News Flash

मोहक तरीही बोचणारे ‘पिक्चर पोस्टकार्ड’

१९८७ मध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच चार स्त्री कलाकार एकत्र आल्या

भारतीय आधुनिक कलेच्या- पर्यायानं नवभारतातल्या सामाजिक अभिव्यक्तीच्या- इतिहासातलं स्त्रियांचं स्थान स्पष्ट करणाऱ्या या सदरातला आजचा लेख यंदा ८०व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या अर्पिता सिंग यांच्याबद्दल..

१९८७ मध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच चार स्त्री कलाकार एकत्र आल्या आणि त्यांनी चित्रांचं प्रदर्शन भरवायचं ठरवलं. नीलिमा शेख, नलिनी मलानी, माधवी पारेख आणि अर्पिता सिंग. योगायोग असा की साधारण याच काळात अर्पिता, नीलिमा आणि नलिनी यांनी वॉटरकलरमध्ये काम करायला सुरुवात केली होती. १९८७-८९ या काळात त्यांनी माधवी पारेख यांनाही बरोबर घेऊन काही प्रदर्शनं केली. एकमेकींबरोबरच्या संवादातून, प्रभावातून त्यांच्या कलानिर्मितीची प्रक्रिया या काळात आकाराला आली. नलिनीच्या कामातली नाटकीयता, नीलिमाच्या चित्रात जाणवत राहाणारं ममत्व आणि अर्पिताच्या चित्रातलं मनोराज्य, त्यातला हळुवारपणा हे एकमेकाला पूरक ठरत गेलं. स्त्रीच्या आयुष्यातली विषण्णता, खिन्नता याविषयीची कथनं यातून व्यक्त होत राहिली, कधी उपहासातून, विनोदातून तर कधी अनुकंपेतून.

यातल्या अर्पिता सिंग यांचा जन्म १९३७ सालातला, आजच्या बांगलादेशमधला. त्यानंतर दिल्लीला स्थलांतरित झाल्यावर त्यांनी दिल्ली पॉलिटेक्निकमध्ये चित्रकलेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर काही काळ त्यांनी कलकत्ता आणि दिल्लीला वीव्हर्स सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये डिझायनर म्हणून नोकरीदेखील केली. सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर मार्क शागाल या चित्रकाराचा फार प्रभाव होता. त्याचबरोबर लोककलांचे आविष्कार, पारंपरिक हातमाग-वस्त्रं आणि भरतकाम यांतल्या प्रतिमांचा प्रभावही त्यांच्या चित्रात दिसतो. त्यांच्या चित्रातल्या कापडाच्या घडय़ा, सुरकुत्या, विणलेल्या कापडाचा ताणा-बाणा, सुई-दोऱ्याने घातलेले टाके आणि चित्राच्या भोवतीची फुलाफुलांची सजावट अशा प्रतिमांमधून हे जैविक नातं घट्ट होत जातं.  आधुनिक विचार आणि संवेदना चित्रातून मांडताना अर्पिता यांनी त्यांच्या चित्रात अलंकारिकता आणली. आधुनिकतेत कलेचा घाट आणि त्याची उपयोगिता या दोन विरोधी गोष्टी मानल्या गेल्या होत्या. पण अलंकरणातून तयार झालेल्या आकृतिबंधातून अर्पिता यांनी हे दोन्ही एकत्र आणत आधुनिक चित्रकलेची पुनव्र्याख्या केली.

