इयत्ता चौथी ते कला शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंतच्या कोणत्याही परीक्षेत करोना विषाणूवर निबंध लिहायचा झाल्यास त्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवण्याची तयारी आपल्यापैकी बहुतेकांची झालेली असावी. खरं तर करोनासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि माहितीच्या महापुरात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण तुम्ही याने हैराण होण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त या प्रवाहातून बाजूला होऊन किनाऱ्यावर यायची गरज आहे. तसे झाल्यास या माहितीच्या माऱ्यापासून तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू शकाल. या आजाराविषयी आतापर्यंत आपल्याला जेवढी माहिती मिळाली आहे, त्या माहितीच्या आधारे आपण वैयक्तिक पातळीवर करोनाशी लढा देण्यास सक्षम आहोत. परंतु.. इटलीने काय करायला हवं होतं?, अमेरिकेचं काय चुकलं?,चीनने काय कारस्थान केले? त्याला पुरावा काय? भारताला किती व्हेंटिलेटरची गरज आहे?

या वादविवादात अवाजवी रस घेऊन मन:स्वास्थ्य बिघडवून घेऊ  नये ही कळकळीची विनंती.  त्यापेक्षा संचारबंदी आणि जमावबंदी फारशी गांभीर्याने न घेतल्यास काय उत्पात घडू शकतो याचे गणित समजून घ्या आणि ‘आपल्याला काय होतंय’ या बिनबुडाच्या आत्मविश्वासाने  विनाकारण घराबाहेर जाणाऱ्या मित्रांना ते समजावून सांगा. करोनाशी लढायचं म्हणजे दोनच नियम प्रामाणिकपणे पाळायचे. एक म्हणजे, स्वत:ची काळजी घ्यायची आणि दुसरं म्हणजे, इतरांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घ्यायची. या दोन नियमांचे काटेकोर पालन केलं की आपण हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवू शकतो. अर्थात ही लढाई आपण निर्धाराने, झोकून देऊन आणि अगदी मनापासून लढायला हवी, हे निश्चित.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी

’ हात सतत स्वच्छ ठेवावे, करोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी किमान २० सेकंद हात साबणाने धुणे आवश्यक आहे. तेवढं लक्षात ठेवलं म्हणजे झालं.

’ लोकांपासून चार हात दूर राहायचं. कुणी परिचितही भेटला तरी, हात जोडायचे. हस्तांदोलन पूर्णपणे बंद. वाद कितीही चिघळला तरी समोरच्याशी ‘दोन हात’ करणं टाळलेलंच बरं. कारण अशा परिस्थितीत सुरक्षित अंतर राखण्याचा नियम पाळणं कठीण असतं.

’ घराबाहेर जाणार असल्यास हातरुमाल नाकतोंड झाकेल असा बांधावा व घरी परतल्यावर स्वत:च्या हाताने साबण लावून धुवावा.

’ जिना चढताउतरताना रेलिंगला हात लावू नये व तीच खबरदारी लिफ्टमध्येसुद्धा घ्यावी  (वयोमानपरत्वे रेलिंग गरजेचे असल्यास हँड सॅनिटायझर हाताशी ठेवावे.)

’ दाराचे हँडल, लिफ्टची बटणे, सार्वजनिक टेलिफोन, कामाचे टेबल-खुर्ची, दुकानाचे काउंटर या ठिकाणी हात नाइलाजाने वा अनवधानाने लागतोच त्यामुळे  ‘हात लावाल तिथे विषाणू’  असण्याची शक्यता आहे हे पक्के ध्यानात ठेवा म्हणजे झाले. आणि म्हणूनच इथे सर्वाधिक काळजी घ्यायला पाहिजे.

’ वाणसामान, कुठलीही वस्तू वा भाजी घेताना विनाकारण हाताळण्याचा मोह टाळावा, खरेदी त्वरित आटोपावी.

’ ताप, खोकला, घसा दुखणे, दम लागणे अशी लक्षणे दिसल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्या. इतरांना लागण लागणार नाही याची काळजी घ्या.

’  समतोल आहार घ्या, नियमित व्यायाम करा अन् फिट राहा, मन प्रसन्न ठेवा.

’  डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलमध्ये काम करणारे इतर कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारे या सर्वाचे हात जोडून आभार मानायला आणि आपली कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका.