समीर गुळवणे

शरद ऋतू सुरू झाला की पुन्हा एकदा निसर्गाचा नव्याने कायापालट व्हायला सुरुवात होते. सुधीर मोघे यांच्या ‘कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले, त्याचे पंख परदेसी परी ओळखीचे डोळे’ या ओळी स्थलांतरित पक्ष्यांची आठवण करून देतात. दरवर्षी ठाणे शहर परिसर जणू अशा या स्थलांतरित पाहुण्यांचे स्वागत करायला सज्ज होऊन त्यांच्या वाटेवर डोळे लावून बसतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

ठाणे शहरात घोडबंदर रस्त्याच्या एक बाजूस येऊर आणि दुसऱ्या बाजूला नागला ब्लॉक असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे दोन भाग येतात. आणखी पुढे गेलात तर तुंगारेश्वर अभयारण्य! त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला ठाणे खाडी आणि कांदळवनांनी व्याप्त जंगल अशी निसर्गसंपत्ती लाभली आहे. या विविधतेमुळे अनेक स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची विविधता बघायला मिळते. ठाणे शहरात प्रामुख्याने आढळणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत कबुतरे, कावळे, कोकिळा, मैना, शिंजीर, घार, बगळे आणि कमी-अधिक प्रमाणात चिमण्या यांचा समावेश आहे. पण लाल बुडाचा बुलबुल, दयाळ, पोपट, पहाडी पोपट, खंडय़ा, नाचण, हळद्या, शिंपी इत्यादी मंडळी प्रत्यक्ष किंवा आपली मधुर संगीतातून नक्कीच भेट देऊन जाताना दिसतात. पण या सगळ्यांच्या पुढे जाऊन ‘पुक पुक पुक’ असा आवाज करून अनेक गल्ल्या गाजवणारा एक पक्षी आहे. श्री. ना. धों. महानोर यांच्या ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्लाल’ असे ज्याचे वर्णन करावे अशा तांबट नावाच्या पक्ष्याने ‘मुंबईचा पक्षी’ म्हणून किताब पटकावला आहे. स्थलांतरित पक्ष्यांच्या यादीमधील ‘नवरंग’ पक्ष्याची उपस्थिती त्याच्या सुरेख रंगामुळे आणि विशिष्ट शीळ घालण्याच्या पद्धतीमुळे शहरामध्ये प्रकर्षांने जाणवते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जंगलामध्ये सापडणाऱ्या अनेक प्रजातींची नोंद आहे. त्यात प्रामुख्याने राखाडी धनेश, स्वर्गीय नर्तक, कोतवाल, अनेक प्रकारचे सुतार पक्षी, शिक्रासारखे शिकारी पक्षी, तिबोटी धीवर, महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणजे पिवळ्या पायाची हरोळी असे अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. डॉ. सलीम अली या भारताला लाभलेल्या महान पक्षी निरीक्षकाच्या जीवनाला कलाटणी देणारी, ‘पितकंठी चिमणी’ येऊरमध्ये बघायला मिळते. दुर्दैवाने गिधाडे शहरातून नामशेष झाली आणि आम्ही घुबडेही हद्दपार केली. उंदीरवर्गीय प्राण्यांचे नियमन करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याने शहरात त्यांचे संवर्धन होणे जरुरी आहे.

ठाणे खाडीतील कांदळवन जंगलात तर ‘खाडीवरील रंगत न्यारी’ असेच म्हणावे लागेल. पाणथळ जागेतील विविध आणि असंख्य पक्षी ठाणे खाडीजवळ बघायला मिळतात. एकीकडे रोहित पक्ष्यांचे अग्निपंख पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. आता तर हे पक्षी पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहेत. तर दुसरीकडे शेकाटय़ा, चिंबोरी खाऊ , चिखल्या आणि छोटा तिलावा यांच्या शेकडोंच्या संख्येने आकाशात वेगाने होणाऱ्या कसरती पाहून अचंबा वाटतो. येथे आढळणाऱ्या नदी सुरय, अनेक प्रकारचे कुरव, तुतारी, चिखल्या, कैकर, समुद्री घार, बदके, करकोचा, चित्र बलाक, शराटी अशी अनेक पक्ष्यांची नावे घेता येतील. वन विभागातर्फे आयोजित नौकाविहार करून नागरिक पक्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ  शकतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानी जोपासावा असा हा छंद आहे.

एकीकडे सतत अधिवास नष्ट होण्याचे संकट असले तरी सुदैवाने निसर्गसंपत्तीबरोबर ठाण्याला निसर्गप्रेमी आणि जागरूक नागरिकही लाभले आहेत. होप, फर्न, पर्यावरण दक्षता मंच, येस यांसारख्या अनेक संस्था व निसर्गप्रेमी गट या क्षेत्रात कार्यरत आहेत. होप आणि पर्यावरण दक्षता मंडळातर्फे २०१३ ते २०१९ पर्यंत दर वर्षी नागरिकांच्या मदतीने पक्षीगणना करण्यात आली. त्यात पक्ष्यांच्या प्रजाती आणि संख्या याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. सन २०१३ पासून आत्तापर्यंत एकंदरीत २५२ प्रजातींची नोंद या गणनेतून झाली आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू ठेवणे जरुरी आहे. सन २०१७ मध्ये याच दोन संस्थांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या सहभागाने ठाणे शहरात चिमणीगणना केली. या सर्वेक्षणात ठाण्यातील विविध भागात चिमण्यांची संख्या कमी-अधिक प्रमाणात आढळून आली. कुठल्या अधिवासात त्या जास्त वावरताना दिसल्या तसेच रस्ते रुंदीकरण आणि बांधकाम यामुळे त्यांच्या संख्येवर होणारा परिणाम अशी उपयुक्त माहिती पुढे आली. एकंदरीत सांगायच तर ठाणे शहर परिसराला अत्यंत सुंदर पक्षीसंपदा लाभलेली आहे. विविध आकाराच्या, रंगांच्या पक्ष्यांनी आणि त्यांच्या सुरेल संगीताने हा शहर परिसर सजला आहे. आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून त्याचा आनंद घ्यायलाच हवा. व्यंकटेश माडगूळकरांच्या शब्दात सांगायचे तर

‘आपल्या जीवनात फुरसतीचा एक लांबलचक भरजरी पदर असावा..’

मला असे वाटते हा आपला फुरसतीचा पदर भरजरी करण्यात पक्ष्यांचा मोठा वाटा आहे.

(लेखक ठाण्यातील निसर्ग अभ्यासक आहेत.)