14 August 2020

News Flash

शेत शिवारातील बोगस डॉक्टर

वैद्यकीय क्षेत्रात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम आरोग्य विभाग नेहमी हाती घेते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात

चुकीच्या सल्ल्यामुळे राहुरी तालुक्यातील रोगग्रस्त झालेल्या डाळिंब बागेची पाहणी करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ.

अशोक तुपे

माणसावरील उपचार करणाऱ्या वैद्यकीय पेशात जसे काही बोगस डॉक्टर घुसलेत तसेच आता कृषी क्षेत्रात त्यातही डाळिंबाच्या बागांमध्येही या ‘स्वयंघोषित सल्लागारां’चा सुळसुळाट झाला आहे. या अशा बनवेगिरीमुळे शेती आणि शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम आरोग्य विभाग नेहमी हाती घेते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. एखाद्या निष्णात डॉक्टरांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना औषधांची तोंडओळख होते. कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना जुजबी ज्ञानाच्या आधारे हे बोगस डॉक्टर रुग्णावर उपचार करतात. पण कधीकधी ते रुग्णांच्या जीवावर बेतते. पण त्यांच्यावर किमान गुन्हे तरी दाखल होतात. पण आता कृषी क्षेत्रात असे कन्सल्टंट ,डॉक्टर, सल्लागार अशी वेगवेगळ्या नावे किंवा स्वयंघोषित पदव्या घेऊन काही लोकांनी धंदा मांडलाय. त्यांनी एकतर उत्पादन खर्च वाढविला पण शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. शेतीत प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्यात त्यांनी धुमाकूळ घातलाय. डाळिंबावर आलेल्या रोगाच्या पाहणीसाठी गेलेल्या कृषी शास्त्रज्ञांना बोगस डाळिंब डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे झालेले नुकसान अनुभवायला मिळाले.

राज्यात  रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड सुरू होण्यापूर्वी सन १९८९-९० मध्ये डाळिंब पिकाखाली ७७०० हेक्टर क्षेत्र होते. पण आता दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्रांत डाळिंब पिकांची लागवड  झाली आहे. नगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्य़ात डाळिंब लागवड वाढली आहे. नगदी असलेले पीक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देते. त्यामुळे या पिकाकडे शेतकरी वळले आहेत. हल्ली बहुतेक डाळिंब उत्पादक हे खत व्यवस्थापन, रासायनिक औषधे, बागांची निगा आदी करिता सल्लागार नेमतात. अनेकदा त्यांना डाळिंब डॉक्टर, कन्सल्टंट, मार्गदर्शक असे म्हणतात. यातील काही कृषी पदवीधर आहेत, तर काही कृषी पदविकाधारक आहेत. पण काही डॉक्टर हे आठवी, नववी झालेले आहेत. ते पूर्वी फवारणीचे काम करत होते. हे काम करता-करता अनुभवाने काही थोडेफार डाळिंब पिकाचे संगोपन कसे करायचे ते शिकले; पण त्यांना फारसे तंत्रज्ञान माहीत नाही. काही विविध कंपन्यामध्ये मार्केटिंग करत होते. कंपनीच्या औषधांचे मार्केटिंग करताना ते ‘डाळिंब डॉक्टर’ झाले. जुजबी ज्ञानावर ते सल्लागाराचे काम करत आहेत पण त्यांनीच आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

टोमॅटो, द्राक्ष, मिरची, टरबूज, खरबूज या पिकातही ते सल्लागार आहेत. एकरी चारशे ते पाच हजार रुपये शुल्क ते घेतात. त्यांचा थेट शेतकऱ्यांबरोबर संपर्क असतो. अनेक कंपन्या व कृषी सेवा केंद्राचे चालक त्यांना औषधे खपविण्यासाठी कमिशन देतात. त्यातून हे डॉक्टर चांगलेच भरभराटीला आले आहेत. एकटय़ा नगर जिल्हयात त्यांची संख्या शेकडय़ाच्या घरात आहे. अगदी महात्मा फुले कृषी विद्यपीठाजवळ राहुरी शहरात असे दहावी नापास झालेले डाळिंब किंवा शेतीचे डॉक्टर आहेत. कृषी शस्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्याऐवजी या बोगस डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण अशा बोगस सल्लागारांमुळे डाळिंब उत्पादक चांगलेच गोत्यात आल्याचे पाहायला मिळाले.

