अमृतांशु नेरुरकर

सर्व डिजिटल सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी खासगी माहितीच्या गोपनीयतेची तडजोड निमूटपणे स्वीकारावी लागणार काय? त्यासाठी आपल्या खासगीपणाच्या अधिकाराचे आकुंचन करून घेण्याची आपली तयारी आहे?

तुम्ही जर वृत्तपत्रांचे गेली पाच-सात वर्षे नियमित वाचक असाल व भारताबरोबरीने आंतरराष्ट्रीय (विशेषत: अमेरिका, युरोपमधील) घटनांचाही मागोवा घेत असाल, तर एक गोष्ट प्रकर्षांने तुमच्या ध्यानात आली असेल. असा एकही दिवस गेला नसेल, ज्या दिवशी माहितीचा गैरवापर, विदा (डेटा) सुरक्षा व गोपनीयतेची तडजोड किंवा नागरिकांच्या खासगीपणाच्या उल्लंघनासंदर्भात एखादी बातमी चर्चिली गेली नसेल. हा अन्यथा दुर्लक्षिलेला विषय प्रकाशझोतात येण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.

एक म्हणजे, एडवर्ड स्नोडेन, ज्युलियन असांजसारख्या ‘व्हिसलब्लोअर’नी देशविदेशातील सरकारी तसेच खासगी आस्थापनांकडून राजरोसपणे होणारी माहितीचौर्याची व डिजिटल हेरगिरीची प्रकरणे गेल्या दशकभरात उघडकीस आणली. तसेच  डिजिटल क्षेत्रातील फेसबुक, गूगल, अ‍ॅपलसारख्या बडय़ा कंपन्यांविरोधात जगभरातील न्यायालयांमध्ये विदा गोपनीयतेच्या तडजोडीसंदर्भात लढले जात असलेले खटले! यातील काही महत्त्वपूर्ण प्रकरणांचा विस्तृत ऊहापोह आपण या लेखमालेत पुढे करणार आहोतच. या अशा वाढत्या प्रकरणांमुळे जनसामान्यांची या विषयाबद्दलची जागरूकता वाढण्यास मदत झालीच; शिवाय प्रथमच हा विषय मुख्य प्रवाहात चर्चिला जाऊ लागला.

दुसरे कारण म्हणजे, गेल्या दशकभरात झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानातील तीन प्रवाहांच्या त्रिवेणी संगमामुळे विदासुरक्षेला निर्माण झालेली नवीन आव्हाने व त्यामुळे होणारे खासगीपणाचे सततचे आकुंचन! वाय-फाय तसेच सेल्युलर ४-जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेट जवळपास सर्वत्र व सदैव उपलब्ध होऊ लागले. त्याच्या जोडीला केवळ तळहातावर मावतील इतक्या आकाराचे, पण उच्च कार्यक्षमता असणारे व तरीही सर्वसामान्यांच्या खिशाला सहज परवडतील असे (विशेषत: अँड्रॉइड) स्मार्टफोन्स बाजारात आले. या दोन्ही तंत्रज्ञानांचा यथायोग्य वापर करून नागरिकांना आभासी पद्धतीने एकमेकांशी जोडण्यासाठी व विविध स्वरूपांत सतत व्यक्त होण्यासाठी विनामूल्य व्यासपीठ म्हणून जन्माला आलेल्या समाजमाध्यमांच्या सार्वत्रिकीकरणामुळे विदा उत्पादन सहज शक्य झाले अन् त्यामुळे ते अविरतपणे होऊ लागले.

नोव्हेंबर, २०१६ मध्ये स्मार्टफोनवर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या प्रथमच संगणकावर इंटरनेट वापरणाऱ्यांपेक्षा जास्त झाली. विशेष म्हणजे, त्यानंतर आजपर्यंत प्रत्येक दिवशी ही दरी वाढतच गेली आहे आणि भविष्यात ती अशीच वाढत जाईल याबद्दल शंका नाही. विदा उत्पादन व संकलनाच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे; कारण स्मार्टफोनवर विदेची निर्मिती करणे जितके सोपे आहे तेवढेच, वा त्याहूनही अधिक सोपे आहे स्मार्टफोनवरच्या इंटरनेट, समाजमाध्यमे व इतर अ‍ॅप्सच्या वापरातून तयार होणाऱ्या विदेचे संकलन करणे!

