डॉ. शशांक जोशी

करोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांवर आहे. ही दुसरी लाट करोना विषाणूच्या उत्परिवर्तनांमुळे (म्युटेशन) आली आहे; त्या उत्परिवर्तनांनंतर आजाराच्या वाढीचा वेग वाढला आहे. त्यामुळे करोनाभय दाटणे स्वाभाविक असले, तरी प्रत्येकाने जबाबदारी ओळखण्याची हीच वेळ आहे..

करोना विषाणू संसर्गाने मागील वर्षीपासून आपल्या जगण्यावर अनेक प्रकारचे निर्बंध आणले आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेतून आपण काहीसे बाहेर पडतोय असे वाटेपर्यंत आता दुसऱ्या लाटेने आपल्याला वेठीला धरले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये विषाणू संसर्गाच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा यादीत राहावे लागत आहे. कानावर पडणाऱ्या या नकारात्मक गोष्टींमुळे नागरिकांना करोनाचे भय अधिक वाटणे स्वाभाविक आहे. ही भीती कमी करण्यासाठी काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे. शांत आणि सकारात्मक मन:स्थिती, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित औषधोपचार आणि विश्रांती या गोष्टींचे कटाक्षाने पालन केले तर अगदी घरच्या घरीही करोनातून रुग्ण पूर्ण बरे होतात. त्यामुळे आपल्याला करोना झाला तर रुग्णालयातच दाखल व्हावे लागेल, हे डोक्यातून काढून टाकणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

कोविड या आजाराचे वेळापत्रक साधारण १४ ते २१ दिवसांचे आहे. लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य वेळेत निदान झाले आणि वैद्यकीय सल्ल्याने व्यवस्थित उपचार पूर्ण केले, तर रुग्ण शांतपणे या आजाराला सामोरा जाऊ शकतो. त्यासाठी या आजाराची लक्षणे काय आहेत, हे प्रत्येकाला नीट माहिती असणे आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, दम लागणे, वास किंवा चव जाणे ही या आजाराची अगदी वैशिष्टय़पूर्ण लक्षणे आहेत. याव्यतिरिक्त अतिसार, अंगदुखी, डोकेदुखी ही लक्षणेही आहेतच. अगदी नव्याने जीभ आणि तोंड कोरडे पडणे, अत्यंत मरगळ येणे अशी लक्षणेही समोर आली आहेत. यांपैकी कोणतेही लक्षण असेल, तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. करोना चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत वाट न पाहता, लक्षणे दिसताच नियमितपणे पुढील १४ दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा ताप आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी (ऑक्सिजन सॅच्युरेशन) तपासणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्ण विश्रांतीनंतर आणि सहा मिनिटे चालून झाल्यावर ऑक्सिजन तपासावा. ऑक्सिजन तीन पॉइंटने घटला असेल किंवा ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टीरॉइड आणि ऑक्सिजन सुरू करावा लागतो. त्यामुळे या पायरीवर रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे महत्त्वाचे ठरते. मात्र, केवळ चाचणीत करोनाबाधेचे निदान झाले असेल- म्हणजे चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली असेल, तर तातडीने रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसते, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. आजाराची लक्षणे सौम्य असतील तरी काळजी जास्त घ्यावी लागते, हे मात्र निश्चित. पहिले तीन ते सात दिवस वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्यावी. दिवसातून तीन वेळा ताप आणि ऑक्सिजन पातळी मोजणे हे सौम्य लक्षणे असली तरी आवश्यक आहे. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात त्यांना दुसऱ्या आठवडय़ात थोडा अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्याकडे नीट लक्ष न दिल्यास इथे जिवावर बेतण्याचे संकटही असते. त्यामुळे सौम्य लक्षणे असतील तरी दुर्लक्ष करणे हिताचे नाही. ज्या ज्या रुग्णांना- मग त्यांचा वयोगट कोणताही असो, करोनाव्यतिरिक्त इतर आजार आहेत (उदाहरणार्थ- मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंड, फुप्फुस विकार, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण, आदी) त्या सर्वानी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या सगळ्यांना करोना संसर्ग झाला तर ती परिस्थिती चिंता वाढवणारी ठरू शकते.

करोनाबाधेबरोबरच औषधे, इंजेक्शने, त्यांची उपलब्धता सध्या नागरिकांच्या चिंतेचा भाग झाला आहे. मात्र, करोनामध्ये दिली जाणारी सर्वाधिक औषधे ही प्रायोगिक आहेत, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. यात विषाणूरोधक फॅविपिराविर आणि रेमडेसिविर ही औषधेही आलीच. रेमडेसिविरचा वापर जास्तीत जास्त पाच दिवस, तोही पहिल्या नऊ दिवसांतच होणे आवश्यक आहे. त्यानंतर नाही. ही औषधे रुग्णाचा जीव वाचवत नाहीत. फार फार तर त्यांचा रुग्णालयातील मुक्काम एक ते तीन दिवसपर्यंत कमी करतात. हाच निकष रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचारांनाही लागू पडतो. पहिल्या पाच दिवसांत मिळालेला प्लाझ्माच रुग्णाला उपयुक्त ठरू शकतो. त्यानंतर त्यासाठी यातायात करणे आवश्यक नाही. पहिल्या पाच ते नऊ दिवसांतच यांपैकी बहुतांश औषधे उपयोगी ठरतात. त्यानंतर त्यांचा उपयोग होत नाही.