नगर जिल्ह्य़ातील संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर आदी भागांत पुन्हा तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मर रोगही आला आहे. यंदा एक जूनपासून पाऊस सुरू आहे, ढगाळ हवामान आहे. आद्रता जास्त आहे. त्यामुळे जिवाणू व बुरशीजन्य रोग वाढले आहेत. त्यातून यंदा डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच राहुरी तालुक्यातील कानडगाव, कणगर, चिंचविहिरे व सात्रळ या गावातील शेतकऱ्यांच्या डाळिंबावरील तेल्या, मर तसेच बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाच्या बागांना भेट देऊन पहाणी केली. या पथकामध्ये विद्यापीठातील कोरडवाहू फळ पिके संशोधन योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत कुलकर्णी, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळूंज, रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे आणि विषय विशेषज्ञ प्रा. अन्सार अत्तार, उपविभागीय कृषि अधिकारी  संजय काचोळे यांचा समावेश होता.

या भेटी दरम्यान काही बागांवर जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांची तीव्रता ५० ते ७० टक्कय़ांच्या दरम्यान आढळून आली. तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव ५ ते १५ टक्कय़ांच्या दरम्यान आढळून आला. बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग व विविध किडींच्या प्रादुर्भावाची कारणे याचा त्यांनी शोध घेतला. रोगास पोषक हवामान, उशिरा बहार धरणे, लागवडीमधील कमी अंतर, घनदाट शाखीय वाढ व त्यामुळे बागेमध्ये तयार झालेले रोगास पोषक हवामान, अनावश्यक रसायनांच्या (बुरशीनाशकांच्या/सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या) वारंवार फवारण्या तसेच साठलेल्या पाण्याचा निचरा न होणे, तण व्यवस्थापनाचा अभाव, बागेमधील अस्वच्छता (रोगट पाने व फळे बागेच्या आवारात विखरून पडलेल्या अवस्थेमध्ये) एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव. या भेटीदरम्यान हा बोगस डॉक्टरांमुळे निर्माण केलेला मोठा गोंधळ समोर आला.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी जी रासायनिक औषधे वापरली होती. त्यांची शिफारस विद्यापीठाने केलेली नव्हती. विशेष म्हणजे संजीवकांचा बेसुमार वापर करण्यात आला होता. अनेक औषधे काय आहेत, त्यांचे नाव काय, कशासाठी वापरतात. त्याचा उल्लेख नव्हता. सेंद्रिय, जैविक, ऑरगॅनिक असे नावे सांगून ती शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आली होती. हुमीक अ‍ॅसिड, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ग्रोथ रेग्युलेटर, टॉनिक अशा नावाने ती शेतकऱ्यांना देण्यात आली होती. त्याची फवारणी बागावर करण्यात आली होती. मध्यंतरी पीजीआर ( प्लँट ग्रोथ रेग्युलेटर) यांना बंदी घालण्यात आली होती. पण आता ती उठली असून त्यातून हा गोरख धंदा सुरू आहे. त्यांची शिफारस शेतीत सुळसुळाट झालेले ‘बोगस डॉक्टर’ करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. काहींनी चुकीची बुरशीनाशकांची व औषधांची शिफारस केली होती. असे या पथकातील डाळिंब शास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळूंज यांनी सांगितले. रोगशास्त्रज्ञ डॉ प्रकाश मोरे यांचाही तोच अनुभव आहे. ते म्हणाले तेल्या, मर, तसेच अन्य कोणत्या रोगावर कोणती औषध मारायचे यांची एक शिफारस आहे. पण या सल्लागारांनी चुकीच्या शिफारशी केल्या त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. असेही निदर्शनास आले.

