डॉ. अभय बंग

आजच्या वैश्विक संकटात मार्ग दाखविणाऱ्या राजकीय व नैतिक नेतृत्वाचा जगभरात अभाव आहे. त्यामुळे उत्तर अन्यत्र शोधायला हवं. महात्मा गांधींसमोर आजचं आव्हान उभं असतं तर त्यांनी काय केलं असतं?

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
World Bank Report Shows No Equal Work Opportunity for Women in Any Country
समान कामासाठी असमान मोबदला? महिलांचे उत्पन्न पुरुषांपेक्षा कमी का? भारतात काय आहे परिस्थिती, जाणून घ्या

आजचे वैश्विक संकट तिहेरी आहे. कोविड महासाथ, व्यापक व खोल आर्थिक मंदी आणि मानवी अस्तित्वालाच धोक्यात टाकणारे पर्यावरणीय बदल. याशिवाय, अशा स्थितीत मार्ग दाखविणाऱ्या राजकीय व नैतिक नेतृत्वाचा आज जगभरात अभाव आहे. त्यामुळे उत्तर अन्यत्र शोधायला हवं. महात्मा गांधींसमोर आजचं आव्हान उभं असतं तर त्यांनी काय केलं असतं? ते त्यांनी स्वत:च सांगून ठेवलं आहे : ‘माझं जीवनच माझा संदेश आहे’! त्यामुळे आपल्याला गांधींचं उत्तर त्यांच्या जीवनात शोधावं लागेल.

त्यांच्या उत्तरात काही वैशिष्टय़ं समान असतील. एक, ते दुसऱ्यांना उपदेश करण्याऐवजी प्रथम स्वत: कृतीत उतरवतील. म्हणूनच आत्मश्लाघा वाटावं अशा तऱ्हेचं ते वाक्य – ‘माझं जीवनच माझा संदेश आहे’ – ते बोलू शकले. आपण बोलू शकतो का? बोलून बघा. जीभ रेटत नाही. दुसरं, ते कोणतीही कृती प्रथम स्थानिक पातळीवर सुरू करतील. जग बदलायला त्याच्या मागे जगभर धावणार नाहीत. मातीच्या एका कणामध्ये पृथ्वी बघू शकण्याची दृष्टी त्यांच्याजवळ होती. मी जिथे आहे ती जागा माझा ‘स्व-देश’ आहे. माझी कृती इथेच सुरू होणार. कारण मी फक्त इथेच कृती करू शकतो. तिसरं, त्यांची कृती सुरुवातीला तरी क्षुल्लक व बालिश वाटेल; उदाहरणार्थ, मूठभर मीठ उचलणे किंवा सूत कातणे. पण थोडं थांबा; त्यामुळे इतिहास बदलेल.

‘तुम्ही आज काय केलं असतं?’ असा प्रश्न गांधींना टाकण्याचा ‘विचार-प्रयोग’ मी करून पाहिला, तेव्हा नऊ कलमी कार्यक्रम प्राप्त झाला. तो असा :

(१) भयमुक्ती : आज विषाणूची भीती ही विषाणूपेक्षा फार व्यापक पसरली आहे. गांधी सर्वात प्रथम आपल्याला सांगतील, ‘निर्भय व्हा’! एक तर भीती ही माणसाला बलहीन करणारी घातक भावना आहे. दुसरं, करोना विषाणूमुळे मृत्यूची भीती लोकसंख्येमधील प्रत्येकाला अत्यंत अल्प आहे. तिचा बागुलबुवा करू नका. त्यांचा अंतिम तर्क राहील – मृत्यूची भीती कशाला? कुणाला? शरीर मेले तरी आत्मा अमर आहे. तुला मृत्यू नाही. भय हे काल्पनिक, असत्य असल्याने ते आपोआप विरघळून नाहीसं व्हायला लागेल.

