News Flash

केशवरावांचे करारी कर्तृत्व..

केशवरावांची पुतणी, सखारामपंतांची कन्या हिराबाई म्हणजे देहूचे बाळकृष्णबुवा मोरे-इनामदार यांची पत्नी.

सदानंद मोरे

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या मुत्सद्दी नेतृत्वामुळे राजकीय सत्तेची फळे बहुजन समाजाला चाखता येऊ लागली. परंतु या सर्व प्रक्रियेचा पाया विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केशवराव ऊर्फ तात्यासाहेब जेधे यांनी रचला होता. त्यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती २१ एप्रिल रोजी आहे. त्यानिमित्ताने..

‘पुण्यात ज्या गोष्टीला आज मान्यता मिळते, तिचा नंतर संपूर्ण देशात स्वीकार होतो,’ अशा अर्थाचे एक वाक्य महात्मा गांधींच्याच नावे नेहमी उद्धृत केले जाते. ज्या काळात गांधींनी हे वाक्य उच्चारले त्या- म्हणजे एका शतकापूर्वीच्याच काळात पुण्यातील टिळक, गोखले या नावांची चर्चा संपूर्ण देशात होत होती. १९१५ मध्ये गोखले आणि १९२० साली टिळक परलोकवासी झाल्यानंतर पुण्याचे मध्यवर्ती स्थान धोक्यात आले असेल असे जर कोणास वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. टिळक पक्षाची बाजू बराच काळ न. चिं. केळकर यांनी लावून धरली आणि यापश्चात विरोध करणाऱ्यांचे अध्वर्यू म्हणून सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतून देशभक्त केशवराव जेधे यांचे नाव पुढे आले. जेधे बंधूंचे शुक्रवार पेठेतील निवासस्थान- ‘जेधे मॅन्शन’चे नाव टिळकांच्या गायकवाड वाडय़ाच्या बरोबरीने घेण्यात येऊ लागले.

माझ्या शाळकरी वयात मी वडिलांच्या बोटाला धरून जेधे मॅन्शनमध्ये जात असे. केशवरावांची पुतणी, सखारामपंतांची कन्या हिराबाई म्हणजे देहूचे बाळकृष्णबुवा मोरे-इनामदार यांची पत्नी. हे लग्न जुळवले ते माझे सत्यशोधक फडकरी चुलते भागवत महाराज देहूकर यांनी. नंतर मोठा झाल्यावर मी भागवत महाराजांबरोबर जेधे मॅन्शनमध्ये जात असे. महाराजांकडून मला एके काळी प्रभावी असलेल्या या चळवळीतील अनेक गोष्टी समजल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयास पुण्यामधील जी मातबर मराठा घराणी साहाय्यभूत ठरली, त्यांच्यातील कारीच्या जेधे-देशमुखांचे घराणे हे अव्वल होते. महाराष्ट्रात ज्याचे राज्य दृढमूल झाले होते त्या आदिलशाहच्या दरबारातील मानमरातबाची चाकरी सोडून, ‘स्वराज्य’ नावाच्या अनिश्चित गोष्टीचा जुगार खेळू पाहणाऱ्या एका पोरसवदा तरुणाच्या मागे उभे राहण्याचे धाडस जेधे घराण्याने केले. शिवकालीन कागदपत्रांमधून या घराण्यातील कर्त्यां पुरुषांची नावे वारंवार भेटतात.

विसाव्या शतकात या इतिहासाची पुनरावृत्ती झाली, असे म्हणण्यात काहीच अतिशयोक्ती नाही. या वेळी शिवरायांच्या जागी त्यांचे वारसदार करवीर छत्रपती शाहू महाराज होते आणि जेधे घराण्याचा वारसा केशवरावांनी चालवला होता. टिळकांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांत शाहू महाराजांचेही देहावसान झाले. त्यानंतर पोरकी झालेली ब्राह्मणेतर चळवळ केशवरावांनी जिवंत ठेवली. दरम्यान, महात्मा गांधींचे नेतृत्व पुढे आले. तेव्हा काळाची पावले ओळखून केशवरावांनी ब्राह्मणेतर पक्षाची ताकद काँग्रेसच्या मागे उभी करून महाराष्ट्रात काँग्रेसची घडी बसवून दिली.