हे विदेचे उत्पादन किती प्रमाणात होत असेल? वानगीदाखल आपण फेसबुकचे विश्लेषण करू या. आजघडीला फेसबुकचे जवळपास अडीचशे कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत. म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या चक्कएकतृतीयांश एवढे लोक फेसबुकचा दैनंदिन वापर करतात. हा एवढा प्रचंड जनसमुदाय केवढी विदा तयार करत असेल? एका अंदाजानुसार, फेसबुकवर केवळ एका दिवसात तब्बल चार पेटाबाइट्स इतक्या विदेचे उत्पादन होते. तुम्ही मेगाबाइट्स (एमबी) किंवा गिगाबाइट्स (जीबी) यांबद्दल ऐकले असेल. आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकाची माहिती साठवण्याची क्षमता बऱ्याचदा गिगाबाइट्समध्ये मोजली जाते. एक पेटाबाइट म्हणजे दशलक्ष गिगाबाइट्स! म्हणजेच फेसबुकवर ४० लक्ष गिगाबाइट्स (!) एवढी विदा केवळ २४ तासांत तयार होते. हे फक्त फेसबुकचे उदाहरण झाले. फेसबुकएवढीच लोकप्रियता असलेल्या ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, टिकटॉकसारख्या इतर समाजमाध्यमी अ‍ॅप्सवर किंवा अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स अ‍ॅप्सवर किती विदा अविरतपणे तयार होत असेल, याचा एक प्राथमिक अंदाज यावरून आपल्याला येऊ शकेल.

महाजालावरची ही विदा किती मौल्यवान आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण या कंपन्यांच्या शेअरबाजारातील मूल्याचा मापदंड वापरू शकतो. फेसबुक जेव्हा २०१२ मध्ये शेअरबाजारात सूचिबद्ध झाली, तेव्हा तिच्या आयपीओने (इनिशिअल पब्लिक ऑफिरग) त्याआधीचे सारे विक्रम मोडीत काढले व तिला १,६०० कोटी अमेरिकी डॉलर्स एवढी प्रचंड किंमत मिळाली. त्याच्या पुढील वर्षी सूचिबद्ध झालेल्या ट्विटरला जवळपास १,४०० कोटी अमेरिकी डॉलर्स एवढी किंमत मिळाली. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की फेसबुक, ट्विटर किंवा तत्सम समाजमाध्यमी कंपन्या कोणत्याही प्रकारच्या मूर्त गोष्टीचे उत्पादन करत नाहीत किंवा पारंपरिक माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणे हार्डवेअर वा सॉफ्टवेअरची निर्मितीही करत नाहीत. तरीही गुंतवणूकदारांना या इतक्या मौल्यवान वाटतात याचे एकमेव कारण म्हणजे, त्यांच्याशी विशाल संख्येने जोडले गेलेल्या तुमच्या-माझ्यासारख्या सभासदांची त्यांच्यापाशी असलेली वैयक्तिक माहिती आणि या कंपन्यांची विदा उत्पादन, संकलन व विश्लेषण करण्याची अफाट क्षमता! फेसबुकच्या अडीचशे कोटी वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचे, त्यांच्याकडून नित्यनियमाने तयार होणाऱ्या विदेचे आणि त्याप्रमाणे त्यांच्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम, सामाजिक/राजकीय मते, आर्थिक स्तर अशा प्रकारच्या आकलनाचे आकर्षण हे केवळ खासगी कंपन्यांना आपल्या उत्पादनाची योग्य व्यक्तींना जाहिरात दाखवण्यापुरते मर्यादित नसते, तर शासकीय स्तरावरदेखील नागरिकांच्या हालचाली, कृतींवर पाळत ठेवण्यासाठी या माहितीचा पुष्कळ उपयोग होत असतो.