(२) रुग्णसेवा : रोग्यांची सेवा ही गांधींची स्वाभाविक वृत्ती होती. बोअर युद्धात, पहिल्या महायुद्धात, भारतातील महामारी दरम्यान व आश्रमातील रोग्यांची शुश्रूषा करण्यात ती वेळोवेळी प्रकट झाली. कुष्ठरोग झालेल्या विकलांग परचुरे शास्त्रींना आपल्या कुटीशेजारी ठेवून त्यांनी स्वत: केलेली शुश्रूषा हे त्याचंच उदाहरण. करोनाग्रस्त रुग्णांची काळजी घ्यायला गांधी स्वत: सुरुवात करतील. ती करताना स्वच्छता, हात धुणे, मुखपट्टी वापरणे या सर्व वैज्ञानिक सूचनांचे काटेकोर पालन करत ते प्रत्यक्ष रुग्णसेवा करतील.

स्वतंत्र होऊ घातलेल्या भारतासाठी योग्य उपचार पद्धती व आरोग्य व्यवस्थेच्या शोधात गांधी पुण्याजवळ उरळी कांचन या गावात राहून १९४६ मध्ये प्रयोग करायला लागले. तेव्हा डॉक्टर व औषधे यांवरील खर्चीक अवलंबनापेक्षा लोकांना स्वावलंबी व आरोग्य-स्वातंत्र्य देणारी नैसर्गिक व सोपी पद्धत ते शोधत होते. आजही ते तशीच पद्धत वापरतील. गांधी शरीराच्या रोगप्रतिकाराच्या नैसर्गिक शक्तीवर विश्वास ठेवतील. त्याला ते निसर्गोपचार म्हणायचे. ‘निसर्गाला वाव द्या’ असं ते म्हणाले असते. करोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी बहुसंख्य रुग्ण आपोआपच दुरुस्त होत असल्याने त्यांची पद्धत उचितच ठरली असती. अतिगंभीर रुग्ण सोडले, तर आजही कोविड रोगासाठी हीच पद्धत योग्य आहे.

कोविडकाळात सेवेचा पुरवठा करण्यास वैद्यकीय व्यवस्था अपुरी ठरत आहे. अशा स्थितीत गांधींचा निरोगी जीवनशैलीचा आग्रह, स्वत:चे आरोग्य स्वत: सांभाळण्याची क्षमता आणि शक्यतो स्वत:च्या ग्रामसमूहामध्येच उपचाराची सोय – अशा आरोग्य व्यवस्थेला आपण ‘आरोग्य-स्वराज्य’ म्हणू शकतो. कोविडच्या साथीवर आरोग्य-स्वराज्य हे उत्तम उत्तर आहे. आणि तरी, अतिगंभीर निवडक रोग्यांना गांधींनी रुग्णालयात पाठवलं असतं. मुख्य म्हणजे, व्यसनांना त्यांचा विरोध जगजाहीर आहे. गांधींची निव्र्यसनी जीवनपद्धती करोनाविरुद्ध प्रभावी उपाय आहे, शिवाय ती इतर रोग व मृत्यूही कमी करेल.

(३) दुसरी दांडीयात्रा : कर्तव्य-बोधासाठी गांधींनी दिलेली जादूची कांडी (इंग्रजीत ‘तलिस्मान’) जगप्रसिद्ध आहे – ‘तुम्ही आजवर पाहिलेला सर्वात दु:खी, निर्बल माणूस आठवा. तो तुमचं कर्तव्य आहे’! आज गांधी असते तर त्यांनी कोणाला ‘तलिस्मान’ म्हणून निवडलं असतं? फार शोधावं लागत नाही. करोनामुळे लादलेल्या सार्वत्रिक बंदीमुळे जे शहरात बेकार व नकोसे झाले आणि परत आपल्या गावाकडे जायला बाध्य झाले; पण ज्यांची परतीची साधनेदेखील शासनाने बंद केली, त्यामुळे जे माणसांचे लोंढे हजारो किलोमीटर पायी निघाले, ते उपाशी, थकलेले, तहानलेले, चालणारे मजूर हेच गांधींचे ‘तलिस्मान’ झाले असते. आज गांधी असते तर ते दिल्ली सोडून या स्थलांतरितांमध्ये गेले असते. त्यांना अन्न, औषध व निवारा देण्याची व्यवस्था केली असती. पण त्याहून महत्त्वाचं, त्यांचा आत्मसन्मान व आशा त्यांनी जिवंत ठेवली असती. मला खात्री आहे की, या विस्थापित मजुरांसोबत एकता व्यक्त करायला व शासनाच्या निर्दय बेजबाबदारीचा निषेध व्यक्त करायला गांधी आज त्या विस्थापितांसोबत चालत असते.. दुसरी दांडी यात्रा!

