सुजाता परांजपे

विविध देशांतल्या प्रसारण माध्यमांतील सर्वोत्कृष्ट कार्यक्रमांची निवड करणारी ‘एबीयू पारितोषिक’ स्पर्धा अलीकडेच पार पडली. त्याविषयी..

जगभर दहशतवादी हल्ले होत असतात. विध्वंसक बॉम्ब फोडले जातात. निरपराध माणसे मारली जातात. पण हा भयानक संहार घडवून आणणारीही माणसेच असतात ना? बॉम्ब फेकून क्षणार्धात होत्याचे नव्हते करणाऱ्यांच्या मनात नेमकी काय भावना असते?  कालांतराने त्यांना या कृत्याबद्दल काय वाटत असेल?

या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असे ठरवले ‘बीबीसी’च्या रिबेका हेन्श्कीने. तिने बॉम्ब तयार करण्यात निष्णात असणाऱ्या काही जणांची भेट घेतली. या विलक्षण भेटीतून जन्माला आला एक अप्रतिम कार्यक्रम- ‘फेसिंग द बॉम्बर्स’! ‘बीबीसी’चा हा रेडिओ लघुपट ऐकण्याची संधी नुकतीच मिळाली. ‘एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन’ म्हणजेच ‘एबीयू’ ही रेडिओ टेलिव्हिजन प्रसारणाच्या क्षेत्रातली क्वालालम्पुरस्थित आंतरराष्ट्रीय संस्था. जगातले अनेक देश/ प्रसारण संस्था तिचे सदस्य आहेत. ही संस्था प्रसारणकर्मीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा भरवते, वेगवेगळ्या देशांबरोबर कार्यक्रमांची सहनिर्मिती करते. तसेच दरवर्षी एक स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेत अनेक देश सहभागी होतात. त्यांच्या देशात ठरावीक मुदतीत प्रसारित झालेले कार्यक्रम पाठवतात. यातून सर्वोत्तम कार्यक्रमांची एबीयू पारितोषिकासाठी निवड होते.

‘एबीयू प्राइझेस-२०२०’ ही या वर्षीची स्पर्धा. यासाठी प्रसारभारतीची प्रतिनिधी या नात्याने अंतिम फेरीतील  एक परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. सुरुवातीला उल्लेख केला तो कार्यक्रम म्हणजे रेडिओ लघुपट या विभागातली ‘बीबीसी’ची प्रवेशिका होती. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळ्या देशांतले प्रसारणाच्या क्षेत्रातले तज्ज्ञ परिक्षणाचे काम करतात. या वर्षी करोनामुळे दोन बैठका आणि कार्यक्रम ऐकणे हे काम ऑनलाइन झाले. एबीयूने स्पर्धेसाठी रेडिओ कार्यक्रमांचे लघुपट, नभोनाटय़, वृत्तांकन यांसारखे एकूण सात विभाग/ प्रकार घोषित केले होते. या सर्व विभागांत मिळून एबीयूकडे १२६ कार्यक्रम दाखल झाले. प्रत्येक विभागातून सर्वोत्कृष्ट चार आणि वृत्तांकन प्रकारातून सर्वोत्तम पाच असे एकूण २९ कार्यक्रम अंतिम फेरीसाठी दाखल झाले होते.

कार्यक्रम इंग्रजीखेरीज इतर भाषांमधलेही होते. किंबहुना तेच जास्त होते. प्रत्येक कार्यक्रमाचे उद्दिष्ट, अपेक्षित श्रोते, सारांश हे तपशील उपलब्ध होते. मात्र, कार्यक्रम प्रभावी असेल तर भाषेचा अडसर जाणवत नाही याची प्रचिती थायलंडच्या एका प्रवेशिकेने दिली. ‘कम्युनिटी सव्‍‌र्हिस अनाउन्समेंट’ अर्थात जनहितार्थ संदेश या प्रकारातला हा संदेश अतिशय साधा होता : ‘मद्यपान करून गाडी चालवू नका.’ चार-पाच वर्षांची एक चिमुरडी तिची स्वत:ची गोष्ट किंचित बोबडय़ा आवाजात सांगत होती. तिच्या आई-बाबांबरोबर ती बाबांच्या मित्राकडे गेली. तिथे बाबा दारू प्यायले. परत येताना गाडीला अपघात झाला आणि आई जागीच ठार झाली. त्या छोटीच्या आवाजातून आणि त्याबरोबरच्या अगदी मंद, पण यथार्थ संगीतातून फक्त ६० सेकंदांचा हा संदेश काळजाला भिडला. ‘जनहितार्थ संदेश’ विभागात थायलंडचा हा संदेश विजेता ठरला.