त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, वडिलांचं लवकर जाणं, स्थलांतरं, प्रवास यांबद्दलचं चित्रण त्यांच्या चित्रांतून सुरुवातीला येत राहिलं. त्या काळात, ‘मृत्यू’ हा त्यांच्या चित्रांतून वारंवार येणारा विषय बनला. काहीतरी गमावल्याची भावना, त्यामुळे दाटून येणारा विषाद, लैंगिकतेचे अत्यंत क्लेशदायक अनुभव हेही त्यांच्या चित्रातून आपल्यासमोर येत राहिले. मधला काही काळ त्यांनी उभ्या-आडव्या रेषांमधून आकाराला येणारी अमूर्त रेखाटनं केली. ८०च्या दशकात त्यांची मुलगी अंजुम वयात येत असताना त्यांच्या चित्रात नव्या प्रतिमा आल्या. ज्युलिएट, लोलिता, कसांड्रा, ओफेलिया यांच्या मिथकांतून आणि साहित्यातून आलेल्या प्रतिमांतून त्या स्त्रीत्वाचे निरनिराळे अनुभव आणि भावना दाखवत होत्या. त्यानंतरच्या काळात मध्यमवयीन बाईचं शरीर, तिच्या इच्छा-आकांक्षा, तिच्या सरळ-साध्या जगण्यातही उमटत राहणारे हिंसेचे पडसाद, त्यातून येणारी अस्थिरता दिसते. या हिंसेच्या रूपकांतून त्यांनी महानगरातल्या जगण्यावर ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे त्यांच्या चित्रांना वेगळीच धार येते. निळ्या आणि गुलाबी रंगांच्या छटातल्या, भरीव रंगांच्या ठशांतून आणि ठळक रेषांतून तयार होणाऱ्या या आकृती आनंद, दु:ख, व्याकूळता अशा अनेक भावनांचं चित्रण करतात. ‘सिक्युरिटी चेक’ या चित्रात मधल्या भागात काळ्या कपडय़ातल्या सैनिकांच्या रांगा दिसतात. तर चारही बाजूंनी फुलांच्या माळा आणि डाव्या बाजूला लष्करी वेषातले सैनिकांचे चेहरे दिसतात. मधल्या भागातल्या स्त्रियांच्या पारदर्शक प्रतिमा सततच्या पाळतीला सामोरं जाताना दिसतात. एका नग्नाकृतीत स्त्रीच्या शरीराच्या आतली रचना व अर्भक दिसते, तर दुसऱ्या चित्रात पारदर्शक वस्त्रांतून तिचं नग्न शरीर दिसतं. अर्पिता सिंग म्हणतात की ‘‘आपल्या समाजात कुठलंही ध्येय साध्य करण्यासाठी हिंसा हे एक माध्यम म्हणून वापरलं जातं. या हिंसेचं मूळ नेमकं काय आहे याचा शोध मी घेत आली आहे.’’

दैनंदिन जगण्यातल्या बारीकसारीक गोष्टी, माणसांचे हावभाव, हालचाली हे रेखाटनांमध्ये टिपायलाही त्यांना मनापासून आवडतं. या एकाच रंगातल्या विविध छटांमध्ये बनवलेल्या रेखाटनांमधून रेषा आणि रंगांवरचं त्यांचं प्रभुत्व स्पष्टपणे दिसतं. त्यांच्या वॉटरकलरमधल्या चित्रांविषयी बोलताना अर्पिता म्हणतात की एकदा वॉटरकलरमध्ये आकृती काढली की त्यात काही फेरफार करता येत नाहीत. मग एखाद्या वेळी हाताचा आकार नीट जमला नाहीये असं वाटलं की त्या त्याच्याच शेजारी दुसरा हात काढून बघायच्या. त्यांच्या म्हणण्यानुसार ही त्यांच्या कामाची प्रक्रियाच बनली. एखादी रेष काढायची आणि ती पुसून टाकायची किंवा बदलायची किंवा कॅनव्हासवर ऑइल वा अ‍ॅक्रिलिक रंगांचे थरांवर थर द्यायचे, ते सँडपेपरने घासून काढायचे आणि नवे थर चढवायचे हा त्यांच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनला. त्यातून तयार होणारे आकार, रंगांचा दाटपणा आणि घासल्यामुळे तयार होणारा पोत, ही त्यांच्या चित्रांचं वैशिष्टय़ं ठरली. या प्रक्रियेमुळे तयार होणारी अनिश्चितता त्यांनी त्यांच्या कलाकृतीत स्वीकारली आणि तीच हळूहळू त्यांची कलाभाषा बनत गेली. ती केवळ वॉटरकलरपुरती मर्यादित न राहता त्यांच्या तैलचित्राचादेखील भाग बनली. अर्पिता सिंग यांच्यासाठी ती रंग आणि आकृतिबंध यांच्याशी ‘खेळ’ करण्याची प्रक्रिया होती.  त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा खेळकरपणा त्यांच्या चित्राचा विषय नाही, तर शैली बनली.