(४) धार्मिक व सामाजिक एकता : गांधींच्या जीवनातील हे शेवटचं, पण अपुरं राहिलेलं कार्य आहे. भारतातील हिंदू व मुस्लीम यांच्यातील परस्पर द्वेष व हिंसेमुळे ते मरणप्राय दु:खी झाले होते. आतादेखील करोना विषाणू जेव्हा भारताच्या दारावर येऊन ठाकला, तेव्हा भारतातील काही नेते धर्मद्वेष पेटवण्यात मग्न होते. दिल्लीमध्ये हिंदू-मुस्लीम दंगे सुरू होते. जणू पुन्हा फाळणीपूर्व अवस्था. पुन्हा नवी फाळणी. हा द्वेष इतका आंधळा झाला की, भारतात करोनाच्या प्रसाराचे खापर एका विशिष्ट धार्मिक पंथाने केलेल्या चुकीवर फोडण्याचा प्रयत्न केला गेला. चूक तर प्रत्येकाने केली. ३१ जानेवारीला करोना भारतात पोहोचल्यावर जवळपास एक महिन्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये लाखभर माणसांची गर्दी गोळा करण्यात आली होती. पण चुकांमध्येदेखील धार्मिक भेदभाव केला गेला. भारतीय समाजाचे शतखंड करण्यात नेते यश मानत होते. अशा स्थितीत गांधींनी काय केलं असतं?

गांधींनी ही समस्या विषाणूइतक्याच प्राथमिकतेने घेतली असती. आपला सर्वधर्मसमभाव व उपनिषदांमधली ‘ईशावास्यं इदं सर्वम्.. सर्वत्रच ईश्वर वसलेला आहे’ ही खरी भारतीय निष्ठा त्यांनी प्रत्यक्ष वर्तनातून प्रकट केली असती. कोणताच भेद न करता लोकांची सेवा केली असती. त्यांना एकमेकांच्या वस्तीत जाऊन सेवा करायला पाठवलं असतं. प्रार्थना करायला एकत्र आणलं असतं. आजच्या शतखंडित समाजातून पुन्हा एक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता.

(५) माझा शेजारी ही माझी जबाबदारी : आज करोनाने प्रत्येकालाच एकटं करून टाकलं आहे. सगळेच एकमेकांच्या संपर्काला घाबरत आहेत, टाळत आहेत. संपर्काशिवाय शेजार कसा? आणि शेजार नसेल तर सामूहिकता कशी, समाज कसा? मला तर अशी शक्यता वाटते की, गांधींनी सध्याचे शासकीय व मानसिक कोंडवाडे मान्य करणं नाकारलं असतं. शेजाऱ्याची काळजी घेणं हा माझा धर्म आहे, असा सत्याग्रह केला असता. घट्ट स्थानिक बंध असल्याखेरीज राष्ट्र बनू शकत नाही, ते म्हणाले असते. अशी नैतिक भूमिका घ्यायला एखादा गांधी लागतो! रोगप्रसार टाळण्याची पूर्ण काळजी घेत त्यांनी शेजाऱ्याची काळजी घ्यायला सुरुवात केली असती. तेव्हा अचानक भ्रमाचे पडदे उठू लागतात. आपल्याला स्वच्छ दिसू लागतं की, महामारीची भीती व शासनाची नीती यामुळे माणसाने माणसाला दूर केल्याने करोनाचा प्रसार थांबला नाही. पण प्रत्येकाला अस्पृश्य करून टाकलं!

