संहिता जोशी

मतदान करणं हे नागरिकांचं लोकशाहीतलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. पण ते फेसबुकवर जाहीर करणं आपलं कर्तव्य आहे का? समाजमाध्यमं मात्र अशा बऱ्याच उठाठेवी आपण करत राहू, यासाठी प्रयत्न करतात.. त्यातून त्यांना मिळतो आपला वेळ.. आणि आपली माहिती!

‘तुम अगर मेरी नही हो सकती तो और किसी की भी नही हो सकती’ असले डायलॉग जुन्या हिंदी सिनेमांत बऱ्याचदा असायचे. गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सगळ्याच समाजमाध्यमांचा दृष्टिकोन काहीसा असाच आहे.

गेल्या लेखात ओझरता उल्लेख आला की, बीड-परभणीच्या लोकांनी चारचौघांत कसं वागायचं हे फेसबुकमधले मोजके अभियंते आणि मार्केटिंगवाले ठरवत आहेत. वीस वर्षांपूर्वी आपण मोठय़ा प्रमाणात ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देत नव्हतो, हल्ली देतो. चारचौघांत, निदान फेसबुकवर कसं वागावं हे फेसबुक ठरवतं. कसं? त्याचं उदाहरण पाहा.

समजा, मी माझ्या फेसबुकवर या लेखाचा दुवा (लिंक) डकवला; तुमच्यापैकी कोणाला तो दिसला, त्यावर तुम्ही ‘लाइक’ बटण दाबलं, काही कॉमेंट केली किंवा तो लेख आपल्या भिंतीवर शेअर केला; याचा अर्थ हा लेख तुम्हाला आवडलाच पाहिजे, माझं प्रत्येक लिखाण तुम्हाला आवडलंच पाहिजे असं नाही. तुम्ही त्या एका लेखाची दखल घेणं एवढंच ते असू शकतं. तरीही, यापुढे फेसबुकवर मी काहीही शेअर केलं की ते तुम्हाला प्राधान्यानं दिसणार.

याचं कारण या कृतींचा अर्थ फेसबुक असा लावतो : मला जे काही म्हणायचं असतं, त्यात तुम्हाला रस आहे. मात्र या प्रक्रियेत तुम्ही फार वेळ फेसबुकवर घालवला नाही. तुमची नजर फेसबुकवरून ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर गेली. यात फेसबुकचा फायदा होण्याजागी ‘लोकसत्ता’चा झाला. हा फायदा म्हणजे फक्त किती लोक फेसबुकवर असतात, आणि किती लोक ‘लोकसत्ता’ वाचतात एवढय़ापुरता नाही.

फेसबुकवर वेळ घालवणं म्हणजे फेसबुकला आपल्याबद्दल अधिकाधिक माहिती देत राहणं. आपण कोणाच्या पोस्ट्स वाचल्या, कोणासोबत संवाद साधला (फेसबुक एंगेजमेंट), हा संवाद शब्दरूपात चालला की गोटोळ्या बाहुल्या (स्मायली) वापरून संवाद झाला, अशी बऱ्याच प्रकारची माहिती फेसबुकला मिळते. फेसबुकवर वेळ घालवणं फेसबुकसाठी महत्त्वाचं असतं; कारण त्यांना तिथे जाहिराती दाखवता येतात.

याउलट अनेक इतर संस्थळं (वेबसाइट्स) जाहिराती दाखवण्यासाठी गुगल अ‍ॅडसेन्स वापरतात. म्हणजे संस्थळावर ज्या प्रकारचा मजकूर, व्हिडीओ वगैरे असतात त्यानुसार जाहिराती दाखवल्या जातात. हा मजकूर कोणत्या प्रकारचा आहे, ते गुगल ठरवतं. त्याशिवाय आपल्यापैकी अनेक लोक जीमेल, गुगल सर्च वापरतात. आपल्याला कोणत्या गोष्टींत रस आहे, हेही गुगलला समजतं. ही माहिती जाहिराती दाखवणाऱ्या गुगल किंवा फेसबुकसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

उदाहरणार्थ, एका रेस्टॉरंटचा मेन्यू मी गुगलवर शोधला. त्याची जाहिरात दुसऱ्या दिवशी मला  फोनवरून फेसबुक बघताना दिसली.

याचं कारण, जाहिराती दाखवण्याची जागा अतिशय मर्यादित आहे. जाहिराती बघण्यासाठी असलेला वेळही मर्यादित असतो; फेसबुक, ‘लोकसत्ता’ किंवा इतर कोणतंही संस्थळ वाचताना आपलं लक्ष बहुतेकसं मुख्य मजकुराकडे असतं. पानाची बहुतेकशी जागा मुख्य मजकुरानं व्यापलेली असते. म्हणून जाहिरातींचे रंग आणि मांडणी भडक, लक्षवेधक असतेच. तरीही आपण जाहिरातींकडे किती काळ लक्ष देतो?

जाहिराती हा गुगल आणि फेसबुकचा पैसे कमावण्याचा मुख्य मार्ग आहे. गेल्या वर्षांत (२०१७-१८) गुगलनं जाहिराती दाखवून ९५ अब्ज डॉलरची उलाढाल केली; त्यांची एकूण उलाढाल ११० अब्ज डॉलरांची आहे. फेसबुकची एकूण उलाढाल ४० अब्ज डॉलरांची झाली; त्यापैकी नऊ अब्ज डॉलर जाहिराती दाखवण्यातून आले. आकडय़ांची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांसाठी थोडक्यात मुद्दा असा की, गुगल आणि फेसबुकचा उत्पन्नाचा मोठा स्रोत जाहिराती हा आहे.