‘पिक्चर पोस्टकार्ड’ हे त्यांच्या एका प्रदर्शनाचं नाव. पण ते ज्या अर्थी वापरलं गेलं ते सर्वार्थाने त्यांच्या चित्रकलेला लागू होतं. पोस्टकार्डावरच्या चित्रांसारखं आकर्षक, रंगीबेरंगी रूप असलं तरी त्याचे पदर उलगडत गेलं की त्यातली गुंतागुंत समजायला लागते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पडसाद त्यांच्या चित्रांत उमटत राहतात. कार, विमानं, झाडं, फुलं, प्राणी, सैनिक, बंदुका, रणगाडे, भारताचा नकाशा, शहरं, रस्ते, रस्त्यांच्या रचना, काळ्या कोटातले पुरुष या प्रतिमा सतत येताना दिसतात. शहरं, शहरातल्या जागा, त्यांची आंतररचना, त्यातले बदल दाखवतात. मातकट, गुलाबी, निळ्या रंगांतून तयार होणाऱ्या शांत भावनेला बंदुका, कटय़ार, बाण या प्रतिमांतून छेद दिला जातो. सपाट कॅनव्हासवर किंवा कागदावर त्याच द्विमितीत त्यांच्या आकृतींची त्या रचना करतात. त्यामुळे माणसांच्या काही तरंगत्या, काही कलंडलेल्या, तिरक्या किंवा चपटय़ा गाडय़ा अशा आकृती दिसतात. वास्तव, सांकेतिक चिन्हं आणि स्वप्नरंजन यांच्यात दोलायमान होणारी ही चित्रं आहेत.

‘द एग फ्राय’ या चित्रात स्त्रीच्या मनोराज्याचं चित्रण येतं तर ‘बाय टू गेट टू फ्री’मध्ये उपभोगवादी संस्कृतीचं. त्यांच्या चित्रातली प्रतीकं कधी चित्र स्वरूपात येतात तर कधी शब्दांच्या रूपात. शब्द, भाषा ही सतत आपल्या आजूबाजूला असते. ती अक्षर रूपात अर्पिता यांच्या चित्रात उतरते. पण ते शब्द केवळ अक्षरं न राहता इजिप्तच्या कलेतल्या चिन्हांसारखे घाट म्हणून आपल्याला दिसत राहतात. ‘‘चित्रात मासा काढला तरी लोक विचारतात ‘हे काय काढलंय?’ म्हणून मग मी लिहूनच टाकते, हा मासा आहे, हे फूल आहे, ही नदी आहे.’’ असंही त्या मिश्कीलपणे म्हणतात.

रस्ते, इमारती, वाहनं, ठरावीक जागा याबरोबरच पायऱ्या किंवा जिना ही प्रतिमा त्यांच्या चित्रात अलीकडच्या काळात आलेली दिसते.  छायाप्रकाशाच्या खेळातून त्यांच्या घराच्या भिंतीवर काही आकार तयार झाले. त्या आकारांची त्यांनी काही रेखाटनं केली आणि ती त्यांच्या चित्रात रूपक म्हणून आली. ‘स्टेप्स अँड कॉरिडॉर्स’मध्ये घुसमटणाऱ्या वातावरणाचं किंवा ‘द गार्डेड स्टेअर’मध्ये अनोळखी प्रदेशाकडे चालू असणाऱ्या प्रवासाचं रूपक म्हणून पायऱ्यांची आकृती आलेली दिसते. अविजीत मुकुल किशोर आणि चैतन्य सांब्राणी यांनी अलीकडे बनवलेल्या ‘टु लेट द वर्ल्ड इन’ या आधुनिक भारतीय कलेवरच्या चित्रपटाची सुरुवात अर्पिता यांच्या मुलाखतीनं होते, त्यात त्यांच्या कलाप्रक्रियेबद्दल बोलताना त्या म्हणतात, ‘‘मी नेमकी कुठे चाललीये माहिती नाही. पण एक प्रकारची ओढ सतत जाणवत राहते. या प्रतिमा चितारणं, त्यांचे आकृतिबंध उभारणं हे सगळं तो दुवा साधण्यासाठी आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीच आहे.’’

 

नूपुर देसाई

noopur.casp@gmail.com

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:27 am

Web Title: arpita singh modern art in india
Next Stories
1 अर्थसंकल्पाला हे भान हवे..
2 ‘मायक्रो फायनान्स’चा पाश..
3 भाजप-विजयाची पंचतत्त्वे
Just Now!
X