संहिता जोशी

विदा – इंग्रजीत ‘डेटा’- ही गोष्ट कधी आपण ‘तयार करतो’;  कधी ती ‘असते’;  कधी आपण हौसेनं ‘देतो’; कधी ती ‘आपल्या नकळत आपल्याकडून घेतली जाते’..  ही विविध प्रकारची विदा वापरण्याचे हेतूही निरनिराळे! ‘डेटा’ला ‘विदा’च म्हणावं की आणखी काही, हा वाद बाजूला ठेवून विदा कसकशी वापरली जाते, या चर्चेची सुरुवात करणारा लेख..

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Blockchain and Cryptocurrency
Money Mantra: ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे काम काय?

मागच्या आठवडय़ातल्या लेखात, रोबॉट म्हणजे काय याची किंचित ओळख झाली. पसरट, गोल डब्यासारखा दिसणारा, केर काढणारा खोकासुद्धा रोबॉट असतो. हा रोबॉट केर काढताना एकीकडे विदा (डेटा) गोळा करतो. काम चोख पार पाडण्यासाठी ही विदा गोळा करणं आवश्यक असतं.

रोबॉटसाठी मराठीत पर्यायी शब्द आहे, यंत्रमानव. केर काढणारा रोबॉट अजिबातच मानवी दिसत नाही, त्यामुळे तो डबा यंत्रमानव वाटत नाही. आपल्या काही ठरावीक धारणा असतात, चहा गरमच असतो; यंत्रमानव म्हणजे त्याचा आकार मानवी शरीरासारखा असेल; त्या धारणा योग्य असतीलच असं नाही. अशी मतं, धारणा बदलणं आवश्यक असतं; विदा म्हणजे नक्की काय, याबद्दल आपल्याही काही धारणा असतील.

गेल्या लेखावर, वाचकांच्या प्रतिसादांत एक मुद्दा वारंवार आला, डेटा या इंग्लिश शब्दासाठी विदा हा शब्द योग्य का अयोग्य? भाषाशास्त्री नसल्यामुळे त्या वादात मी शिरणार नाही. विदा या शब्दासाठी जे पर्याय सुचवले गेले, त्यात एक पर्याय आला ‘दत्त’. या शब्दाचा अर्थ एकांनी असा सांगितला – ‘दत्त’ म्हणजे आपणच दिलेली माहिती. शिवाय वापरायची परवानगी आपणच देतो.

आपखुशीने दिली जाते तेवढीच विदा असते असं नाही. थोडं तांत्रिक बोलायचं तर, माहिती (इन्फर्मेशन) ही गणिती संकल्पनासुद्धा आहे. माहितीचं एकक म्हणजे विदा. कधी विदा असते- ‘आजचं तापमान २४० से. हे फक्त आहे.’ ही विदा दिली-घेतली जाईलच असं नाही. हे झालं तटस्थ उदाहरण.

मी जीमेल वापरते. हल्ली जीमेल मला आठवण करून देतं – हे अमकं ईमेल केल्याला तीन दिवस उलटले, अजून त्यांचं उत्तर आलेलं नाही. याचा अर्थ असा की, जीमेल आपली ईमेलं वाचतं. मजकूर वाचल्यावर, त्यात कोणाला काही प्रश्न विचारले आहेत, विनंती केली आहे, कोणाची ख्यालीखुशाली विचारायला ईमेल केलं आहे, हे जीमेलला समजतं. कोणत्या इमेलांवर प्रतिसाद येणं अपेक्षित आहे, हे समजतं. अशा पत्रांवर तीन दिवसांत उत्तर आलं नाही, की जीमेल आठवण करून देतं, ‘तीन दिवस झाले, पुन्हा आठवण करून द्यायची का?’

लहानपणी, सकाळी उठल्यावर ‘दात घासलेस का’, ‘दूध प्यायलंस का’ म्हणत आईसुद्धा माझ्या मागे लागत असे. हे करण्यामागचा तिचा हेतू काय, तर लहान मुलीनं फार वेळ उपाशी राहणं योग्य नाही. या लेखमालेसाठी वेळेत लेख पाठवला नाही, असं दोन-तीनदा झालं तर वेळेआधीही संपादकांची ईमेल्स येऊन धडकतील. ही व्यावसायिक जबाबदारी आहे. जीमेल नक्की काय हेतूनं मला आठवण करतं?

बरेचदा सांगितलेला खरा किस्सा. जीमेल किंवा लिंक्डिन ईमेलांवर बारके प्रतिसाद सुचवतं; बटणावर क्लिक केलं की उत्तर तयार. मी एका मुलीशी लिंक्डिनवर बोलत होते. संभाषण संपवताना तिला म्हटलं, ‘नोकरीशोधासाठी शुभेच्छा. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी स्त्रिया आलेल्या मला आवडतील.’ तिनं उत्तर दिलं, ‘मी टू’ त्यावर लिंक्डिननं मला सुचवलेलं एक उत्तर होतं, ‘आय अ‍ॅम सो सॉरी’!  ‘#मीटू’ चळवळ, तिचे सामाजिक संदर्भ, आम्ही दोघी स्त्रिया आहोत, या गोष्टी लिंक्डिनला कळल्या आहेत. हे तपासण्यामागचा लिंक्डिनचा हेतू काय असतो?