नव्या पिढीला केशवराव व त्यांचे कार्य फारसे माहीत नसते. स्वातंत्र्योत्तर काळात, १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाणांच्या मुत्सद्दीपणाच्या नेतृत्वामुळे राजकीय सत्तेची फळे बहुजन समाजाला चाखता येऊ लागली. तथापि, या सर्व प्रक्रियेचा पाया केशवराव ऊर्फ तात्यासाहेब जेधे यांनी घातला असल्याचा सर्वानाच सोयीस्कर विसर पडला. सत्तरच्या दशकात डॉ. गेल ऑम्वेट, डॉ. य. दि. फडके, डॉ. भा. ल. भोळे, जगन फडणीस यांच्या लेखन-संशोधनामुळे जेधेंवरील अन्याय काही प्रमाणात दूर झाला, असे म्हणता येते. पण हे प्रमाण पुरेसे नाही, याचीही नोंद घ्यायला हवी.

केशवरावांचे चरित्र व कार्य समजून घ्यायचे असेल, तर आधुनिक महाराष्ट्राच्याच इतिहासात शिरावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य इ.स. १८१८ मध्ये संपुष्टात आले अन् महाराष्ट्रात ब्रिटिशांची राजकीय सत्ता सुरू झाली. स्वराज्याचे केंद्र आधी रायगड होते. नंतर पहिल्या शाहू महाराजांच्या काळात ते साताऱ्यात हलले. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर ते पुण्याकडे सरकले. सर्व कारभार पेशव्यांकडे गेला.

पेशवाईच्या पूर्वार्धात स्वराज्याचा विस्तार भारतभर झाला. मराठय़ांनी अटकेपार घोडे दौडविले. दिल्लीचे तख्त ताब्यात ठेवून जवळपास दोन-तृतीयांश हिंदुस्थानवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता गाजवली. वायव्य आणि पूर्वेकडून (पक्षी : कोलकता) दिल्लीकडे झेपावू पाहणाऱ्या अफगाण आणि ब्रिटिश या परकीय सत्तांना काही काळ रोखून धरण्यात मराठे यशस्वी झाले. तथापि, पेशवाईच्या उत्तरार्धात मात्र मराठय़ांच्या या साम्राज्यास उतरती कळा लागली आणि सत्तास्पर्धेत बाजी मारून ब्रिटिशांनी देश ताब्यात घेतला. राज्य बुडाले ते मराठय़ांचे. हे सांगण्याचे अनेकांनी टाळले आहे, पण तो मुद्दा वेगळा.

आपल्या साम्राज्यप्राय राज्यांपासून वंचित झालेल्या महाराष्ट्रावर या सत्तांतराचे वाईट परिणाम झाले. मराठय़ांच्या सैन्यात शेतकऱ्यांचा भरणा जास्त प्रमाणात होता. शेती करता करता लढाया करायचा त्यांचा बाणा होता. सत्तांतरामुळे लढाया, चौथाया, खंडणी वगैरे गोष्टी एकाएकी संपुष्टात आल्यामुळे सर्व आर्थिक भार शेतीवर आला व आर्थिकदृष्टय़ा संपन्न झालेला बहुजन समाज बघता बघता विपन्न झाला. विशेषत: नव्या ब्रिटिश सत्तेच्या कायदेकानूंशी, प्रशासन पद्धतीशी त्याला जुळवून घेता येईना.