चीनने इतर क्षेत्रांप्रमाणे इथेही मुसंडी मारली आहे असा अनुभव आला. अंतिम २९ कार्यक्रमांमध्ये चीनच्या तीन प्रसारण संस्थांच्या मिळून नऊ प्रवेशिका होत्या. ‘वुहानमधले ५० दिवस’, ‘वुहानमधले ९२ दिवस’ यांसह या विषयावरचे चीनचे चार कार्यक्रम अंतिम फेरीत पोहोचले होते. व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि इंडोनेशिया यांचेही करोनाशी निगडीत कार्यक्रम वेगवेगळ्या विभागांत होते. ‘डॉक्युड्रामा’ या प्रकारात ‘पंक इन अ पॅण्डेमिक’ हा ऑस्ट्रेलियाचा कार्यक्रम विजेता ठरला. कॅनडात टोरोंटोमधल्या एका घरात विलगीकरणाच्या काळात तिघी मैत्रिणी ‘पंक बॅण्ड’ सुरू करतात, या सत्य घटनेवरचा माइक विल्यम्स या सूत्रधाराने सादर केलेला हा कार्यक्रम. माइकचा त्यांच्याशी मनमोकळा संवाद, मधूनच चेष्टा-मस्करी, त्यांचे प्रांजळपणे सांगणे, आपसातले ताणेबाणे- अर्ध्या तासाच्या अवधीत या सगळ्या गोष्टी माइक अगदी सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवतो. २२ मे २०२० या दिवशी प्रसारित झालेला हा कार्यक्रम याच नावाने गूगलवर शोधल्यास मिळू शकेल.

रेडिओ हे श्राव्य माध्यम. श्रोत्यांपर्यंत जे पोहोचवायचे ते केवळ आवाजातून. निवेदनाचा आवाज आणि जी गोष्ट सांगायची त्या गोष्टीला पूरक असे ध्वनी वापरताना ते खरे, परिणामकारक वाटायला पाहिजेत, श्रोत्यांना त्यांच्याशी जोडता आले पाहिजे याचे भान कायम ठेवावे लागते. या निकषांवर यशस्वी ठरलेला याच विभागातला ‘साउंड सीनरी : वॉर्मिग फिल्ड्स’ हा एक नितांतसुंदर चिनी कार्यक्रम. यांग मिंग हा निवेदक गेली २० वर्षे रानावनात, डोंगरदऱ्यांत भटकतोय. या भटकंतीत त्याने कितीतरी नैसर्गिक आवाज ध्वनिमुद्रित केले. पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, खळाळते पाणी, घोंघावणारा वारा, भातखेचरांमधली बदकांची फडफड यांसारख्या ध्वनींचा चपखल उपयोग केलेला हा १३ मिनिटांचा कार्यक्रम. कल्पना नाविन्यपूर्ण नसली तरी निसर्गातले हे अस्सल ध्वनी ऐकणे हे खरोखरच निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याची जाणीव निर्माण करणारे होते. पण आधी सांगितलेला ‘पंक इन अ पॅॅण्डेमिक’ हा कार्यक्रम त्याच्या अनोख्या शैलीमुळे ‘साउंड सीनरी’पेक्षा उजवा ठरला.

माणसामाणसांमधला भेदभाव, तृतीयपंथीयांचे प्रश्न, नैराश्य हे विषयही अन्य कार्यक्रमांतून हाताळलेले होते. ‘बीबीसी’तर्फे ज्वलंत विषयांवरच्या दोन प्रवेशिका होत्या. भारतातून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमांत ‘कोविडकाळातले मजुरांचे स्थलांतर’ आणि ‘भारतातल्या मुस्लीम स्त्रिया’ हे दोन विषय वेगवेगळ्या विभागांत दाखल होते. मात्र, परीक्षकांच्या मूल्यांकनामध्ये हे कार्यक्रम पुढे जाणारे ठरले नाहीत. ‘जनहितार्थ संदेश’ प्रकारात आकाशवाणी दिल्लीचा कार्यक्रम अधिकारी अभिनय श्रीवास्तव याच्या पाणी प्रश्नासंबंधीच्या संदेशाची मात्र  ‘कौतुकास्पद’ अशी वाखाणणी झाली.

एकुणात, आजच्या भवतालाचे हे आवाज ऐकण्याची संधी कोविडकाळातील निरुत्साही जगण्यात आशावाद पेरणारी होती.

(लेखिका आकाशवाणी पुणे केंद्रात सहाय्यक निदेशक (कार्यक्रम) आहेत.)

sujata.paranjape@gmail.com