अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांना संगीतसाज चढवणारे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे सुहृद, दिग्दर्शक किरण यज्ञोपवित  यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा..

‘बबडय़ा’ हे नाव मी ‘समन्वय’च्या नाटक मंडळींकडून पहिल्यांदा ऐकलं. त्याला मी पाहिलाही नव्हता किंवा त्याचं म्हणून बघितलं असं त्याचं कामही ध्यानात नव्हतं. ‘बबडय़ा’ या नावामुळे मनासमोर एक छोटी, लडिवाळ, बटू मूर्ती येत होती. प्रत्यक्षात जेव्हा भेट झाली तेव्हा उंचापुरा, स्थूल देहाचा, धारदार विनोदबुद्धी असलेला नरेंद्र भिडे नावाचा माणूस भेटला आणि त्याने मला चकवलं.

पुढे ‘ताऱ्यांचे बेट’ या सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून मी मुंबईत काम करत होतो. ती बालाजी फिल्म्स आणि नीरज पांडे अशा मोठय़ा बॅनरची निर्मिती होती. त्यामुळे त्यांनी माझ्यापुढे त्यांच्या ठरलेल्या सेटअपमधले काही संगीत दिग्दर्शकांचे पर्याय ठेवले. मला त्यांचा अनुभव फार बरा आला नाही. मी ‘मराठी संगीतकार पाहिजे’ असं म्हणत नीरज पांडेकडे नरेंद्रच्या नावाचा आग्रह धरला. त्या वेळी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा नुकताच चर्चेत आलेला सिनेमा होता. त्यातलं नरेंद्रचं काम पाहून आणि त्या वेळी नरेंद्रने ‘डॉन स्टुडिओ’ या नावाने कर्वेनगर (पुणे) इथे चांगला सेटअप उभा केला होता तो पाहून, ते पटकन होकार देतील अशी माझी अटकळ होती. आणि त्यात मला त्याच्याबरोबर काम करणं सोयीचे होईल असा माझा स्वार्थी हेतू होता. दोन्ही ग्रुपशी चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या आणि नरेंद्रचं नाव पक्कं झालं. काही दिवसांतच नरेंद्रनं मला सिनेमासाठी एक उत्तम सिग्नेचर टय़ून ऐकवली. पारंपरिक वाद्यमेळ आणि निवडक पाश्चात्त्य वाद्यांची जोड असलेली ती अफलातून टय़ून होती. नरेंद्रने उत्तम काम आणि तेही ठरल्या वेळात पूर्ण केलं. खरं पाहता काम चांगलं झालं होतं. पण काही भाग पुन्हा नव्याने करायला पाहिजेत, असा निर्मात्यांनी आग्रह धरला. मला ते फार पचनी पडलं नाही. पण नरेंद्रनं मध्यस्थी करून काही भाग पुन्हा सगळा ध्वनिमुद्रित केला. मला वाटलं होतं की तो चिडला असेल, पण त्यानं शांतपणे सगळा प्रकार समजून घेतला आणि मी त्याच्याशी खऱ्या अर्थानं जोडला गेलो. त्याला ‘बबडय़ा’ अशी हाक मारू लागलो. वैभव जोशी, आदित्य इंगळे यांसारख्या मित्रांबरोबर गप्पांचे फड रंगायला लागले आणि ‘बबडय़ा’ची चांगली ओळख पटायला लागली.

संगीतकार म्हणून नरेंद्रच्या कारकीर्दीचं विश्लेषण करावं हा माझा प्रांत नाही. त्याचे अनेक जाणकार आणि सक्षम संगीतकार मित्र आहेत. ते त्याच्याविषयी यथावकाश लिहितील, पण मला या संगीतकारापलीकडचा माणूस म्हणून तो फार लोभस वाटला. डीपी रोडला स्टुडिओ झाल्यानंतर माझ्या कामासाठी जाणं वाढलं होतंच, त्यात प्रवीण तरडे या मित्रामुळे त्याच्याकडे वारंवार जाणं होत असे. प्रवीण आणि नरेंद्र यांचं एकमेकांशिवाय पान हलत नसे. या काळात स्टुडिओपल्याडचं एक मैत्र तयार झालं आणि त्या धिप्पाड शरीरातल्या बुद्धिवान व निरागस माणसाकडे मी ओढला गेलो. या पाहण्यातून काही प्रश्न मनात आले, ते तेव्हा का विचारले नाहीत, हा प्रश्न मनाला सतावतो आहे.

