17 December 2017

News Flash

मराठी भाषेचे अराजक माजल्यासारखे का वाटते?

८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुण साधू यांनी भूषविले.

लोकसत्ता टीम | Updated: September 26, 2017 4:55 AM

नागपूर येथे झालेल्या ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुण साधू यांनी भूषविले. त्यांनी भाषणात मराठी भाषेच्या स्थितिविषयी चिंता व्यक्त करतानाच मराठीच्या संवर्धनासाठी उपायही सुचवले.या भाषणाचा संपादित अंश..

भाषा ही जिवंत वस्तू नसून, ते एक साधन आहे; साध्य नव्हे. भाषेला समाजाशिवाय स्वतंत्र अस्तित्व नसते. समाजाचे न्यून ते भाषेचे न्यून आणि समाजाचा पराक्रम तो भाषेचा पराक्रम. तलवारीचा स्वतंत्र पराक्रम कसा असू शकतो? एक तलवार मोडली तर योद्धा ती फेकून दुसरी उचलतो. भाषेची निगा राखली नाही तर ती अराजकी होते. भाषेची उपयुक्तता कमी झाली तर आपण तिच्यात दुरुस्ती करतो, बदल करतो किंवा प्रसंग पडला तर त्या त्या व्यवहारापुरती दुसरी उपयुक्त भाषा स्वीकारतो.

भाषातज्ज्ञांच्या मते, तीन शतकांपूर्वी ६००० पेक्षा अधिक भाषा जगात बोलल्या जात होत्या. पंधरा-सोळाव्या शतकापासून दर्यावर्दी व्यापारी जगभर हिंडू लागले. प्रक्रियेत जास्त संख्येने बोलल्या जाणाऱ्या समृद्ध, प्रगल्भ, लष्करी बळ व व्यापारी समृद्धी असलेल्या देशांच्या भाषा कमजोर भाषिक गट स्वीकारू लागले किंवा जेत्या साम्राज्यकर्त्यांची भाषा हळूहळू नुसती बोलीभाषा नष्ट होऊ  लागल्या. १९९०च्या सुमारास वर्षांला अंदाजे २०० भाषा लयास जात होत्या. संज्ञापन व डिजिटल क्रांतीमुळे भाषिक संस्कृत्यांमधील संपर्क व आदानप्रदान एवढय़ा वेगाने वाढते, की दरसाल अस्तास जाणाऱ्या भाषांची संख्याही वाढली. बलदंड अर्थव्यवस्था असलेल्या देशांतील समृद्ध भाषा ज्या विविध शास्त्रांमध्ये संचार करू शकतात त्या टिकतील. येत्या शतकाच्या आत जागतिक व्यवहाराची, राजनीतीची, व्यापाराची, संवादाची, संगणकाची भाषा इंग्रजीसारखी एकच असेल. पण ती शेक्सपिअरची, इंग्लंडच्या राणीची, जवाहरलाल नेहरूंची किंवा सलमान रश्दींचीही इंग्रजी नसेल. जागतिक व्यवहारात थोडय़ाफार प्रमाणात कदाचित चिनी, हिंदी, स्पॅनिश, पोर्तुगीज, रशियन इत्यादी भाषा अस्तित्व टिकवून ठेवतील.

मराठीची उपेक्षा मराठी माणूसच करतो आहे. मराठी माणसाचे स्वभाषेविषयीचे प्रेम ढोंगी आहे, त्याची अस्मिता बेगडी आहे आणि भाषेविषयीचा अभिमान पोकळ आहे. हे असे होण्यामागे पुष्कळ ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक कारणे असू शकतील. तरीही एक गोष्ट नि:संदिग्धपणे सांगितली पाहिजे, ती अशी की, आपल्या दहा कोटी लोकांची मायमराठी मरणपंथाला वगैरे निश्चितच लागलेली नाही. मराठी मृत्यूपंथाला लागलेली नसेल तर ठिकठिकाणच्या व्यासपीठांवरून, चर्चासत्रांमधून, संमेलनांमधून असा केविलवाणा आक्रोश का बरे सुरू आहे? ती आजारी पडलेली आहे काय? तसेही दिसत नाही. मराठी भाषेचे अराजक माजल्यासारखे का वाटते?

