहे, परंतु त्यात सूक्ष्म विचार ‘मानसारम्’ने केलेला आहे.

अदितौ चेशकोणे वा त्रयाणां देवतार्चनम् ॥

– मानसारम्

अदिती किंवा ईश कोपऱ्यात देवतार्चनासाठी जागा राखून ठेवावी.

वास्तुशास्त्रासाठी ईशान्य दिशा ही सर्वोत्तम सांगितलेली आहे हे वेगळे सांगणे नको. आता ईशान्य दिशेत देवघर चालते असे म्हटल्यानंतर ज्यांच्या घरात ईशान्य दिशेत देवघर ठेवण्यासारखी स्थिती नाही तिथे काय असा प्रश्न येणे साहजिकच. मग त्यातला मध्यम मार्ग असा की, जिथे कुठे, ज्या कोणत्या खोलीमध्ये देवघर असावे अशी इच्छा असेल त्या खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर घ्यावे आणि त्याहीपेक्षा कनिष्ठ मार्ग हवा असेल तर घरामध्ये कुठेही देवघर घ्या परंतु देवघर घरात असू द्या.

बेडरूम आणि देवघर :

हल्ली बऱ्याच ठिकाणी ‘बेडरूममध्ये देवघर चालते का?’ असा एक प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न विचारण्यामागे एक अल्पशी भीती मनात असते की बेडरूममध्ये जे काही केले जाते ते देवासमोर कसे चालेल?

भारतीय विचारसरणीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थमय जीवन जगायला सांगितलेले आहे. अर्थ म्हणजे पसे मिळविणे, तसेच भौतिक सुखांची उपलब्धता करून घेणे व काम म्हणजे इच्छा, आकांक्षा, वासना, महत्त्वाकांक्षा इ.ची पूर्तता करून घेणे. यामध्येच कामविषय सेवन अर्थात शरीरसुखाची प्राप्ती याही गोष्टी आल्याच. या दोन्हीलाही दिव्य अशा पुरुषार्थात स्थान देणारी व योग्य नतिक बंधनात राहिल्यास अर्थ पुरुषार्थ व काम पुरुषार्थ साध्य करणे हेही देवकार्यच मानणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे अर्थ आणि काम या पुरुषार्थाची प्राप्ती करायचीच- परंतु ती धर्म आणि मोक्ष नियंत्रित!

मित्रहो, एक लक्षात ठेवा, आपण बेडरुममध्ये जे काही करतो त्यात मुळात वाईट असे काही नसते. योग्य समाजबांधणीसाठी व समाजातील स्वैराचारासारखा अनिष्ट प्रकार टाळण्यासाठी जगातील सर्वच संस्कृतींनी मान्य केलेला विवाह व वैवाहिक जीवन हा राजमार्ग आहे. नतिक बंधनात राहून हा राजमार्ग आपणास चालायचा असतो. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सृष्टी चालू ठेवण्याचे ब्रह्मदेवाचे कार्य आपल्या हाती निसर्गाने सोपविले आहे. पती-पत्नी हे शिव-पार्वती स्वरूप असतात आणि शिव-पार्वती हे एकच असतात. त्यामुळे पती-पत्नी स्वरूपात येथे काही करणे यात गर काहीही नाही.

पती-पत्नींच्या नात्याशिवाय अन्य कोणाबरोबर आपण काही ‘उद्योग’ करू आणि अशामुळे आसपास देवघर नसावे (म्हणजे त्याच्यासमोर असे काही उद्योग करणे नको) अशी कल्पना असेल तर आपण देवच न ओळखण्याची चूक करीत आहात. आपण जिथे कुठे असतो त्या प्रत्येक कणाकणात देव भरून राहिलेला आहे ही भावना मनात पक्की झाल्यास असे प्रश्नच निर्माण होणार नाहीत. अगदी ज्या पलंगावर आपण झोपणार तो पलंगसुद्धा देव स्वरूपच आहे हेही मनात पक्के ठरू द्या. या विश्वात सर्वत्र देव भरलेला आहे हे पचविल्यास अशा प्रश्नांतून आपली सहज सुटका होईल आणि आपण जे काही करू ते देवकार्यच असेल. त्यामुळे बेडरूममध्ये देवघर असण्याने काही बिघडणार नाही. असे प्रश्न मनात आणऱ्यांनी एका खोलीत संसार करणाऱ्या गृहस्थांची काय पंचाईत होईल याचाही विचार केलेला बरा.

ईशान्येत देवघर शक्य नसेलच तर पूर्व दिशेत कुठेही देवाची पाठ पूर्वेकडे आणि आपले तोंड पूर्वेकडे असेल अशी व्यवस्था करा. तेही शक्य नसेल तर घरात सोयीच्या ठिकाणी देवाची स्थापना करा आणि जपजाप्य, मेडिटेशन किंवा पोथिपारायण या गोष्टी जमल्यास ईशान्य प्रभागात करा. त्याचे फळ निश्चितच जास्त असते.