(६) चुकांचा स्वीकार : करोनाच्या साथीला तोंड देताना आजच्या नेतृत्वाने अनेक चुका केल्या. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ४० लाख विमान प्रवाशांना विदेशातून भारतात येऊ दिलं. त्यापैकी फक्त ३८ हजारांची करोना चाचणी करण्यात आली. यामुळे करोना भारतात शिरला. या ४० लाखांना आवश्यक संस्थात्मक अलगीकरण करण्याऐवजी १३४ कोटींना टाळेबंदीची शिक्षा दिली. करोनाविरुद्धच्या या युद्धात जागतिक व राष्ट्रीय नेतृत्वाने आपले घोषित ध्येय वारंवार बदलले – विषाणू प्रवेश नको, मग कंटेन्मेंट, मग रोगीसंख्या दुप्पट होण्याची वेळ लांबवणे (डबलिंग टाइम), मग मृत्यूची संख्या मर्यादित ठेवणे व आता ‘करोनासोबत जगायला शिका’.. अपयश आले की ध्येयच बदलून यशाचा दावा सुरू!

एका नव्या रोगाविषयी पुरेसं ज्ञान व उपाय नसल्याने निर्णयात चुका होणं स्वाभाविक आहे. पण ‘आमचा उपाय साफ चुकला’ ही प्रामाणिक कबुली कुठे आहे? गांधींनी ते सत्य जाहीर केलं असतं. ते जनतेशी खरे बोलले असते. ‘माझी हिमालयाएवढी चूक झाली’ अशी जबाबदारी घेतली असती. आश्चर्य म्हणजे, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर आणखी जास्त विश्वास ठेवला असता.

(७) स्थानिक स्वराज्य : वुहानमध्ये एक विषाणू जन्मला आणि जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात. अजस्र अर्थव्यवस्थेने आपल्याला दगा दिला आहे. गांधी स्मरण करून देतील की, स्थानिक उत्पादन, स्थानिक उपयोग व परस्पर संबंधांचे स्थानिक छोटे समूह हे अधिक स्थिर व मानवीय प्रारूप आहे. त्याला ते ‘ग्राम-स्वराज’ म्हणायचे. परावलंबन आलं की स्वातंत्र्य धोक्यात येतं. त्यामुळे गांधी स्थानिक, शक्यतो स्वयंपूर्ण अशी अर्थरचना सुचवतील.

अर्थरचनेत ‘महाकाय’ऐवजी ‘स्थानिक’ असा बदल आला तर त्यासोबत राजकीय व प्रशासकीय सत्तादेखील विकेंद्रित होईल. जागतिकीकरणामधून सर्वत्र हुकूमशाही प्रवृत्तीचे राजकीय नेते उदयाला आले आहेत. भांडवलशाही व उदारवादाने आश्वासन दिलेल्या स्वातंत्र्याऐवजी या नेत्यांनी नागरी-स्वातंत्र्य व माध्यम-स्वातंत्र्य आक्रसून लोकांना भयग्रस्त केलं आहे. पण कोविडच्या महामारीने ही जागतिक सत्ताव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था प्रश्नांकित केली आहे. कोणतीच केंद्रित सत्ता आपल्याला वाचवू शकत नाही, ती केवळ खोटे दावे करते हे लोकांनी अनेक देशांमध्ये अनुभवलं आहे. गांधी आपल्याला अहिंसकपणे, हळुवारपणे या महाकाय, राक्षसी अर्थ-राजकीय व्यवस्थेपासून छोटय़ा-छोटय़ा स्थानिक समूहांच्या मानवीय व्यवस्थेकडे घेऊन जातील. खरी नाती व खरी लोकशाही बिनचेहऱ्याच्या वैश्विक व्यवस्थेपेक्षा एकमेकांना ओळखणाऱ्या स्थानिक माणसांच्या समुदायांमध्येच फुलू शकते.

