24 January 2021

News Flash

उन्हाळी नाचणी!

या पिकाच्या उन्हाळी लागवडीचा प्रयोग गेल्या वर्षी राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्य़ात यशस्वी रीत्या घडला.

पराग परीट

नाचणी हे तसे खरिपात घेतले जाणारे पावसाळी पीक. परंतु या पिकाच्या उन्हाळी लागवडीचा प्रयोग गेल्या वर्षी राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्य़ात यशस्वी रीत्या घडला. आता हाच प्रयोग राज्यात अन्यत्र केला जात आहे. या आगळय़ावेगळय़ा उन्हाळी नाचणी लागवडीविषयी..

गत वर्षी राज्यातला पहिलाच उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या अठरा शेतकऱ्यांनी पंधरा एकरांवर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात ‘आत्मा’च्या पीक प्रात्यक्षिक बाबीच्या मदतीने यशस्वी करून दाखवला. खरिपापेक्षा उन्हाळ्यात नाचणीचे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन मिळाले. या प्रयोगाच्या यशस्वीतेमुळे यंदा राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकरी उन्हाळी नाचणी उत्पादन घेण्यासाठी स्वत:हून तयार झाले आहेत. उन्हाळी नाचणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच काही काळजी घेतल्यास त्याचा उत्पादन वाढीसाठी निश्चितच उपयोग होईल. यासाठी खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे.

योग्य बियाणे निवड : स्थानिक जुन्या वाणांपेक्षा हळव्या म्हणजे ९० ते १०० दिवसांत तयार होणाऱ्या व्ही.एल.- १४९, व्ही.आर. – ७०८, जी.पी.यु. -२६, पी.ई.एस.४०० निमगरव्या वाणांमध्ये आर.ए.यु. – ८, एच.आर.- ३७४, दापोली – १, दापोली सफेद या वाणांचा तर पी.आर.-२०२, पी.ई.एस.-११०, इंडाफ – ८, फुले नाचणी, फुले कासारी या गरव्या वाणांच्या नाचणी बियाणाचा लागवडीसाठी वापर करावा.

बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बीजप्रक्रि या उत्पादन वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. यासाठी प्रति किलो बियाणास ४ ग्रॅम थायरम आणि त्यानंतर २५ ग्रॅम अ‍ॅझोस्पिरिलम ब्राफिलेन्स आणि अ‍ॅस्परजिलस अवोमोरी या जिवाणु संवर्धकाची बीजप्रक्रि या करावी.

रोपवाटिका निर्मिती : एक एकर नाचणी लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी एक किलो बियाणे पुरेसे आहे. साधारणपणे पाच मीटर लांब आणि एक मीटर रुंदीचे गादीवाफे तयार करून घ्यावेत. त्यात चांगले कुजलेले शेणखत आणि कार्बारिल भुकटी १० टक्के मिसळून त्यावर बियाणे पातळ पेरावे किंवा वाफ्यावर समप्रमाणात पसरून द्यवे. खूप दाट बियाणे पडल्यास रोपांची अपेक्षित वाढ होत नाही आणि अशा कमजोर रोपांमुळे पुढे पीक काढणीस उशिरा तयार होते.

रोप लावण : रोपे २१ ते २५ दिवसांची झाल्यावर मुख्य शेतात लागवड करावी. उशिरा लागण केल्यास अपेक्षित फुटवे मिळत नाहीत आणि उत्पादनावर परिणाम होऊ  शकतो.

खते : रोपे लावल्यावर एकरी १० किलो नत्र, १६ किलो स्फुरद आणि १० किलो पालाश द्यावे. त्यानंतर एक महिन्याने १० किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. रोपवाटिकेत रोपे पंधरा दिवसांची झाल्यावर १९:१९:१९ ची तसेच पीक भरणी अवस्थेत असताना ०:०:५० ची फवारणी फायदेशीर ठरते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. ‘युरिया डीएपी ब्रिकेट्स’चा वापरही उत्पादन वाढीच्या दृष्टीने उपयोगी ठरतो पण ‘ब्रिकेट्स’चा वापर केला असल्यास वरून पुन्हा नत्राचा वेगळा डोस देण्यामुळे पिकाची नको तितकी वाढ होते आणि धान्य उत्पादन खालावते.

पाणी : उन्हाळ्यात पिकाला जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे पाणी द्यावे. या पिकाची पाण्याची गरज कमी आहे. मुख्य शेतात रोपांची लागवड करताना, त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांतून एकदा हलके पाणी द्यावे. पीक पोटरी आणि फुलोरा अवस्थेत असताना पाणी देणे आवश्यक असते.

कीड रोग व्यवस्थापन : उन्हाळी हंगामात नाचणीवर कीड रोगांचा फार उपद्रव होत नाही. तरीही पीक पोटरी अवस्थेत असताना गुलाबी खोड अळीचा प्रादुर्भाव गेल्या वेळच्या प्रयोगात दिसून आला. यासाठी प्रतिबंधात्मक उपायासाठी रोपे मुख्य शेतात लावल्यावर लगेचच पिवळे चिकट सापळे शेतात जागोजागी लावावेत. प्रादुर्भाव दिसून आल्यास निंबोळी अर्क किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के अशी फवारणी घ्यावी. मावा, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींचा  प्रादुर्भाव दिसून येताच इमिडाक्लोप्रीड ४ मिली किंवा थायोमेथोक्झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. करपा दिसून आल्यास २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा १० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा सहा ग्रॅम ट्रायसायक्लोझोल किंवा २५ ग्रॅम मॅन्कोझेब यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी.

आंतरपीक : पिकाच्या भोवती कारळे, सूर्यफूल, मका, झेंडू ही पिके सापळा पिके म्हणून घेणे फायदेशीर ठरते. आंतरपीक म्हणून तीळ, मोहरी यांसारखी मुख्य पिकाला अडथळा न ठरणारी पिके घेता येऊ  शकतात.

काढणी व मळणी : पीक पक्व झाल्यावर लवकर बोंडे काढून घ्यावीत. वेळ झाल्यास परिपक्व बोंडांमधून दाणे गळून पडायला सुरुवात होते. बोंडे उन्हात चांगली वाळवून मग मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात चांगले वाळवून हवेशीर ठिकाणी साठवून ठेवावे.

धान्य उत्पादन : उन्हाळ्यातील हवामान नाचणी पिकासाठी पोषक असल्याचे पन्हाळा तालुक्यातील प्रयोगावरून दिसून आले. सरासरी एकरी उत्पादन १६ ते १८ क्विं टल मिळाले. यापेक्षाही उत्पादन वाढ शेतकरी प्रयोग करून निश्चित मिळवू शकतात.

चारा उत्पादन : उन्हाळी नाचणीचा चारा नाचणीची बोंडे खुडून झाल्यानंतरही हिरवा आणि रसरशीत राहतो. जनावरे आवडीने खातात. यात लोह, कॅल्शियमचे प्रमाणही चांगले असते. एकरी चार ते सहा टन ओल्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. याचा मूरघासही खूप चांगला करून ठेवू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 12:16 am

Web Title: artciel on summer finger millet abn 97
Next Stories
1 विदाव्यवधान : गोपनीयतेचा बदलता दृष्टिकोन
2 अद्वयबोध : एक तत्त्व नाम
3 एकत्व तेचि सत्य..
Just Now!
X