जाहिरातीचे पैसे देणाऱ्यांना त्यातून पुरेसा नफा झाला नाही तर जीमेल, गुगल डॉक्स, गुगल शोध, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या गोष्टी आपल्याला फुकट वापरता येणार नाहीत. आतापर्यंत फुकट मिळणाऱ्या या सेवांसाठी पुढे जर पैसे मोजावे लागले तर वापरकर्त्यांची संख्या कमी होईल. त्यामुळे जाहिराती योग्य प्रमाणात दिसणं गुगल, फेसबुक या सेवादात्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मार्केटिंगवाले, अभियंते आणि विदावैज्ञानिकांसाठी यात आव्हानात्मक प्रश्न असतात. एक तर या जाहिरातींची मांडणी कुठे आणि कशी करावी? कोणत्या प्रकारे मांडणी केली की जाहिरातींमधून अधिक उत्पन्न मिळतं, हे शोधणं विदावैज्ञानिकांचं काम.

फेसबुकवर आपण अधिकाधिक वेळ घालवणं त्यासाठी महत्त्वाचं असतं. फेसबुकवर मोठे लेख लिहिले की त्यातले काही शब्द दिसतात, आणि बाकीचा लेख वाचण्यासाठी ‘सी मोअर’ यावर क्लिक करावं लागतं. कारण फेसबुकच्या विदावैज्ञानिकांनी हे बघितलेलं असणार की, मोठे लेख आले की लोक ते फार वाचत नाही. छान-छोटं काही लिहिलं की त्याला अधिक प्रतिसाद येतो. आपली नजर फेसबुकवरून दुसरीकडे गेली की त्यात फेसबुकचं नुकसान असतं.

हा लेख प्रकाशित झाल्यावर त्याचा दुवा माझ्या फेसबुकवर मी डकवेन. मात्र ते प्राधान्यानं कुणाला दाखवायचं, हे ठरवणं माझ्या हातात नाही. माझ्या मत्रयादीतल्या सगळ्यांनाच हा दुवा प्राधान्यानं दिसेल असं नाही. साधारणत: माझ्या विचारांचे जे लोक असतील त्यांनाच हा दुवा दिसेल. तेच लोक यावर चर्चा करतील. आता हे माझ्या विचारांचे लोक कोण, हे ठरवणं ‘सोपं’ नसतं. ज्यांना आपली ईमेलं, स्टेटस, कॉमेंट्स वाचता येतात; आपण काय लाइक करतो, काय शेअर करतो हे दिसतं, त्यांना समविचारी लोक शोधणं किती कठीण असणार! कॅलिफोर्नियातले काही अभियंते आणि विदावैज्ञानिक मिळून हा निर्णय घेणार की किती आणि कोणत्या लोकांना हा लेख प्राधान्यानं दाखवावा!

यात गमतीची गोष्ट अशी की, यात काहीही व्यक्तिगत पातळीवर चालत नाही. आपली जात, भाषा, त्वचेचा वर्ण, वय, यांमुळे या जाहिराती दाखवणाऱ्या, समाजमाध्यमं चालवणाऱ्या कंपन्यांना काहीही फरक पडत नाही. एक व्यक्ती स्त्री आहे किंवा दलित आहे वा कुणी जपानी आहे म्हणून त्यांच्यावर ठरवून अन्याय करणं, किंवा त्यांना त्रास देणं असे प्रकार हे लोक करत नाहीत. जाहिराती दाखवून उत्पन्न मिळेल का, आणि कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न, पर्यायानं नफा कसा होईल, याचा विचार चालतो.

नफा वाढवण्याच्या प्रकारांतून आपल्या खासगीपणावर हल्ला होतो. टीव्ही बघताना सगळ्यांना सारख्याच जाहिराती दिसतात; पण समाजमाध्यमांवर दिसणाऱ्या जाहिराती खास आपल्यासाठी बनवलेल्या असतात. कालच ज्या रेस्टॉरंटचा मेन्यू शोधला, त्याची जाहिरात फेसबुकवर दिसली म्हणून ‘हे पाहा लगेच माझ्या मदतीला आले,’ असं म्हणावं का?

अमेरिकेत  राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या तेव्हा ‘आय व्होटेड’ (मी मतदान केलं) असं बटण आलं. अनेकांनी ते हौसेनं वापरलंसुद्धा; अर्थात! मतदान करणं हे नागरिकांचं लोकशाहीतलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. पण ते फेसबुकवर जाहीर करणं आपलं कर्तव्य आहे का? निवडणुका, ‘शार्ली एब्दो’वर झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्सचा झेंडा किंवा २६ जानेवारीला भारताचा झेंडा आपल्या प्रोफाइल चित्राला फेसबुकवर नेसवणं, ही आपली कर्तव्यं आहेत का? मतदान करणं, िहस्र हल्ल्यांचा निषेध करणं, ही सुजाण नागरिकांची, व्यक्तींची कर्तव्यं आहेतच. मात्र याची माहिती फेसबुकवर जाहीर करून, आपण सुजाण असल्याची जाहिरात करणं महत्त्वाचं आहे का?

हे सगळं करायला फेसबुक आपल्याला उत्तेजन देतं आणि आपण या गोष्टी हौसेनं करतो. ‘प्लीज मतदान करा’ असं आपल्या मत्रांना आपण एरवीही सांगत नाही का? मग त्यात आणि फेसबुकवर हेच सांगण्यात काय फरक आहे? मोठय़ा प्रमाणावर तयार केलेली, उपलब्ध असलेली विदा आणि एकटय़ा-दुकटय़ा गोष्टी, सांगोवांगी, यांत काय फरक असतो? ते पुढच्या भागात बघू.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com