आनंद मोडकांचा साहाय्यक म्हणून त्यांचं बोट धरून नरेंद्र खऱ्या अर्थानं या व्यावसायिक जगात आला. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर अगदी तरुण वयातच त्यांच्या अनेक गाण्यांचं संगीत संयोजन नरेंद्र करू लागला. त्याला मोडकांविषयी अफाट आदर. मोडक आणि एस. डी. बर्मन यांच्या गाण्यातली मेलडी हा त्याच्या चिंतनाचा विषय होता. लता मंगेशकर हे त्याचं दैवत होतं. त्यांच्या गाण्यातली एखादी जागा डोळे मिटून ऐकावी आणि डोळे वाहून देत त्यात हरवून जावं इतका तो मनस्वी होता. उत्तम सिनेमे, उत्तम साहित्य, उत्तम संगीत, उत्तम खाणं आणि जोडीला उत्तम मैत्र यांचा तो भोक्ता होता. माणसांवर त्याचं प्रेम होतं. त्याच्या स्टुडिओतले त्याचे सगळे सहकारी हे अनेक वर्ष त्याचं कुटुंब बनून गेले आहेत. त्याचं वाचन चांगलं होतं. मराठीतल्या कवींची त्याची चांगली रुजवात होती. कारणच हे होतं की, तो अतिशय संवेदनशील होता. अशा मनस्वी माणसाला स्टुडिओ चालवणे हा अतिशय व्यापारी व्यवसाय का करावासा वाटला असेल, हे मला कधी कळलं नाही. जेव्हा हा प्रश्न मनात फार जास्त पिंगा घालत होता, तेव्हा तो अनेक व्यापांत गुरफटलेला होता.

बबडय़ा हे एक रसायन होतं. अतिशय मोठा विचार करणे आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीतरी अचाट मार्ग अवलंबणे हे तो अनेकदा करत असे. नवनवीन योजनांची चक्रं त्याच्या मेंदूत फिरत असत आणि तो त्यांना अमलात आणण्याचा खटाटोप करत असे. हे अमलात आणताना त्याची पुरती दमछाक होत असे, पण ते विसरून तो पुढचा घाट घालायला सज्ज असे. पुण्यात संगीतकार खूप आहेत, पण त्यांना फायनल मिक्सिंगसाठी मुंबईत जावं लागतं, हे त्याला खटकत होतं आणि त्यातला व्यवसाय त्याला खुणावत होता. पुण्यातल्या माणसाला सिनेमाचं काम करायला मुंबईत जायची काही गरज नाही. त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा, सर्व सोयींनी युक्त स्टुडिओ उभा केला पाहिजे, हे त्याच्या मनाने घेतलं आणि त्यानं तसला एक उत्तम भव्य स्टुडिओ डीपी रोडसारख्या मध्यवर्ती भागात उभा केलादेखील! आतासुद्धा हा स्टुडिओ लहान पडतो आहे, याहून मोठा अद्ययावत सुविधा असणारा स्टुडिओ आपण टाकला पाहिजे, हे त्याच्या मनानं घेतलं होतं. माझा ‘सलाम’ नावाचा सिनेमा त्याच्या या नव्या स्टुडिओतून बाहेर पडून प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा. साल होतं २०१४. गेल्या सहा वर्षांत तिथे अनेक उत्तम सिनेमे संस्कारित झाले. पण अलीकडे त्याला याहून अधिक भव्य काहीतरी दिसत होतं आणि त्याची योजना त्याच्याकडे तयार होती.