राज्य जसे या बहुजन शेतकऱ्यांचे गेले, तसे ते उच्चवर्णीय ब्राह्मणांचेही गेले होते. तथापि, नव्या सत्ताधाऱ्यांना राज्यशकट चालवण्यासाठी स्थानिक, पण शिक्षित नोकरदारवर्गाची आवश्यकता होती. शिक्षणाची पूर्वापार परंपरा असलेल्या ब्राह्मणांनी व तत्समांनी नवी विद्या शिकून घेतली व ब्रिटिश प्रशासनातील खालच्या अधिकाराच्या जागा पटकावल्या. हळूहळू ते वरही चढत गेले. त्यामुळे सत्ता ब्रिटिशांची, पण सर्व पातळ्यांवरील प्रशासकीय कारभार उच्चवर्णीयांचा- अशी एक विलक्षण कोंडी झाली. विद्येकडे दुर्लक्ष झालेल्या बहुजनांना नोकऱ्या मिळत नव्हत्या व शेती किफायतशीर होत नव्हती. या पेचातून या समाजाला बाहेर काढण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी ‘सत्यशोधक चळवळ’ सुरू केली. या चळवळीचे स्वरूप बाह्य़ात्कारी जातीय वाटत असले, तरी तिच्या आतला गाभा वर्गीय होता, हे विसरता कामा नये. बहुजनांनी ब्रिटिश सत्तेची कास धरून शिक्षण घ्यावे, आर्थिकदृष्टय़ा सबल व्हावे, स्वातंत्र्याचे नंतर पाहू- असे या चळवळीचे म्हणणे होते. या भूमिकेतूनच तिने काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढय़ास पाठिंबा दिला नाही.

मात्र, महात्मा फुले यांच्या पश्चात या चळवळीला उतरती कळा लागली होती. तिला नवसंजीवनी देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांच्या काळात सत्यशोधक चळवळीचे रूपांतर आधी ब्राह्मणेतर चळवळीत आणि माँटेग्यू-चेम्स्फर्ड सुधारणांनंतर राजकीय पक्षात झाले. याच टप्प्यावर संपूर्ण जेधे घराणे ब्राह्मणेतर चळवळीत उतरले. त्या काळात पुण्यात लोकमान्य टिळक आणि त्यांच्याच अनुयायांचा पुण्यातील सार्वजनिक जीवनावर पूर्ण कब्जा होता. या मंडळींना आव्हान देण्याचे धाडस केशवरावांनी केले. बघता बघता पुण्यात एक मोठे परिवर्तन घडून आले. अर्थात, ही गोष्ट सोपी मुळीच नव्हती. ती घडवून आणण्यासाठी केशवराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी टिळक पक्षाच्या धर्तीवर गणेशोत्सवात मेळ्यांचे माध्यम वापरले. याच टप्प्यावर केशवरावांना दिनकरराव जवळकर हे साथीदार भेटले. जेधेंचे संघटन कौशल्य आणि जवळकरांचे वक्तृत्व यांनी महाराष्ट्र ढवळून निघाला. मुंबईच्या कौन्सिलमध्ये ब्राह्मणेतर पक्षाचे उमेदवार निवडून येऊ लागले. काहींना दिवाणगिऱ्या म्हणजे मंत्रिपदेही मिळाली. जेधे-जवळकरांची जोडगोळी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली.

परंतु काळाबरोबर पावले टाकणाऱ्या केशवरावांना ब्राह्मणेतर चळवळीच्या संकुचितपणाची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. दरम्यान, काँग्रेसमध्ये महात्मा गांधींचे नेतृत्व मूळ धरीत होते. देशाची वाटचाल स्वातंत्र्याकडे होत होती. सुदैवाने जेधेंना काकासाहेब गाडगीळांसारखा उच्चवर्णीय सहकारी लाभला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या रूपाने एक आध्यात्मिक आणि राजकीय उपदेशकच मिळाला होता. या सर्वाच्याच विचारमंथनातून ब्राह्मणेतर पक्षाने स्वातंत्र्यलढय़ात उतरावे, त्यासाठी काँग्रेसमध्ये यावे असे निष्पन्न झाले. केशवराव काँग्रेसमध्ये आले. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादास मूठमाती देऊन जेधे-गाडगीळ या जोडीने महाराष्ट्रावरील काँग्रेसची पकड घट्ट केली. जेधेंमुळे महाराष्ट्रातील बहुजन, ब्राह्मणेतर वर्ग काँग्रेसमध्ये येऊन गांधींच्या स्वातंत्र्यलढय़ात सामील झाला. या महापरिवर्तनाचे शिल्पकार होते केशवराव जेधे!

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या जेधेंची काँग्रेसच्या संघटनेवर पकड असली, तरी मुंबई राज्याचे मंत्रिमंडळ मात्र बाळासाहेब खेर आणि गुजराती भांडवलदार यांच्या ताब्यात राहिले. काँग्रेस आणि खुद्द महात्मा गांधी यांच्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी व श्रमिकांच्या इच्छाआकांक्षांना धुमारे फुटले होते. काँग्रेसचे राज्य म्हणजे बहुजनांचे राज्य असेल, शेतकरी व कामकरी यांचे राज्य असेल, असाच त्यांचा समज झाला होता. केशवराव त्याचे प्रतीक होते. तथापि, सत्ता हाती आल्यावर काँग्रेसवरील भांडवलदार वर्गाचे आणि गांधीवादी शंकरराव देव यांचे वर्चस्व कायम राहिले. ही मंडळी बहुजनांच्या हिताच्या योजना रोखून धरू लागल्याचे चित्र निर्माण झाले.

केशवरावांसारख्या प्रामाणिक आणि निरलस कार्यकर्त्यांकडून हे सहन होणे शक्य नव्हते. त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत शेतकरी संघ स्थापन केला आणि खेर-मोरारजी-पटेल यांच्या नेतृत्वाला आतून आव्हान दिले.

दरम्यान, स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यामुळे आता काँग्रेसला कोणाच्या पाठिंब्याचीही गरज उरली नाही. जेधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची काँग्रेसमध्ये कोंडी होऊ लागली. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यात जाहीर वाद होऊ लागले. शंकरराव देवांनी आपली पुण्याई खेरांच्या पारडय़ात टाकली. जेधे व त्यांचे माजी ब्राह्मणेतर साथीदार यांच्यावर जातीयवादाचे आरोप होऊ लागले.

तोवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्क्‍सवादाचा प्रभाव वाढीस लागला होता. जेधेंच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या बहुजन नेत्यांमधील माधवराव बागल, शंकरराव मोरे यांनी मार्क्‍सच्या विचारांचा अभ्यास केला होता. फुले आणि मार्क्‍स यांच्या विचारांतूनच बहुजनांचे राज्य येईल, अशी त्यांची खात्री झाली होती. या सर्व मंडळींनी फुले-मार्क्‍स विचारांवर आधारित नवा राजकीय पक्ष काढायचा निर्णय घेतला. तोच ‘शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)’ होय. या टप्प्यावर जेधे-मोरे ही नवी जोडी नावारूपाला आली.

सुरुवातीच्या काळात शेकापने महाराष्ट्रात मोठी आशा निर्माण केली होती. पण पुढे हा प्रयोग फसला, अशीच नोंद इतिहासाला करावी लागते. त्याचे एक कारण म्हणजे जेधे व मोरे यांच्यातील बेबनाव आणि दुसरे म्हणजे, यशवंतराव चव्हाण यांची मुत्सद्देगिरी. पण तो वेगळा मुद्दा.

नियती कशी असते ते पाहा.. पुढे जेधे आणि मोरे या दोघांनीही स्वगृही पुन:प्रवेश केला. अर्थात, तरीही केशवरावांनी आपला स्वतंत्र बाणा सोडला नाही. त्यांचा करारीपणा अखेपर्यंत टिकून राहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात व गोवामुक्ती आंदोलनास त्यांनी बळ दिले.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील महाराष्ट्रामधील बहुजन समाजाचा इतिहास लिहायचा झाला, तर तो केशवराव जेधे यांना केंद्रस्थानी ठेवूनच लिहावा लागेल, यात शंका नाही. उत्तरार्धाचा पूर्वार्ध यशवंतरावांच्या भोवती गुंफावा लागेल!

(लेखक संत साहित्य आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक आहेत.)

sadanand.more@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 2:41 am

Web Title: article about keshavrao jedhe on silver jubilee anniversary
Next Stories
1 लोकशाहीचा धर्म!
2 आक्रमकता आणि अलिप्तता
3 मोदींचे मनमोहक बांगलादेश धोरण
Just Now!
X