(८) आवश्यकतेचा विवेक : ‘पण मग आमच्या गरजांचे काय?’ आधुनिक समाजातल्या महोत्पादनाचे काही उपभोक्ते नक्कीच विचारतील. गांधी त्यांना समजावतील.. कधीही तृप्त न होणारी उपभोगाची इच्छा, इंद्रियांना २४ तास उत्तेजित करून सुखाचा आभास भोगण्याची मागणी ही तुमची नैसर्गिक गरज नसून तुमच्यामध्ये कृत्रिमरीत्या रोवलेली अनैसर्गिक सवय आहे. महाकाय उत्पादन व्यवस्था व बाजार यांच्या वाढीसाठी तुम्ही अनिवार उपभोग करणे आवश्यक आहे. वस्तुत: तुम्ही उपभोग करत नाही, तुम्ही उपभोगले जाता. क्षणभर थांबून शांतपणे आत डोकावून बघा. यापैकी किती उपभोग हे तुमच्या शरीर, मन, बुद्धीला निरोगी व सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक आहेत? आणि किती कृत्रिम सवयी? लोभ?

‘या पृथ्वीतलावर सर्वाच्या आवश्यकतांसाठी पुरेसे आहे; लोभाला पृथ्वी अपुरी पडेल,’ असं गांधी म्हणाले होते. आवश्यकता व लोभ यांत विवेक करण्याची शक्ती; प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारी, पण लोभाला नियंत्रणात ठेवणारी समाज व्यवस्था व नैतिकता या दिशेने गांधी आपल्याला घेऊन जातील. स्वराज्याची व्याख्याच त्यांनी अशी केली की- ‘स्वत:चे राज्य नव्हे, स्वत:वर राज्य’!

जेव्हा आपण विवेकाने आपल्या गरजा मर्यादित करू, अफाट उत्पादन व अनावश्यक उपभोग कमी करू, तेव्हा आपल्याला अनुभव येईल की, आधुनिक समाजातील अनेक अतिरेकांविना आपण आनंदाने जगू शकतो. कोविडकाळातील टाळेबंदीच्या दरम्यान आपण याची थोडीशी झलक पाहिली आहे.. आणि आश्चर्य! त्याबरोबर ग्लोबल वार्मिगदेखील कमी व्हायला लागेल!

(९) प्रार्थना : शेवटची कृती जी गांधीजी स्वत: करतील व आपल्याला करायला सुचवतील, ती असेल – प्रार्थना! रोज दिवसाच्या अंती, आपले सर्वोत्तम प्रयत्न करून, सर्व शक्ती व शक्यता वापरून झाल्यावर आता थोडा वेळ शांत बसा. अंतर्मुख व्हा, नम्र व्हा आणि शरण जा. कुणाला शरण जा? ते तुमच्या मर्जीवर आहे – ईश्वराला, निसर्गाला, जीवनाला, सत्याला, काळाला – तुम्हाला जे भावेल त्याला शरण जा. किमान गांधी तरी असंच करतील. जे जे शक्य आहे ते सर्व प्रयत्न तुम्ही केले आहेत. आता यापुढे ते ओझे आपल्या पाठीवर वाहू नका. माणसाला कर्तृत्वाचे व अपेक्षांचे निर्थक व घातक ओझे आपल्या पाठीवरून उतरवून स्वतंत्र होता आलं पाहिजे. यालाच गांधी शरण जाणे व प्रार्थना म्हणतात. विश्वाच्या अनंत पसाऱ्यात आपल्या अहंकाराची व प्रयत्नांची क्षुद्रता लक्षात घ्या. आता त्याच्या मर्जीने होऊ द्या – म्हणजेच शेवटी जे होईल ते स्वीकार करा.

गांधी परत येण्याची वाट न बघता, त्यांनी परत येऊन जे केलं असतं ते आपण सुरू केलं पाहिजे.

search.gad@gmail.com