संतोष मासोळे

बोर हे तसे कमी पाणी असलेल्या भागात घ्यायचे फळपीक. फळबाग लागवड योजनेनंतर राज्यात अनेक भागात बोराची लागवड केली गेली. परंतु या लागवडीनंतरही आज अनेकांना उत्पादन आणि त्यापासून उत्पन्नाच्या बाजूंवर अपेक्षित यश प्राप्त झालेले नाही. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्य़ातील बोर उत्पादनाची ही यशोगाथा..

liquor
परमीट रुममधील ‘मद्य’भेसळ आटोक्यात येणार! तपासणी यंत्र खरेदीसाठी शासनाची मान्यता
Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
water supply cut in mumbai
मुंबईवर पाणीकपातीची वेळ का?

बोर हे तसे कमी पाणी असलेल्या भागात घ्यायचे फळपीक. फळबाग लागवड योजनेनंतर राज्यात अनेक भागात बोराची लागवड केली गेली. परंतु या लागवडीनंतर अनेकांना उत्पादन आणि त्यापासून उत्पन्नाच्या बाजूवर अजून अपेक्षित यश प्राप्त झालेले नाही. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्य़ातील विजय देवराम बेहरे यांची बोराची शेती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे आकर्षण ठरली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या बोराची चव आणि देखणा आकार व्यापारी, ग्राहकांना भुरळ घालतो आहे.

धुळे तालुक्यातील बोरिस-लामकानी रस्त्यावर बेहरे यांची आठ एकर शेती आहे. यापैकी चार एकर जमिनीवर ३० वर्षांपूर्वी त्यांचे वडील देवराम बेहरे यांनी उमराण जातीची बोर लागवड करण्याचे धाडस केले. त्या काळात धुळे जिल्ह्यात कुठल्याही शेतकऱ्याने या हंगामी फळाचे कलम लागवडीचे धाडस केलेले नव्हते. अशा या बोराच्या यशस्वी लागवडीतील त्यांचे अनुभव आज या फळ उत्पादकांसाठी महत्त्वाचे ठरले आहेत.

जून-जुलैमध्ये लागवड केले जाणारे बोरांचे कलम त्यांनी १८ फूट बाय १८ फूट किंवा २० बाय २० अशा अंतराने लावले. पुरेसे अंतर ठेवल्यामुळे फळधारणा होईपर्यंत दोन झाडांच्या फांद्यांमध्ये गुंता झाला नाही. फळ झाडाचे संगोपन करताना खोड किडे किंवा अन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ  नये म्हणून औषधांची वेळेवर फवारणी केली. जमिनीचा पोत टिकून राहावा म्हणून रासायनिक खताऐवजी सेंद्रिय पद्धतीच्या खताला त्यांनी प्राधान्य दिले. हे सूत्र गेले ३० वर्षे त्यांनी सांभाळल्याने त्यांच्या शेतात आज कमीत कमी रासायनिक खतांचा अवलंब झालेला आहे.

मावा, तुडतुडे किंवा अन्य कीटकांचा प्रादुर्भाव होऊ  नये म्हणून झाडांची विशेष काळजी त्यांनी घेतली. मेमध्ये उन्हाचे प्रमाण अधिक असल्याने बोरांच्या झाडांच्या बुंध्याशी किंवा खोडांमध्ये किडय़ांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. सर्वत्र कोरडेपणा आणि कीटकांना अन्न मिळत नसल्याने बोरांच्या खोडाशी ते येऊ  शकतात. असे किडे खोडांमधील गर कुरतडत असल्याने त्याचा परिणाम झाडांच्या फांद्या, पानांसह येणाऱ्या फुलोऱ्यावर, फळांवर होऊ  शकतो. यासाठी काळजी घेत आवश्यकतेनुसारच त्यांनी पाण्याचे नियोजन केले. यासाठी वातावरणातील बदलांवरही त्यांनी सतत लक्ष ठेवले.  बेहरे यांच्या शेतात ठिबक यंत्रणा नाही. विहिरीचे पाणी थेट शेतातील प्रत्येक खोडाशी सोडले जाते. झाडावर फलधारणेपूर्वा येणाऱ्या फुलांच्या पूर्ततेसाठी आणि पानांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या औषधांची फवारणी ते करातत. घरातील सदस्य आणि बैलजोडी यांच्या मदतीतून बेहरे कुटुंबीयांनी अशा पद्धतीने बोराची ही शेती जोपासली आहे. या साऱ्यांचे फलित म्हणून गेले तीस वर्षे त्यांच्या बागेतील हे प्रत्येक झाड चविष्ट बोरांनी लगडलेले दिसत आहे. त्यांच्या चार एकर क्षेत्रात साडेपाचशे झाडे आहेत. एका हंगामात एक झाडापासून त्यांना साधारणपणे अडीच ते तीन क्विंटल बोरांचे उत्पादन मिळत आहे. मात्र तरीही त्यांच्या बोरांना असलेली चव आणि त्याचा आकार यामुळे त्यांना येणारी मागणी ते आज पूर्ण करू शकत नाहीत.

त्यांच्या बोरांना परराज्यातून मोठी मागणी आहे. बेहरे यांच्या शेतातून काढण्यात आलेली बोरं जयपूर, सिलिगुडी, पाटणा यांसह अन्य ठिकाणी पुरविली जातात. प्रत्येकी १० किलो वजनाच्या खोक्यांमधून परराज्यात जाणाऱ्या बोरांना प्रचंड मागणी आहे. बेहरे यांच्या शेतातून जेवढी बोरं निघतील, तेवढी खरेदी करण्याची तयारी व्यापारी, विक्रेत्यांनी दर्शविली आहे. बोराच्या शेतीतून खर्च वजा जाता त्यांना वर्षांला किमान १२ लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळत आहे.

बोरांचे कलम लागवड केल्यानंतर झाडांची वाढ कमी असेपर्यंत कडधान्याचे आंतरपीक घेता येते. पण असे कुठलेही पीक घेऊ  नये, असे बेहरे यांचे म्हणणे आहे. आंतरपीक घेण्याच्या मोहातून बोरांच्या झाडांचे अपेक्षित संगोपन होण्यास अडथळे येऊ  शकतात. आंतरपिकाचे उत्पन्नही अपेक्षेप्रमाणे मिळू शकेल याची शाश्वती नसते, असा दाखला ते देतात.

बेहरे यांनी १९९०-९१ मध्ये उमराण जातीच्या बोरांची लागवड केली. गेल्या ३० वर्षांपासून ढगाळ आणि बदलणाऱ्या हवामानाचे आव्हान स्वीकारत बेहरे यांनी बोरांचे विक्रमी उत्पादन घेण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प पूर्णत्वास गेल्याचे बेहरे यांच्या शेतात भेट दिल्यावर लक्षात येते. बोराच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेता येते हे त्यांनी सिध्द केले. परिसरातील शेतकरीही त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. एकाच फळाच्या लागवडीतून सलग ३० वर्ष घेतले जाणारे मुबलक उत्पादन अन्य शेतकऱ्यांसाठी आकर्षण आणि उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या प्रयोगाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने देखील त्यांना ‘महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे.