22 January 2021

News Flash

कर्तव्यनिष्ठ सहृदयी

कॅ. बयास अधिकारी म्हणून जितके कर्तबगार होते, तितकेच माणूस म्हणून हळव्या मनाचे होते.

प्रवीणसिंह परदेशी

लष्करी अधिकारी म्हणून कर्तबगारी दाखविलेले, स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थानाच्या विलीनीकरणात मोलाची भूमिका निभावणारे आणि तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या सुरक्षा दलाचे प्रमुख राहिलेले कॅप्टन मोहनसिंह बयास यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयीचे हे टिपण..

कॅप्टन मोहनसिंह बयास हे माझे आजोबा. यांनी आपल्या सेवेची सुरुवात लष्करी जीवनातून केली. ‘रॉयल आर्मी ऑफ कोल्हापूर’ महाराजांच्या ‘राजाराम रायफल’मध्ये ते लष्करी अधिकारी म्हणून दाखल झाले. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती शहाजी राजे यांचे ते ‘एडीसी’देखील होते. ब्रिटिश अमलाच्या या काळात कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना जबाबदारीच्या पदावर नेमले जाई व त्या प्रकारे त्यांची निवडही केली जाई. त्या वेळी अफगाण सीमेवर असलेल्या ‘लँडी कोताल’ या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या शांतीसेना काम करीत होत्या, त्यात कॅप्टन बयास यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. बंडखोर पख्तून कबिलेवाल्यांना नियंत्रणात ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. तिथल्या डोंगरात भटकणे आणि चुकार पक्ष्यांची शिकार करणे, हा त्यांचा छंद होता. कॅ. बयास अधिकारी म्हणून जितके कर्तबगार होते, तितकेच माणूस म्हणून हळव्या मनाचे होते.

स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थानाच्या विलीनीकरणातल्या वाटाघाटींत मोहनसिंह बयास यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. शेवटच्या टप्प्यात जी संस्थाने विलीन झाली, त्यात कोल्हापूर होते. छत्रपतींनी बडोदा संस्थान विलीन होईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला होता. पुढे सरदार पटेल आणि व्ही. पी. मेनन यांना भेटण्यासाठी मोहनसिंह छत्रपती शहाजी राजेंबरोबर गेले होते. पटेलांनी अखेर छत्रपतींना विलीनीकरणासाठी राजी केले. आजोबा आठवणीने सांगायचे, पटेलांबरोबर खासगी बैठक संपवून छत्रपती बाहेर आले, तेव्हा त्यांनी आजोबांना दु:खाने मिठी मारली आणि म्हणाले, ‘‘मोहन, आपले कोल्हापूर गेले.’’

आजोबा निसर्गाचे चांगले अभ्यासक होते. शिकार हा त्या वेळचा सहज प्रकार होता. एकदा विख्यात शिकारी आणि निसर्ग अभ्यासक जिम कॉर्बेट यांच्याबरोबर ते जंगलात फिरता फिरता ते एका ठिकाणी बसले. कॉर्बेट त्यांना म्हणाले, ‘‘मोहन, तू अजगराच्या वेटोळ्यावर बसला आहेस.’’ महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बिबटे, वाघ आणि हत्ती यांच्याबरोबरच्या त्यांच्या आठवणी त्यांनी ‘दांडेलीची वाघीण’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर ‘कोल्हापूर रायफल्स’ विसर्जित करण्यात आली. त्यानंतर मोहनसिंह यांनी राज्य पोलीस दलात काम करण्याचा निर्णय घेतला. डहाणू, सोलापूर, धुळे, अलिबाग या आजच्या शासकीय जिल्ह्य़ांत त्यांनी भरपूर काम केले. ‘एसीपी’ म्हणून नागपूर येथील त्यांचा सेवाकाळ लक्षणीय होता. जांबुवंतराव धोटे यांनी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनाला त्यांनी ज्याप्रकारे नियंत्रणात आणले, त्यामुळे त्यांचे नाव चांगलेच गाजले होते. या कर्तव्यदक्षतेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तरुण पोलीस अधिकारी म्हणून मोहनसिंह पंतप्रधान नेहरूंच्या सुरक्षा दलाचे प्रमुखही होते. ‘रीडर्स डायजेस्ट’ मासिकात त्यांची एक आठवण प्रकाशित झाली आहे. एकदा गर्दी नेहरूंच्या खूप जवळ आली. मोहनसिंहांनी सौम्य लाठीमार करून गर्दीला दूर केले. यावर नेहरू खूप चिडले. त्यांनी धावत येऊन ती लाठी ताब्यात घेतली आणि मोहनसिंहांना म्हणाले, ‘‘तुम्ही लोकांशी असे वागू शकत नाही.’’ यावर मोहनसिंह तत्काळ उत्तरले, ‘‘मी पोलिसांच्या संकेतानुसार माझ्या पंतप्रधानांचे रक्षण करीत आहे.’’ नेहरूंनी यावर स्मितहास्य केले. परंतु आजोबा जितके कर्तव्यकठोर होते, तितकेच कुटुंबवत्सल. निवृत्तीनंतरही ते पोलीस प्रशासनातील कितीतरी अडचणींवर मात करण्यासाठी नव्या अधिकाऱ्यांना सल्ला देत.

(लेखक ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 12:32 am

Web Title: article on captain mohansingh bayas zws 70
Next Stories
1 बचत वाढेल, तूट घटेल! 
2 अतिवृष्टीचे आव्हान!
3 साखर कारखानदारीची खडतर वाट!
Just Now!
X