किंबहुना, आपल्याला फुकटात एखादी वस्तू किंवा सेवा वापरता येते, तेव्हा पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे, की त्यामागचा हेतू काय? जीमेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डिन, इत्यादींच्या सेवा फुकटात वापरता येतात. (त्यांच्याकडून अधिक सेवा विकत घेता येतात, ती बाब निराळी.) आपण एकमेकांशी काय बोलतो, हे या सेवादात्यांना समजतं. त्यानुसार आपण कोण आहोत, काय-काय गोष्टी करतो, हे या सेवादात्यांना समजतं. अर्थात, फेसबुकवर झालेले संवाद जीमेलला समजत असतील असं नाही; किंवा फोनवर झालेली संभाषणं फेसुबककडे पोहोचत नाहीत. मात्र आपल्याला जाहिराती दाखवण्यापुरती माहिती या सेवादात्यांना समजते. मी ३५+ वयाची, मध्यमवर्गीय, स्त्री आहे, इतपत माहिती या सेवादात्यांकडे असणार. मी काय गोष्टी गुगल करते, त्यावरून मला कोणत्या विषयांत रस आहे, हे गुगलला समजणार.

हा लेख प्रकाशित झाला की मी हौसेनं ‘लोकसत्ता’च्या संस्थळावर जाईन तेव्हा मला माझ्यासाठी खास निवडलेल्या जाहिराती दिसतील. या जाहिराती कशा निवडल्या जातात, यामागेही विदाविज्ञानातलं तंत्र आहे; तो विषय सध्या बाजूला ठेवू. दोन-चार जाहिराती दिसल्या तर फार बिघडतंच असं नाही. समजा मी कॉफीबद्दल गोष्टी गुगल करत असेन तर त्यासंबंधित जाहिराती मला गुगलवर दिसतील; कदाचित मला त्याचा उपयोग होईलही. त्याजागी चहाच्या जाहिराती दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करता येईल. ठरावीक गोष्ट जाहिरात आहे, हे जेव्हा आपल्याला माहीत असतं, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करायचं असेल तर अनेकदा दुर्लक्ष करताही येतं.

त्यापुढे मी अँड्रॉइड फोन वापरते. त्याचं ‘लोकेशन’ सुरू असतं. समजा मी कॉफीबद्दल गुगल करत असेन तर गुगल-मॅप्स मला कॉफीची दुकानं नकाशांमध्ये दाखवेल, त्याबदल्यात कॉफीच्या दुकानांकडून या जाहिरातीचे पैसेही घेईल. पण ही जाहिरात आहे, हे मला समजणार नाही. दिसलं सहज कॉफीचं दुकान म्हणून मी तिथे कदाचित जाईनसुद्धा!

कॉफी पिणं, विकत घेणं या गोष्टी तशा किरकोळ आहेत. त्यात फार खर्च होत नाही, ना फार नुकसान होत. यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की जीमेलच्या ईमेलांमध्ये काय लिहिलं जातं, गुगलमध्ये काय शोधलं जातं, आपण फोनचं इंटरनेट वापरतो की वाय-फाय, इंटरनेट एक्स्प्लोरर वापरतो की क्रोम की फायरफॉक्स, फोनचं ‘लोकेशन’ किंवा ‘जीपीएस’ सुरू असतो त्याची इत्थंभूत माहिती गुगलकडे असते. ही माहिती आपल्याकडून गुगलला जाते. अशी कोटय़वधी लोकांची माहिती गुगलकडे असते. ही माहिती वापरून पॅटर्न्‍स तयार करता येतात; आपलं वय, आर्थिक परिस्थिती, कशावर खर्च करण्याकडे कल आहे, अशा अनेक गोष्टी त्यातून शोधता येतात.

आई दूध पिण्यासाठी मागे लागायची, ते फक्त तिच्या मुलीपुरतं होतं. तिचा हेतू दुधाचा खप वाढवणं हा नव्हता. ती चार लाख मुलांच्या मागे लागत नव्हती. ‘लोकसत्ता’चे संपादक मला आठवण करून देतील तर तो त्यांच्या कामाचा भाग असेल; त्यासोबत ते आठवण करणारं कुठलंसं फोन-अ‍ॅप विकत घेण्याची जाहिरात पाठवणार नाहीत.

विदा ही गोष्ट कधी आपण तयार करतो;  कधी ती असते;  कधी आपण हौसेनं देतो; कधी ती आपल्या नकळत आपल्याकडून घेतली जाते. तिचा वापर कधी आपल्याला जाहिराती दाखवायला केला जातो. कधी फेक-न्यूज दाखवायला..  याबद्दल पुन्हा कधी तरी.

तळटीप : सध्या मराठीतून लिहिलेल्या ईमेलांकडे जीमेल, लिंक्डिन वगैरे दुर्लक्ष करतात. मराठी वाचणारी यंत्रणा सध्या जीमेल किंवा ट्विटरवर नाही. मात्र तसं कधीच होणार नाही, असं अजिबात नाही. तोवर सध्या मराठीत लिहून घेऊ, असं म्हणण्यातही हशील नाही. कारण जेव्हा अशी यंत्रणा विकसित करायला घेतली जाईल, कदाचित त्यावर काम सुरूही असेल, तेव्हा आपण त्यासाठी पुरेसा मजकूर लिहून ठेवला असेल.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com