पण आज परिस्थिती अशी आहे की, या डिजिटल सेवांवर आपले अवलंबित्व एवढे वाढले आहे आणि त्यांनी निर्माण केलेल्या या आभासी विश्वात आपण एवढे गुरफटून गेलो आहोत की त्यांच्यापासून काही काळही फारकत घेणे आपल्याला शक्य होणार नाही. ई-मेल, लघुसंदेश, ई-कॉमर्स, वेब कॉन्फरन्स तसेच समाजमाध्यमांवरील विचारांची व माहितीची देवाणघेवाण यांसारख्या सेवा पुष्कळ उपयोगी आहेत यात वादच नाही. करोनाकालीन अनिश्चिततेच्या कालखंडात व त्यानंतरच्या नव-नित्य (न्यू नॉर्मल) जीवनशैलीत डिजिटल तंत्रज्ञानाधारित सेवांनी आपले दैनंदिन व्यवहार बऱ्याच अंशी सुरळीत ठेवण्यास आपल्याला पुष्कळ मदत केली आहे.

पण मग असा प्रश्न पडतो की, या सर्व डिजिटल सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या खासगी माहितीच्या गोपनीयतेची तडजोड निमूटपणे स्वीकारावी लागणार का? त्यासाठी आपल्या खासगीपणाच्या अधिकाराचे आकुंचन करून घेण्याची आपली तयारी आहे का? अशा प्रश्नांवर बऱ्याचदा पुढील छापाची उत्तरे किंवा प्रतिवाद ऐकायला मिळतात : एक म्हणजे, आपल्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेची ज्यांना इतकी चिंता आहे अशांनी स्मार्टफोन, इंटरनेट व त्यावरील डिजिटल सेवा वापरूच नयेत. आणि दुसरे म्हणजे, मी डिजिटल व्यासपीठांवर आदानप्रदान करत असलेल्या माहितीत गुप्त व लपविण्यासारखे असे काहीही नाही, मग गोपनीयतेची किंवा खासगीपणाची एवढी फिकीर मी का करू?

वरवर पाहता हे दोन्ही मुद्दे तर्कशुद्ध वाटू शकतील, पण जरा खोलात जाऊन विचार केलात तर त्यातील फोलपणा ध्यानात येईल. तुम्हाला तुमची माहिती गोपनीय वाटत असो वा नसो, तिच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर विविध प्रकारच्या सायबर हल्ल्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. या माहितीचा वापर करून आपल्या व्यक्तित्वावर होणारा घाला (आयडेंटिटी थेफ्ट), त्यामुळे होणारे मानसिक व आर्थिक शोषण, डिजिटल हेरगिरीच्या सततच्या जाणिवेमुळे अभिव्यक्तीवर येणाऱ्या मर्यादा, आपल्या विचारधारा व प्राधान्यक्रमांप्रमाणे विशिष्ट विचारकुपांमध्ये (एकोचेंबर) अडकवणे, अशा प्रकारच्या परिणामांना आपल्याला कळत-नकळत तोंड द्यावे लागते.

त्याहून महत्त्वाचे म्हणजे, डिजिटल माध्यमांचा मनमुराद वापर करणे किंवा आपली गोपनीयता व खासगीपणा जपण्यासाठी डिजिटल माध्यमांचा त्याग करणे- यांपैकी फक्त एकाच गोष्टीची निवड करावी लागणे हा काही यावरचा सर्वोत्तम उपाय नाही. त्यापेक्षा आपण तंत्रज्ञान गोपनीयतेची जाणीवपूर्वक काळजी घेणारे बनवू शकतो, ज्यामुळे विदागळती कमीत कमी होईल. आपण विदासुरक्षेची हमी देणारे नियम व कायदे तयार करू शकतो, ज्यामुळे आपला खासगीपणाचा अधिकार अबाधित राहील व त्याच्या उल्लंघनाची किंवा माहितीच्या गैरवापराची मोठी किंमत डिजिटल सेवादात्यांना चुकवावी लागेल. या सर्व बाबींचा विस्तृत ऊहापोह आपण या लेखमालेत पुढे करणार आहोत.

डिजिटल युगात विदासुरक्षा व गोपनीयतेबद्दलची जागरूकता बऱ्याच प्रमाणात वाढलेली असली, तरीही या संकल्पना काही एकविसाव्या शतकात जन्मल्या नाहीत. या संकल्पनांना मुळापासून समजून घेण्यासाठी त्यांच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे, ज्याची सुरुवात पुढील लेखापासून करू या.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com