देवघरातील मूर्ती भंग पावणे :

देवघरातील मूर्ती ही प्राणप्रतिष्ठा केलेली असल्यास, नित्य पूजेतील असल्यास ती भंग पावल्यास सरळ विसर्जन करून त्या ठिकाणी दुसऱ्या देवमूर्तीची स्थापना करावी. परंतु एखादा फोटो फुटला किंवा त्याची काच तडकल्यास असा कोणताही किंतु मनात येऊ देऊ नका. कारण ज्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली असते त्यातच फक्त देवत्व असते. बाकी सर्व फोटो, इ. गोष्टी या केवळ आपल्या सोयीसाठी आहेत, त्यामुळे त्यांना कोणतेही नियम नसतात.

देवाच्या आसनाची उंची :

देवघर स्वतंत्र असल्यास ते जमिनीपासून किती उंच ठेवावे याचे प्रमाण म्हणजे आपण मांडी घालून बसल्यास आपल्या नाभीइतके उंच देवाचे आसन यावे.

मूर्तीची उंची :

देवघरामध्ये असलेल्या मूर्ती ‘वितस्तत’ म्हणजे एक वित (अंगठा आणि करंगळी पूर्णपणे ताणल्यास त्या दोन्हीमध्ये येणारे अंतर) एवढय़ा उंचीच्या असाव्यात असे सांगितलेले आहे. या अर्थाने पाहिल्यास गणेशोत्सवात आपण जी मूर्ती घरातल्या उत्सवासाठी विकत आणतो तीसुद्धा यापेक्षा मोठी नसावी. भव्यता मूर्तीत पाहायची नसते तर ती कार्यातून दाखवायची असते. मूर्तीच्या भव्यतेचा अट्टहास घरातल्या उत्सवासाठी सोडला तरी विसर्जनानंतर उद्भवणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न किती प्रमाणात सुटू शकेल हे सामान्य माणसाच्याही लक्षात येईल.

मूर्तीची संख्या :

देवघरात कमीतकमी देव असावेत. कुलदैवत, कुलदेवता, श्रीगणेश, इ. किंवा पंचायतन पूजेचा प्रकार असेल तर त्याप्रमाणे मूर्तीची संख्या असावी. कोणत्याही धार्मिक स्थळाला जाऊन आलं की तिथली एखादी मूर्ती किंवा फोटो आणला जातो. तसेच हल्ली कोणत्याही सण-समारंभांत संतांचे किंवा देवतांचे फोटो किंवा मूर्ती भेट देण्याची प्रथा फारच वाढली आहे. या सर्वच मूर्ती किंवा फोटो हे सरळ देवघरात ठेवण्याची गरज नसते. ते अन्यत्र ठेवले तरी चालतात. त्यांची रोज पूजा व्हायलाच हवी असेही नाही. आपल्या देवघरातल्या मूर्तीत जे तत्त्व आहे तेच या फोटोंमध्येही आहे. देवघरातल्या मूर्तीची केलेली पूजा याही देवतांना पोहोचतेच हे मनात बसले तर असेही प्रश्न निर्माण होणार नाहीत.

देवघरातल्या मूर्तींच्या या संख्येवर प्रतिबंध घालण्याचे आणखी एक कारण म्हणजे वाढत्या मूर्तीच्या पूजेसाठी लागणारा जास्तीचा वेळ. यामुळे ती पूजा कंटाळवाणी होत जाते. शिवाय पुढची पिढीही याची जोपासना करेलच अशी शक्यता कमी होत जाते. त्याचे अवडंबर होऊ नये हा हेतू.

आपण पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. प्रसन्न मनाने, सावध चित्ताने आणि देवासाठी म्हणून कोणतीही उपासना करा. त्यातही जर गुरुउपदिष्टित उपासना असेल, गुरुमंत्र घेऊन त्यांनी निर्देशित केलेल्या मार्गाने उपासना करीत असू तर ति जास्त महत्त्व असते.

एकंदरीत काय तर आपले देव हे कधीही आपली चूक शोधून ‘कधी एकदा याला शिक्षा करतो’ अशा आविर्भावात नसतात, त्यामुळे देवपूजा करताना, पूजापाठ करताना थोडेफार चुकले तरी काहीही बिघडत नसते. देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीयुक्त भावनेने त्याच्याकडे जाण्याची गरज नसते.
सौजन्य – लोकप्रभा

First Published on February 8, 2019 5:51 pm

Web Title: archaeology and temple in house
Just Now!
X