तेल्या व मर रोग येण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पण चुकीचे मार्गदर्शन तेवढेच कारणीभूत आहे. संगमनेर येथील कृषी विभागातील उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे सांगतात की काही सल्लागार चुकीचे किंवा अज्ञानातून चुकीचा सल्ला देतात.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. असे शेतीतील बोगस डॉक्टरांना रोखणारी व्यवस्था नाही, कायदा नाही. कृषी विभागाच्या अधिकार नाही. शेतकऱ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. हल्ली शेत शिवारात फोफावलेल्या या बोगस डॉक्टरांना दूर केले पाहिजे. द्राक्ष शेतीत पूर्वी त्यांची चलती होती. पण आता त्यांना कोणी विचारत नाही. द्राक्ष उत्पादकांनी स्वत: तंत्रज्ञान आत्मसात केले. म्हणून ते पुढे गेले. आता डाळिंब उत्पादकांनी तो मार्ग चोखाळला पाहिजे.

कांदा, कापूस, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो या नगदी पिकांवर कीड व रोग जास्त येते, अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी खते व संजीवके जास्त वापरतात. विविध रसायने वापरली जातात. त्याच्या शिफारशी कृषी विध्यापीठे व विविध संशोधन संस्थानी केलेल्या आहेत. पण अनेकदा अधिक उत्पादन घेण्याच्या नादात या बोगस डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. गावोगावी कृषी सहाय्यक असतात. तसेच किसान वाहिनीवरून दूरध्वनी केला की शेतकऱ्यांना मोफत सल्ला मिळतो, कृषी विध्यापीठे दैनंदिनी प्रकाशित करतात. त्यांची संकेतस्थळ असते. दूरध्वनी क्रमांक दिलेले असतात. त्यावर दूरध्वनी केला की माहिती मिळू शकते. पण गावोगाव येऊन सल्ला देणाऱ्या बोगस डॉक्टरच्या मार्केटिंगला अनेक जण बळी पडतात. अन् त्यांचा सल्ला शेतकरी घेतात. हल्ली गावोगावी अनेक खते व औषध विक्री करणारे दुकाने सुरू  झाली आहेत. त्यातील अभ्यास असणारे शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन करतात. पण आता टॉनिक विक्रीत नफा जास्त मिळतो, ऑरगॅनिक खते व औषधात नफा अधिक असतो, त्यामुळे अनेकदा बोगस खते विकून नफा मिळविणारे खूप वाढले आहेत. बोगस औषधांचा सुळसुळाट झाला आहे. त्यात रसायने असतात. पण ही रसायने पिकाचे शरीरशास्त्र बिघडवते. त्यातून पिके वाचवताना मग नाकीनऊ  येतात. एकूणच बोगस डॉक्टर हे शेतीत धोकादायक बनले आहेत. फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काही सल्लागार तयार झाले आहेत. त्यातील काही ग्रुप हे तज्ज्ञांचे आहेत. पण काही फेक असतात. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

चांगले सल्लागार फायदेशीर

सध्या कृषी पदवीधरांची संख्या वाढली आहे. ते गावोगाव कृषी सेवा केंद्र टाकतात. किंवा सल्लागार म्हणून काम करतात. त्यांना शेतात काम करताना अनुभव येतात. ते प्रयोग करतात. सुरुवातीला त्यांनी काही खते व औषध विक्री करणाऱ्या कंपन्यात काम केलेले असते. अनुभवावर ते सल्लागार बनतात. ते शास्त्रज्ञांच्या व प्रगतशील शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यांचा सल्लागार म्हणून अनुभव गरजेचा असतो. चागल्या डॉक्टरकडे गेले की रुग्णाला आराम मिळतो. तसेच चांगल्या सल्लागाराचा सल्ला मोलाचा ठरतो. पण बोगस डॉक्टरच्या वाटय़ाला न गेलेले बरे.

ashok.tupe@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 12:20 am

Web Title: article on bogus doctor on the farm abn 97
Next Stories
1 केळी उत्पादकांचे टाळेबंदीतील यश
2 Maharashtra CM Uddhav Thackeray birthday : कणखर.. पण मातृहृदयी
3 Maharashtra CM Uddhav Thackeray birthday : कुटुंबवत्सल मुख्यमंत्री
Just Now!
X