दिगंबर शिंदे

भाजी मंडईमध्ये गेले तर हिरवीगार भाजी, मोठय़ा पानांची आणि रसरशीत कोथिंबीर, जाड पानांचा पालक, गर्द हिरव्या अथवा पोपटी रंगाची मिरची, सरळ दोडका हे पदार्थ लक्ष वेधून घेतात. मात्र हा माल संकरित बियाणांचा असल्याने सुगरण कितीही चांगली असली तरी जिभेवर रेंगाळणारी चव त्याला काही मिळत नाही. यालाच तोड म्हणून धनगावच्या विमलकाकूं ची पारंपरिक बियाणांची बँक खरिपाच्या तोंडावर सुरू झाली असून यामुळे अनेक महिलांचे पाय सध्या त्यांच्या घराकडे वळले आहेत.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

कृष्णाकाठची जमीन म्हणजे काळजाच्या वडीसारखी. काळीभोर आणि कसदार. एखादं माणूस पेरलं तर उगवल अशी. मात्र बाजारपेठेत माल गेला की चार पैसे गाठीला येतात, याचा अनुभव आल्यानंतर याच कृष्णाकाठच्या जमिनीत उसाचे उत्पादन वाढीस लागले. उसाच्या कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी नवनवीन वाण विकसित झाले. या भागावर पोसलेले साखर कारखाने अधिका-अधिक उस उत्पादन आपल्या भागात व्हावे यासाठी नवनवीन तंत्र, पध्दतींना प्रोत्साहित करू लागले.

उसाबरोबरच बाजारपेठेशी निगडित भाजी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढू लागली. अवघ्या महिनाभरापासून उत्पादन चालू होत असल्याने अनेक शेतकरी बाजारपेठ समोर ठेवून भाजी उत्पादनाच्या मागे लागला. यात कृष्णा काठची चविष्ठ वांगी बाजारपेठेत आपला रूबाब दाखवू लागली. मात्र बाजारातील मागणीच्या तुलनेत उत्पादन मिळत नव्हते. यामुळे संकरित उत्पादनाकडे ओढा वाढला. यामुळे देशी वाण हद्दपार झाले. आकर्षक रंगाबरोबरच सुडोलपणा, काटेरीपणा लोप पावत गेला. याचबरोबर देशीवाणाची जिभेवर रेंगाळणाऱ्या गावरान भाज्याही लोप पावत चालल्या.

अशा स्थितीत देशीवाणाच्या इथल्या मातीत रूजलेलं बियाणं जतन करण्याबरोबरच त्याचा प्रसार करण्याचे काम सत्तरीत पोहोचलेल्या कृष्णाकाठच्या धनगावमधील विमला महादेव उतळे तथा विमला मावशी करीत आहेत. एका काठाला औदुंबर आणि दुसऱ्या बाजूला धनगाव. औदुंबरात असलेल्या दत्तमंदिरासमोरील नदीच्या पलतीरावर असलेल्या हेमाडपंती भुवनेश्वरी देवीच्या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर वसलेलं हे धनगाव. धनाचे आगर असलेले धनगाव नदीच्या काठालाच वसले आहे. याच धनगावमध्ये विमला मावशीचे घर-दार आणि परसही आहे.

स्वतची दीड एकर जमीन आणि परस यामध्ये तिने भाजीपाल्याचे पारंपरिक बियाणे जतन करून ठेवलं आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापुरावेळी अंगणात येऊन कृष्णा नदी थयथयाट करून गेली. मात्र अक्षयतृतीयेला परसदारात लावलेली वेलवर्गीय भाज्यांचे फारसे नुकसान झाले नाही. किमान पुढच्या हंगामासाठी बियाणे शिल्लक राहिलेच.

दरवर्षी पश्चिम दिशेचे म्हणजेच स्थानिक भाषेत वरलीकडचे वारे सुटले की, विमला मावशी घरात गाडग्या, मडक्यात राखेत ठेवलेले बियाणे काढण्याची धांदल सुरू होते. रानात पेरणीचा हंगामही आलेला असतो. रानात कुरी चालली की भाजीसाठी एखादा पाटा हा ठरलेलाच असतो. या पाटय़ात म्हणजे एखाद्या कडेला भाजीपाला करण्यासाठी गवारी, मिरची, वांगी, भोपळा, दोडका ही फळवर्गीय भाज्यांची लागण ठरलेलीच असते. मात्र यात देशी वाणाचा आग्रह विमला मावशी अग्रहक्काने धरतात. केवळ घरच्या रानातच नव्हे तर आयाबायांनाही घरच्या शेतातील भाज्यांची चव चाखण्यासाठी आणि लागणीसाठी प्रवृत्तही करतात. यातून आकारली आहे बियाणांची बँक.