मराठी समाजाचा मूलभूत न्यूनगंड, व्यापार-उद्यम व संपत्ती साधनेविषयीची उदासीनता, अतिरेकी सहिष्णुता व फाजील आत्मविश्वास यांचे जालीम मिश्रण; हिंदी भाषकांचे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत महाराष्ट्राच्या खेडय़ांसह सर्व भागांत वेगाने होत असलेले स्थलांतर; जागतिकीकरणाची प्रक्रिया, डिजिटल तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने, चित्रवाणी वाहिन्या यांमधील प्रगतीमुळे जगाचे जवळ येणे व परस्परावलंबन वाढणे; कल्पनातीत वेगाने होणारे जगाचे सांस्कृतिक सपाटीकरण; भाषारक्षणासाठी, अस्मितारक्षणासाठी एवढेच नव्हे तर घटनेने दिलेले भाषिक अधिकार बजावण्यासाठीदेखील शासकीय पातळीवर आणि मराठी भाषा अभ्यासकांमध्ये व साहित्यिकांमध्ये गांभीर्याचा, चिंतेचा इच्छाशक्तीचा, जिद्दीचा आणि रचनात्मक धोरणांचा अभाव.. या शक्ती मराठी भाषेवर प्रभाव टाकत आहेत.

शिखरस्थाने आणि संपन्न करिअर क्षेत्रे इंग्रजी शिक्षित शहरी मध्यमवर्गाने बळकाविली असून त्यामुळे मराठी माध्यमाच्या ग्रामीण तरुणांची प्रगतीची बंद झालेली दारे उघडायची असतील, तर ग्रामीण मुलांनी इंग्रजीचाच आश्रय घेतला पाहिजे. प्रगतीसाठी यापुढे मराठी उपयोगी नाही आणि मराठीला भविष्य नाही अशी तीव्र भावना जी मध्यम व उच्चवर्गीयांमध्ये होती ती आता सर्वच मराठी समाजात वाढू लागली आहे.  एकूणच महाराष्ट्र व मराठी समाज गेल्या अनेक दशकांत सर्वच आघाडय़ांवर मागे का पडू लागला आहे हे पाहायला हवे. त्यासाठी मराठी समाजाने, मराठी विचारवंतांनी व साहित्यिकांनी कठोर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी गेल्या ऐंशी-नव्वद वर्षांत एकूणच मराठी माणसाची मानसिकता कशी बदलली हे तपासले पाहिजे. खरे तर इंग्रजीच्या प्रभावशाली वर्तुळाने सर्व भारतीय भाषांवर जणू चेटूकच टाकले आहे; पण इतर बहुतेक भाषांतील लोक इंग्रजी शिडीचा उपयोग करून घेतात. मराठीतील सर्वसामान्य जनता इंग्रजीत कच्ची असेल; पण महाराष्ट्रातील बुद्धिवादी उच्चवर्गीय महाजन इंग्रजी भाषेत कमी पडतात असे कोण म्हणेल? ते देखील भारतीय बुद्धिवादी वर्तुळामध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा त्यावर ठसा उमटवू शकत नाहीत.

आजच्या क्षणी मराठी भाषेच्या भवितव्याची रेषा कोणत्या दिशेने जाते आहे, त्याचे निदान असे करता येईल. आठशे वर्षांचे समृद्ध काव्य व साहित्य लाभलेली, नऊ  कोटी लोकांची प्रगल्भ व सुंदर मराठी भाषा सहजासहजी नाहीशी होणे शक्य नाही, लवचिकता व प्रवाहीपणा ही लक्षणे तिने आत्मसात केली असल्याने संक्रमण काळातील आव्हाने स्वीकारण्यासाठी ती सक्षम आहे. त्यामुळे ती बदलते आहे. पुढील एक-दीड शतकात मराठी समाज जसा बहुभाषिक आहे तसाच राहील. मात्र त्यात गुणात्मक फरक असेल. ज्ञानभाषा म्हणून मराठी विकसित करण्याची संधी आपण गमावल्याने पुढच्या काळात मराठी समाज इंग्रजीचा किंवा जागतिक भाषेचा आधार ज्ञानभाषा म्हणून घेईल. ज्ञानेश्वरांपासून तो ढसाळापर्यंतचे उत्तमोत्तम मराठी साहित्य-संचित या बदललेल्या भाषेत त्यापुढील पिढीसाठी कसे न्यायचे, हा प्रश्न आपल्या व पुढच्या पिढय़ांना सोडवावा लागेल. मराठी भाषेची लवचीकता आणि प्रवाहीपणा यांना उत्तेजन देऊन नवनवी शब्दसंपदा आत्मसात करीत असताना मराठीचा आत्मा गमवायचा नसेल तर एक साधी गोष्ट मात्र करावी लागेल. आपला आळस व न्यूनगंड सोडून ज्ञानेश्वर- तुकारामाचे स्मरण करीत थोडीशी हिंमत धरून महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जिद्दीने शक्य तेथे मराठीत बोलायचे. आपल्याच राज्यात आपलीच भाषा बोलायला कसला संकोच किंवा शरम? तेव्हा या व्यासपीठावरून मराठीप्रेमी लोकांना एकच आवाहन करता येण्यासारखे आहे. लोकहो, महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मराठीत बोला.

First Published on September 26, 2017 4:55 am

Web Title: article on arun sadhu arun sadhu opinion on marathi language