करोना रुग्णांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेऊन तातडीने औषधोपचार सुरू करणे ही त्यातील पहिली जबाबदारी. संपर्कात आलेल्या सर्वापासून स्वत:ला विलग करून चाचणी आणि औषधोपचार सुरू करणे, तसेच त्या सर्वानाही विलग राहून चाचणी करून घेण्यास सुचवणे गरजेचे आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल आणि अनेक जीव वाचतील. त्यामुळे आपल्याला करोना संसर्ग झाला म्हणून घाबरून जाऊन रेमडेसिविरसाठी जिवाचे रान करत राहण्यापेक्षा शांतपणे करोनाला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. लवकरात लवकर वैद्यकीय उपचार सुरू करणे, स्टीरॉइड, ऑक्सिजन आणि पालथे छातीवर झोपणे या गोष्टीच आपले प्राण वाचवण्यास मदत करणार आहेत, हे लक्षात ठेवावे. घरी किंवा रुग्णालयात उपचार घेत असाल तरी नियमित व्यायाम, प्राणायाम, जलनेती, योगासने यांचा उपयोग होतो. सकस आहार नियमित वेळी घेऊन तो सावकाश खाणे महत्त्वाचे आहे. रुग्णाने सतत सकारात्मक, शांत राहणे, सात ते आठ तास चांगली झोप घेणेही बरे होण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ठरते. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांनी फोनवरून किंवा टेलि-कन्सल्टेशनद्वारे डॉक्टरांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. तुमचा ताप, ऑक्सिजन पातळी, नाडी, साखर, रक्तदाब, श्वसनदर या गोष्टी आता स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणांद्वारे घरीही तपासता येतात. त्यांची माहिती तुमच्या डॉक्टरांना कळवून तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होण्याबाबत आग्रही दिसतात. सरकारी असो किंवा खासगी, सर्व रुग्णालयांमध्ये सारखेच उपचार रुग्णांना दिले जातात. त्यामुळे आपण घेत असलेल्या उपचारांवर विश्वास ठेवून सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे.

राज्यात, विशेषत: पुणे आणि मुंबईतील रुग्णसंख्या आता स्थिर होताना दिसत आहे. रुग्णसंख्येचा आलेख पुढील आठ ते दहा दिवस स्थिर राहिला तर आपण दुसऱ्या लाटेवर हळूहळू मात केली असे म्हणता येईल. मात्र, म्हणून आपला धोका संपला असे नाही. पुढील किमान वर्षभर मुखपट्टी, स्वच्छता, गर्दी टाळणे, बाहेर गेल्यानंतर इतरांपासून अंतर राखणे या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. कारण करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा आहेच! दुहेरी मुखपट्टी अधिक संरक्षण देत असल्याचे नुकतेच संशोधनातून समोर येत आहे. त्यामुळे दुहेरी मुखपट्टी वापरणेही हिताचे ठरेल. देशात करोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. लस घेतल्यानंतर करोना होणारच नाही असे नाही; मात्र आजाराची तीव्रता कमी करण्यास लस निश्चित उपयुक्त ठरते. त्यामुळे शक्यतो सर्वानी लस घेऊन अतिरिक्त संरक्षण मिळवणे आवश्यक आहे.

दुसऱ्या लाटेदरम्यान संसर्गाच्या वाढत्या वेगामुळे आजाराबाबत भय आणि नकारात्मकता वाढीस लागली आहे. मात्र, आजारापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळणे आणि आजाराचा संसर्ग झालाच, तर शांतपणे, सकारात्मक राहून, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे, हे त्यातून बरे होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शक्य तेवढे घरी राहा, बाहेर जाणे अपरिहार्यच असेल तर प्रतिबंधात्मक नियम पाळा आणि काळजी घ्या.

कोविड या आजाराचे वेळापत्रक साधारण १४ ते २१ दिवसांचे आहे.

लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य वेळेत निदान झाले आणि वैद्यकीय सल्ल्याने व्यवस्थित उपचार पूर्ण केले तर रुग्ण शांतपणे या आजाराला सामोरा जाऊ शकतो.

त्यासाठी या आजाराची लक्षणे काय आहेत, हे प्रत्येकाला नीट माहिती असणे आवश्यक आहे.

ताप, कोरडा खोकला, दम लागणे, वास किंवा चव जाणे ही या आजाराची अगदी वैशिष्टय़पूर्ण लक्षणे आहेत.

याव्यतिरिक्त अतिसार, अंगदुखी, डोकेदुखी ही लक्षणेही आहेतच. अगदी नव्याने जीभ आणि तोंड कोरडे पडणे, अत्यंत मरगळ येणे अशी लक्षणेही समोर आली आहेत.

यांपैकी कोणतेही लक्षण असेल तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

करोना चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत वाट न पाहता, लक्षणे दिसताच नियमितपणे पुढील १४ दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा ताप आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी (ऑक्सिजन सॅच्युरेशन) तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

(लेखक राज्य करोना कृती दलाचे सदस्य आहेत.)