उन्हाळी पावसाने हजेरी लावली की विमला मावशीची गडबड ठरलेलीच असते. मान्सून कोकणात आल्याचा सांगावा घेऊन येणारे गार वारे वाहण्यास सुरुवात झाली की, पावसाची चाहूल लागली आणि विमला आईची बियाणे बँक उघडते. विमलामावशीच्या शब्दात सांगायचं तर ‘बी भरणाचा वकुत आला’.

भाजीपाला असो किंवा डाळी असो किंवा धान्य सगळे. घरचेच पाहिजे असा या विमला मावशीचा नेहमी प्रयत्न सुरू असतो. कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या भाज्या कराव्या लागतात, त्याच्या वाढीसाठी रासायनिक खतांची गरजच भासणार नाही, त्याचबरोबर निसर्गात उपलब्ध असलेले वातावरण कसे आणि कोणत्या वाणाला पोषक असते याची खडान्खडा माहिती मावशीला आहे. पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते, औषधांची मात्रा, प्रसंगी पोषक टॉनिक द्यावे लागते हे या मावशीला माहीतच नाही. तिचे म्हणणे असते ते बियाणे चांगले असेल तर पीकही निपजते. यासाठी चांगल्या दमदार बियाणांचा आग्रह तिचा ठरलेलाच. यातूनच तिने देशी बियाणाचीं जपणूक करण्याची पध्दत विकसित केली आहे. त्यामुळेच भाज्या, कडधान्य, धान्य या सर्वाचे चांगले देशी बियाणे साठवून ठेवायचे आणि वर्षभरात वेगवेगळ्या हंगामात ते टोकायचे आणि त्याचसोबत ते इतरांनाही द्यायचे हा प्रयोग गेली कित्येक वर्षे सुरू आहे.

विमला मावशीने एक छोटीशी बियाणे बँक बनवली आहे. घरात गाडगे, मडके यामध्ये हंगामाची सांगता जवळ आली की, मूळ बियाणे कधी राखेत, कधी िलबाच्या पानात ठेवले जाते. बियाणे झाकून ठेवण्यासाठी मडक्याच्या तोंडाला एखाद्या कापडाने बांधून ठेवले जाते. हंगामाच्या सुरुवातीला काही दिवस हे बियाणे पुन्हा बाहेर काढून त्यात अळी, किड  झालेले बाजूला काढून चांगले बियाणे टोकणीसाठी वापरण्याकरिता बाजूला काढून त्याचाच वापर करण्याचा शिरस्ता आहे. या बँकेतून घरचा भाजीपाला पिकवून खाणाऱ्यांना विनामोबदला बी दिले जातात. मात्र यासाठी  एकच अट. हे देशी घरचे बी मोडायचे नाही, चांगले बी तयार झाले की मागेल त्याला द्या असा सल्ला वजा आदेश विमला मावशी बी मागणाऱ्या एखाद्या महिलेला देत असते.

विमला मावशीच्या भाज्या म्हणाल तर  मेथी, पालक, करडा, धना, आंबाडा, राजगिरा, चाकवत, आंबट चुका, लाल तांदळ, शेपू,  वांगे , दोडका, कारले अशा  देशी वाणांचं बियाणं या बँकेत आहे. कडधान्यामध्ये हिरवा, पिवळा मूग, उडीद, काळा श्रावण घेवडा, तीळ, पठारी पावटा, चुनुला पावटा, बुटका घेवडा, चवाळा आणि चटणीसाठी कारळ, जवस अशी बियाणे बँकेत आहेत.

दुर्दैवाने गतवर्षीच्या महापुरात बहुतांशी सर्वच घरातील धान्यासोबतच हे बियाणेही भिजून कुजून गेले. मात्र विमला मावशी नशिबवान ठरल्या. महापुराचे पाणी घराच्या अंगणात येऊन गेले, मात्र माजघरात गाडग्यात ठेवलेले देशी वाणाचे बियाणे सुरक्षित राहिले.  पावसाळी हवा सुटली तशी शेतकऱ्यांची पेरणीची धांदल सुरू झालीय आणि माता भगिणींची भाजीपाला टोकण्याचीही लगबग सुरु झालीय. त्यामुळे विमला मावशीच्या बियाणे बँकेत वर्दळ वाढली आहे. आत्तापर्यंत पन्नासभर माता भगिणींच्या हातातून शेतात हे बियाणे पडले सुद्धा.

digambar.shinde@expressindia.com