24 September 2020

News Flash

‘व्यंगचित्रां’चा उच्छाद!

हिंसेचा सार्वत्रिक निषेध व्हायला हवा

(संग्रहित छायाचित्र)

महंमद पैगंबराची व्यंगचित्रे प्रसिद्ध केली म्हणून ‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकावर दहशतवादी हल्ला करणारी ‘आयसिस’ आणि मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र प्रसृत केले म्हणून कोणा एकावर मुंबईत हल्ला करणारे शिवसैनिक यांत गुणात्मक फरक नाही. काही वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढले म्हणून पश्चिम बंगालमध्ये एकाला अशाच ‘तृणमूल’ हल्ल्यास सामोरे जावे लागले. गाईचे मांस वाहून नेत असल्याच्या संशयावरून अनेकांवर जीवघेणे हल्ले करणारे असोत वा व्यंगचित्रांच्या प्रसृतीसाठी मारहाण करणारे हे कथित शिवसैनिक असोत! ते केवळ किडक्या सामाजिक व्यवस्थेचे निदर्शक ठरतात. या सर्व प्रकारच्या हिंसेचा तीव्र निषेध राजकीय पक्षनिरपेक्षपणे व्हायला हवा. कारण यात राजकारण वा समाजकारण नाही. ही शुद्ध गुंडगिरी ठरते. मुंबईतील मारहाणीची शिकार ठरलेली व्यक्ती निवृत्त नौदल अधिकारी आहे. केवळ याच मुद्दय़ावर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने दिलेला भर पाहता जणू काही अन्य कोणी असता तर एकवेळ हा हल्ला दुर्लक्ष करण्यासारखा ठरला असता, असा अर्थ निघू शकतो. तोही निंदनीयच. हिंसेचा सार्वत्रिक निषेध व्हायला हवा. मग ती गणवेशातील व्यक्तींकडून झालेली असो वा शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्यांकडून घडलेली असो. हिंसेला थारा नाही, असाच संदेश संबंधितांकडून जायला हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर रास्त कारवाई करावी. ज्या शिवाजी महाराजांचे नाव मुख्यमंत्र्यांची पक्षसंघटना उठताबसता घेते त्या शिवाजी महाराजांनी अशा गुन्ह्य़ास काय सजा केली असती, याचा विचार त्यांनी केल्यास कारवाईची दिशा त्यांना दिसेल. ..आणि दुसरे असे की मुख्यमंत्र्यांचे तीर्थरूप शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे उच्च दर्जाचे व्यंगचित्रकार होते. तेव्हा आपल्या शिवसैनिकांच्या कृतीने त्यांना काय वाटले असते याचाही विचार त्यांनी करायला हवा. बाकी सध्याचे राजकारण हीच मुळात जिवंत व्यंगचित्रांची भाऊगर्दी ठरते. पण ती हिंसक ठरत असेल तर हा व्यंगचित्रांचा उच्छाद आवरणे आवश्यक ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 12:18 am

Web Title: article on cartoons loksatta standpoint abn 97
Next Stories
1 धर्मादाय संस्थांची फरफट थांबवा!
2 अस्वस्थ वर्तमानातील कलाविष्कार
3 चाँदनी चौकातून : ट्रोल..
Just Now!
X