अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. सुरुवातीला २५ डेमोक्रॅट्समध्ये तगडी स्पर्धा होती, आता आठ मैदानात उरलेत. त्यात जो बिडेन, तुलसी गॅबार्ड, एलिझाबेथ वॉरेन, बर्नी सँडर्स यांचा समावेश आहे. त्यांपैकी २०१६ मधील निवड प्रक्रियेत हिलरी क्लिंटन यांनी पराभव केलेले बर्नी सँडर्स हेच माध्यमचर्चाच्या केंद्रस्थानी आहेत. याचे कारण त्यांचे डेमोक्रॅटिक समाजवादी-पुरोगामी असणे.

सँडर्स यांच्या याच समाजवादी असण्यामुळे त्यांना तीव्र संघर्ष करावा लागेल, असा अंदाज ‘अल् जझिरा’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील वृत्तान्तात वर्तवला आहे. त्यांनी महत्त्वाचे प्रश्न पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणले, परंतु त्यांचा पाठपुरावा करताना संघर्ष अटळ आहे. सँडर्स यांनी पक्षापुढे ठेवलेल्या प्रस्तावांमध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण, प्रतितास १५ डॉलर किमान वेतन आणि सार्वत्रिक आरोग्यसेवा यांचा समावेश आहे. त्यांची स्वतंत्र अशी तगडी ओळख आणि छोटे देणगीदार यांच्यामुळे त्यांना फायदा होत आहे. त्यांनी आपले अग्रस्थानही कायम राखले आहे, अशी टिप्पणीही या वृत्तान्तात केली आहे.

‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील एका लेखात मात्र सँडर्स हे समाजवादी नाहीत, परंतु ते तसे जाहीर करत असल्याचे म्हटले आहे. त्या लेखात सँडर्स यांनी घेतलेल्या आघाडीबद्दल त्यांचे कौतुक केले असले, तरी ते समाजवादी कसे नाहीत हे स्पष्ट करण्याचा प्रयत्नही केला आहे. सँडर्स कोणत्याही अर्थाने समाजवादी नाहीत, त्यांना कोणत्याही मोठय़ा उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करायचे नाही, की बाजारपेठांचे केंद्रीकरण. मग ते स्वत:ला समाजवादी का म्हणवतात, असा प्रश्न उपस्थित करून- ते आपले व्यक्तिगत ‘ब्रॅण्डिंग’ करण्यासाठी तसे करीत आहेत; परंतु ते अध्यक्षपदाचे उमेदवार निवडले गेले तर त्यांनी स्वत:ला समाजवादी म्हणणे ट्रम्प यांच्या पथ्यावर पडेल, असा इशाराही लेखात देण्यात आला आहे.

सँडर्स यांच्या दीर्घ राजकीय प्रवासाचा विस्तृत वेध ‘बीबीसी’ने घेतला आहे. त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही उलगडले आहेत. सँडर्स यांना प्रतिकूल परिस्थितीत जिंकायला आवडते, असे निरीक्षणही ‘बीबीसी’ने नोंदवले आहे. त्यासाठी त्यांच्या पहिल्यावहिल्या राजकीय विजयाचा दाखला दिला आहे. १९८१ मध्ये बर्लिग्टनच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सँडर्स यांनी, अनेक दशके शहरावर वर्चस्व असलेल्या डेमोक्रॅटिक उमेदवाराचा पराभव करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ते १९९० मध्ये प्रथम अमेरिकी प्रतिनिधीगृहात अपक्ष म्हणून निवडून आले. त्या वेळी ४० वर्षांत अशी कामगिरी करणारे ते पहिले होते. गर्दी खेचणारे सँडर्स तत्त्वे आणि धोरणांच्या आधारावरच अमेरिकेची निवडणूक जिंकली जाऊ  शकते हे दाखवून देतील, असेही ‘बीबीसी’ने म्हटले आहे.

‘बीबीसी’च्या आणखी एका लेखात डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध बर्नी सँडर्स असाच अध्यक्षपदाचा सामना होऊ  शकतो, असे निरीक्षण नोंदवले आहे. रिपब्लिकन अध्यक्ष ट्रम्प यांचे डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी म्हणून सँडर्स आघाडीवर आहेत. त्यांना मिळणारा पाठिंबा उत्साही आहे, पण त्यांचा पक्ष आणि देश असा असामान्य उमेदवार स्वीकारण्यास तयार आहे का, असा प्रश्नही या लेखात उपस्थित केला आहे.

सँडर्स यांनी पक्षप्रतिस्पध्र्याच्या छातीत धडकी भरवली आहे. त्यामुळे या प्रतिस्पध्र्यानी कंडय़ा पिकवणे सुरू केले आहे, याची नोंद ‘द गार्डियन’मधील लेखात घेतलेली दिसते. स्वत:ला ‘डेमोक्रॅटिक सोश्ॉलिस्ट’ म्हणवणारे सँडर्स पक्षासाठी आपत्ती ठरतील, असा इशारा काही डेमोक्रॅट्स देत आहेत. जो बिडेन यांच्यासह सँडर्स यांचे काही प्रतिस्पर्धी कोणतेही पुरावे नसताना ‘सँडर्स ट्रम्प यांच्याकडून पराभूत होतील आणि तसे झाल्यास डेमोक्रॅट्ससाठी ते संकट ठरेल,’ असा इशारा देत असल्याची टिप्पणी ‘द गार्डियन’ने केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना बर्नी सँडर्स मात देतील का, याचा वेधही काही वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सँडर्स अमेरिकेचे अध्यक्ष?’ असा प्रश्नार्थक शीर्षकाचा लेख ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात अग्रगण्य नियतकालिकांतील तज्ज्ञांची मते आणि त्यांवर आधारित निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. सँडर्स नेहमीच अध्यक्षपदाचे दावेदार होते, परंतु त्यांच्या काही सामर्थ्यस्थळांमुळे काही डेमोक्रॅट्स उत्साही तर काही चिंतातुर आहेत, असे निरीक्षणही या लेखात नोंदवले आहे. ‘एनबीसी न्यूज’च्या संकेतस्थळावरील लेखातही सँडर्स यांच्याविषयी सकारात्मक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सँडर्स आपल्या उदारमतवादी दृष्टिकोनामुळे ट्रम्प यांना पराभूत करू शकतात, असे भाकीत या लेखात वर्तवले आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)