त्याच्या तीक्ष्ण विनोदबुद्धीचे आम्ही दिवाने होतो. फेसबुकवरच्या त्याच्या पोस्ट्स हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. चालू घडामोडींवर भाष्य करणारी अतिशय चतुर शब्दयोजना असलेली टिप्पणी तो करत असे. त्याची दखल घेणारा मोठा वर्ग त्याने तयार केला होता. भिन्न राजकीय विचार मांडणारे तिथले काही मित्र आणि त्याच्यात  चांगलीच जुंपत असे. पण प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांविषयी कमालीचा आदर बाळगत. तरीही त्याचं ते फेसबुकवर इतकं रमणं हेदेखील खटकणारी गोष्ट होती. का तो त्याला इतकं महत्त्व देत होता?

अनेक मालिका, अनेक चित्रपट, अनेक नाटकं यांना यशस्वी संगीत दिलेला, अनेक पुरस्कारांनी मानांकित असलेला हा संगीतकार अंतर्यामी काहीसा खिन्न, काहीसा असमाधानी होता असं वाटायचं. आपल्याला आपल्या मगदुराला साजेसं काम आणि नाव मिळालं नाही हे बहुसंख्य कलावंतांचं भागधेय असतं. आजच्या ‘सतत चकाकत राहा’ अशा उथळ खळखळाटी काळात शहाण्यातल्या शहाण्या माणसालादेखील गंड निर्माण होतो. मनाला प्रतिसादाची भूक लागलेल्या कलाकाराला याचा त्रास होत असेल का?

भव्य निर्माण करण्याची एका अर्थानं जुगारी वृत्ती ही बेधडक वृत्तीच्या कलाकाराच्या कुडीत वास करून असतेच. त्यातूनच जगात अद्वितीय कलाकृती किंवा जागा तयार होतात. पण त्या उभारणीत काही कायमचं नष्ट होतं राहातं, हाही नियम आहे.

अद्ययावत तंत्रज्ञान राबवणारे व्यवसाय हे बकासुरी वृत्तीचे असतात. त्यांची सर्वच भूक प्रचंड असते. त्यात सतत नवनवीन शोध लागलेली यंत्रं आणून बसवावी लागतात आणि त्या यंत्रांच्या किमती चुकवण्यासाठी नवनवीन व्यावसायिक क्लृप्त्या कराव्या लागतात. आधी प्रचंड गुंतवणूक, मग त्याचे परतावे चुकवण्यासाठी दिवसरात्र धंदा. हा धंदा जरा आकाराला येतो तोवर नवीन तंत्र येतं. त्याची नवीन यंत्रं. हे न सुटणारं चक्र मानगुटीवर येऊन बसतं.

‘लोकसत्ता’मध्ये गेले वर्षभर तो ‘या मातीतील सूर’ हे सदर लिहीत होता. त्याच्या सांगीतिक जीवनाचं ते सदर प्रतिबिंब होतं. नुसतंच सांगीतिक विश्लेषण नाही, तर समकालीन वास्तवाचा धांडोळा त्या सदरात तो फार सुंदर पद्धतीनं घेत असे. लतादीदी हे त्याचं दैवत होतं. त्यांच्यावरचा लेख शेवटचा लिहायचा म्हणून त्यानं राखून ठेवला होता. त्याच्या अनेक योजना लिहायच्या राहून गेल्या, त्यातली ही अत्यंत काळजाजवळची प्रार्थनादेखील त्याच्या मनातच राहिली.

संवेदनशील माणसाने धंदा करावा का, याचं उत्तर ‘हो’ही आहे आणि ‘नाही’ही. चांगली माणसं व्यवसायात मूल्य आणतात हे बरोबर आहेच, पण त्यासाठी त्यांना जी जबर किंमत द्यावी लागते त्याचा हिशेब सहज लक्षात येत नाही बहुधा..

kiranyadnyopavit@gmail.com